शार्क परी ओशन रॅमसे

Submitted by मुक्ता.... on 27 November, 2021 - 07:34

डाऊन द मेमरी लेन

शार्कपरी: ओशन रॅमसे
(Ocean Ramsey and the sharks)

रॅमसे म्हटलं की हॉरर सिनेमा समोर येतो ना? आणि त्यात शार्क म्हटलं की तोबा तोबा. पण इथे शार्क विषयी आहे मात्र हॉरर चा काहीही संबंध नाही.

अमेरिकेतल्या हवाई इथे घर असणारी ओशन रॅमसे ही खरतर जलपरी त्यातूनही शार्कपरी म्हणायला हवी. नावातच समुद्र आहे ना. खरतर ही तीस वर्षीय जलपरी एक फॅशन मॉडेल होती. वयाच्या विशीत म्हणे तिने खूप मॉडेलिंग केलं. पण वयाच्या चौदाव्या वर्षीपासून समुद्राशी संधान साधलय ओशन ने. वयाच्या अवघ्या 14व्या वर्षी तिने शार्क बरोबर कुठलाही पिंजरा किंवा सुरक्षा कवच न वापरता फ्री डायविंग केलं होतं. अशी ही वेडी फ्री सी डायवर आहे. मॉडेलिंग सोडून तिने मरीन बायोलॉजिस्ट अथवा समुद्री जिवंशास्त्रज्ञा होणं स्वीकारलं. ओशन म्हणते, तिला तिच्या आई व बाबा यांच्यामुळे समुद्राची आवड निर्माण झाली. ती गेली कैक वर्ष शार्क कॉन्झर्वेशन आणि अवेअरनेस साठी काम करते आहे. तिची आणि तिच्या मित्राची स्वतःची अशी डायविंग कँपनी आहे. हवाई येथे. त्यांची मरिन बायोलॉजिस्ट ची टीम आहे जी शार्कबरोबर आणि समुद्री डायविंग करण्यासाठी काम करते. लोकांना समुद्रात घेऊन जाते आणि प्रशिक्षण पण देते. ओशन अनेक देशात काम करते आहे ते शार्क माशांच्या कमी होणाऱ्या संख्येसाठी. शार्क या समुद्री जीवाविषयी अनेक गैरसमज प्रचलित आहेत. टीव्ही, सिनेमा यातून त्यांना राक्षस दाखवण्यात येते. आशिया खंड तसेच अनेक किनाऱ्यांवरती शार्क ची हत्या केली जाते ती त्यांच्या डोर्सल फिन साठी. अनेक खवय्यांना त्याचे सूप आवडते. तसचं इतर अनेक उपयोग,की दुरुपयोग यासाठी शार्क ना मारून त्यांची तस्करी केली जाते. याचे प्रमाण 1980 ते 2000 च्या दरम्यान जास्त होते.या अवैध शिकारी बरोबर त्यांचा माणसाला तथाकथित असलेला धोका आणि नसते छंद म्हणूनही शार्क ची शिकार होत राहिली.

याचा परिणाम म्हणून शार्क माशांचे प्रमाण लक्षात यावे इतके कमी झाले. त्यांच्या अनेक प्रजाती नष्ट झाल्या. ओशनला या वस्तुस्थितीची जाणीव होती. ती खूप अस्वस्थ झाली. तिने या बाबतीत जनजागृती करायचा निर्णय घेतला. ओशन चे काम सरळ नव्हतेच.पण ती ठाम राहिली.आज पूर्ण जगात तिच्या कामाविषयी दखल घेतली गेली आहे.
ओशन प्रसिद्ध आहे ती शार्क माशांबरोबरच्या फ्री डायविंग साठी. तिच्या 'गो प्रो' वरच्या ग्रेट व्हाइट शार्क बरोबरच्या फ्री डायविंग व्हिडीओ मुळे ती खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आली. ग्रेट व्हाइट शार्क, बुल शार्क, टायगर शार्क, हॅमर हेड शार्क इत्यादी अत्यंत तापट आणि अग्रेसीव शार्क बरोबर तिने फ्री डायविंग कुठलेही सुरक्षा कवच न वापरता आणि फ्री डायविंग म्हणजे ऑक्सिजन सिलिंडर न वापरता. खरच कमाल आहे. आजपर्यंत तिला कोणत्याही शार्क ने इजा केली नाही. तरीही तिचे सहकारी तिची खूप काळजी करतात. तिला मॉडेलिंग साठी आताही ऑफर येतात पण ती म्हणते की एखादी असाईन मेंट येते तेव्हा ती एकतर डायविंग च्या बोटवर असते किंवा शार्क काँसर्वेशनच्या कामात मग्न असते. ती त्यालाच प्राधान्य देते. इन्स्टाग्राम, फेसबुक इतर सोशल मीडियावर ओशन चे अनेक चाहते आणि फॉलोवर आहेत ,त्यातलीच मी एक तिची चाहती आहे.तिचे शार्क डायविंग करतानाचे अनेक व्हिडीओ आहेत, फोटोज आहेत. ते बघितलं की शार्क विषयी आत्मीयता निर्माण होते. माहीत नाही आयुष्यात कधी असं करायला मिळेल कधी.

शार्कडायविंग करणाऱ्या माणसांना ती सांगते की दिसला शार्क की मार उडी असं करू नये. साधारण पाण्याच्या पृष्ठभागावर येणाऱ्या शार्क जवळ न जाता मध्यभागी असणाऱ्या शार्क जवळ जावे व त्याच्या मागून अथवा सिग्नेचर असणाऱ्या डोर्सल फिन जवळून हळुवार पोहत राहावे. उतावळे पणा करू नये. या समुद्रात ला जायंट अतिशय बुद्धिमान आणि वैचारिक प्राणी आहे. टिट फॉर टॅट असा त्याचा स्वभाव आहे. त्यालाही शांतता आवडते. मानव आणि शार्क यांच्यात नक्कीच मैत्री होऊ शकते असे म्हणताना ओशन स्वतःचे उदाहरण नक्कीच देते.

ओशन ने आतापर्यंत 30 प्रकारच्या शार्क बरोबर काम केलं आहे, डायविंग देखील केलं आहे. आतापर्यंत एकदाही धोकादायक अनुभव तिला आला नाही. ती स्टिंग रे या शार्क चेच भाईबंद असणाऱ्या समुद्री जीवांबरोबर देखील काम केलंय. करतेय.

अशा या ओशन ने मलातरी वेड लावलंय. ओशनचे काही डायविंगचे व्हिडीओ ,त्यांची लिंक देतेय. जरूर पहा. छान वाटेल.

ओशनचे काम अव्याहत सुरू आहे आणि राहील , तिला त्यातुन शार्क विषयी लोकांचे असलेले गैरसमज आणि भीती कमी करण्यात थोडं तरी यश मिळतंय असं म्हणू शकतो.

मी वरील सर्व माहिती इंटरनेट वरील वाचन व ओशन रामसे यांच्या मुलाखती, व्हिडीओ आणि सोशल मीडिया अकौंट यावरून संकलित केली आहे.

गो प्रो व्हिडीओ लिंक
https://youtu.be/d-1xU0VfJ-g

https://youtu.be/duSPHGiPhwk

रोहिणी बेडेकर

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users