अर्ध सत्य

Submitted by Swamini Chougule on 18 November, 2021 - 07:07

सम्यक आज दुपारी त्याच्या कॅबिनमध्ये काम करत असताना अचानक चक्कर येऊन पडला होता. ऑफिस मधील एक कर्मचारी त्याच्याकडे काम आहे म्हणून गेला आणि सम्यक त्याला जमिनीवर बेशुद्ध पडलेला दिसला त्याने बाहेर येऊन आरडाओरडा केला त्याचे डॅड म्हणजेच सुकेतनराव लगेच पळत आले. त्यांनी लगेच अब्युलन्स मागवली आणि सम्यकला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले.

सम्यक सरपोतदार सुकेतन सरपोतदारांचा एकुलताएक मुलगा! सुकेतन सरपोतदार म्हणजे एक बडी आसामी नगरचे प्रथित यश बिल्डर! गर्भ श्रीमंत माणूस! त्यांना एकच मुलगा तो म्हणजे सम्यक तो त्यांचा जीव की प्राण होता. सुकेतन त्याची पत्नी पल्लवी आणि सम्यक असं छान त्रिकोणी कुटुंब! सुकेतनराव आणि पल्लवी दिसायला अगदी सामान्य रूप रंगाचे! पल्लवी गव्हाळ रंगाची तर सुकेतराव सावळ्या रंगाचे पण सम्यक गोरागोमटा, घाऱ्या डोळ्यांचा आणि कुरळ्या केसांचा, धिप्पाड आकर्षक तरुण! लोक अनेकदा सुकेतनराव आणि पल्लवीला म्हणायचे ही की सम्यक तुमचा मुलगा आहे असं वाटत नाही. सम्यक दिसायला जितका सुंदर तितकाच हुशार ही होता. तो लंडन मधून M. B. A करून आला होता आणि तो दोन वर्षां पूर्वीच सुकेतनरावां बरोबर बिझनेस सांभाळू लागला होता. त्याने बिझनेस जॉईन केल्या पासून सुकेतनरावांना फक्त फायदाच फायदा झाला होता. आता सुकेतनराव आणि पल्लवी त्याच्या लग्नाचा विचार करत होते. पण अठ्ठावीस वर्षांचा सम्यक आज अचानक असा बेशुद्ध पडला होता.

नगरच्या एका मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये त्याला नेण्यात आले. पल्लवीला ही फोन करून त्यांच्या एका कर्मचाऱ्याने हॉस्पिटलमध्ये बोलवून घेतले. पल्लवी ही घाबरून हॉस्पिटलमध्ये आली. तर सुकेतनराव I. C. Uच्या बाहेर उभे असलेले पल्लवीने पाहिले व त्यांच्या जवळ जाऊन त्या काळजीने बोलू लागल्या.

पल्लवी,“ काय झालं आपल्या सम्यकला?” त्यांनी विचारले.

सुकेतनराव,“ अजून डॉक्टर तपासत आहेत त्यांनी काहीच सांगितले नाही अजून!” ते म्हणाले

तो पर्यंत डॉक्टर बाहेर आले. पल्लवी आणि सुकेतनराव त्यांच्या जवळ गेले. सुकेतनरावांनी काळजीने डॉक्टरांना विचारले.

सुकेतनराव,“ काय झालंय डॉक्टर माझ्या मुलाला?” त्यांनी विचारले.

डॉक्टर,“ उद्या पर्यंत आपल्याला कळेल. आम्ही काही टेस्ट केल्या आहेत त्याचे रिपोर्ट उद्या पर्यंत येतील. तो पर्यंत मी काहीच सांगू शकत नाही. सम्यक शुद्धीवर आला आहे तुम्ही भेटू शकता त्याला!.” ते म्हणाले आणि निघून गेले.

पल्लवी आणि सुकेतनराव दोघे जावून सम्यकला भेटले. दोघे ही रात्र भर I. C. U. बाहेर बसून होते. दोघांचा ही जीव थाऱ्यावर नव्हता. सुकेतनराव तर खूपच काळजीत दिसत होते उलट पल्लवीनेच त्यांना धीर दिला. दुसऱ्या दिवशी दुपारी बारा वाचता सम्यकचे सगळे रिपोर्ट आले आणि डॉक्टरने पल्लवी आणि सुकेतनरावांना बोलवून घेतले. दोघे ही डॉक्टरांच्या केबीनमध्ये गेले. डॉक्टर खूपच गंभीर दिसत होते त्यामुळे दोघांना ही अंदाज आला होता की सम्यकला काही तरी गंभीर झाले आहे. सुकेतनरावांनी आवंढा गिळतच डॉक्टरांना विचारले.

सुकेतनराव,“ डॉक्टर माझ्या सम्यकला काय झाले आहे?”

डॉक्टर,“ आज सम्यकचे सगळे रिपोर्ट आले आहेत आणि खरं तर रिपोर्ट चिंताजनक आहेत. सम्यकचे हिमोग्लोबीन खूपच कमी झाले आहे म्हणजेच अगदी 5 ग्रॅमवर आले आहे म्हणून त्याला चक्कर आली आणि तो बेशुद्ध झाला. सुरवातीला त्याला ऍनिमिया झाला असेल असे वाटले पण आहार विहार सगळं व्यवस्थित असताना सम्यकला ऍनिमिया कसा झाला हा प्रश्न मला पडला होता म्हणून मग माझ्या एका मित्राशी मी सल्लामसलत केली. त्याला थैलेसीमिया झाला असण्याच्या शक्यते पर्यंत पोहोचलो आणि दुर्दैवाने आमचा संशय खरा ठरला.” ते गंभीरपणे बोलत होते.

पल्लवी,“ म्हणजे नेमकं सम्यकला काय झालंय डॉक्टर?” तिने धीर करून विचारले.

डॉक्टर,“थैलसीमिया एक प्रकारचा रक्ताचा विकार आहे ज्यामुळे मानवी शरीरात रक्त निर्मिती व्यवस्थित होत नाही आणि वारंवार पेशंटला रक्त चढवावे लागते. त्यावर कायमस्वरूपी इलाज आहे!”ते गंभीरपणे बोलत होते.

सुकेतनराव,“ मग सुरू करा इलाज डॉक्टर मी माझ्या मुलासाठी पाण्या सारखा पैसा खर्च करू शकतो!” ते डोळ्यात पाणी आणून म्हणाले.

डॉक्टर,“Mr. सरपोतदार अहो इतकं सोप नाही ते त्यासाठी बोनमॅरो ट्रान्सप्लांट करावे लागेल आणि त्यासाठी सम्यकचे बायोलॉजीकल म्हणजे अगदी रक्तातल्या नात्याच्या लोकांचा बोनमॅरो हवा! सम्यकला भाऊ-बहीण नाहीत. आपण तुमच्या दोघांचे बोनमॅरो मॅच होतात का पाहू आणि हो तुम्हाला पुढच्या ट्रीटमेंटसाठी मुंबईला जावे लागेल. मी माझ्या ओळखीतील एका डॉक्टरचा रेफरन्स देतो आणि फोन करून ही सांगतो सगळं! तत्पूर्वी आपण तुमचे बोनमॅरो मॅच होतात का ते पाहू!” ते म्हणाले.

हे ऐकून दोघे ही डॉक्टरच्या केबिनमधून बाहेर पडले. दोघे ही स्तब्ध आणि निःशब्द होते. वरून पल्लवी आणि सुकेतन शांत वाटत असले तरी दोघांच्या ही मनात अनेक वादळे आणि वैचारिक आंदोलने उठत होती. दोघे ही वेगवेगळ्या वैचारिक वदळांमध्ये अडकले होते. दोघांच्या ही मनात भीती होती की एकोनतीस वर्षांपासून इतक्या निगुतीने आणि काडी-काडी गोळा करून बांधलेले हे सुंदर घरटे या एका वादळाने कोलमडून पडेल की काय? असे कोणते वादळ होते ते ज्याची भीती मात्र दोघांना ही वाटत होती?

एक तर त्याच्या लाडक्या सम्यकचा जीव धोक्यात होता आणि दुसरे म्हणजे हे घोंगावणारे वादळ! दोघे ही शांतच होते पण फक्त वरून! सुकेतन आणि पल्लवीचे बॉनमॅरो मॅच होतात का हे पाहण्यासाठी दोघांची HLA(human leukocyte antigen test) करण्यात आली. साधारपणे या टेस्टचे रिपोर्ट मिळायला एक आठवडा लागतो पण डॉक्टरांनी त्यांचे रिपोर्टर चार दिवसात येतील अशी व्यवस्था केली.

हे चार दिवस दोघांनी ही एखाद्या वादळात भरकटलेल्या नौके सारखे काढले. सुकेतन आणि पल्लवीच्या मनाची वेगळीच घालमेल चालली होती. नाही म्हणायला ते सम्यक समोर अगदी सगळं सामान्य आहे असे वागत होते. त्याच काळात सम्यकला ब्लड चढवण्यात आले त्यामुळे त्याला आता बरे वाटत होते आणि रोगाची ही नुकतीच सुरुवात होती त्यामुळे ही त्याची प्रकृती ठीक होती. पाचव्या दिवशी डॉक्टरांनी संध्याकाळी आठ वाजता दोघांना ही बोलवून घेतले. दोघे ही डॉक्टरच्या केबिनमध्ये भीतभीतच गेले.डॉक्टरांनी त्यांना बसायला सांगितले आणि ते बोलू लागले.

डॉक्टर,“ मिस्टर आणि मिसेस सरपोतदार बातमी चांगली नाही. तुमच्या दोघांचे ही बोनमॅरो सम्यकशी मॅच होत नाहीत. खरं तर दोघां पैकी एकाचे बोनमॅरो मॅच व्हायला हवा होता पण तो होत नाही! होत असे रियर केसेस मध्ये! आपल्याला आता डोनर शोधावा लागेल पण तो ही लवकरात लवकर. मी तुमची मुबंईत हॉस्पिटलमध्ये व्यवस्था करतो पण डोनरसाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतील.” ते गंभीर होत म्हणाले.

हे ऐकून दोघे ही स्तब्ध होते. पण दोघांच्या ही डोळ्यातून अश्रू धारा वाहत होत्या.डॉक्टरांना त्यांना काय समजवावे कळत नव्हते. पल्लवी शांतच होती पण तिच्या डोळ्यात आता वेगळीच भीती दिसत होती. सुकेतनने मनात काही तरी विचार केला. चेहरा रुमालाने पुसला आणि पल्लवीचा हात धरून त्याने तिला फरपटतच हॉस्पिटलमधुन बाहेर नेले आणि कारमध्ये बसवले आणि तो स्वतः ड्रायव्हर सीटवर बसला. तो गाडी स्टार्ट करणार तर पल्लवी त्याला रडतच म्हणाली.

पल्लवी,“ अहो आपण कुठे निघालो आहोत. समूची जेवणाची वेळ झाली आहे कमीत कमी त्याला सांगून तरी….” ती पुढे बोलणार तर सुकेतनने तिच्याकडे जळजळीत नेत्र कटाक्ष टाकला आणि तिने आवंढ्या बरोबर शब्द ही गिळले आणि ती शांत बसून राहिली.

सुकेतनने त्यांच्याच बंगल्या समोर गाडी पार्क केली आणि तो पल्लवीला घेऊन घरात शिरला. पल्लवी मात्र आतून पूर्णपणे हदरली होती. त्याने पल्लवीला समोर उभे केले आणि अगदी शांतपणे तो म्हणाला.

सुकेतन,“ पल्लवी सम्यकचा बायोलॉजीकल बाप कोण आहे?(त्याने विचारले ते शब्द पल्लवीने ऐकले आणि तिने एक हुंदका दिला.) रडून काहीच होणार नाही पल्लू! मला वाटले नव्हते की मला तुला हा प्रश्न आयुष्यात कधी विचारावा लागेल पण आज प्रश्न सम्यकच्या जीवाचा आहे आणि माझा मुलगा माझा जीव आहे. त्याला काही झालेले मला सहन नाही होणार! जरी मी त्याचा बायोलॉजीकल बाप नसलो तरी!...” ते पुढे बोलणार तर पल्लवी मध्येच बोलू लागली.

पल्लवी,“ म्हणजे तुम्हाला माहीत होते की सम्यक तुमचा मुलगा नाही? तरी तुम्ही माझा आणि त्याचा स्वीकार केला मला एक ही शब्द न बोलता न विचारता?” ती आश्चर्याने म्हणाली.

सुकेतन,“ हो मला माहित होतं हे तू प्रेग्नेंट आहे हे ज्या दिवशी कळले त्याच दिवसा पासून!” ते अगदी शांतपणे म्हणाले.

पल्लवी,“ पण कसे काय माहीत होते तुम्हाला हे? म्हणजे त्या वेळी गर्भ किती महिन्यांचा आहे हे फक्त गर्भवती बाईच सांगू शकत होती कारण सोनोग्राफीची सोय इतकी नव्हती आणि आपण ती करून ही घेतली नाही. मग तुम्हाला असे समजले हे आणि मी तुमची इतकी मोठी फसवणूक केली हे समजून ही तुम्ही शांत का राहिलात?”ती आश्चर्याने विचारत होती.

सुकेतन,“ हो सगळं सांगतो तू आधी बस इथे!(असं म्हणून त्यांनी तिला सोफ्यावर बसवले आणि बोलू लागले) तुला आठवत का जेंव्हा तू प्रेग्नेंट आहे म्हणून माईने मला फोन करून ऑफिसमध्ये कळवलं त्या दिवशी मी रात्री घरी आलोच नाही. दुसऱ्या दिवशी आलो!(तिने नुसती होकारार्थी मान हलवली) तुला माहीत आहे की मी घटस्फोटित होतो आणि तू माझी दुसरी पत्नी आहेस.संगीता माझी पहिली पत्नी होती. लग्नाला पाच वर्षे झाली तरी आम्हाला मूल होत नव्हते. मग डॉक्टरकडे गेलो. तिच्या आणि माझ्या सगळ्या टेस्ट केल्या तर संगीता आई होऊ शकत होती तिच्यात कोणताच दोष नव्हता तर दोष माझ्यातच होता. मी कधीच बाप होऊ शकत नव्हतो कारण मी पुरुष होतो तरी माझ्यामध्ये शुक्राणूचे प्रमाण नगण्य होते. संगीताला मात्र मुल हवे होते आणि ती श्रीमंत घरातील असल्यामुळे आणि पुढारलेल्या विचारांची असल्याने तिने कोणता ही कांगावा न करता मला घटस्फोट मागितला आणि मी ही निमूटपणे तिला घटस्फोट दिला. पण माझे माई-अण्णा माझा मोडलेला संसार पाहू शकत नव्हते. म्हणून त्यांनी मला दुसरे लग्न करण्याचा तगादा लावला. मला मात्र दुसरे लग्न करण्याची इच्छा नव्हती.त्यातच अण्णा आजारी पडले आणि त्यांनी मला त्याची शेवटची इच्छा मी दुसरे लग्न करावे अशी आहे म्हणून सांगितले आणि मला त्यांचे मन मोडवले नाही. मी तयार झालो पण आपण कोणाला तरी फसवणार हा विचार मला मनातल्या मनात खात होता. त्यातच तुझे स्थळ मला सांगून आले आणि तू माईला आवडलीस. कधी कधी काही गोष्टी आपल्या मना विरुद्ध दुसऱ्याच्या सुखासाठी कराव्या लागतात. तू माझी अर्धांगिनी झालीस. मी मात्र आतून खचत चाललो होतो. एक मुलगा आणि पती म्हणून सगळी कर्तव्य पार पाडत होतो पण मनात तुला फसवल्याची अपराधी भावना होती. लग्न झाल्यावर दोनच महिन्यात तुला एक दिवस चक्कर आली आणि माई तुला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली आणि तू प्रेग्नेंट असल्याची वार्ता माईने मला दिली. हे ऐकून मला खरं तर तुझा खूप राग आला तू माझी फसवणूक केली ही भावना मनात होती. पण माझे दुसरे मन म्हणत होते की तू ही पल्लवीला फसवले आहेस की तू तर तिला सत्य कुठे सांगितलंस की तू बाप होवू शकत नाहीस. रात्र भर मी याच द्वंद्वात होतो. मग असा विचार केला की जे सुख मला आयुष्यात कधीच मिळणार नव्हते. ते तूझ्या रूपाने अर्थातच तुझ्या बाळाच्या रूपाने माझ्याकडे चालून आले आहे. तुझ्या गर्भातले मूल शेवटी माझेच नाव लावणार आणि माझाच वंश चालवणार मग तो अंश कोणाचा का असेना आणि मी काहीच बोललो नाही उलट दुसऱ्या दिवशी पेढे घेऊन आनंदाने घरी आलो! मी घटस्फोटीत आहे पण घटस्फोट का झाला हे न सांगता तुला अर्धसत्य सांगितले आणि तुही आई होणार आहेस हे सांगितलंस पण कोणाच्या बाळाची हे न सांगता मला अर्धसत्य सांगितलंस आणि याच अर्धसत्यावर आपला आज सत्यातला पूर्ण संसार फुलला आहे पल्लवी!” ते बोलून शांत झाले.

पल्लवी,“ खरं तर तुम्ही मला तेंव्हाच हाकलून देऊ शकत होतात मी तुम्हाला फसवलं म्हणून पण तुम्ही तसं काहीच केलं नाही उलट मला प्रेम,मान सन्मान आणि माझ्या मुलाला तुमचं नाव दिलत मी तुमची आयुष्य भर ऋणी राहीन!” ती हात जोडून म्हणाली.

सुकेतन,“ असं बोलून तू मला परक करत आहेस पल्लू ! खरं तर मीच तुझे आभार मानले पाहिजेत कारण तू मला माझ्या नशिबात नसणारे बाप होण्याचे सुख दिलेस. मी जेंव्हा सम्यकला पहिल्यांदा या हातात घेतल ना त्याचा बाप तेंव्हाच झालो! त्याच्या हसण्यात-रडण्यात हरवून गेलो. जेव्हा लोक मला म्हणतात ना की सम्यक तुमचा मुलगा आहे वाटत नाही तेव्हा मला राग नाही येत तर अभिमान वाटतो की इतका देखणा माझा मुलगा आहे आणि तो नुसता देखणाच नाही तर कर्तृत्ववान आहे. तुला कल्पना नाही पल्लवी की त्याने दोन वर्षात आपला बिझनेस कुठल्या कुठे नेवून ठेवलाय! खरं तर मीच तुझे आभार मानले पाहिजेत असा मुलगा मला दिल्या बद्दल आणि ज्या माणसाने तुला फसवून सोडले ना त्याची कीव वाटते मला तो खूप मोठ्या सुखाला मुकला आहे! पण आता त्याला आपल्याला शोधावं लागेल आपल्या सम्यकसाठी!” ते म्हणाले.

पल्लवी,“ नाही वो त्याने मला नाही फसवलं त्याचा खूप जीव होता माझ्यावर उलट त्याला जर कळले असते की मी आई होणार आहे तर त्याने आकाश पाताळ एक करून माझ्याशी लग्न केले असते!” त्या म्हणाल्या.

सुकेतन,“ म्हणजे काय म्हणायचं काय तुला?” त्यांनी आश्चर्याने विचारले.

पल्लवी,“ मला त्याने नाही तर माझ्याच रक्ताच्या नात्यांनी फसवलं! म्हणून तर मी तुमच्या घरात लग्न होऊन आले मात्र माझ्या माहेरचा उंबरा पुन्हा ओलांडला नाही आणि सुदैवाने तुम्ही तशी वेळ ही कधी येऊ दिली नाहीत. मी पुण्यात अकरावीला कॉलेजमध्ये गेले आणि अरण्यक अभ्यंकर माझ्या बरोबर शिकायला आला. अरण्यक गोरा-गोमटा, घाऱ्या डोळ्यांचा आणि धिप्पाड शरीराचा तरुण अगदी आपला समू त्याच्या सारखाच आहे! तो कविता करायचा त्याच्या दिसण्यामुळे आणि गुणांमुळे अनेक मुली त्याच्यावर फिदा होत्या. त्यातीलच मी ही एक! तरी मी त्याला कधी ही नजर वर करून पाहिले नाही पण त्याची नजर माझ्यावर होती. त्याने बारावीत गेल्यावर मला प्रपोज केले आणि मी नाही म्हणायचे कारणच नव्हते. पहिल्या प्रेमाचे गुलाबी दिवस एकमेकां बरोबर आणाभाका घेत आम्ही सिनियर कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. आता अरण्याक कवी संमेलने गाजवू लागला होता. नाटके लिहीत होता.त्याच्या घरात त्याची आई आणि तो दोघेच तो वर्तमानपत्रासाठी लेख, कविता लिहत असे त्यातून मिळणारे मानधन आणि पार्ट टाइम जॉब त्यात तो त्याचा चरितार्थ चालवत असे. त्याच्या घराची परिस्थिती तशी बेताचीच होती. या सगळ्यातच आम्ही पदवीच्या पहिल्या वर्षात असताना आमची पिकनिक शिमल्याला गेली आणि आमच्या दोघांत घडू नये ते घडले. आम्ही दोघे ही वाहवत गेलो तरी ही माझा अरण्यकवर पुर्ण विश्वास होता. म्हणतात ना मांजराने किती ही डोळे झाकून दूध पिले तरी लोक त्याला पाहत असतात. मी पिकनिक वरून येण्या आधीच घरी अरण्यक व माझ्याबद्दल कोणा कडून तरी कळले. घरचे जणू माझ्या येण्याची वाटतच पाहत होते. मी आल्यावर आबांनी मला खूप मारले. त्यांना माझे प्रेम मान्य नव्हते कारण जाती वेगळ्या होत्या आमच्या दोघांच्या ही! मग मला जबरदस्तीने मावशीकडे पाठवले नगरला कॉलेज वगैरे तर बंदच! माझा आणि अरण्यकचा संपर्क तुटला. त्यातच तुमचे स्थळ आले पण निसर्गाने त्याची किमया दाखवली होती आणि सम्यक माझ्या गर्भात आला होता मग मी ही जास्त आढेवेढे न घेता तुमच्याशी लग्नाला तयार झाले! आरण्यकला आपल्याला शोधायला वेळ लागणार नाही कारण तो आता फिल्म इंडस्ट्रीतला एक नामांकित गीतकार आणि लेखक आहे. मागच्याच आठवड्यात त्याचा वर्तमानपत्रात इंटरव्ह्यू आला होता.” तिने सगळं सांगून एक निःश्वास सोडला.

सुकेतन,“ असं आहे तर! पण तो सम्यकला बोनमॅरो द्यायला तयार होईल का?” त्याने विचारले.

पल्लवी,“ होईल तयार तो! मी घेऊन येईन त्याला!” ती ठामपणे म्हणाली.

तो पर्यंत सुकेतनचा फोन वाजला. हॉस्पिटलमधुन नर्स बोलत होती.

नर्स,“ सर आहो सम्यक सर ना जेवण करतायत ना औषध घेतायत तुम्ही प्लिज लवकर या!”

सुकेतन,“ हो हो आम्ही येतो! चला लवकर पोराने हॉस्पिटल डोक्यावर घेतले आहे!” ते हसून म्हणाला.

सुकेतन आणि पल्लवी हॉस्पिटलमध्ये पोहोचले तर सम्यक तोंड फुगवून बसला होता. पल्लवी त्याच्या जवळ जेवणाच ताट घेऊन बसत म्हणाली.

पल्लवी,“ काय झालंय समू इतकं चिडवायला?”

सम्यक,“ मला एकट्याला सोडून कुठे गेला होतात तुम्ही दोघे? एक तर मला काय झालंय कोणी सांगायला तयार नाही! इथे राहून मी कंटाळलो आहे मम्मा!” तो तोंड फुगवून म्हणाला.

सुकेतन,“ बेटा तुला काही ही मोठे झाले नाही! एक छोटेसे ऑपरेशन करावे लागेल मुबंईला जाऊन त्याचीच तयारी करत होतो दोघे आम्ही! उद्या आपण मुबंईला जात आहोत. तू जेव आणि औषधे घेऊन झोप आता” ते प्रेमाने त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाले.

सम्यक,“ ठीक आहे”

पल्लवी,“ लहान आहेस का तू आता असं वागायला! जेव लवकर!” त्या रागाने म्हणाल्या.

सुकेतन,“ पल्लवी! बच्चाच आहे तो माझा अजून!” ते हसून म्हणाले.

सम्यक,“ काय डाडा तुम्ही पण!” तो असं म्हणून हसायला लागला
★★★★

दुसऱ्या दिवशी तिघे ही मुबंईला पोहोचले. नगरच्या डॉक्टरांनी आधीच हॉस्पिटलमध्ये सगळी व्यवस्था केली होती. पल्लवी आणि सुकेतन दोघे ही जवळच लॉजवर राहिले. सम्यकची व्यवस्था लावून आणि सुकतेनला त्याच्या जवळ बसवून पल्लवी नेटवर पत्ता शोधून अरण्यकच्या बंगल्यावर जायला निघाली.
संध्याकाळची वेळ होती सूर्य मावळतीकडे त्याची लालीमा पसरवत त्याच्या अस्थाकडे झुकत चालला होता. पल्लवी मात्र वेगळ्याच विवंचनेत होती तिने सुकेतनला शब्द तर दिला होता पण आता तिला भीती वाटत होती की अरण्याक बोनमॅरो द्यायला तयार होईल का? ती हा सगळा विचार करत होती आणि ड्रायव्हरने गाडी थांबवली. पल्लवी गाडी थांबण्याने भानावर आली समोर अरण्याकचा बंगला होता. ती गाडीतून उतरली आणि भीतच बंगल्याच्या गेट जवळ जाऊन सिक्युरिटी गार्डला अरण्यकला निरोप द्यायला सांगितला की पल्लवी नाईक आली आहे. त्याने इंटर कॉमवरून फोन करून अरण्यकला विचारले आणि अरण्यकने त्याला पल्लवीला आत पाठवून दे असं सांगितले. पल्लवी बंगल्यात शिरली. त्याने आणि तिने स्वप्नात रंगवलेले हुबेहूब घर होते ते पोर्च मध्ये मोठा झोपाळा आत हॉलमध्ये गेल्यावर वर जाणारा नागमोडी जिना आणि सुंदर असे इंटिरिअर अगदी तिच्या पसंतीच्या रंगा पासून ते फर्निचर पर्यंत! ती हे सगळं आश्चर्याने पाहत होती. तर अरण्यक बार काउंटर जवळ बसून ड्रिंक घेत तिला मोठ्याने म्हणाला.

अरण्यक,“ या या पल्लवी नाईक उफSs सॉरी सॉरी मिसेस पल्लवी सुकेतन सरपोतदार! आज इतक्या वर्षांनी माझी आठवण झाली! नाही म्हणजे तुम्ही एका करोडपती बिल्डरच्या सुविद्य पत्नी! एका तरुण मुलाच्या आई तुम्हाला माझी आठवण कशी काय आली! छान त्रिकोणी कुटुंब आहे की तुमचं असं पहिल्या प्रेमीला भेटायला आलात तुम्हाला शोभत का हे?आणि तुमच्या नवऱ्याला माहीत आहे का हे?” तो कडवटपणे म्हणाला.

पल्लवी,“ हे बघ अरण्यक मी इथे मागच काही उकरायला नाही आले तर तुला मदत मागायला आले आहे आणि हो सुकेतनला माहीत आहे मी इथे आलेली रादर त्यांनीच मला पाठवलं आहे!” ती शांतपणे म्हणाली.

अरण्याक,“ अरे तुमच्या सारख्या करोडपती लोकांना मी काय मदत करणार?"तो हसून म्हणाला.

पल्लवी,“ हो तूच आम्हाला मदत करू शकतोस! माझा मुलगा सम्यक जो तुझाच मुलगा आहे त्याला बोनमॅरोची गरज आहे आणि दुर्दैवाने माझा बोनमॅरो मॅच झाला नाही पण तुझा बोनमॅरो नक्कीच मॅच होईल कारण तू सम्यकचा बायोलॉजीकल बाप आहेस. हा हॉस्पिटलचा पत्ता आणि माझे कार्ड टेबलावर ठेवते विचार कर आणि उद्या ये!”ती असं म्हणाली

अरण्यक,“ म्हणजे तुझा आणि माझा मुलगा!” तो म्हणाला

पल्लवी,“ हो तुझा आणि माझा मुलगा पण तुझा आणि त्याचा संबंध बायोलॉजीकल आहे तो सुकेतन सरपोदरचा मुलगा होता आणि राहणार आहे. खरं तर हे सत्य तुला मी कधीच सांगितले नसते आणि तुझ्या दारी ही मी कधी आले असते पण नियतीने खेळच असा खेळला आहे की आज मी हतबल आहे म्हणून तुझ्या समोर याचक म्हणून आले आहे. आमच्या सम्यकचे प्राण फक्त तूच वाचवू शकतोस! मी तुझ्या समोर पदर पसरते माझ्या मुलाचे प्राण वाचव!” ती रडत म्हणाली आणि धावतच निघून गेली.

हे सगळं ऐकून अरण्यक स्तब्ध होता.तो दुसऱ्या दिवशी यांत्रिकपणे हॉस्पिटलमध्ये पोहचला. त्याला पाहून सुकेतनने पल्लवीला डोळ्यानेच हाच का विचारले आणि पल्लवीने डोळ्यानेच होकार दिला. अरण्यकने त्यांच्याशी काहीच न बोलता काचेतूनच I. C. U मध्ये झोपलेल्या सम्यकला पाहिले आणि तो नर्स बरोबर टेस्ट करायला निघून गेला. चार दिवसांनी अरण्यकचा आणि सम्यकचा बोनमॅरो मॅच होतो असे रिपोर्ट आले आणि पुढच्या दोनच दिवसात सम्यकचे बोनमॅरो ट्रान्सप्लांट यशस्वीपणे पार पडले. अरण्यक जसा आला तसा निघून ही गेला कोणाला काहीच न बोलता.पण तो सम्यकला नवीन आयुष्य मात्र देऊन गेला.

सम्यक मात्र आनंदाने त्याचे आयुष्य जगतोय सुकेतन हा त्याचा वडील आहे असे समजून त्याच्या ही नकळत एका अर्धसत्या बरोबर!

© स्वामिनी चौगुले

Group content visibility: 
Use group defaults

कल्पना चांगली आहे.
पण thalassemia सारखा आजार लहानपणीच लक्षात येतो ना? एवढा मोठा होईपर्यंत सम्यकला काहीच लक्षणं दिसली नाहीत असं कसं ?
अरण्यकची तशी काहीच चूक नसताना पल्लवी प्रत्यक्ष भेटीत त्याच्याशी इतकी कडकपणे का बोलते? अरण्यकच्या मनात कडवटपणा असणं साहजिकच आहे.

@देवभुबाबा
धन्यवाद!हो कथा वाढवता आली असती पण ही कथा स्पर्धेसाठी लिहली होती मी आणि त्यात शब्द मर्यादा 1500 शब्दांची होती.
@वावे
धन्यवाद! तुम्ही म्हणता ते ही बरोबर आहे थैलसीमिया हा आजार लहानपणीच निदर्शनास येतो. तरी काही रिअर केसेस मध्ये तो तरुणपणात म्हणजेच बऱ्याच उशिरा लक्षात येतो. या बाबतीत माझ्या डॉक्टर मैत्रिणीशी चर्चा करून मी ही कथा लिहली आहे.पल्लवी अरण्यकशी कडक बोलते कारण तिला अरण्यक कोणत्या ही रुपात तिच्या आयुष्यात किंवा सम्यकच्या आयुष्यात नको असतो. अरण्यक सम्यक वर हक्क सांगेल ही देखील भीती तिच्या मनात असते.