अनंतचक्र..

Submitted by _आदित्य_ on 22 October, 2021 - 09:35

आठवते मज कुणीतरी स्वप्नात भेटले होते..
ओळख पाळख नसतानाही आप्त वाटले होते !
त्याने जे सांगितले ते संक्षिप्त तराणे होते..
आपुलकीचे बोल तयाचे पुढीलप्रमाणे होते :
ऐक बालका सावध हो तू कलियुग आहे बाबा..
जगात आमिषे फार जाहली, ठेव मनावर ताबा !
काल एक बैरागी आमुच्या दारावरती आला..
मागत भिक्षा, देव तुझे कल्याण करेल म्हणाला !
त्याने जे सांगितले ते संक्षिप्त तराणे होते..
शब्द प्रभावी त्या इसमाचे पुढीलप्रमाणे होते :
ऐक नीट जर हवी तुला ह्या संसारातून मुक्ती..
जपातपाने साधत नाही अलग तयाची युक्ती !
पार्वतीस जे वदले शिव ते तुला सांगतो आता..
आठवतील हे शब्द तुलाही शेवट जाता जाता !
त्यांनी जे सांगितले ते संक्षिप्त तराणे होते..
परमयोगविज्ञान शिवाचे पुढीलप्रमाणे होते :
ऐक पार्वती तुला सांगतो रहस्य ब्रम्हांडाचे..
आदि नसे वा अंत नसे ते परम रूप शून्याचे !
अनुभवता येते ते जेव्हा अनुभव संपून जातो..
तरी परंतु या वाटेने क्वचितच कोणी येतो !
परी वाटते कलियुगात हे कुणातरी आठवेल..
आठवेल हे जयास तो ऐसे काही बोलेल :
आठवते मज कुणीतरी स्वप्नात भेटले होते..
ओळख पाळख नसतानाही आप्त वाटले होते !
(कविता पुन्हा पहिल्यापासून सुरु)

...........

Group content visibility: 
Use group defaults