‘शेजाऱ्या’चे ओझरते दर्शन

Submitted by कुमार१ on 26 November, 2021 - 11:26

गेल्या २५-३० वर्षांत आपल्यापैकी अनेक जणांच्या कुटुंबात वा नात्यात कोणी ना कोणी परदेशी गेलेले किंवा जाऊन आलेले आहे. पर्यटन, शिक्षण, नोकरी आणि व्यवसाय अशा अनेक हेतूंनी लोक परदेशात जातात. त्यामुळे अनेक कुटुंबांच्या गाठीशी परदेश प्रवासाचे विविध अनुभव साठलेले असतात. जेव्हा विविध कारणांमुळे होणाऱ्या कौटुंबिक मेळाव्यांना लोक एकत्र जमतात तेव्हा हटकून परदेशातील अनुभवांची देवाण-घेवाण होते.

असाच एक मेळावा एकदा आमच्या घरी भरला होता. त्या समूहातील सहा जण विविध देशांमध्ये जाऊन आलेले होते. अमेरिका कॅनडापासून ते ऑस्ट्रेलिया जपान पर्यंत अनेक देशांच्या अनुभवांवर गप्पा चालू होत्या. मला एकदम लहर आली आणि म्हटलं, आता जरा यांची फिरकी घेऊ.
मग मी सर्वांना म्हणालो,
“तुम्ही बरेच जण जगातील अनेक प्रगत व सधन देशांमध्ये जाऊन आलेले आहात. पण माझे एक वैशिष्ट्य आहे. मी अशा एका देशामध्ये जाऊन आलेलो आहे की जिथे तुमच्यापैकीच काय पण माझ्या माहितीतील अन्य कोणीही तिथे गेलेले नाही. मी ९९.९% खात्रीपूर्वक सांगू शकतो की तुमच्यापैकी कोणीही त्या देशाला आयुष्यात भेट देण्याची शक्यता नाही. तर आता माझा प्रश्न असा आहे की तुम्ही तो देश ओळखा” !

इतका वेळ हसत खिदळत गप्पा चालल्या होत्या. माझ्या या निवेदनानंतर एकदम सन्नाटा पसरला. अनेकांना आश्चर्य वाटले की मी एवढे छातीठोक कसे सांगू शकतोय. सगळ्यांचे चेहरे आश्चर्यचकित झालेले. मग मी म्हणालो, “प्रयत्न करा, सुरुवात तर करा ओळखायला, पाहिजे तर मी पैज लावतो”! मग आशिया, युरोप, दक्षिण अमेरिका व आफ्रिका या खंडांतील अनेक आणि काही अतिपूर्वेकडील देशांची नावे लोकांनी सांगितली. तरीपण अद्याप त्यांनी माझे उत्तर काही ओळखले नव्हते. मग मी थोडी भर घातली, “देश आपल्यासारखाच आहे. प्रगत किंवा सधन म्हणता येणार नाही. मग अजून काही न ऐकलेल्या देशांची नावे पुढे आली. तरीसुद्धा अजून उत्तर सापडत नव्हते. शेवटी एकमुखाने सगळे म्हणले, आम्ही हरलो बुवा. मग मी जाहीर केले,

मी ज्या देशाला भेट देऊन आलेलो आहे तो म्हणजे पाकिस्तान” !

माझे उत्तर ऐकल्याबरोबर मागच्यापेक्षाही अधिक सन्नाटा पसरला. अनेकांचे चेहरे वाकडे झाले. काहींच्या कपाळावर आठ्या उमटल्या. मग एक जण म्हणाले, “तुम्ही काही सरकारी अधिकारी, खेळाडू, सैनिक, कलाकार किंवा पत्रकार असे काही नाहीत ते माहित आहे. तसेच तुम्ही इतिहास संशोधक, राजकीय अभ्यासक किंवा गेला बाजार, जातिवंत पर्यटक देखील नाही. मग असं वाटतंय की कशाला मरायला हा माणूस गेला होता पाकिस्तानात ? तुम्ही तिम्बक्तूला गेलो असे म्हटला असतात तरी आमचा विश्वास बसला असता ! पण पाकिस्तान, छे, काहीतरीच काय“ ! मी हसलो आणि म्हणालो, “बरोबर आहे तुमचा तर्क. पण मी तिथे जाऊन आलोय हे वास्तव आहे. आता तिथे मी का जाऊन आलो ते मी तुम्हाला सांगतो”.
..
वाचक मित्रहो,
असा हा आमच्या कुटुंबीयांसमवेत घडलेला संवाद होता. थोडे पुढे जाऊन मी म्हणतो की, हा लेख जे वाचक वाचणार आहेत त्यांच्यापैकीही कोणी पाकिस्तानला गेले असण्याची शक्यता जवळजवळ नाही. पुन्हा एकदा मी हे विधान ९९ % खात्रीने करतोय. अर्थात उरलेला १ टक्का मी बाकी ठेवतोय याचे कारण असे : ध्यानी मनी नसताना मी नाही का गेलो त्या देशात? तसा चुकून एखादा इथेसुद्धा सापडू शकतो.
तर मग आता तुमच्याही मनात प्रश्न आला असेल, की कशाला उठून गेला हा बाबा तिकडे पाकिस्तानात ? Happy

तर आता ती कथा सांगतो. सुरुवातीला एक स्पष्ट करतो, की मी काही कामासाठी तिथे गेलो होतो आणि अगदी अल्पकाळ म्हणजे जेमतेम तीन दिवस वास्तव्य करून लगेच भारतात परतलो होतो. त्यामुळे रूढ अर्थाने हे पर्यटन नाही याची नोंद घ्यावी. आपल्याकडील ज्या लोकांचे नातेवाईक पाकिस्तानात आहेत असे लोक (व अन्य काही अपवाद) वगळता, सामान्य भारतीय नागरिक पाकिस्तानला हौसेने जाण्याचा विचार स्वप्नात देखील करत नाही. म्हणून माझा हा एक वेगळा अनुभव लिहिणे असा या लेखाचा हेतू आहे.
…..

तर मग सुरुवात करतो. घटना आहे १९८० च्या दशकातल्या पूर्वार्धातील. तेव्हा मी नुकताच एमबीबीएस झालो होतो. आता पुढे काय करावे या विचारात एक गोष्ट अशी ठरवली, की अमेरिकेत जाण्याच्या डॉक्टरांसाठीच्या स्पर्धात्मक परीक्षेला बसावे. ही स्पर्धात्मक परीक्षा आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध देशांमध्ये होते पण त्याकाळी भारतात मात्र त्याची केंद्रे नव्हती. १९६० च्या दशकामध्ये भारतात ती केंद्रे होती पण पुढे ती बंद करण्यात आली. त्यामागील हेतू हा असावा की जर आपल्या देशात केंद्रच ठेवले नाही तर परीक्षेला बसणाऱ्या लोकांची संख्या आपोआपच मर्यादित राहते. आपले डॉक्टर्स शक्‍यतो आपल्याच देशात राहावेत हा या सगळ्या मागचा उद्देश असावा. ज्या देशांचे धोरण असे नव्हते, त्यांनी आपापल्या देशांमध्ये अमेरिकेच्या परीक्षेसाठी केंद्रे ठेवली होती. माझे एक नातेवाईक सिलोनला (आताच्या श्रीलंकेला) जाऊन ही परीक्षा देऊन आल्याचे मला माहित होते.

तेव्हाची आमची कौटुंबिक आर्थिक स्थिती सामान्य होती. परीक्षेसाठी लागणारे डॉलर्समधील शुल्क अमेरिकेतली नातेवाईकांच्या मेहेरबानीने मिळाले. आता प्रत्यक्ष परीक्षेस जाऊन बसण्याचा खर्च एवढी बाजू आम्ही सांभाळायची होती. त्यामुळे जो काही प्रवासखर्च होईल तो कमीत कमी असावा असेच ठरवणे भाग होते. त्या काळी जे विद्यार्थी पुरेसे सधन होते ते अशा निमित्ताने सिंगापूर, फिलिपिन्स आणि तत्सम देशांनाही भेट देऊन परीक्षेच्या जोडीने सहल व मौजमजा करून येत. आम्ही जेव्हा परीक्षा केंद्रांच्या तक्त्यावर नजर टाकली तेव्हा लक्षात आले, की आपल्याला परवडण्यासारखी केंद्रे दोनच असून ती पाकिस्तानात आहेत. त्यापैकी एक म्हणजे कराची आणि दुसरे लाहोर.

मग जरा आजूबाजूला चौकशी करून आम्ही अधिक माहिती काढली तेव्हा एक गोष्ट स्पष्ट झाली. भारतातील बरेच डॉक्टर्स या कामासाठी पाकिस्तानला जायचे. सर्वसाधारण आपल्या भौगोलिक प्रांतानुसार केंद्र निवडीची विभागणी झालेली होती. संपूर्ण उत्तर आणि मध्य भारतातील डॉक्टर्स लाहोरला जात. तेव्हा अमृतसर ते लाहोर ही रेल्वेसेवा सुद्धा उपलब्ध होती. त्यामुळे त्यांच्यासाठी हा प्रवास तर अगदी स्वस्तातला.
तर पश्चिम आणि दक्षिण भारतातील विद्यार्थी कराची केंद्र निवडायचे. माझ्यासाठी मुंबई ते कराची हा विमानप्रवास हाच मार्ग सगळ्यात स्वस्त ठरणार होता.

मग अर्ज भरला आणि कराचीची निवड केली. आता पुढचा टप्पा होता पाकिस्तानचा व्हिसा मिळवणे. तेव्हा काहीतरी कारणामुळे मुंबईतील पाकिस्तानी दूतावासाचे उपकेंद्र बंद होते. त्यामुळे दिल्लीला जाणे हाच एकमेव पर्याय शिल्लक होता. त्या आधी सांगितले पाहिजे की मी नुकताच पदवीधर झालेला असल्याने माझ्या जवळ कुठल्याही प्रकारची आर्थिक बचत वगैरे नव्हती. किंबहुना पासपोर्ट म्हणजे काय हे फक्त ऐकून माहित होते. मग तातडीने मुंबईला जाऊन आयुष्यातील पहिला पासपोर्ट काढला. तेव्हाच्या पासपोर्टच्या पहिल्या पानाच्या मागच्या बाजूस एक ठळक सूचना दिलेली असायची :

सदर पारपत्रधारकाला दक्षिण आफ्रिका सोडून जगातील अन्य सर्व देशांना जाण्यास परवानगी दिलेली आहे”.

Passport_of_India_travel_restriction_note_to_the_Republic_of_South_Africa.jpg

याचे कारण म्हणजे तेव्हा दक्षिण आफ्रिकेचे वर्णद्वेषी धोरण चालू होते. म्हणून भारताने त्यांच्याशी राजनैतिक संबंध ठेवलेले नव्हते.
मग दिल्लीला जायचे ठरले. अशा तऱ्हेने आयुष्यातील पहिली दिल्लीवारी या कामाच्या निमित्ताने झाली. दिल्लीमध्ये त्यांच्या दूतावासात गेलो आणि परीक्षेसंबंधी माहिती दाखवल्यावर त्यांनी ७ दिवसांसाठी फक्त कराचीचा व्हिसा मंजूर केला. आम्ही व्हिसा मिळवण्यासाठी जेव्हा दिल्लीला गेलो होतो तेव्हा तिथे कडाक्याची थंडी होती. तोपर्यंत महाराष्ट्र न सोडलेल्या मला उत्तरेतील मरणाची थंडी म्हणजे काय असते ते समजले.

हे सर्व तांत्रिक सोपस्कार पूर्ण झाले. एकीकडे जमेल तसा अभ्यास चालू होता. अखेर परीक्षा जवळ आली. आता पहिला प्रश्न होता तो म्हणजे तिथे कराचीमध्ये राहायचे ठिकाण ठरवणे. त्याकाळी आपल्याकडे आंतरजाल तर जाऊद्या पण संगणक सुद्धा नव्हते. मग काही ओळखीच्या लोकांना कामाला लावले आणि थोडीफार माहिती काढली. आमची परीक्षा होती ‘ताज इंटरनॅशनल’मध्ये. नावावरुनच लक्षात आले की तिथे राहणे काही आपल्याला परवडायचं नाही. मग थोडेफार नकाशे पाहिल्यावर असे लक्षात आले की या परीक्षेच्या ठिकाणापासून दोन किलोमीटर अंतरावर मेहरान नावाचे एक हॉटेल आहे जे आपल्या खिशाला परवडू शकेल. आणि मुख्य म्हणजे तिथे मिश्राहारी भोजन व्यवस्था होती. मग मेहरान हॉटेल मोजून दोन दिवसांसाठी फोनद्वारा आरक्षित केले. आता परीक्षा एक दिवसावर येऊन ठेपली होती. मुंबई ते कराची विमान प्रवासाचे तिकीट काढले होते. म्हटलं, चला या निमित्ताने आयुष्यातला पहिला विमान प्रवास घडतो आहे. परीक्षेच्या आदल्या दिवशी मुंबईमध्ये विमानात बसलो. कुठलीही गोष्ट प्रथम अनुभवताना माणूस हरखून जातो तसे माझेही झाले. साधारण एक तास वीस मिनिटात कराचीला पोहोचलो.

जेव्हा आपण भारतातून अन्य सधन देशांमध्ये जातो तेव्हाची प्रवासवर्णने वाचली की एक गोष्ट लक्षात येते. मुंबईतून जेव्हा विमान उडते तेव्हा आपल्याला सुंदर इमारतींच्या जोडीने झोपडपट्ट्यांचा महासागरही दिसतो आणि परदेशात विमान उतरत असताना मात्र एकदम सगळेच चकचकीत, लखलखीत, परीराज्यासमान दृश्य वगैरे दिसते. माझ्या या परदेश प्रवासात मात्र हा फरक उद्भवणार नव्हता. इथून उडताना आणि तिथे उतरताना दोन्हीकडे समानच दृश्य नजरेस पडले. अखेर कराचीमध्ये उतरलो. तेव्हा त्या विमानतळावर नूतनीकरणाचे वगैरे काम चालू होते. तसा तो सामान्य दर्जाचा वाटला. (पुढे काही वर्षांनी मात्र पाकिस्तानने त्यांचे सर्व विमानतळ अत्यंत शाही रीतीने सजवले होते. ते भारतापेक्षा अधिक डामडौलाचे आहेत असे वर्णन मी खुशवंतसिंग यांच्या एका पुस्तकात नंतर वाचले होते).

विमानतळापासून हॉटेलकडे जाताना रस्त्यावर नजर टाकली. थोडा परिसर बघितला आणि लक्षात आले की या शहराचा तोंडवळा आणि रचना साधारण मुंबईप्रमाणेच आहे. एक प्रकारे ही पाकिस्तानची मुंबई म्हणता येईल. गरीबी-श्रीमंतीचा निकट सहवास हे दोन्ही शहरांचे समान वैशिष्ट्य. आम्ही ज्या टॅक्सीत बसलो होतो ती जपानमधून आयात केलेली कार होती तोपर्यंत भारतात मारुती कार सामान्य माणसाच्या हातात फारशी दिसत नव्हती. पाकिस्तानात बहुतेक कार उद्योग यथातथाच असावा. त्यामुळे तेव्हा ते परदेशी गाड्या थेट आयात करत होते. आमचे हॉटेल आल्यावर टॅक्सीतून उतरलो व आपल्या फियाटच्या सवयीनुसार धाडकन ते दार लावले ! तो मोठा आवाज ऐकल्यावर ड्रायव्हर माझ्यावर चांगलेच डाफरले. यावरून ही नाजूक प्रकारची गाडी आहे आणि दार हळुवार लावायचे असते हा धडा प्रथम मिळाला. मग हॉटेलच्या खोलीत पोचलो. दुसऱ्या दिवशी परीक्षा असल्याने फार काही करायला वाव नव्हता. अभ्यास करणे भाग होते.

परीक्षेचा दिवस उजाडला. परीक्षा एकूण दोन दिवस होती रोज सहा तास. त्यापैकी दर दोन तासांनी थोडावेळ विश्रांतीचा असे. परीक्षेच्या २ सत्रांमध्ये त्यांनी दुपारच्या खाण्याची किरकोळ व्यवस्था केली होती. ही परीक्षा संपूर्ण वस्तुनिष्ठ स्वरूपाची होती उत्तरपत्रिकेवर योग्य त्या पर्यायांच्या पुढे पेन्सिलने खूण करायची होती. संपूर्ण परीक्षेत कुठेही पेन लागणार नव्हते. परीक्षेसाठी पर्यवेक्षक म्हणून स्कर्ट परिधान केलेल्या दोन जाडजूड अमेरिकी बायका आलेल्या होत्या. त्यांच्या देहबोलीवरूनच त्या कडक असल्याचे लक्षात आले. त्यांनी सुरुवातीला महत्वाची सूचना केली,

जेव्हा परीक्षेचा वेळ संपल्याची घोषणा होईल तेव्हा सर्वांनी आपापल्या पेन्सिली ताबडतोब खाली ठेवल्या पाहिजेत. या शिस्तीचे पालन न केल्यास तुमची उत्तरपत्रिका रद्द ठरवण्यात येईल”.
ही सूचना ऐकल्यावर लगेच काही त्याचे गांभीर्य जाणवले नाही. दुपारच्या सत्रात वेळ संपल्याचे जाहीर झाल्यावरही (पेपर गोळा करेपर्यंत) तीन विद्यार्थी लिहीतच होते. हे त्या बायकांच्या लक्षात आल्यावर त्या तातडीने पळत त्या विद्यार्थ्यांकडे गेल्या. त्यांनी त्या मुलांना तुम्ही नियम मोडल्याचे सांगून लगेचच त्यांच्या उत्तरपत्रिकांवर काट मारून त्या रद्दबादल ठरवल्या. इतकी करडी शिस्त मी आयुष्यात प्रथमच पाहिली.

परीक्षेच्या शुल्कामध्ये त्यांनी खाण्यासाठीचे पैसे घेतलेले होते. त्यातून त्यांनी एका कागदी खोक्यामध्ये आम्हाला अल्पोपहार दिला. ते खोके उघडून पाहिल्यावर त्यात फक्त एक केळ व एक कबाबचा तुकडा असे खाद्य होते. मला केळ अजिबात आवडत नाही. पण आता करतो काय ? थोड्याशा वेळात काहीतरी खाणे भागच होते. तेव्हा मी मिश्राहारी होतो ते एका दृष्टीने बरेच झाले. भुकेच्या वेळी जे अन्न समोर येईल ते खाण्यात शहाणपण असते. पुढे माझ्या मुलांना मी हा किस्सा सांगितला आणि एक सल्ला दिला, “जरी परंपरेने आपण घरी शाकाहारी असलो तरी जगाच्या पाठीवर कुठेही वेळप्रसंगी तरुन जायचे असेल तर सर्व काही खायची सवय असलेली बरी असते”.

पहिल्या दिवशीचा पेपर संपल्यानंतर ताजमधून बाहेर पडलो आणि चालतच मुक्कामाच्या हॉटेलकडे जायचे ठरवले. तेवढेच टॅक्सीच्या पैशांची बचत आणि थोडफार काहीतरी बघता यावे हा उद्देश. सहज रस्त्यावरील एक-दोन दुकानांमध्ये डोकावलो. दुकानाची रचना अगदी आपल्यासारखीच होती. दुकानदारांनी, “आप इंडियासे आये है ना” असे म्हणून स्वागत केले व आदराने बोलले. चहा मागवला. आपल्या व त्यांच्या प्रमाणवेळेत अर्ध्या तासांचा फरक असल्याचे त्यांनी आम्हाला सांगितले. एकंदरीत पाहता पाकिस्तानी माणूस आपल्या कुठल्याही उत्तर भारतीय माणसाप्रमाणेच दिसतो. अशी भ्रमंती करीत हॉटेलात पोचलो. रात्री हॉटेलमध्ये अगदी पोटभर वरण-भात खाऊन घेतला तेव्हा कुठे जीव शांत झाला. परीक्षेच्या दुसऱ्या दिवशी सर्वसाधारण पहिल्या दिवसाप्रमाणे सर्व काही झाले. आता कालच्या प्रकारानंतर विद्यार्थ्यांना कडक शिस्तीची कल्पना आलेली होती. त्यामुळे आज कोणीही वेळ संपल्यानंतर लिहित बसायची आगळीक केली नाही.

अखेर पूर्ण परीक्षा संपली. एकंदरीत ही वस्तुनिष्ठ परीक्षा म्हणजे बुद्धीला खुराक होता. वस्तुनिष्ठ प्रश्नांचे अनेक अवघड आणि गोंधळात टाकणारे प्रकार इथे अनुभवायला मिळाले. एखाद्या विषयाचे सखोल वाचन असल्यासच आपण अचूक उत्तर देऊ शकतो हे लक्षात आले. परीक्षा केंद्राला टाटा केल्यावर पुन्हा एकदा चालतच रस्त्याने निघालो. साधारणपणे आपण भारतातच आहोत अशीच भावना होती. काही खास वेगळे असे त्या भागात तरी जाणवले नाही. रस्त्यांवरील अ/स्वच्छता आणि बे/शिस्त अगदी आपल्याप्रमाणेच. एकेकाळचे आपण भाऊ भाऊच आहोत हा विचार मनात बरेचदा येऊन गेला.
आता उरलेल्या वेळात ओळखीने एकच कार्यक्रम ठेवलेला होता तो म्हणजे तिथल्या एका रूग्णालयाला भेट देणे. मग घाईत तिकडे पोचलो. दोन-तीन डॉक्टरांशी गप्पा झाल्या. त्यापैकी एक डॉक्टर मुकेश हा सिंधी होता. त्याने आमच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. त्याच्या कुटुंबामध्ये फाळणीच्या वेळेस बऱ्याच हत्या झालेल्या होत्या. त्यामुळे त्याच्या चेहऱ्यावर कायमस्वरूपी खिन्नतेचे सावट होते. त्याचे काही नातेवाईक भारतात येऊन स्थायिक झाले होते. त्यापैकी काही तर पिंपरी-चिंचवडला असल्याचे त्याने सांगितले.

त्यासंदर्भात 1947 साली एक एकतर्फी करार दोन्ही देशांदरम्यान झाल्याचे त्याच्याकडून समजले. या करारातील तरतूद अशी आहे : जर पाकिस्तानातील एखाद्या व्यक्तीला भारतात येऊन वास्तव्य करावेसे वाटले तर भारत सरकार विचार करून त्या व्यक्तीला एक वर्षाचा व्हिसा देते. पुढे दरवर्षी त्याचे नूतनीकरण काही अटींवर होऊ शकते. याला अनुसरून मुकेशचे काही नातेवाईक भारतात आले. त्यापैकी काहींना येथे स्थिरस्थावर होणे जमले व कालांतराने त्यांनी भारताच्या नागरिकत्वासाठी अर्ज केलेला होता. परंतु त्याच्या अन्य काही नातेवाईकांना इथे काही जम बसवता आला नाही. त्यातून निराश होऊन पुन्हा पाकिस्तानात परतही जावे लागले होते. हे सर्व पाहता मुकेशची मनस्थिती द्विधा होती. त्याच्या मनात आज ना उद्या मध्यपूर्वेतील देशांमध्ये दीर्घकाळ रहावे असे होते व तेथून जमल्यास पाश्चिमात्य देशांमध्ये जायचा त्याला प्रयत्न करायचा होता.

मुकेशला मनापासून शुभेच्छा देत आम्ही ती रुग्णालय भेट आटोपती घेतली. आता लगेचच हॉटेलवर जाऊन सामानाची बांधाबांध करून परतीच्या प्रवासास निघायचे होते. त्यांनी व्हिसा जरी ७ दिवसांचा दिलेला असला तरी मला तिथे उगाच भटकणे परवडणारे नव्हते. मग काही तासातच आम्ही परीक्षेला बसलेले काही जण परतीच्या प्रवासासाठी कराची विमानतळावर हजर झालो. तिथे एकमेकांना आलिंगन देत निरोप घेतला. आमच्या सर्वांच्या बोलण्यात एक समान मुद्दा होता. भविष्यात आम्ही मनाप्रमाणे विविध देशांचे पर्यटन करू शकू. पण त्या पर्यटनाच्या यादीमध्ये एरवी पाकिस्तानचा समावेश चुकूनही झाला नसता. या परीक्षेच्या निमित्ताने आपण एकेकाळी अखंड भारताचाच भाग असलेल्या प्रदेशाला भेट दिली एवढे या परीक्षेमुळे साध्य झाले होते. तसेच खुद्द परीक्षेचा अनुभवही अविस्मरणीय होता.

जेमतेम तीन दिवसाच्या या छोट्या मुक्कामात माझ्या मनात कराची म्हणजे दुसरी मुंबई एवढीच भावना निर्माण झाली. त्या काळी भारतात सिंधी लोकांनी चालवलेली ‘कराची स्वीट मार्ट’ अशी मिठाईची प्रसिद्ध दुकाने असायची. त्या दुकानांमधून आम्ही वेफर्स वगैरे आवडीने आणायचो. त्या दुकानांचे नाव ज्या गावावरून आले ती कराची आपण पाहिली असे एक मानसिक समाधान लाभले. तिथल्या सामान्य माणसांवर नजर टाकता ते आणि आपण सामाजिक वावरात तसे सारखेच आहोत हे दिसून आले. दोन राष्ट्रांमध्ये स्वातंत्र्यापासूनच वैरभाव निर्माण झालेला आहे खरा. परंतु तिथल्या काही सामान्य नागरिकांशी गप्पा मारताना तो काही जाणवला नाही. भविष्यात जर दोन देशांदरम्यानचे राजनैतिक संबंध कधी सुधारलेच् तर निदान दोन्हीकडच्या नागरिकांना मुक्तपणे एकमेकांच्या देशात पर्यटनासाठी जाता येईल का, असा एक भाबडा विचार तेव्हाच्या तरुण मनामध्ये येऊन गेला. परंतु आजचे अजूनच बिघडलेले वास्तव आपण जाणतोच.
असो.

लेखातील घटनेनंतर पुढील संपूर्ण आयुष्यभरासाठी पाकिस्तानला जाणे हा विषय मी कायमचा बाद करून टाकलेला आहे. पण, आयुष्यातील पहिला विमान व परदेशप्रवास आणि पहिल्या आंतरराष्ट्रीय परीक्षेचा अनुभव या कारणांसाठी का होईना पाकिस्तान माझ्या आठवणीत राहील.
........................................................................................................................................................
लेखातील चित्र जालावरून साभार !

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारत त्या मध्ये असणारा च त्या शिवाय कॉपी, पेपर फुटी सारखी काम होवूच शकत नाहीत.
>>
अहो, भारतातील परीक्षाकेंद्रे कित्येक वर्षांपूर्वी बंद झाली होती !!
.....
राभु,
धन्यवाद व पुनरागमनासाठी स्वागत !

छान अनुभवकथन !

मलाही 'गुजरानवाला' गावच्या माझ्या मित्राचे आमंत्रण आहे. मला तो कतार मधे भेटलेला. मला पाकीस्तानातल्या अटकेला जायचे आहे असे सांगीतल्यावर तू ये तर मग तुला सगळीकडे फिरवून आणतो असे सांगीतले होते त्याने. पाकीस्तान, शिकल्या सवरलेल्या मध्यमवर्गीयांना राहण्यायोग्य राहीला नाहीये असे त्याच्या बोलण्यात यायचे. बाहेरील देशांपैकी त्याची प्रथम पसंती अमेरीका होती. पण त्याच्या नावात मोहम्मद असल्याकारणाने ९/११ नंतर अमेरिकेत त्याच्या प्रवेशावर अघोषित बंदी होती. पण इतरत्र जाण्याचे त्याचे प्रयत्न फळास येऊन सध्या तो इंग्लंडात स्थायीक झालाय.

पाकीस्तानात कधी जाणे होईल कोणास ठावूक.
अटकेपार जावे नित्य वदावे.

सर, खूप छान आणि अविस्मरणीय अनुभव!!
पुढील शिक्षणासाठी अमेरिकेत गेले असल्यास तेथील अनुभव वाचायला आवडतील.

रोचक माहिती, मस्त अनुभवकथन. तुमच्या लेखनशैलीमुळे कोणताही लेख आवर्जुन वाचावासा वाटतो.
मलाही पाकिस्तानी वेबसिरीज आणि त्यातला निसर्गसंपन्न पाकिस्तान पाहुन एक ट्रिप करावीशी वाटते. पण मी एका MNC मध्ये GMS / इमिग्रेशन मॅनेजर (global mobility services) आहे/होते, त्यामुळे मला चांगलंच माहीत आहे की पाकिस्तानी व्हिसा मिळणं 'आसान नहीं, नामुमकीन है'. आमचे काही UK किंवा US entity चे एम्प्लॉयीज सद्य नागरिकत्व काहीही असु दे, पण जुन्या पाकिस्तानी नागरिकत्वामुळे त्यांना भारतात मिटिंग / प्रोजेक्टसाठी आणणं प्रचंड वेळखाऊ आणि तापदायक असायचं. एक अतिशय सिनियर मार्केटिंग हेड कित्येक वर्षे अमेरिकन पासपोर्ट असुनही विनाकारण सरकारी कागदपत्रे आणि फॉर्मलिटीजमुळे एका अत्यन्त महत्वाच्या मिटिंगसाठी भारतात येऊ शकला नाही, शेवटी मिटिंगची जागा दुसऱ्या देशात शिफ्ट करावी लागली. एका पॉईंटला तो इतका फ्रस्ट्रेट झाला होता कारण कॉलेज ऍडमिशन नन्तर 30 वर्षात तो पाकिस्तानमध्ये कधी गेलाही नव्हता, त्याची बायकोही अमेरिकन. पण केवळ जन्म पाकिस्तानमधला म्हणुन त्याच्याकडे विचित्र डॉक्युमेंट्सची मागणी होत होती. या सगळ्या परिस्थितीतुन मी अनेकवेळा गेली आहे. सगळ्या परीक्षा पार पाडुन कोणी पाकिस्तानी व्हिजिटर आलाच तर जवळच्या पोलीस स्टेशनला कळवणं अनिवार्य होतं.
हे सगळं सांगण्याचा उद्देश एवढाच की जसे ते इथे येणं कठीण, तेवढंच मी ही टूरिस्ट म्हणुन जाणं अवघड आणि अशक्य असणार. बेस्ट वे, वाघा बॉर्डरला जाऊन गेटच्या पलिकडे दिसणारा पाकिस्तान पहाणे. Proud

मीरा, भारीच की.
तुझेही मजेशीर अनुभव लिही, काही लीगल कारणाने अडचण येणार नसेल तर.

छान अनुभव... वाचुन गम्मत वाटली. काही वर्षांपुर्वी आपले क्रिकेटर्स पाकभेटी करुन यायचे आणि अनुभव लिहायचे, तेही असेच ऊत्सुकतेने वाचले जायचे.

मला मोहेंदोजारोला भेट द्यायची फार ईच्छा आहे. मी मेंबर असलेल्या एका फेसबूक गृपवर हा विषय चर्चीला गेला व त्यासंहंधीत व्हत्सप्प ग्रुपवर मी जोइन झाले.. सुरवातीला खुप उत्साहाने चर्चा झाल्या पण ‘पाकिस्तानको जाना मुश्किलही नही बल्की नामुमकीन है‘ याची खात्रि पटल्यावर सगळा उत्साह फुस्स्स झाला Happy

तुझेही मजेशीर अनुभव लिही, >>> आम्ही इंटरनॅशनल लेबर लॉ आणि व्हिसा फॉर्मलिटीजमध्ये रुक्ष झालेली आयुष्य आहोत (मी आणि माझी टीम). इंटरेस्टिंग किस्से बरेच आहेत, पण ते आता लिहु शकत नाही. रिटायरमेंटनन्तर GMS Life वर एक पुस्तक लिहेन. Wink

अभिप्राय व पूरक माहितीबद्दल सर्व नवीन प्रतिसादकांचे आभार !
......
तुम्ही सर्वांनी प्रतिसादांमधून मनमोकळे आणि भरभरून लिहिलेत याबद्दल आनंद वाटला.
आपल्यापैकी बऱ्याच जणांना पाकिस्तानात विशिष्ट ठिकाणी पर्यटन करायची इच्छा आहे हे समजले.

अटकेपार जावे नित्य वदावे, वेबसिरीज आणि त्यातला निसर्गसंपन्न पाकिस्तान , मोहेंदोजारोला भेट द्यायची फार इच्छा
.... हे सर्व मुद्दे रोचक !

मस्त अनुभवकथन!
चर्चा पण छान.

>>>>त्यांचे सर्व विमानतळ अत्यंत शाही रीतीने सजवले होते. ते भारतापेक्षा अधिक डामडौलाचे आहेत असे वर्णन मी खुशवंतसिंग यांच्या एका पुस्तकात>>>> ह्या पुस्तकाचे नाव समजेल का?

साद, आभार !

The sights & sounds of the world हे खुशवंतसिंगांचे मूळ पुस्तक.
त्याचा मराठी अनुवाद : सुहाना सफर (चंद्रशेखर मुरगुडकर, २००२ ).
...
बाकी वरील चर्चेतील

‘पाकिस्तानको जाना मुश्किलही नही बल्की नामुमकीन है‘

... हे फार म्हणजे फारच आवडले !
सहमत.

छान लिखाण व अनुभव Happy
मलाही हडपा मोहेंजोदरो आणि सिंधू नदी पाहायची आहे

लेख कालच वाचला होता,प्रतिसाद द्यायचा राहून गेला. छान लेख.
कोणे एकेकाळी मोहेंजोदारो बघायचे होते.आता तेही वाटत नाही.जिज्ञासा म्हणाल्या तसे पाकिस्तानी सिरियलमधून दिसणारा पाकिस्तान छान वाटतो.पण त्या सिरियलच्या खालच्या कॉमेंट्स वाचल्यावर किती खोलवर द्वेष रुजलेला आहे हे कळते.कदाचित मी चुकतही असेन.

धन्यवाद !
...
सिरियलच्या खालच्या कॉमेंट्स वाचल्यावर किती खोलवर द्वेष रुजलेला आहे हे कळते

>>>>
आता हा मुद्दा आलाच आहे तर पूर्वी काही यावर काही वाचलेले लिहितो. भारत व पाकिस्तानचे भविष्यात कधी काळी एकत्रीकरण होईल का, किंवा व्हावे का ? असा प्रश्न जेव्हा उपस्थित होतो तेव्हा आपल्या सर्वांचे उत्तर अजिबात नको/ नाही असेच असते. आपण आहोत ते सुखात आहोत; त्यांना वेगळेच राहू देत, अशी सामान्य भारतीयाची धारणा असते.
परंतु या संदर्भात एका आदरणीय व्यक्तीचे वेगळेच मत वाचले होते. ती व्यक्ती म्हणजे दिवंगत फील्ड मार्शल सॅम माणेकशा. जेव्हा त्यांच्या निधनाची मोठी बातमी पहिल्या पानावर आली होती, तेव्हा त्यांचे काही उद्गार विशेष चौकटीत प्रसिद्ध झाले होते. त्यापैकी एक यासंदर्भात होते :

“भारत व पाक हे भविष्यात कधी ना कधी एकत्र येऊन विलीन होतील(च)”
अशी त्यांना आशा होती आणि त्यांची इच्छाही होती.

हे वाचल्यावर मला आश्चर्यही वाटले आणि काहीसा धक्काही बसला. परंतु हे म्हणणारी व्यक्ती खूप आदरणीय असल्यामुळे मी शांतपणे त्यावर फक्त विचार केला.

जगाच्या इतिहासात जर्मनीचे एकीकरण ही ठळक घटना माझ्या नजरेसमोर आली. अर्थात त्यांची संस्कृती वेगळी आहे व आपली वेगळी. खूप विचार करता मला माणेकशांचा विचार काही झेपला नाही.
असो.

इतरांना काय वाटते याबद्दल ?

भारत, पाकिस्तान, श्रीलंका या तीन देशांनी मिळून क्रिकेट विश्वचषक आयोजित केला होता. १९९६ मध्ये. तेव्हा श्रीलंकेत अशांतता असल्यामुळे काही देशांनी आपल्या खेळाडूंच्या सुरक्षिततेबद्दल शंका घेतली होती. तर, सुरक्षिततेबद्दल त्यांची खात्री पटवण्यासाठी भारत आणि पाकिस्तानची मिळून एक टीम विरुद्ध श्रीलंकेची टीम, असा एक सामना आयोजित केला होता. त्या सामन्याबद्दल द्वारकानाथ संझगिरींनी लिहिलं होतं की या निमित्ताने साकलेन मुश्ताक, अनिल कुंबळे, सचिन तेंडुलकर, वसिम अक्रम वगैरे खेळाडू खांद्याला खांदा लावून खेळले. जर फाळणी झालीच नसती, तर कदाचित असाच संघ आज खेळताना दिसला असता आणि मग विश्वचषक दुसऱ्या कुणाला स्वप्नातही दिसला नसता Wink

गंमत म्हणून कल्पना करायला ठीक आहे, पण वास्तवात येणं कठीण आहे!

गंमत म्हणून कल्पना करायला ठीक आहे, पण वास्तवात येणं कठीण आहे!...... सहमत.

राजकारणी लोकांमुळे असेल किंवा श्रेष्ठत्वाच्या भ्रामक कल्पना असोत जे काही असेल ते पण एकत्र होणे कठीण,नव्हेच तर अशक्य आहे.

ज्या राष्ट्राची उभारणी द्वेष/तिरस्काराच्या पायावर झाली आहे,तिथे अजून काय अपेक्षा ठेवणार?
असतीलही,आहेतही मानवतावादी विचारवंत दोन्ही बाजूला. विषाद वाटतो कधी कधी ह्या tirskarachya भावनेचा.

पाकिस्तनचा विसा मिळवणे इतके कठिण आहे हे माहिती नव्हते.

माझ्या कामानिमित्ताने सध्या एका कम्पनीच्या ऑफशोअर लोकांशी सम्बंध येत आहे. हे ऑफशोअर सेन्टर लाहोरमध्ये आहे. पुढल्या भारतवारी बरोबर पाकिस्तानला भेट द्यावी असे बरेच दिवस मनात आहे. पाकिस्तानच्या विजिटर विसाची फी फक्त १५ रुपये आहे फक्त Happy आणि पाक्सितानात प्रवेश करताना किमान नगद केवळ ४५ युएस डॉलर्स Happy

>>>>
ज्या राष्ट्राची उभारणी द्वेष/तिरस्काराच्या पायावर झाली आहे,तिथे अजून काय अपेक्षा ठेवणार?>>> +९९९

.

<< इतरांना काय वाटते याबद्दल ? >>
मग फक्त भारत पाकिस्तान बद्दलच का? सगळेच देश विलीन झाले तर? (अर्थात ते होणार नाही कधी).
जॉन लेननचे १ अप्रतिम गाणे Imagine याच संदर्भात आहे.

Imagine there's no countries
It isn't hard to do
Nothing to kill or die for
And no religion, too
Imagine all the people
Living life in peace... You...

गंमत म्हणून कल्पना करायला ठीक आहे, पण वास्तवात येणं कठीण आहे!.

विषाद वाटतो कधी कधी ह्या tirskarachya भावनेचा.

जॉन लेननचे १ अप्रतिम गाणे
>>
या सर्वांना +१११

खरं आहे. As a realist it is impossible to imagine reunion of India, Pakistan, and Bangladesh as it was before partition. मला वाटतं जसे अमेरिका आणि कॅनडाचे सौहार्दाचे संबंध आहेत तसे भारताचे पाकिस्तान बरोबरचे संबंध रहावेत. ही देखील अपेक्षा फारच अतिरंजित वाटू शकते पण अशक्य नाही असे वाटते.
स्टीव्ह जॉब्सच्या चरित्रामध्ये असा उल्लेख आहे की तो अफगाणिस्तानातून पाकिस्तानमार्गे भारतात आला आणि मग इथे काही दिवस राहीला. या वाक्यानंतर कंसात "The world was very different back then" अशा अर्थाचे एक वाक्य लिहिलंय ते मला लक्षात राहिलंय अजून! It gives me some hope!

USMLE साठी पाकिस्तानला गेलेले काही मित्र आहेत. त्यांच्याकडून त्यांचे अनुभव सविस्तर ऐकले होते. त्यामुळे तुमचं अनुभवकथन रिलेट करू शकलो.

भारताबाहेर आल्यावर अनेक पाकिस्तानी / अफगाणिस्तानी मित्र झाले. त्या लोकांना भारताबद्दल असलेलं कुतूहल, भारतीय सणांविषयी असलेली माहिती (गणेशोत्सव, दिवाळी), त्यांच्या घरी गेल्यावर अनुभवलेलं अगत्य ह्या सगळ्या गोष्टींचं माझ्या मनावर खूप चांगलं इम्प्रेशन आहे.

लेख आवडला. अगदी रोचक आहे. Happy परीक्षेचे केंद्र भारतात का नव्हते ? काही कारण ...

मला हुंझा दरी, गिलगिट बाल्टिस्तान बघण्यासाठी जायची इच्छा आहे, पाकिस्तानाच्या बाजूचा हिमालय व तेथील दऱ्याखोऱ्या अतिशय रम्य आहेत. एक मुलगी आहे जी तिथली मंदीरं दाखवते ते युट्यूब वर नियमितपणे बघते.
प्रतिक्रिया व अभिप्रायही माहितीपूर्ण आहेत.
विक्रमसिंह, तुम्हीही लिहा.
आयवरी कोस्टची कहाणी >>> +१, जरूर लिहा. प्रतीक्षेत.
जॉन लेननचे ..अप्रतिम गाणे.
देवकी +१ , हा विषाद नसता तर या दोन्ही देशांनी किती प्रगती केली असती, आता मात्र 'विकसनशील' वर अडकलो आहोत !!!!

पापिस्तानी मंडळी गोडबोली असतात. ब्रदर, भाईसाहब संबोधून बोलतात तरी पण "इकडे गोड बोलतो परंतु भारतात जाऊन बॉम्ब फोडतो" असा विचार हटकून मनात येतोच.

डोकं खांद्यावर आणि मेंदू योग्य जागी असलेली मंडळी मात्र "पार्टिशन नहीं होता तो अच्छा होता" असे म्हणताना ऐकली आहेत!!

फाळणीचा इतिहास, तिकडच्या लोकांचे कटू/ गोड अनुभव आणि भविष्यातील शक्यता यासंबंधी आपण सर्वांनी व्यक्त केलेले विचार समजले. गुंतागुंतीचा विषय आहे खरा.

सर्वांना धन्यवाद !

* परीक्षेचे केंद्र भारतात का नव्हते ? काही कारण ...
>> हे लेखात दिले आहे. हे पहा:

१९६० च्या दशकामध्ये भारतात ती केंद्रे होती पण पुढे ती बंद करण्यात आली. त्यामागील हेतू हा असावा की जर आपल्या देशात केंद्रच ठेवले नाही तर परीक्षेला बसणाऱ्या लोकांची संख्या आपोआपच मर्यादित राहते. आपले डॉक्टर्स शक्‍यतो आपल्याच देशात राहावेत हा या सगळ्या मागचा उद्देश असावा.
.........
1960 मध्ये माझ्या एका नातेवाइकांनी ही परीक्षा मुंबईत दिली होती.
तेव्हाची परिस्थिती खूप वेगळी होती. ज्या दिवशी या परीक्षेचा निकाल लागे, तेव्हा अमेरिकेचे एजंट इथल्या उत्तीर्ण झालेल्या डॉक्टरांशी स्वतःहून
संपर्क करून त्यांना अक्षरशः 'उचलून' नेत !
Happy

खुपच मस्त लेख!
काहींनी वर लिहीलंय तसं भारताबाहेर भेटलेल्या पाकिस्थानी लोकांचा अनुभव शक्यतो चांगलाच असतो. वागायला बोलायला अगदी आपल्यासारखेच लोक.

मी अशा एका देशामध्ये जाऊन आलेलो आहे की जिथे तुमच्यापैकीच काय पण माझ्या माहितीतील अन्य कोणीही तिथे गेलेले नाही. >>>
हे वाचल्यावर आधी तुवालू देश असावा असं वाटलं. काही दिवसांपूर्वी आलेल्या या बातमीमुळे तुवालू नावाचा असा देश आहे हे कळलं Happy

धन्यवाद !

तुवालू देश >> भारीच नाव की Happy

Pages