पसारा..

Submitted by _आदित्य_ on 2 November, 2021 - 02:13

कळशीत घेऊनिया थंडगार पाणी..
रानोरान अनवाणी ! फिरू नको राणी !
जवळच आहे तुझे तहानले घर..
पडुदे मनात ओल्या पावसाची सर !!

कस्तुरीमृगाच्यापरी वेडा तुझा धावा !
अंतरीचा बाहेर तू शोधतेस रावा !!
पदर खोचून, उरी वेड पांघरून..
ऐकू बघतेस निळ्या बासरीची धून !?

गवसेल काय? भय !! धुक्याचा प्रलय !
जुनी अमावस ! नाही चंद्राचा उदय..
चुकला - मुकला वारा.. पाचोळपसारा..
रंगाविण उदासीन मोराचा पिसारा !!

नाद पैंजणाला तुझ्या असेल वेगळा..
कोवळे सावळे गीत येई तुझ्या गळा..
पण साजणाला नाही रस त्यात काही !
प्रीतीची बिचारा तुला मागताहे ग्वाही !!

निळे घन कधीपून कोसळून गेले..
मनाचे पाषाण खाली ढासळून गेले..
झाकतेस मनात उठल्या मारव्याला !
उन्हे जाळणारी.. तुझा दोष गारव्याला !?

खुळ्यापरी धावू नको, जाऊ नको दूर !
सावर सावर तोल मनाला आवर !!
धावपळ थांबताच साजण पावेल !
समाधीचा दीप तुझ्या अंतरी तेवेल !!

.................................

Group content visibility: 
Use group defaults

आदित्य...
तुमच्या बऱ्याच कविता वाचल्या मी...
त्यातून दरवेळी एक अनुभव आणी शिकवण मिळते...
तुमच्या कविता अध्यात्मिक आहेत असं वाटतं मला.....
ह्याही कवितेत तुम्ही मनाच्या अस्थिरतेला
सांगत आहात स्थिर व्हायला....
पण उपमांनी सजवून... भक्तिरसात ढाळून..
खूपच बहुरंगी आणी सुंदर आहे लिखाण तुमचं...
ही तर आवडलीच..
पण बाकीही खूप आवडल्या मला कविता..

Thank you so much
For such appreciation !!
तुम्हाला इतकं आवडलं हे पाहून बरं वाटलं...
@'अवलिया' !! Happy