वणवा वैशाखाचा

Submitted by निशिकांत on 13 January, 2022 - 08:16

आठवणींच्या पुरात येतो
सदैव अनुभव रखरखल्याचा
श्रावणातही मनी पेटतो
प्रचंड वणवा वैशाखाचा

भल्या पहाटे ऐकत होतो
जात्यावर आईचे गाणे
साखरझोपेमधील स्वप्ने
बघावयाचा मी नेमाने
वांझोटा का छंद पाळला?
काल, आज मी जगावयाचा
श्रावणातही मनी पेटतो
प्रचंड वणवा वैशाखाचा

क्षणात गट्टी, क्षणात कट्टी
मनी कधी ना राग न हेवा
खुश असायला सर्वासंगे
कारण लागत नव्हते तेंव्हा
मुक्त विहारी धागा तुटला
शाळेमधल्या आयुष्याचा
श्रावणातही मनी पेटतो
प्रचंड वणवा वैशाखाचा

जीवनात मग वसंत आला
प्रवेश होता प्रीय सखीचा
दरवळलेले विश्व पाहिले
मोद आठवे क्षणोक्षणीचा
बघता बघता मोसम सरला
हवा हवासा मोहरण्याचा
श्रावणातही मनी पेटतो
प्रचंड वणवा वैशाखाचा

देठ असोनी हिरवा हिरवा
पिकून गेली दोन्ही पाने
मना वाटते झुळूक यावी
गळून जावे क्रमाक्रमाने
मागे, पुढती कोण? कधी? हा
निर्णय असतो दयाघनाचा
श्रावणातही मनी पेटतो
प्रचंड वणवा वैशाखाचा

वर्तमान हा जगावयाचा
काळ असावा, कधी न जमते
भूतकाळ वेताळ रुपाने
पाठीवरचे ओझे असते
गूढ असोनी भविष्य सारे
छंद मनोरे बांधायाचा
श्रावणातही मनी पेटतो
प्रचंड वणवा वैशाखाचा

निशिकांत देशपांडे, पुणे.
मो.क्र. ९८९०७ ९९०२३

Group content visibility: 
Public - accessible to all site users