तेच ते का करू?

Submitted by निशिकांत on 31 October, 2021 - 08:53

तेच ते का करू?

किती श्वास आता जुन्या आठवांचे मनी लागले एवढे गुदमरू
उसास्यात गेली जरी रात्र सारी, सकाळी पुन्हा तेच ते का करू?

कसे पाप झाकावया सोडले तू , उकिरड्यावरी निर्दयी होउनी?
मनाला कळाले जगी स्वार्थ आहे, असो माय आणि तिचे लेकरू

स्त्रिया आजच्या प्रश्न पुसतात हल्ली कशाला उगा मी वडाला पुजू?
पुरे जाहली साथ जन्मातली या, पती तोच तो का पुन्हा पत्करू?

उधारीत आनंद, नगदीत दु:खे, अशी रीत का रे तुझी जीवना?
म्हणोनीच मृगजळ पुढे मागुती मी, निराशेसवे रोज का वावरू?

अरे पांडवांनो! खरा प्रश्न आहे जुगारात बुध्दी कशी भ्रष्टली?
पणाला कसे लावले द्रौपदीला? जरा स्पष्ट सांगा नका घाबरू

कशी वागती माणसे ते बघोनी, शिकायास पक्षी जणू लागले!
सुगी संपता शेत सोडून गेले, बघाया न उरले कुठे पाखरू

जरी निर्भया कायदा पास झाला, तरीही सुरक्षा न दिसते कुठे
सदा प्रश्न चिन्हासवे नांदते ती, सुरक्षित कुठे अन् कसे वावरू?

तिला आठवावे तुला वाटते पण तर्‍हा ही तुझी रे किती वेगळी!
तिने ज्या दिल्या कैक जखमा तुला त्या नको ना गड्या सारख्या टोकरू!

खरे दु:ख "निशिकांत"लाही कळाले, जरी संपदा खूप आहे घरी
मुले दूरदेशी उडाली अचानक, घरी एकही ना असे कोकरू

निशिकांत देशपांडे, पुणे.
मो. क्र. ९८९०७ ९९०२३
वृत्त--वागीश्वरी
लगावली--लगागा X ७ + लगा

Group content visibility: 
Public - accessible to all site users