विविध धर्मात आढळणारी मुलांची एकसारखी नावे

Submitted by ऋन्मेऽऽष on 7 October, 2021 - 17:55

आज शाहरूखच्या मुलाचा आर्यनचा व्हॉटस्सप ग्रूपवर विषय निघाला. ग्रूपवर एक आर्यन नावाचा मुलगाही आहे. अर्थात तो मराठी मुलगा आहे. त्याला शाहरूख बिलकुल आवडत नाही. किंबहुना जिथे त्याला शाहरूखवर टिका करायची संधी मिळते, ती तो सोडत नाही. आणि दरवेळी मी त्याला चिडवतो, लाज नाही वाटत, बाबांना असे बोलतोस Wink

तर सांगायची गंमत अशी की गौरी आणि शाहरूख या हिंदू-मुस्लिम दांपत्याने आपल्या मुलाचे नाव असे ठेवले आहे की ते कुठल्या धर्माचे म्हणावे चटकन कळत नाही. किंबहुना मुस्लिमांपेक्षा हिंदूंच्याच जास्त जवळचे वाटते.

सलील! अस्सेच एक नाव. एक शालेय मित्र. अर्थात आमची शाळा राजा शिवाजी विद्यालय, मराठी माध्यम असल्याने तो मराठीच हे आम्हाला माहीत होते. तसेच सलीलचा अर्थ पाणी हे सुद्धा त्याच शाळेत शिकलो होतो. तरीही बाहेरचे लोकं जेव्हा त्याचे नाव ऐकायचे तेव्हा त्यांना तो मुस्लिमच वाटायचा. बहुधा सलीम, साहील, या साधारण तश्याच मुस्लिम नावांमुळे असेल. की सलील नावही असते मुस्लिमांत??

समीर! या नावाचे माझे लहानपणी चाळीत, शाळेत, क्लास वगैरे मध्ये मिळून टोटल पाच सहा मित्र होते. सारेच मराठी होते. पुढे दहावीला डोंगरावर अभ्यास करायला जायला लागलो तेव्हा समीर शेख नावाचा सातवा मित्र मिळाला. जो मुसलमान होता. तेव्हा मला पहिल्यांदा समजले की हे नाव मुसलमानांमध्येही असते आणि ते देखील बरेपैकी कॉमन असते. सलमानच्या एका चित्रपटात समजले की समीर म्हणजे हवां का झोंका. पण तो अर्थ नेमका कुठल्या भाषेत ते अजूनही माहीत नाही.

ईशा! नात्यातल्या एका भावाने मुलीचे नाव ईशा ठेवले. जवळपास पंचवीसेक वर्षांपूर्वीची गोष्ट. घरात एकच गोंधळ. हे कुठले नाव? हे नाव आपल्यात नसते, हे तर मुस्लिमांत असते, वगैरे वगैरे. खरे खोटे अल्लाह जाणे. पण भावाने आणि वहिनींनी सांगितले की पार्वतीचे एक नाव आहे. खरे खोटे राम जाने. पुढे जाऊन समजले की धर्मेंद्र यांचीही एक ईशा देओल नावाची मुलगी आहे आणि घरातले वातावरण निवळले. पण त्याही पुढे जाऊन कोणीतरी सांगितले की धर्मेंद्र यांनीही दुसरे लग्न करायला ईस्लाम धर्म स्विकारलेला आणि वातावरण पुन्हा गोंधळले Happy

असो, तर अभिषेक नाईक! ऐकल्यासारखे वाटतेय नाव Happy ऋन्मेष या आयडीमागचे खरे नाव. ऑर्कुटवरची माझी सेक्युलर विचारसरणी आणि अमन की आशा ईमेजमुळे मला गंमतीने अबू शेख म्हटले जायचे. पण एकदा माझ्या अभिषेक नाईक या नावाला एक मुस्लिम महाविद्यालयच फसले होते.

तर गंमत अशी झाली होती, वीजेटीआयला डिप्लोमाला अ‍ॅडमिशन घेण्याआधी मी जवळचेच म्हणून आमच्या भायखळा येथील साबूसिद्धीकी अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घ्यायला गेलो होतो. तिथे मला मॅकेनिकलला अ‍ॅडमिशन हवे होते. जे माझे दहावीचे मार्क्स पाहता मिळायची शक्यता कमीच होती. कारण त्या कॉलेजला मुस्लिम विद्यार्थ्यांसाठी ७० ते ८० टक्के आरक्षण होते. पण तरीही ते तेथील कर्मचार्‍यांच्या चुकीने मला जवळपास मिळालेच होते. कारण माझ्या अभिषेक नावातील 'षेक' ला 'शेख' समजून आणि 'नाईक' हे आडनावही मुस्लिमांतही असल्याने माझा फॉर्म चुकून त्या आरक्षणाच्या टोपलीत गेला होता. अ‍ॅडमिशनही त्या लिस्टमधील मेरीटनुसार पक्के झालेले. फी भरणारच होतो. ते माझ्याच लक्षात आले की अरे आपल्याला मुस्लिम कोट्यात टाकत आहेत. पुढे काही गडबड होऊ नये या हिशोबाने मी ती चूक संबंधितांच्या लक्षात आणून दिली. आणि माझे अ‍ॅडमिशन होता होता राहिले.
नंतर तिथले ऑफिस कर्मचारी येऊन माझ्या वडिलांना म्हणाले की तुम्ही काही बोलला नसता आणि एकदा पैसे भरले असते तर तुमचे अ‍ॅडमिशन झाल्यातच जमा होते. पुन्हा फिरून आम्ही वा कोणी रद्द केले नसते. पण नशीबात ते नव्हतेच म्हणा. वा त्यापेक्षाही चांगले होते म्हणूया.. Happy

असो, तर मला स्वतःलाही मुलाच्या वेळी असेच एखादे नाव ठेवायचे होते. जे हिंदूतही असावे आणि मुसलमानांमध्येही वा शीखांमध्येही. त्या नावावरून त्याचा धर्म चटकन कळू नये. एक नाव जवळपास फायनलही केले होते. कबीर ! ज्यावरून संत कबीरही आठवावेत आणि चक दे चा रुबाबदार शाहरूख, कबीर खानही डोळ्यासमोर यावा. पण नावांची चर्चा करताना बायकोच एकदा बेसावधपणे म्हणाली, की मला ते ऋन्मेष नावही छान वाटते. आणि मग मलाही तो मोह आवरला नाही.

अर्थात मुलीचे नाव ठेवताना यातले काहीही डोक्यात नव्हते. किंबहुना बारश्याचा दिवस, बारश्याची संध्याकाळ उजाडली आणि घरी जमलेल्या बायका पाळणा हलवायचा विधी करू लागल्या तरी नावाबाबत माझे आणि बायकोचे एकमत होत नव्हते. अखेर माझे वडीलच म्हणाले, की मुलगी परीसारखी दिसतेय तर तुर्तास परी नाव ठेवा. पुढे सावकाश विचार करून ठरवा आणि जे छानसे सुचेल ते रजिस्टर करून घ्या. परी आपले घरचे नाव राहील. पण त्यानंतर कसले काय. परी हे नाव बोलायला ईतके सुटसुटीत आणि गोड वाटू लागले, आणि त्या नावाशीच भावनिक नाते जोडले गेले, की उगाच कागदोपत्री दुसरे नाव ठेवायची गरजच काय असा विचार केला आणि तेच फायनल झाले.

पुढे जेव्हा मी तिला गार्डनमध्ये नेऊ लागलो तेव्हा परी हाक मारताच किमान चार मुली मागे वळून बघायच्या. कारण बहुतेक मुलींचे हे घरचे नाव असावे. पण आमच्या नाक्यावरच्या सुपरमार्केटमधील मुस्लिम दुकानदाराच्या याच वयाच्या भाचीचे खरेखुर्रे नाव होते. हे असे काही समजले की माझी बायको चिडायची, बघ किती कॉमन नाव ठेवलेस. हे तर मुस्लिमांमध्येही निघाले. पण फायदा हा व्हायचा की त्या मुस्लिम मामाकडून या भाचीलाही वरचेवर फ्री चॉकलेट मिळायचे Happy

तर तुमच्या माहीतीत अशी काही सर्वधर्मीय नावे असतील आणि त्यातून घडणारे काही किस्से असतीत तर जरूर शेअर करा. त्यातले एखादे नाव आवडलेच तर तिसर्‍या अपत्याच्या वेळी त्याचा विचार करू शकतोच Happy

धन्यवाद,
ऋन्मेऽऽष

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

"सारा" तेंडुलकरांनी ठेवलं नि पतौडींनी पण ठेवलं... हिंदू की मुस्लिम असं मूळ कुठलं विचारशील तर तसं काही नसाव. आमच्या घरात - "किती सारा पसारा घालतेस!!" असं मातोश्री वारंवार म्हणतं तेच अमृतादिदी नि अजंली दिदीने ऐकलं असावं...

परी नाव खूप गोड आहे !

मला आठवणारी नावे
सारा (सचिनची मुलगी... आताच्या जमान्यात त्यावर गदारोळ झाला असता)
सना (सौरवची मुलगी)
कमल
रेहान
साहिल

तशी सर्व धर्मात आढळणारी नावे - तारा, तानिया, माया, जस्मिन

असीम. शनाया.

गंगाप्रसाद, विश्वेश्वर, सलमान, अश्रफ, लक्ष्मणप्रसाद, रामप्रसाद, इस्माईल, रणछोडदास ..........

नावांविषयी बरीच माहिती मिळाली...तुमची लेखनशैली भन्नाट असते... इतर लेखनप्रकार का हाताळत नाहीत.

पण नावांत काय असतं हो...
गुलाबाला काहीही म्हटलं तरी सुगंध तोच...

अमन

गुलाबाला काहीही म्हटलं तरी सुगंध तोच... >> 'त्याला जुलाब म्हणून बघा; दरवळेल का सुगंध?' - इति शिरीष कणेकर.

आर्यन.. सध्याचं एकदम फेमस नाव. दोन्ही धर्मात चालतं.
साजन.. माझा एक ख्रिश्चन मित्र, आणि दुसरा माझ्या हिंदू मैत्रिणीचा भाऊ
शायना.. फिल्मी नाव, सगळ्याच धर्मात चालतं असा माझा अंदाज

अमन नाव खूप आवडीचे होते सुर्यगंगा. कल हो ना हो मध्ये शाहरूखचे होते. मलाही ऑर्कुटवर अमन की आशा टोपणनाव होते. तेव्हा एका कथेतही हे नाव वापरलेले मी. पण पुढे तो अमन वर्मा एका स्कॅंडलमध्ये सापडला आणि त्याच्यासोबत हे नावही मनातून ऊतरले.

दत्तात्रय. धन्यवाद Happy
मी लेखक नाहीये. अर्थात नवीन नवीन शिंगे फुटलेली तेव्हा समजायचो ते वेगळे. पण मी धागाकर्ता आहे. ईतर लेखनप्रकार हाताळायला ते असतात काय हे सुद्धा मला माहीत नाही. असो, पण आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद Happy

@ शांत माणूस
भारुड, कीर्तनाची तुम्ही वाचलेल्या/लिहिलेल्या पुस्तकांची नावे दिली तर बरे होईल... वाचू आनंदे...

सूर्यगंगा, होय तोच तो. त्या प्रकरणानंतर मग गायबलाच. मी तरी पाहिले नाही. बघायची ईच्छाही राहिली नाही.

भारुड, कीर्तनाची तुम्ही वाचलेल्या/लिहिलेल्या पुस्तकांची नावे दिली तर बरे होईल... वाचू आनंदे...>>> मी अशुक्शित आहे. मला ललिता वाचता येते असे कधी म्हणालो?

अमन वर्मा इंडियन आयडॉल चा पहिला होस्ट. त्याच्यावर आरोप झाले होते. सलमान खानने त्याला क्लीन चिट दिली होती.

>>> मी अशुक्शित आहे.

तुमच्यासारखं अशुक्शितपण देव सगळ्यांना देवो ...

Pages