चिंधी : शेवट

Submitted by सोहनी सोहनी on 18 October, 2021 - 05:55

चिंधी : शेवट
https://www.maayboli.com/node/80358 - चिंधी६
https://www.maayboli.com/node/80325 - चिंधी५
https://www.maayboli.com/node/80267 - चिंधी४
https://www.maayboli.com/node/80233 - चिंधी३
https://www.maayboli.com/node/80216 - चिंधी२
https://www.maayboli.com/node/80201 - चिंधी१

समोर जे घडत होतं ते कळण्या पलीकडे होतं. ती कावरी बावरी झाली होती, तिला स्वतःमध्ये होणारे बदल मान्य नव्हते, ती खूप अशक्त, जवळ जवळ सांगाडाच दिसायला लागली, तरीही ती भरभर हवनात आहुती टाकत होती, मंत्र म्हणत होती.
आणि अचानक त्या हवनातून काळ्या धुरासारखं काहीतरी निघायला लागला, ते वेगळंच काहीतरी होतं, ते तिच्या भोवती फिरायला लागलं, ती अजूनच घाबरली, मी घट्ट धरून ठेवलेल्या बोटांना ओढणी बांधून घेतली, रक्त यायचं पूर्ण बंद झालं इतकं घट्ट आवळलं.
ती जोरात ओरडली " विधीत विघ्न आणलास मूर्ख मुली, आता कुणी वाचणार नाही " ती घाबरून उठून पळायचा प्रयत्न करू लागली पण तिच्या त्या कृश शरीराला ते शक्य होत नव्हतं, ते काळं वेटोळं जणू तिला गिळू पाहत होता, आता वाट पाहण्यात काही अर्थ नव्हता, तिच्या कर्माने तिचा नाश होणार होताच.

निसर्गाने देखील एक मोठा श्वास सोडला असावा आणि आपलं काम चालू केलं, मी फेकलेल्या जळत्या लाकडांमुळे सुकलेलं गावात आग पकडून वाढत चालली होती, काहीच मिनिटांत आग वाढून सगळ्यांना आपल्या कवेत घेणार होती.
मी त्या दोघांकडे पाहून म्हणाली जीव वाचावा स्वतःचा, चला इथून पण ते जागीच खिळले होते, मी अहिर जवळ जाऊन त्याला उठवण्याचा प्रयत्न करू लागले पण तोही हलायला तयार नव्हता, ते तिघे एकमेकांकडे पाहत होते, मी अहिर ला जोरजोरात हलवत होते पण तो एकटक अप्पांकडे पाहत होता,
आणि अचानक तिच्या शरीराने पेट घेतली, हे तिघेही धावत तिला वाचवायला गेले, आणि ह्यांच्या कपड्यांनी देखील आग पकडली,
सगळे, अहिर सकट सगळ्यांनी पेट घेतला, इकडे तिकडे पळताना पायाखाली सांडलेल्या आहुतीने आग पकडली आणि त्यांची शरीरे आगीने होरपळू लागली,
तिकडे झाडांनी आग पकडायला सुरुवात झाली होती, मला काय झालं काय माहित मी मागे एकवेळ हि न पाहता धावत सुटले.

जळालेल्या गवतावरून मी धावत सुटले, आगीने एव्हाना रौद्र रूप धारण केलं होतं, मोठ्या झाडांनी आग पकडली होती, त्या चौघांचे आवाज हृदयाला धडकी भरणारे होते, त्यांचा अंत अटळ होता पण मी स्वतःला वाचवण्यासाठी माझ्याही नकळत धावत होते,
माझं मन तिथे अहिर जवळ थांबलं होतं पण मी धावत होते शरीर वाचवायला.
आग धगधगत होती, आपले रौद्र हात पसरून जे येईल त्याला आपल्या कवेत घेत वेगाने पुढे सरकत होती.
मी काट्या कुट्याची तमा न बाळगता धावत होते, फक्त धावत होते.आताच ज्या पुरुषभर उंचीच्या गवतातून मी धावत आले ते जाळून खाक झालं होतं,
आग प्रचंड वाढली होती, वाळलेली झाडांसोबत ओली झाडं देखील जळणार होती.
पक्षी प्राणी, असतील नसतील ते सगळे जीव जाळून खाक होणार होते, मागे उरणार होती ती फक्त आणि फक्त भस्म. . .
ह्या विचारांनी माझ्या डोळ्यांतून पाणी वाहत होतं, त्या चौघांचे आवाज कधीच मागे पडले होते, सगळंच मागे पडलं होतं, आगीच्या ज्वाला लपलप करत सगळ्यांना आपल्या मिठीत घेऊन मला स्वतःत सामावून घ्यायला माझ्या मागावर होती.
धावून छाती फुटायची वेळ आली होती,किती तरी वेळा स्वतःच्या पायांत गुंतून कितीतरी झाडांना धडकून गेले होते, पण जखमांची गणती न करता शेवटी मी त्या झऱ्यात उतरले.
त्या झऱ्याच्या त्या बाजूला जाऊन मी तशीच ओली गवतावर पडले, पडल्या पडल्या समोरच दृश्य पाहत मी गुढगे छातीशी घेऊन हमसून हमसून रडले.
झऱ्याच्या त्या पलीकडे आगीने थैमान घातलं होतं, झऱ्याच्या या पलीकडे यायला तिला काहीसाच वेळ लागणार होता.

ती चिंधी नक्की काय प्रकार होता? तिने कशासाठी हे सगळं केलं?? ह्या लोकांना तिच्यापासून काय मिळालं?
हे लोक तिच्या मायावी बोलण्यात कसे आले???
अहिर शिकलेला असून देखील तो कसा असा वागला?? ते आगीतून निघालं ते काय होतं?? चिंधीच्या शरीराला अचानक कशी आग लागली???
तिच्या कडे शक्ती असून देखील ती कधी नष्ट झाली??
मी अहिर ला वाचवू शकत होते कि नव्हते???
आणि अजून असंख्या विचार मी त्या लपलपत्या आगीत स्वाहा करून, जड पावलांनी मुख्य रस्त्याकडे मदत शोधण्यासाठी निघाले . . .

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

कथा चांगली झाली आहे. शेवट फार खास वाटला नाही पण हे तुमचं तुम्हाला कळालं आहे त्यामुळे अभिनंदन Happy

ही कथा 6 भाग करण्या ऐवजी 2 भागात केली असती आणि शेवट थोडा वेगळा झाला असता तर प्रचंड आवडली असती.

छान झाली पण शेवटच्या प्रश्नांची उत्तरं मिळाली असती तर जास्त छान वाटलं असतं. आता नायिकेसारखे आम्हीपण बुचकळ्यात पडलो.

शेवटच्या प्रश्नांची उत्तरं मिळाली असती तर जास्त छान वाटलं असतं. आता नायिकेसारखे आम्हीपण बुचकळ्यात पडलो.>>
होना, नेटाने वाचत होतो ..

तुमची सगळ्यांची निराशा झाली त्याबद्दल सॉरी, पण काही तरी रोचक लिहायच्या नादात कथेतील सत्य लपला जाऊ शकत होता, असं मला जाणवलं,
कदाचित मीच घाई केली, अजून शांत विचार करून शेवट लिहायला हवा होता.

पण तुम्ही सगळ्यांनी मनापासून वाचली, त्याबद्दल खूप खूप आभार, मी नक्कीच तुमच्या सगळ्यांची मते विचारात घेऊन नवीन लिखाण करेन.