ग्रिष्मालाही भिजवलेस तू भाग्या

Submitted by निशिकांत on 24 October, 2021 - 07:55

भाग्यवान का बनवलेस तू भाग्या ?
ग्रिष्मालाही भिजवलेस तू भाग्या

रोती सूरत सदैव असतानाही
किती खुबीने हसवलेस तू भाग्या!

स्वप्न मृगजळी लाख असू दे माझे
स्वप्न बघावे! शिकवलेस तू भाग्या

अपुल्यासंगे बोलत नाही हल्ली
दार मनाचे उघडलेस तू भाग्या

अता शिकायत कसली उरली नाही
ओंजळ भरुनी मज दिलेस तू भाग्या

नुरल्या भेगाळल्या कपारी आता
आपुलकीने शिंपिलेस तू भाग्या

"जसे ठेवले तसे रहावे" का हे?
विचार जगती पेरलेस तू भाग्या

निष्कर्माच्या ठिसूळ पायावर का?
घरकुल अपुले बांधलेस तू भाग्या

स्पष्ट सांग ना! "निशिकांता"च्या कानी
मनी भाव जे पोसलेस तू भाग्या

निशिकांत देशपांडे, पुणे.
वृत्त--वंशमणि
मात्रा ८+८+४=२०

Group content visibility: 
Public - accessible to all site users