अनाथांची माय

Submitted by दत्तात्रय साळुंके on 4 January, 2022 - 23:24

तू जगाचा पालनहार
देवकी अंतरताच
तुला राखलं यशोदेनं
गोकुळीचा तू लाडला
दह्यादुधात वाढला

आमची एक अनाथांची माय
तुझ्या वरचढ तिची करणी हाय

चिंधीचं महावस्र तिनं
ठिगळं जोडून केलं
अन अनाथांना पांघरूण दिलं
तू उघड्या डोळ्यांनी पाहिलं
द्रोपदीला वस्र पुरवणारा तू
तुझी लाज झाकायला
सिंधूताईनं आयुष्य वाहिलं

आज बहुदा तूच अनाथ झालास
अनाथांची माय घेऊन गेलास

देवा किती रे
स्वार्थी झालास
मी प्रत्येकाची आई
होऊ शकत नाही
म्हणून आईला जन्म दिला
असं तूच कधीतरी म्हणालास…

(ममतेचा महासागर माईंना भावपूर्ण श्रद्धांजली)
© दत्तात्रय साळुंके
5-01-2022

Group content visibility: 
Public - accessible to all site users