हे डोंगरकड्या

Submitted by बिपिनसांगळे on 23 November, 2021 - 11:40

हे डोंगरकड्या
---------------------------------------------
हे डोंगरकड्या ,
गड्या , काय डौलात उभा आहेस तू !
छाती पुढे काढून

हे डोंगरकड्या ,
तुझ्या उन्नत छातीवर
बरसत असतील मेघ
अन त्यांच्या मोतियांची माळही
रुळत असेल तिच्यावर
अन तूही ते मोती
अलगद सोडत असशील
तुझ्या पायागती
भरभरून

हे डोंगरकड्या ,
हिवाळ्यात धुक्याची शाल लपेटत असशील
तुझ्या त्या छातीभोवती
तरुणीच्या धवल अवगुंठनासारखी
अन गार वारंही गपगुमान
बाजूबाजूने वाहून निघून जात असेल
तुझ्या पोलादी छातीला नमून

हे डोंगरकड्या ,
ग्रीष्मात तुझ्या कड्यावरचं गवत
पिवळं - पिवळं पडत असेल
एखाद्या बुजुर्गाच्या छातीवरचे
केस न केस पांढरे झाल्यासारखं
अनुभवी अन पोक्त बुजूर्गच तूही
खरंतर आतून

पण गड्या ,
आजकाल जमाना बदललाय
किरकोळ माणसंही छाती फुगवून चालतात
त्यांच्या छातीच्या पिंजऱ्यात हृदय नाही रे
तर फत्तर भरले आहेत
ज्यांना पाझर फुटत नाही काळजातून

ते कधी तुझी उन्नत छाती फोडतील
माहिती नाही
कधी तुला सपाट करतील
जमीनदोस्त करतील
वणवा लावतील तुझ्यावरच्या फुलोऱ्याला
माहिती नाही
घेतील सातबारा बदलून
अरे , गायबही करून टाकतील
एखाद्यावेळी नकाशातून

आमच्याही छातीत धडधडतं रे
पण मजेत रहा
त्यांची नजर तुझ्यावर पडेपर्यंत
तगून रहा
यांचं पाप यांनाच फेडायचं आहे - मागून !
हे डोंगरकड्या …
---------------------------------------------------------

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults