प्रतिमात्मक लिखाण

Submitted by निशिकांत on 16 October, 2021 - 09:53

( वीक एंड लिखाण. )

आपण जर सभोवताली डोळसपणे पाहिले तर बर्‍याच गोष्टी मजेशीर घडताना दिसतात. याला कारणीभूत असते आपण जोपासलेल्या श्रध्दा आणि त्यांच्याशी चिकटून रहाण्यातील वाटणारा मोठेपणा! परत लोक काय म्हणतील याची तलवार कायमच लटकत असते.
१) परत फिरा काम होणार नाही;  कारण मांजर आडवे गेले आहे,
२) सवाष्ण बाई भरली घागर घेऊन वाटेत भेटली तर काम यशस्वी होते,
३) मुहूर्त बघून पूजा पाठ किंवा कामाची सुरुवात करणे,
४) आमक्या आमक्या वारी दाढी किंवा कटिंग करू नये
एक नाही अशा हजारो बाबी आपणास दिसतील आणि आपणही त्या पाळतोच.  मी जास्त उदाहरणे देत नाही कारण ते कदाचित कांही लोकांना आवडणार नाही. अर्थात यात कांही गोष्टी प्रतिकात्मक असतात. श्रावणाच्या आसपास मृत्तिका पूजन हे धरतीमातेचे उपकार बिंबवण्यासाठी असते कारण धरती सुजलाम सुफलाम नसती तर काय झाले असते? तसेच मंगळागौरीची पाने पत्रीने पुजा करणे याचे पण आहे. वनस्पती जोपासणे आणि त्यांचे अनन्यसाधारण महत्व हे यातून अधोरेखित करण्यासाठी असते. आपण हे सर्व श्रध्देचा भाग म्हणून करतो. म्हणावी तशी जागृती न आल्याने जंगलतोड चालूच आहे.  आपण कर्मकांडात अडकतो आणि मूळ उद्देश बाजुलाच रहातो.
गेल्या आठवड्यात आपण विजयादश्मी नेहमीप्रमाणे उत्साहाने साजरी केली. ठिकठिकाणी ( विशेषतः उत्तर भारतात) रावणाच्या पुतळ्यांचे दहन करण्यात आले. असे दहन कित्त्येक वर्षापासून करतच आहोत. याचा हेतू दुष्टप्रवृत्तींचा नायनाट करावा असा आहे. रावण हा दुष्टवृत्तीचे प्रतीक आहे. पण प्रत्यक्ष हे काम करतो का? दुष्टप्रवृत्ती दिवसेंदिवस वाढतच आहे. खून, दंगे, लिंचींग, लाचखोरी हे सारे कशाचे प्रतीक आहे? पण आपण दरसाली रावणाचे दहन करतो एक  कर्मकांड म्हणून. आपण नेहमी प्रतिकात्मक परीघात अडकलेलो असतो.  यावर विचार करून करून माझ्या एका कवितेचा जन्म झाला. मी ही कविता दसर्‍यादिवशी मुद्दाम पोस्ट केली नाही कारण मला जनतेच्या सणासुदीच्या उत्साही मूडमधे अडथळा आणायचा नव्हता. सदर कविता खाली पेश करतोय.

रावणास का पोसत असतो? ( विजयादश्मीच्या निमित्ताने. )

विजयादश्मी मुहुर्तावरी
दशाननाला जाळत असतो
वर्षाच्या उरलेल्या दिवशी
रावणास का पोसत असतो?

रामप्रभूंना तोंड द्यावया
समोर होता एकच रावण
हजार आता सभोवताली
लुटावयाला अमुचा श्रावण
राम व्हायचे सोडून त्याच्या
पादुकांस प्रक्षाळत असतो
वर्षाच्या उरलेल्या दिवशी
रावणास का पोसत असतो?

आज जरी का कुणी लक्ष्मण
भूक लागुनी मुर्छित झाला
हनुमंताने कुठे उडावे?
संजिवनीचा शोध घ्यायला
पर्वतावरी घरे, लव्हासा
झाडे आम्ही तोडत असतो
वर्षाच्या उरलेल्या दिवशी
रावणास का पोसत असतो?

सत्तांधांच्या हस्ते जेंव्हा
पुतळ्याला फुंकून टाकले
दुष्टाचे निर्दालन झाले
मनोमनी जनतेस वाटले
आजकालचा रावण येथे
जुन्या रावणा जाळत असतो
वर्षाच्या उरलेल्या दिवशी
रावणास का पोसत असतो?

अनेक रावण जिवंत असुनी
मानमरातब त्यांना मिळतो
पुरुषोत्तम मर्यादित, त्याचा
म्हणे मंदिरी वावर दिसतो
रामकथेतिल आदर्शांचे
डोस जमाना सोसत असतो
वर्षाच्या उरलेल्या दिवशी
रावणास का पोसत असतो?

समाज सारा राम बनावा
प्रत्त्यंचा ओढून धराया
मुठभर रावण वेचवेचुनी
बाण मारुनी नष्ट कराया
कृती न करता, समाज निर्बल
प्राक्तनास का कोसत असतो?
वर्षाच्या उरलेल्या दिवशी
रावणास का पोसत असतो?

निशिकांत देशपांडे, पुणे.
मो.क्र. ९८९०७ ९९०२३
 

 

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच. नुसता पुतळा जाळतो आपण, रावण तसाच राहतो. रावण म्हणण्यापेक्षा त्याच्यातला दानव तसाच राहतो.
दसर्याला सोनं वाटायचं म्हणून आपट्याचं झाड ओरबाडून आणतो आपण. दुसर्याला भिकारी करून श्रीमंती मिरवायची खोडच आहे माणसाला.