मोत्याचे डुल आणि कुडी

Submitted by मनीमोहोर on 27 October, 2021 - 07:36

कानामध्ये आभूषणे घालून चेहऱ्याचं सौंदर्य खुलवण्याची कला पुरातन काळापासून मानवाला अवगत आहे. कानामध्ये पानं फुलं घातल्याचे उल्लेख पुराणात ही आढळतात. कर्णाची कवच कुंडले कोणाला माहीत नसणं शक्यच नाही. वारीयाने कुंडल हाले , बुगडी माझी सांडली ग , झूमका गिरा रे, ढुंढो ढुंढो रे साजना ह्या सारखी कर्णभूषणांवर आधारित अनेक गाणी लोकप्रिय ही झाली आहेत. नायिकेचे कानातलं नायकाच्या शर्टात अडकणे हिंदी मराठी चित्रपटा दिग्दर्शकां मध्ये पूर्वी भलताच पॉप्युलर होता. असो

कानात वयानुसार शोभतील अश्या विविध प्रकारच्या कर्णभूषणांमुळे चेहरा तर खुलतोच पण ह्याचे अनेक फायदे ही सांगितले आहेत आयुर्वेदात. कानात एका विशिष्ट ठिकाणी टोचल्यामुळे मेंदूची वाढ उत्तम होते. डोळे नीट राखले जातात. स्त्रियांचं आरोग्य उत्तम रहाण्यास मदत होते, मानसिक तणाव कमी होतात ...असे अनेक. म्हणून हा एक संस्कार म्हणून ही ओळखला जात असेल हिंदू धर्मात.

लहान बाळाचे कान टोचणे हा सोळा संस्कारांपैकी एक संस्कार आहे. जनरली बाळाच्या जन्मानंतर लगेच म्हणजे बाराव्या दिवशीच हा विधी अगदी समारंभपूर्वक केला जातो. मानाने आपल्या ओळखीच्या सोनारास घरी बोलावले जाते. सोन्याच्या तारेने त्यात एखादा मोती घालून कानाच्या पाळीवर एका विशिष्ट बिंदूवर बाळाचे कान टोचले जातात. बाळ वेदनेने कळवळत , घरातल्या सगळयांचा जीव खालीवर होतो पण थोड्याच वेळात ते शांत ही होतं. काही ठिकाणी सोनाराला खोबऱ्याच्या वाट्या मान म्हणून देण्याची पद्धत आहे. जनरली कान टोचल्यावर काही ही प्रॉब्लेम होत नाही. कानात मोत्याची सुंकलं घातलेलं बाळ त्याच्या जिवलगाना अगदी बाळकृष्णा सारखं दिसू लागतं. काही जण मात्र हल्ली बाळ थोडं मोठं झाल्यावर डॉक्टर कडून ही कान टोचून घेतात .

हल्ली जरी लोंबत्या नाजूक कानातल्याची चलती असली तरी पूर्वी स्त्रिया मोत्याच्या, सोन्याच्या किंवा अगदीच श्रीमंत घरच्या स्त्रिया हिऱ्याच्या कुडयाच जास्त करून वापरत असत. एक मोती मध्ये आणि बाजूला सहा असे ते फार कलाकुसर नसलेले डिझाईन असे कुड्यांच. माझी आई ही अश्याच खूप मोठ्या मोठ्या आणि मळसूत्र खूप जाड असलेल्या मोत्याच्या कुड्याच वापरत असे. त्या वेळच्या परिस्थितीनुसार तिच्याकडे हा एकच जोड होता कुड्यांचा. तिच्या कानात रोज ह्याच अगदी ठसठशीत अश्या कुड्या असत. अर्थात कार्यप्रसंगी वैगेरे ही ह्याच कुड्या ती घालत असे. रविवारी नहाताना मात्र मोती खराब होतील म्हणून कुड्या काढल्या जात. शिकेकाई च्या पाण्याने हळुवार हाताने धुवून , मल्लमच्या फडक्याला नीट पुसून संध्याकाळी अंबाडा घालून झाला की परत कुड्या कानात घातल्या जात.. ती कुंकू मोठं लावत नसे पण कुड्या मात्र अगदी ठसठशीत होत्या तीच्या.

आता तिच्या नंतर आमची किती ही इच्छा असली तरी त्या वापराव्या अशी तरी आम्हाला ते अशक्य आहे. ते जाडजूड मळसूत्रच मुळात कानात जाणार नाही आमच्या कोणाच्याही. त्यामुळे त्या अगदीच कपाटात पडून होत्या जे मनाला फारसं पटत नव्हतं. म्हणून मी तेच मोती वापरून खाली दिसतोय तसा हार केला नातीसाठी . दोन सोन्याचे मणी आणि मध्ये कुडीतला मोती आणि मधोमध त्या पैकीच दोन मोत्यांचं पेंडंट असे बरोब्बर कुडीतलेच चौदा मोती वापरले.

पणजीची आठवण म्हणून मुलीच्या मुलीला ती ताई झाली तेव्हा तिला दिला. त्यावेळी मुलीला मुलगाच होऊ दे अशी मी देवाजवळ प्रार्थना करत होते. म्हणजे तस मला मुलगा पाहिजेच, वंशाचा दिवा वैगेरे काही वाटत नव्हतं. पण पणजीच्या मोत्याचा हार माझ्याकडे एकच होता . मला किती ही वाटलं तरी मी दुसरा तसा हार करू शकत नव्हते. म्हणून मुलगी झाली असती तर एकाच मुलीला ( ते ही उत्सवमूर्ती बाळाला नाही ) आपण पणजीचा हार दिला ही बोच माझ्या मनाला निदान थोडे दिवस तरी लागली असती. हे सगळं टाळण्यासाठी मुलीला मुलगा होऊ दे अस वाटत होतं. आणि देवांनी माझं ऐकलं. माझा पेच परस्पर सोडवला. असो.
माळ
IMG_20190812_114026557~2.jpg

कानात कर्ण भूषण घालून चेहऱ्याची शोभा वाढवण ही जरी स्त्रियांची मक्तेदारी असली तरी काही पुरुष ही हौशी असतात एका कानात छोटीशी चांदणी वैगेरे अनेक पुरुष ही घालतात . पूर्वी राजे महाराजे कानात हिऱ्या मोत्याचे चौकडे घालत असत. श्रीमंत खानदानी लोक कानात भिकबाळी हा दागिना आवर्जून घालत असत. लहान मुलांना ही अगदी तीन चार वर्षांपर्यंत कानात डुल घालत असत. जुन्या गृप फोटोत कानात डुल , आणि डोक्यावर जरीची टोपी घातलेली छोटी मुलं हमखास पाहायला मिळतात.

आमच्याकडे माझ्या यजमानांचे असे डुल अजून ही आहेत. घरातल्या सगळ्या छोट्या मुलांनी तेच वापरले असल्याने ते ऐंशी नव्वद वर्ष जुने नक्कीच असतील. अति वापरामुळे एका डुलाचा खालचा लोलक पडला होता.एका ओळखीच्या सोनाराने तो नीट लावून दिला. त्याला मागे हुक आहे आणि ते डुल कानाच्या थोडे खाली येतात घातले की. मोती अजून ही खूप सुंदर आहेत. माझ्या मुलीने आठ दहा वर्षे हे तिच्या वडिलांचे डुल खूप वापरले. परकर पोलका आणि हे डुल फार गोड दिसत असत. आता असे डिझाईन मिळत नसल्याने ते खूप वेगळे आणि उठून दिसत असत. आपल्या आजोबांनी आणि आईने वापरलेले हे डुल आता नातीच्या कानात बघायची खूप इच्छा आहे. पण मुलीने तिचे कान टोचून घ्यायच्या प्रतीक्षेत आहे.

डुल
20210924_194257~3_0.jpg

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Pages