सुरू जाहले वेड लागावयाला

Submitted by निशिकांत on 4 January, 2022 - 08:40

सुरू जाहले वेड लागावयाला---

तिचे चित्र रेखाटता कुंचल्याने
सुरू जाहले वेड लागावयाला
वजा जाहलो मीच माझ्यातुनी अन्
अता शुन्य दिसतोय मी आरशाला

तिच्या फक्त एका कटाक्षात माझे
कसे विश्व बंदिस्त निमिषात झाले?
अशी वाढली चलबिचल का मनाची?
युगाचे कुठे स्थैर्य हरवून गेले?
कुठे ती? कुठे मी? तरी लागलो का?
दुराव्यात जवळीक शोधावयाला
तिचे चित्र रेखाटता कुंचल्याने
सुरू जाहले वेड लागावयाला

असा ना कुणी पहिला, मान ज्याची
तिला पाहण्याला न वळली कधीही
असो पोरसवदा तथा वृध्द कोणी
खुमारी रुपाची न घटली कधीही
कुणी उर्वशी, मेनका ती असावी
असे लागले पैज मारावयाला
तिचे चित्र रेखाटता कुंचल्याने
सुरू जाहले वेड लागावयाला

तिच्या चेहर्‍याचा तजेला नि लाघव
हुबेहुब उतरताच कॅन्व्हासवरती
उतरली जणू पौर्णिमाही बघाया
रुपाला कशी एवढी आज भरती?
पुन्हा एकदा सज्ज व्हा कुंचल्यांनो!
नवी जान चित्रात ओतावयाला
तिचे चित्र रेखाटता कुंचल्याने
सुरू जाहले वेड लागावयाला

तिचे चित्र जेंव्हा तिला भेट केले
तिने जे दिले हास्य, होते नशीले
रुजू लागली तत्क्षणी प्रीत कळले
नि सांगावया ओठ होते विलगले
कपारीत, अलवार ओल्या क्षणांना
उबारा सखे लागलो द्यावयाला
तिचे चित्र रेखाटता कुंचल्याने
सुरू जाहले वेड लागावयाला

निशिकांत देशपांडे, पुणे.
मो.क्र. ९८९०७ ९९०२३
( वृत्त--भुजंगप्रयात )

Group content visibility: 
Public - accessible to all site users