बासरी

Submitted by किरण कुमार on 18 November, 2021 - 03:08

ताम्र होता रंग दिव्याचा उंच खांबावरी
समोर आला तत्परतेने कृष्ण सावळा हरी

वस्त्र तोकडी ठिगळे आणिक पाठीवर गोणी
पुढे चालता खळाळणारी खिशातली नाणी

एक बासरी त्यात देखणी मनात भरलेली
मुक्त सुरांना उधळत मी ती ओठी धरलेली

निवडक वेळू कांताराचा गोंड्याने सजला
मोह अनामिक कसा सुटावा रस्त्यावर मजला

चाचपताना खिसे जरासे मेख जाणवे खरी
कसे नेमके विसरुन आलो पैसे तेव्हा घरी

मुक्त मनाने तो ही बोले "घेवूनी जा दादा"
मोल तयाचे नंतर द्यावे हिशोब हा साधा

माज धनाचा दावत वदलो देइन दुपटीने
थांबशील जर त्याच ठिकाणी उद्या सवडीने

आनंदे मी घेत बासरी आलो तेव्हा घरी
पुन्हा कधी त्या रस्त्यावर तो दिसला नाही हरी

भिडून गेली काळजास ती स्वच्छ किरदारी
घेत उधारी वणवण फिरलो त्याच्या दरबारी

श्रावणातल्या सरीत झिम्मड भिजून तो गेला
दान सुरांचे झोळीत टाकत निघून तो गेला

अहंपणाचा फुगाच फूटला त्या भर चौकात
भिक्षूक झाला क्षणात राजा जाणुनी औकात

दर्शन देवून सुदाम्यास या,अंतरी पेटाया
युगायुगातून तोच मुरारी येतो भेटाया .........................

(इतरत्र पुर्वप्रकाशीत)

- किरण कुमार

Group content visibility: 
Use group defaults

खूप छान, आवडली कविता.

मला माहीतच नव्हते तू कविता करतोस ते. बघितले तर भरपूर दिसताहेत.
वाचेन आता एकेक.