आदिवासी / खूप ग्रामिण भागांतील महिलांचे आरोग्य

Submitted by मुग्धमानसी on 21 October, 2021 - 13:23

काही स्वयंसेवी (हौशी) लोकांच्या ग्रूप सोबत आदिवासी एरियात जाण्याचे योजले आहे. एक प्रयोग म्हणून आणि एक इच्छा म्हणूनही. अजून बरेच हेतू आहेत जे मलाही माहीत नाही. पण मला जायचे आहे म्हणून केवळ मी जाणार आहे.

तर... तिथल्या आदिवासी बायकांनी मला जे काही शिकवायचे आहे ते त्या शिकवतीलच... आणि माझ्या अल्प बुद्धिला ते झेपावे अशी अपेक्षा आहेच. पण एवढ्या लांब जाऊन आपणही त्यांना काही बुद्धिचातुर्याच्या गोष्टी सांगून ’प्रवाहात’ वगैरे आणायचे करावे अशी त्या ग्रूपची इच्छा दिसते आहे. त्या दिशेने विचार करता फार गहन प्रश्न समोर ठाकले. त्यांची उत्तरे तुम्हा सर्वांच्या मदतीने मिळाली तर बरे होईल.

१. तिथल्या सर्व महिला मासिक पाळी दरम्यान सॅनिटरी पॅड्स / टॅम्पोन्स वापरण्याची शक्यता नगण्य आहे. कारण पैसे नाहीत, जवळपास केमिस्ट नाही, माहीती नाही, ’आमच्यात नसतं असलं काही’ वगैरे तर आहेच... ज्यांना आपण कदाचित डिफ़ेंड करूही, किंवा उत्तरे देऊही. पण सगळ्यात मोठा प्रश्न... या सॅनिटरी पॅड्स / टॅम्पोन्स ची विल्हेवाट कशी लावायची? त्यापेक्षा कपडे बरे आणि कटकटविरहित नाहीत का? पुन्हा पुन्हा वापरता येतात. सहज उपलब्ध असतात. (विचार केल्यास ते पर्यावरण योग्यही वाटतात.)... वगैरे.
अश्या प्रश्नांना काय उत्तरे द्यावीत? काय योग्य? कशामुळे? (त्यांच्या दृष्टीने कृपया.)

२. मेनोपॉझ संदर्भात आणि शरीर स्वच्छते संदर्भात त्या महिलांना आणि त्यांच्या कुटुंबियांना काय आणि कसे मार्गदर्शन करता येईल?

३. असे काही खेळ किंवा क्लुप्त्या सुचवता येतील का ज्यामुळे त्यांच्याशी जवळीक साधणे सोपे जाईल?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

तुमच्या प्रश्नांबाबत काहीच सांगू शकत नाही. मात्र तिकडे जाऊन आल्यावर त्याबाबत थोडेफार लिहा ही विनंती. एक चांगला अनुभव वाचायला मिळेल. Happy

तुम्हाला तेवढा वेळ मिळालाच तर त्यांच्या पारंपारिक नृत्य आणि गाण्यांचा कार्यक्रम आयोजित करा. शक्य असेल तर एकत्रित भोजन ही ठेवा. सर्व एकत्र येण्यासाठी आणि मनमोकळेपणाने बोलण्यासाठी अशी वातावरण निर्मिती गरजेची आहे. शिवाय जेवणाचा कार्यक्रम ठेवल्यावर त्यासुद्धा घरकामात व्यस्त न राहता आवर्जून हजेरी लावतील.... आणि मग गप्पांच्या ओघात तुमच्या विचारांची देवाण घेवाण करा. बऱ्याचदा आदिवासी स्रिया सुद्धा त्यांच्या पाड्यावरील एखाद्या वयस्क अथवा teamleader चे ऐकणारे असतात, अश्या व्यक्तीचा शोध घेऊन त्यांना हि पटवून देऊन त्यांच्यामार्फत पुढील कार्यक्रम राबवण्याचा प्रयत्न करा.
सध्या भात कापणीचे आणि मळणीचे दिवस जवळ येत आहेत. त्यामुळे शेतकामावर जाणाऱ्या स्रिया कार्यक्रमाला उपस्थिती दाखविणे म्हणजे तसे कठीणच. अंगमेहनत झाल्यावर शरीर आरामाला प्राधान्य देतो. त्यामुळे तुमच्या भेटीचे नियोजन या गोष्टी ध्यानात घेऊनच करा.

चांगल्या उपक्रमास शुभेच्छा !

मुळात मासिक पाळी हा शरीरधर्म असून यात काहीही अपवित्र वगैरे नाही, असे प्रबोधन करणारे पथनाट्य स्वरूपाचे कार्यक्रम ठरवता येतील.

कपडाही ठीक आहे...पण स्वच्छता शिकवा. शिवाय त्यात काहीही अपवित्र नाही असे समजावून सांगा. मेनोपॉझ चे वेळी येणारे प्रॉब्लेम्स..(किंबहुना त्यांना हे होर्मोनल प्रॉब्लेम्स वगैरे नसतीलच फार..... साधी राहणी, साध्या अपेक्षा, किमान गरजा!) पण समजावून सांगा. त्यापेक्षा तरुण मुलींना गर्भ निरोधनाबद्दल सांगितलेत तर अधिक चांगले. मूल होऊ देणे - न देणे हा तुमचा चॉइस असला पाहीजे हे ठसवा. बाळंतीण बाई बद्दलही अनेक प्रवाद, गैर समज असतात...... तेही कसे चूक आहेत ते सांगा.

हल्ली मासिक पाळीच्या बाबतीतली स्वच्छता म्हणजे सॅनिटरी नॅपकिन असंच समीकरण दिसतं. पण तसंच असण्याचं काही कारण नाही.
हा खालचा व्हिडिओ मला खूप चांगला वाटला होता. त्यात दाखवलेली प्रॉडक्ट्सही चांगली आहेत.

"Sustainable menstruation and sanitary waste management">

मुग्धमानसी, चांगला उपक्रम आहे!
मनात काही योजून न जाता तिथली परिस्थिती पहा आणि मग ठरवा असं सुचवेन. या विषयावर प्रत्येक वयोगटातल्या बायकांशी वेगवेगळ्या प्रश्नांवर चर्चा होऊ शकते. त्यामुळे तिथे कशाची गरज आहे हे लक्षात आले की अधिक चांगले पर्याय सुचवता येतील असे वाटते.
जाऊन आल्यावर इथे जरूर कळवा! शुभेच्छा!

खूप छान उपक्रम,
कपडा वापरत असतील तरी काहीच काळजी नाही फक्त स्वच्छता अतिशय महत्त्वाची आहे हे ठसवून द्या,बऱ्याच वेळा आतले कपडे ओलसर कुबट जागी वाळवले जातात त्यामुळे होणाऱ्या संभाव्य त्रासाची कल्पना द्या,कदाचित बऱ्याच जणी त्या त्रासातून जात असतील,वैयक्तिक स्वच्छता खूपमहत्त्वाची.
जर तिथे पाण्याचा प्रश्न बिकट असेल तर कमी पाण्यात देखील वैयक्तिक स्वच्छता कशी करता येऊ शकते याचं नियोजन त्यांच्याच मदतीने करता येईल

छान उपक्रम... menstrual cup चा option ही आहे बाजारात.. जो reuse करू शकतो.. विल्हेवाट लावण्यासाठी विशेष प्रयत्न लागत नाहीत.. स्वच्छ धुतला की रेडी तो युज.. sanitary pads पेक्षा hygienic वाटतो.. पटत असेल तर सुचवू शकता.. एकदा घेतल्यावर किमान वर्षभर तरी जातो..

https://youtu.be/xjk--YpJBIY
अगदी आजच हा व्हिडीओ पाहिला.. प्रियांका कांबळे चा.. आदिवासी पाड्यांवर काम करते बरेच वर्ष याच विषयात.. काही contact मिळाला आणि guidance मिळाला तर उपयोग होऊ शकेल..

छान आहे. अनुभव नकी लिहा.
या बरोबरच त्यांना शरीराची झीज होऊ नये म्हणून पुरक खाणे, सप्लिमेन्ट्स व्हिटामिनच्या गोळ्या वगैरे सारखे विषय समजावले तर उपयोगी पडेल कदाचित. माझ्या इथल्या एक ओळखीच्या डॉ. खेड्यापाड्यात जाऊन कामात स्वतःकडे दुर्लक्ष करणार्‍या स्त्रीयांना तपासणी करून योग्य त्या सप्लिमेंट्स द्यायचे कँप्स करायच्या.

मुग्धमानसी, स्तुत्य उपक्रमात भाग घेतल्याबद्दल खूप अभिनंदन.
१) एक माहितीदात्या ह्या नात्याने मासिक पाळीत वापरल्या जाणार्‍या प्रत्येक पर्यायाचे फायदे व तोटे समजावून सांगता येतील. वाचता येत नसले तरी माहिती ऐकून कोणता पर्याय, कसा वापरावा याचा निर्णय मुली करू शकतील. (उदा: कपडे धुवून वापरणे पर्याय निवडला तर वरील एका व्हिडीयोत सांगितल्याप्रमाणे सूर्यप्रकाश, पाणी इ वापरून स्वच्छ करणे इ). "काय योग्य?" ह्या प्रश्नाचे उत्तर देणे मी टाळीन कारण बहुतेक स्त्रियांना आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळे पर्याय वापरावे लागतात. सर्व पर्याय वापरले असणार्‍या अनुभवी स्त्रीच्या नात्याने आपण त्यांचे "थॉट पार्टनर"/साऊंडींग बोर्ड होऊन त्यांना त्यांच्यासाठी योग्य निर्णय घेण्यास मदत करू शकतो. आज पॅड्स इ घेणे शक्य नसले तरी पुढे मागे आर्थिक स्थिती बदलल्यावर करण्यासाठी 'ध्येय' राहील. ("ध्येय" शब्द फेमिनीन केयर प्रॉडक्ट्स साठी वापरावा लागतो ही एक विडंबना विसंगती आहे.)

२) मेन्स्ट्रुपिडीया ह्या चॅनेलवर फ्री कंटेंट आहे. माफक किंमतीत पुस्तके आहेत. (माझा ह्या संस्थेशी काही संबंध नाही. ह्यांची माहिती वर्तमानपत्रात वाचली होती.) रजोनिवृत्ती बद्दल काही कंपन्यात एच.आर तर्फे वर्कशॉप्स होतात. अशा कुठल्या संस्थेतून मराठीत पत्रके इ मिळू शकतील. इंग्रजीत आंतरजालावर उपलब्ध आहेत.

३) फार काही टीप्स नाहीत पण "ही मन लावून ऐकते" (गुड लिसनर) यासारखं जवळीक साधण्यासाठी दुसरे साधन नाही. "अरे पण समोरची पार्टी बोलली तर पाहिजे"... खरं आहे. बाईला स्वत:च्या गरजा बोलण्याची सवय नसते. त्यांना समजून घेण्यासाठी तुला खूप शुभेच्छा.

थोडी रिक्षा - मासिक पाळी व्यतिरिक्त स्त्रीला अनेक आरोग्य समस्यांचा सामना करावा लागतो (उदा: इंफेक्शन्स जास्त होणे, हाडांचे आजार, धूरामुळे होणारे आजार). जर अशा समस्या उपक्रमात बसत असतील तर - https://www.maayboli.com/node/80019

तुझे अनुभव नक्की लिही. वाचायला उत्सुक आहे.

माझं मुळ गाव मराठवाड्यतल्या नक्षलग्रस्त तालुक्यात येतं. आमच्या गावात ७ घरे पाटलांची, २ धनगराची, एक नवबौद्ध आणि जवळपास २०० घरे गोंड, माडिया आहेत. या नवरात्रीत गावी जाणं झालं त्यावेळची गोष्ट. गावाच्या मधोमध जाणाऱ्या रस्त्याने गावाचे २ भाग केले आहेत. आमच्या गावात १ किराणा दुकान होतं जे गेल्या ७,८ वर्षांपासून बंद आहे. आता फक्त गुटखा तंबाखू, बिस्कीट वगैरे विकणारी एक टपरी तेवढी आहे. तिथे सॅनिटरी पॅड भेटत नाहीत. पण...

गेल्या ४, ५ वर्षात आमचं गाव प्रचंड सुधारलं आहे. आमच्या शेतावरच्या गड्याला बोलवायला गोंडांच्या भागात गेलो असता उकिरड्यात बऱ्याच ठिकाणी सॅनिटरी पॅड्स पडलेले दिसले. या समाजात चोळी घालत नसत पण आताशा म्हाताऱ्या सुद्धा चोळीशिवाय राहत नाहीत. TV आणि जुजबी शिक्षण यांनी बराच फरक पडतो. घराबाहेर कधीच न पडणारा हा लाजरा बुजरा समाज, यावेळी गावात छान गरबा खेळताना दिसला. परवा कोजागिरीला सुद्धा मोठाच कार्यक्रम केला. असो, विषयाकडे वळूयात. काही कारणाने सरकारी दवाखान्यात गेलो होतो तर तिथे शांतता होती, पण खाजगी दवाखान्यात बरीच गर्दी असते. BHMS / BUMS वगैरे डॉक्टर लोक खोऱ्याने पैसे कमवत आहेत. आणि सरकारीमधले MBBS डॉक्टर निवांत होते. थोडक्यात आरोग्यावर लक्ष देत आहेत आदिवासी सुद्धा. (खरं तर या खाजगी पैसेखाऊ अर्धवट डॉक्टरांकडे जाण्याऐवजी सरकारी मध्ये चांगले उपचार होतात. जमलं तर या विषयावर त्यांचं प्रबोधन करता येईल)

साधारण गावात डोळे उघडून आणि कोणत्याही अजेन्डा न राबवता फिरलं तर गाव खरा कसा आहे ते कळतं. गावातला कचरा सुध्दा बरेच काही सांगतो. तर, आधी नेमकी परिस्थिती बघा, त्यांच्या नेमक्या गरजा कोणत्या आहेत ते समजून घ्या. दारू पिण्याचे प्रमाण खूप असते इथे. म्हणजे १०० पुरुषांमागे ७० स्त्रिया गावठी दारू सनावरदिवशी घेतात. पुरुष जवळपास रोज.. त्याचे दुष्परिणाम समजावता येतील.

थोडक्यात, आम्ही तुमचे आयुष्य बदलायला आलोय या अभिनिवेशात न जाता, त्यांचे आयुष्य समजून घ्यायला गेलात तर अधिक बरे. शुभेच्छा!

खूप धन्यवाद सगळ्या प्रतिसादांबद्दल.

सीमंतिनी तुमचा धागा वाचला. बरेच नवे मुद्दे मिळाले. माहिती मिळाली. धन्यवाद.

मी उद्या जाते आहे. आल्यावर अनुभव सांगेनच इथे. पण खरं सांगायचं तर माझा हेतू माझ्या पुरता स्वार्थी आहे. मी माझ्यापुरतं काहीतरी मिळवण्यासाठी तिथे जाते आहे. त्यातूनही माझा त्यांना काही फायदा होऊ शकला तर उत्तमच!