कंटाळा

Submitted by पाचपाटील on 14 October, 2021 - 13:43

१. स्वतःला सतत वागवत राहणे ही काही सोपी गोष्ट नाही.
कंटाळा येतो. कंटाळा राहत्या जागेचा येतो, शहराचा येतो, गोंगाटाचा येतो, पुस्तक सिनेमांचा येतो, माणसांचा येतो,
स्वतःचाही येतो.. संपूर्ण गावाला, समाजाला, देशाला एकाच वेळी कंटाळा आलाय असं सहसा होत नाही. कंटाळा ही
वैयक्तिक गोष्ट आहे.
त्यामुळे असा कंटाळा मनसोक्त भोगण्याचा मूड असतानाच कुणी काही अपेक्षा व्यक्त केली की चीडचीड उत्पन्न होते.. 'मला माझी स्पेस हवीय' अशा पद्धतीच्या आधुनिक
शब्दरचनेद्वारे ही भावना अभिव्यक्त होते..
अर्थात अशा प्रकारातला कंटाळा कायमस्वरूपी टिकत नाही. तो येत जात राहतो.

२. कंटाळा पहाटे येत नाही. दुपार किंवा संध्याकाळ ही
कंटाळ्याची लाडकी वेळ आहे.
अशावेळी खुर्चीत फैलावून मागं रेलावं.. जबड्याचे सांधे
मोडेपर्यंत तोंड उघडावं.. छातीभर श्वास आत घ्यावा... आणि श्वास बाहेर सोडत असताना शेवटच्या बिंदूला "आssयाssयाssआईगंss" असा मोठ्ठा ध्वनी उत्पन्न करावा... ह्या प्रक्रियेस मराठी भाषेमध्ये जांभई असे म्हणतात. जांभई ही कंटाळ्याची बहिण असते.

समजा एखादा मनुष्य अशी सणसणीत जांभई देऊन थांबला असता त्यास प्रतिसाद म्हणून शेजारच्या कोपऱ्यातून हुबेहूब तशीच जांभई ऐकू येते..
काही मनुष्यांकडे जांभई शेवटाकडे जाऊन संपुष्टात येत
असतानाच शिट्टी वाजवल्यासारखा ध्वनी निर्माण
करण्याचेही कौशल्य दिसून येते.
खाजगी कार्यालयांमध्ये शक्यतो दुपारच्या जेवणानंतर हे
प्रकार ऐकायला, पहायला मिळतात.
परंतु सरकारी कार्यालयांमध्ये ह्याबाबतीत 'सकाळ दुपार
संध्याकाळ'
असे क्षुद्र फरक करणं व्यर्थ मानलं जातं. तिथे
दिवसाच्या कोणत्याही वेळेस अशा संसर्गजन्य जांभयांची
जुगलबंदी सादर करण्यात काहीच अडचण नसते.

३. कंटाळा ही काही अलीकडची शहरी आधुनिक भावना नसावी. आदिमानव पूर्वजही ह्यातून गेले असणार.
शिकार, मैथून, झोप वगैरे अतिमहत्त्वाची रूटीन कामं
उरकल्यानंतर काही आदिमानवांना उरलेला वेळ खायला उठत असेल, त्यातूनच त्यांनी शेती वगैरे भानगड शोधून
काढली असणार.
शिवाय रोज उठून शिकार वगैरे करून अन्न मिळवायचं
म्हणजे भलताच धोकादायक प्रकार. त्यामुळे वस्तीजवळच
सुरक्षित अन्नधान्य उपलब्ध करून देणारा शेती हा प्रकार त्यांना सुरूवातीला तरी भन्नाट वाटला असणार.
पण हळूहळू लक्षात आलं असेल की शेती हे गळ्यापर्यंत
बुडवणारं, चोवीस तासांची बांधिलकी मागणारं काम आहे. त्यात कंटाळा वगैरेसाठी फुरसतच मिळत नाही.
तरीही समजा आलाच कंटाळा तर तो घालविण्यासाठी
मध्ययुगात अधूनमधून लढाया वगैरे करण्याचे ऑप्शन्स होते त्यांच्याकडे.
परंतु लढाया वगैरेंमुळे समाजाचा कंटाळा जात असला तरीही व्यक्तीचा कंटाळा घालविण्यासाठी लढाईचा उपाय तसा बिनकामाचाच.
कारण कंटाळा हा सृजनशीलही असू शकतो. स्वयंपूर्णही असू शकतो. आणि अशा कंटाळ्याची चव चाखण्याचं भाग्य ज्यांना मिळालेलं असेल, त्यांच्या हातून कला क्रीडा साहित्य संगीत वगैरे निर्माण झालं असेल..
आणि ह्या गोष्टी एका व्यक्तिच्या कंटाळ्यातूनच निर्माण
झालेल्या असल्यामुळे, अनेकांचा कंटाळा घालविण्यासाठी
त्या अतिउपयुक्त ठरल्या असतील.

४. कंटाळ्याला नीट हाताळलं नाही तर त्याच्या येण्याची
फ्रिक्वेन्सी वाढत जाते आणि कंटाळ्याचे थर साचायला
लागतात. मग प्रत्येक गोष्टीला नकार द्यावासा वाटतो. साध्या कंटाळ्याचं विषारी कंटाळ्यात रूपांतर व्हायला लागतं.
विषारी कंटाळा जगण्यात शिळेपणा आणतो. जगण्यातल्या इंटरेस्टला चूड लावतो.
विशेषत: जगण्यासाठी काम वगैरे फालतू धंदे करण्याची काही गरजच नाही इतका महामूर पैसा जवळ असेल तर असा कंटाळा येणं अटळ आहे.
परंतु अशा कंटाळ्याची चैन हरहमेश उपलब्ध असणे ही किती मौल्यवान गोष्ट आहे, हे कळण्याएवढी काही कोट्यधीशांची जाणीव विस्तारलेली नसते..
त्यामुळे समोर अथांग काळ पसरलेला आहे आणि ड्रग्जचा आधार घेतल्याशिवाय त्या काळाला तोंड देता येत नाही, अशी भयावह अवस्था त्यांना प्राप्त होऊ शकते.
मजूर लोकही देशी किंवा हातभट्टीची दारू सर्रासपणे
झोकतात, पण त्यामागे कंटाळा हे कारण नसावे.
कंटाळा येण्यासाठीही ऊर्जेची एक किमान पातळी शरीरात असावी लागते.
समजा दिवसभर पिळून चिपाड केलं जात असेल आणि
त्यामुळे रात्री कुठंतरी जाऊन अंग फेकून देण्यापुरतीच ऊर्जा शिल्लक रहात असेल.. तर स्वतःच्या असल्या जगण्याविषयी वाटणारी लाज विसरण्याचा दारूशिवाय दुसरा सोपा उपायच त्यांच्यापाशी उपलब्ध नसेल.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान मार्मिक लिहिलंय! मध्यंतरी एका व्हॉट्सॲप फॉरवर्ड मध्ये कंटाळा आणि आळस यातला फरक वाचला होता जो पटला. कंटाळा म्हणजे बदल हवा असणे (सतत काम केल्यावर) आणि आळस म्हणजे असलेली स्थिती सुखमय वाटल्याने ती बदलण्याची इच्छा न होणे (थंडीच्या दिवसांत उबदार पांघरुणात पडून रहाणे).

मस्तच.
आळसाचा कंटाळा येऊ लागला तर किती छान होईल!