मूक आक्रंद--( वीक एंड लिखाण )

Submitted by निशिकांत on 27 November, 2021 - 09:08

कांही वर्षापूर्वी करम या संस्थेतर्फे एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यामधे वक्त्यांना विषय होता एकत्र कुटुंब पध्दती की विभक्त कुटुंब पध्दती योग्य. विषय तसा जुनाच आहे. यात चार पाच वक्त्यांनी भाग घेतला होता. ही भाषणे पूर्वार्धात झाल्यानंतर उत्तरार्धत याच विषयावरील कविता पण सादर झाल्या. मी या कार्यक्रमात आमंत्रित वक्ता आणि कवी म्हणून माझा सहभाग नोंदवला होता.
बर्‍याचजणांनी विभक्त कुटुंबपध्दतीची तरफदारी करताना प्रामुख्याने दोन मुद्दे मांडले. पहिला मुद्दा असा होता की वैयक्तिक गुणांना संयुक्त कुटुंबात पोषक वातावरण नसते. जीवन म्हणजे एक गुदमर असते. पावलोपावली इतर लोक काय म्हणतील, मुलांच्या वैयक्तिक विकासाकडे हवे तसे लक्ष देता येत नाही. मनाला मुरड घालत जगावे लागते. या सर्वात जीवनाचा आनंदच हरवून जातो.
या व्यासपिठावर मी एकटाच एकत्र कुटुंबपध्दतीचा पुरस्कार करत होतो. याला कारणही तसेच होते. मी एका जंबो एकत्र गरीब कुटुंबात जन्मलो आणि वाढलेला होतो. मी या बद्दल आधिकाराने बोलू शकतो. मला आठवते आमच्या घरी जेवायला बसले  तर जेवणार्‍यांची संख्या पस्तीस ते चाळीसच्या घरात असायची. खरे वाटणार नाही कदाचित कुणाला. आणि हा मुद्दा मी पुण्यात, जिथे विभक्त पधदती पोसलेली आहे,  तिथे मांडत होतो. मी स्वतः अनुभवलेलं आहे की माझे वडील नोकरी वगैरे करत नसतानाही आम्हा भावंडाचे पालनपोषण झाले. एकत्र कुटुंबात कुणी उपाशी रहात नसत. एक महत्वाचे म्हणजे बाँडिंग खूप घट्ट असते हे निश्चित! अजून एक महत्वाचा मी मांडलेला मुद्दा असा की विभक्त कुटुंबातील मुले होत असलेल्या लाडामुळे खूप आत्मकेंद्रीत असतात. त्यांना आपले कांही  इतरांशी शेअर करणे हा प्रकार माहीतच नसतो. बहुतांश मुले चिडखोर असतात.त्यांना घरच्या आई बाबांचे लक्ष शंभर टक्के हवे असते.  इगोईस्टही असतात. एकत्र कुटुंबातील मुले जास्त सहनशील असतात. आयुष्यातील धक्के सहन करायची शक्ती त्यांच्यात जास्त असते. शेवटी मी म्हणालो की प्राणी पण कळपाने रहातात; तर माणसाला का अवघड वाटावे?
हा कार्यक्रम खूप यशस्वी झाला. पण हा विषय कांही माझी पाठ सोडेना!
आजच्या बदलत्या जीवनशैलीचा जीवनावर होणार्‍या परिणामांचा परामर्ष घेणे  गरजेचे आहे असे  वाटते. आपली आर्थिक परिस्थिती, वाढत्या गरजा,  वैयक्तीक महत्वाकांक्षा, विभक्त कुटुंबपध्दतीत नवरा बायको या दोघांनाही नोकरी करण्याची गरज या गोष्टी मध्यम वर्गीयांच्या जीवनावर खूप परिणाम करत आहेत. आपल्या मुलाचे चांगले पालनपोषण व्हावे म्हणून एक मूल कुटुंबशैली आता बर्‍यापैकी स्थीर झाली आहे. हे सर्व होणे अपरिहार्य आहे. पण या बदलाचे अनेक पैलू आहेत.

वर्किंग कपल्सच्या मुलांवर याचा परिणाम नक्कीच होतो आहे. आईला इच्छ असूनही मुलांना वेळ देणे जमत नाही. पण मुलांच्या वाट्याला उपेक्षा येते हे कुणाच्या ध्यानात येत नाही. बाळाला पाळणा घरात ठेवणे, त्याला सांभाळण्यासाठी आया ठेवणे या सर्व बाबीत मुलांची हेळसांड तर होतेच होते. मी कल्पना केली की अशा एखाद्या मुलाला अशी व्यथा सांगावयाची असेल तर तो काय सांगेल? त्याच्या मनात खदखदणार्‍या भावना असतीलच. अशा मुलांचा आक्रंद या रचनेत मांडण्याचा प्रयत्न केला आहे. माझा कोणाचीही टिका करण्याचा हेतू नाही. बघा प्रयत्न यशस्वी झाला आहे का ते!

थोपवावे मी कसे?

पेटलेल्या काहुराला
शांतवावे मी कसे?
भावनांच्या वादळांना
थोपवावे मी कसे?

पाळणाघर विश्व माझे
माय करते नोकरी
ऊब मायेची न तेथे
दु:ख सलते अंतरी
गात अंगाई स्वतःला
झोपवावे मी कसे?
भावनांच्या वादळांना
थोपवावे मी कसे?

खेळणी भरपूर आहे
खेळतो मी एकटा
ना मला ताई न दादा
मीच मोठा, धाकटा
काचणार्‍या वेदनांना
जोजवावे मी कसे?
भावनांच्या वादळांना
थोपवावे मी कसे?

अक्षरे गिरवून घेण्या
माय ना बाबा घरी
शिक्षणाचे तीन तेरा
मी रित्या कलशापरी
चित्र भावी जीवनाचे
रंगवावे मी कसे?
भावनांच्या वादळांना
थोपवावे मी कसे?

कोक देते, चिप्स देते
ती घरी आल्यावरी
वेळ फिरवायास नसतो
हातही पाठीवरी
तृप्ततेचे स्वप्न नेत्री
जागवावे मी कसे?
भावनांच्या वादळांना
थोपवावे मी कसे?

जन्म पुढचा द्यायचा तर
दे मला गरिबा घरी
हक्क आईचा मिळावा
ऐक माझे श्रीहरी
दु:ख तुज सोडून इतरा
दाखवावे मी कसे?
भावनांच्या वादळांना
थोपवावे मी कसे?

निशिकांत देशपांडे, पुणे.
मो. क्र. ९८९०७ ९९०२३

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खरंय, एकत्रित कुटुंब पद्धतीचं चांगली . मुलांचं बालपणं असो की वयस्करांचं म्हातारपणं, एकत्रित कुटुंबात अश्या वेळी जो आधार असतो तो पाळणाघरात आणि बंद दारात मिळत नाही.