जसा बहरला कल्पतरू--( वीक एंड लिखाण )

Submitted by निशिकांत on 4 December, 2021 - 06:33

एखाद्या दिवसाचे पूर्ण जीवनात अतिशय महत्व असते. तसे सर्वच दिवशी कांही ना कांही घडत असते जे माणसाच्या आयुष्यात नगण्य असते. म्हणून बहुतेक दिवस "नेमेची येतो मग पावसाळा" या सदरात मोडणारे असतात. पण घरात नवीन अपत्याचे अगमन, मेहनतीने बांधलेल्या घराची वास्तुशांती, एखादी विशेष घडलेली घटना या मनात नेहमीसाठी जपाव्या अशा असतात आणि त्या जपल्याही जातात. सारे जीवनच एका अर्थाने आकारत असते. हे जीवनाच्या घाईगर्दीत ध्यानातही येत नाही. पण जेंव्हा शांतपणे मागे वळून बघतो किंवा सिंहावलोकन करतो तेंव्हा सारा जीवनपटच डोळ्यासमोरून तरळतो. अनेक सुखदु:खाचे पैलू दिसावयास लागतात आणि आपण कुठेतरी हरवून जातो. यालाच जीवन ऐसे नाव म्हणत असावेत.
मी आणि माझी पत्नी सौ. जयश्री दोघांनाही आवर्जून दरसाली आठवणारा आणि आमच्या दृष्टीने महत्वपूर्ण असलेला दिवस म्हणजे चार डिसेंबर ज्या दिवशी आम्ही विवाहबध्द झालो. ५२ वर्षापूर्वी आमच्या सहजीवनाची सुरुवात झाली. खूप चढउतार पाहिले जीवनात. या बद्दल जास्त बोलणे म्हणजे स्वतःची टिमकी वाजवल्यासारखे होईल म्हणून हा मोह टाळतो. पण जीवनात जे कांही चांगले घडले ते उत्कृष्ट आप्त, मित्र मंडळी, कर्यालयीन सोबती यांच्या सहकारामुळेच घडले हे मात्र नक्कीच. आजच्या या लिखाणाचे प्रयोजन या सर्वांच्या प्रती ऋण व्यक्त करणे हेच आहे. परमेश्वराचे ऋण तर वादातीत आहे. हे ऋण व्यक्त करण्यासाठी एकदा मी लिहिले होते ते असे:

हातामध्ये हात धरोनी वसंत आम्ही सवे पाहिला
जगून झाले यथार्थ जीवन, मोह न कुठला मनी राहिला

दयाघना तव छत्र कृपेचे असेच राहो उरल्यायुष्यी
म्हणून तुझिया चरणावरती कृतज्ञतेचा भाव वाहिला

एकदा आम्ही दोघे गत आयुष्याचा आढावा घेत होतो. गप्पा बर्‍याच रंगल्या ज्यात मुलेही सामील झाली होती. जवळ जवळ दोन तास हा कार्यक्रम चालू होता. अशा गप्पा झाल्यानंतर माझ्या मनात आले की आपण किती छान जीवन जगलो.! या एकमेव सकारात्मक विचारातून एक कविता आवतरली. या कवितेतून आम्हा दोघांचेही मनोगत व्यक्त होते. ही कविता आपणासमोर नम्रतेने पेश करतोय.

जसा बहरला कल्पतरू----

हिशोब करता आयुष्याचा
कांही आठवू, कांही विसरू
वळून बघता जीवन भासे
जसा बहरला कल्पतरू

जीवनातले कडे कोपरे
साठे माणिक मोत्यांचे
जेथे रमलो हळूच विणले
जाळे नात्यागोत्यांचे
कठीण समयी कधी न पडला
प्रश्न पुढे मी काय करू
वळून बघता जीवन भासे
जसा बहरला कल्पतरू

कष्टाविन का खडबड झाले
हात आपुले आज असे?
स्वतःच लिहिल्या नशीब रेषा
भाग्य आम्हाला हवे तसे
हिंमत आहे आकाशाला
कवेत अपुल्या सहज धरू
वळून बघता जीवन भासे
जसा बहरला कल्पतरू

खूप राहिलो सूर्य प्रकाशी
संध्या छाया दिसू लागल्या
आठवणींच्या लक्ष तारका
वेचू त्यातिल सर्व चांगल्या
सूर मारुनी खोल सागरी
मोत्यांच्या ओंजळी भरू
वळून बघता जीवन भासे
जसा बहरला कल्पतरू

धवल यशाची जणू पताका
जीवन करण्या शुभ्र साजरे
धाग्यांनी सुखदु:खाच्या विणले
आयुष्याचे वस्त्र गोजिरे
या वस्त्रावर आपण दोघे
इंद्रधनूचे रंग भरू
वळून बघता जीवन भासे
जसा बहरला कल्पतरू

कांगारूचे जीवन जगलो
पोटी धरुनी दोन मुले
काबिज केले लिलया त्यांनी
क्षितिजापुढचे क्षेत्र नवे
पैलतीर तो दिसू लागला
डोळे मिटुनी ईश स्मरू
वळून बघता जीवन भासे
जसा बहरला कल्पतरू

निशिकांत देशपांडे, पुणे.
मो.क्र. ९८९०७ ९९०२३

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान.
तुम्हाला दोघांना लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा. _/\_

खुप छान कविता!
तुम्हा उभयतांना विवाह वर्धापनदिनाच्या शुभेच्छा !! __/\__ Happy

>>>धाग्यांनी सुखदु:खाच्या विणले
आयुष्याचे वस्त्र गोजिरे>>>
किती सुंदर दृष्टिकोन...दु:खद धागेही गोजिरं वस्र बनवतात...असं निर्लेप असावं

खूप छान कविता! Happy
तुम्हा उभयतांना विवाह वर्धापनदिनाच्या शुभेच्छा !! __/\__ 

खूप छान कविता! Happy
तुम्हा उभयतांना विवाह वर्धापनदिनाच्या शुभेच्छा !!

हीरा, सामी, उपाशी बोक, देवकी, हार्प्र्न, मी_आर्या, साळुंकेजी, अस्मिता, देवभुबाबा आणि वावे, मनापासून आभार आपणा सर्वांचे दिल्खुलास प्रतिसाद आणि शुभेच्छांसाठी.