समाधान न होणाऱ्या भेटी!

Submitted by पराग१२२६३ on 14 October, 2021 - 06:27

8 ऑक्टोबर 1998. हवाईदल दिनाच्या निमित्ताने पुण्याच्या लोहगाव हवाईदल स्थानकाला (Air Force Station) मी पहिली भेट दिली तो दिवस. त्याआधी दोन-तीन वर्ष असं होत होतं की, लोहगाव विमानतळावर सामान्य नागरिकांना विमानं पाहण्यासाठी खुली असल्याची बातमी दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रांमध्ये यायची. त्यामुळे लोहगाव विमानतळावर विमाने पाहण्याची इच्छा असूनही संधी मिळत नव्हती. 1997 मध्येही असेच झाल्यावर मात्र निश्चय केला की, पुढच्या वर्षी हवाईदल दिनाला या विमानतळावर जाऊन प्रत्यक्षात विमाने पाहायचीच.

हवाईदलात असलेले आमचे एक नातेवाईक त्यावेळी बदली होऊन लोहगाव हवाईदल स्थानकावर रुजू झाले होते. हवाईदलात ते अधिकारी होते. त्यांच्यामुळे 1998 च्या हवाईदल दिनाला या विमानतळावर जाऊन लढाऊ विमाने पाहण्याची संधी सुकर झाली. त्या दिवशी पुण्याला मी खास तेवढ्यासाठीच गेलो होतो. कोणत्याही विमानतळावर जाण्याची माझी पहिलीच वेळ असल्यामुळे खूपच रोमांचित झालो होतो. सकाळी लवकरच मी त्या नातेवाईकांच्या घरी पोहचलो आणि त्यांच्याबरोबरच विमानतळावर गेलो. सगळीकडे कडेकोट सुरक्षा होतीच.

प्रत्यक्ष विमानतळावर पोहचल्यावर धावपट्टीपासून काही शे मीटर अंतरावर आम्ही उभे होतो, तेव्हा काही मिनिटांतच समोरून एका मिग-29 बीने अतिशय जबरदस्त गडगडाटी, गगनभेदी आवाजात उड्डाण केले. तेव्हा मला मिग-29 चे पहिल्यांदाच प्रत्यक्ष दर्शन होत होते आणि त्यामुळे खूप रोमांचितही झालो होतो.

पुढे 2003 मध्ये पुन्हा एकदा लोहगाव हवाईदल स्थानकावर जाऊन लढाऊ विमाने अगदी जवळून पाहण्याची संधी मिळाली. यावेळी विमाने पाहण्याची संधी सर्वसामान्य नागरिकांसाठीही उपलब्ध करून देण्यात आली होती. कधी नव्हे ते हवाईदल दिनाच्या आधी वृत्तपत्रात त्यासंबंधीची बातमीही प्रकाशित झालेली होती. मग काय, गर्दी होणारच की! मीही लवकरच लोहगाव विमानतळ गाठले. प्रदर्शनाच्या ठिकाणी जात असताना समोर नजर पडली ती हवाईदलातून निवृत्त झालेल्या आणि आता जतन करून ठेवण्यात आलेल्या मिग-21 विमानावर. पुढे थोड्या अंतरावर सुरक्षाविषयक तपासण्या पूर्ण करून प्रवेशद्वारातून आत गेल्यावर तिथूनच सामान्य लोकांना पाहण्यासाठी मांडलेली हवाईदलाची वेगवेगळी आयुधे दृष्टीस पडू लागली. त्या सगळ्या शस्त्रास्त्रांच्या भोवतीने दर्शकांनी कधीच गराडा घातला होता. त्यातल्या त्यात सुखोई-30 एमकेआय या दीर्घ पल्ल्याच्या बहुउद्देशीय हवाई प्राबल्य स्थापित करणाऱ्या लढाऊ विमानाच्या भोवतीने तो गराडा जास्तच दिसत होता.

पुढे 2005 मध्येही लढाऊ विमाने पाहण्याचा तसाच अनुभव पुन्हा एकदा लोहगावला जाऊन घेतला. त्यावेळी सागर गंगाधरे हा माझा शाळेतला मित्र माझ्याबरोबर होता. हवाईदल स्थानकाला भेट देण्याची आणि लढाऊ विमाने पाहण्याची माझी ही तिसरी तर त्याची पहिली वेळ होती. पण प्रत्येकवेळी लढाऊ विमाने पाहण्याची मला मिळालेली संधी पहिलीच भासत राहिली. कारण ही विमाने प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे कितीही वेळा पाहिली तरी मनाचे समाधान होत नाही. अशा ठिकाणी पुन्हापुन्हा यायला मिळावं असं वाटत राहतं. माझा मित्रही ही विमाने पाहून त्यावेळी प्रफुल्लित झाला होता. 2005 नंतर मात्र लोहगाव विमानतळावर सामान्य नागरिकांना लढाऊ विमाने पाहण्यासाठी खुली ठेवणे बंद झाले.

लेखाची लिंक
https://avateebhavatee.blogspot.com/2021/10/blog-post_14.html

याआधीच्या लेखाची लिंक
https://avateebhavatee.blogspot.com/2021/10/blog-post_8.html

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छानच. धागा अपघातानेच उघडला. मी पण सू थर्टी व मिग आणी हेलिकॉप्टरची प्रात्यक्षिके पाहिली आहेत. सू ३० अमे झिंग आहे. हैद्राबादेस हुसेन सागर च्या अवती भवतीच्या आकाशात प्रात्यक्षिके झाली होती. साडे अकराची प्रात्यक्षिके तर अकराला लोहगाव वरून ती विमाने निघाली होती. व पायलट ने स्लो स्पीड ला पण चालवून दाखवले होते ( आकाशातच) खाली हुसेन सागर व आकाशात ही विमाने एकदम अविस्मरणीय अनुभव.

मी मिग विमानांच्या इंजिनांवर चार स्क्रिप्टे लिहिली आहेत. तेव्हा त्यांचा अभ्यास केला होता. ते मागून आग ओकत विमने सुरू होतात ते लै भारी वाट्टॅ मला. वन्स अ टॉप गन फॅन ऑलवेज अ टॉप गन फॅन.