एक श्रध्दांजली भोकरवाडीच्या बापाला...

Submitted by दत्तात्रय साळुंके on 4 October, 2021 - 02:35

एक श्रध्दांजली भोकरवाडीच्या बापाला…

मित्रहो एव्हाना तुमच्या लक्षात आले असेल की मी साहित्यरत्न द.मा. मिरसदारांना श्रध्दांजली अर्पितोय….

दिनांक ३ ऑक्टोबर. वेळ मध्यरात्र. झोप येत नाही म्हणून तळमळत होतो. हाताला मोबाईल लागला. लोकसत्ता उघडला. बातमी वाचली आणि दमांनी त्यांच्या कथांतून अखंड मराठी मनाला आंदण दिलेल्या आनंदाची लयलूट आठवली.

मंडळी आपलं जगणं म्हणजे
सुख पाहता जवापाडे
दु:ख पर्वता एवढे
अथवा सुखदुःखाच्या दोन टोकात नियतीने केलेली ओढाताण वगैरे वगैरे.

विनोदाशिवाय किती कठीण झालं असतं आपलं गंभीर जगणं. दमांचं विनोदी लिखाण क्षणभर का होईना आपली रोजच्या विवंचना पासून सुटका करते. केवढे उपकार आहेत दमांचे आपल्या सर्वांवर. त्यामुळे एक सहृदयी गेल्याचं दु:ख झालं. मनाला/शरीराला मरगळ आली की कधीही त्यांचं हाताला लागेल ते पुस्तक वाचा तुमची मरगळ कुठल्याकुठे निघून जाईल. अशी मरगळ आली नसेल तर तुमचा उत्साह/आनंद द्विगुणित झाल्याशिवाय राहणार नाही.

खरंतर दमां सारखी माणसं मरत नसतात. पण त्यांचं प्रत्यक्षात असणं आणि त्यांना फोटोत पहाणं पटत नाही मनाला.

दमांनी १८ चित्रपटकथा लिहिल्या. मला आठवतं जुन्या चित्रपट श्रेयनामावलीत कथा पटकथा द.मा. मिरासदार हे एक हमखास दिसणारं नाव असायचं आणि ते नाव पाहिल्यावर चित्रपट छान असणार याची खात्री व्हायची.

द.मा, व्यंकटेश माडगूळकर, शंकर पाटील हे समकालीन ( द.मा आणि व्यंकटेश माडगूळकर यांचा जन्म १९२७ चा तर शंकर पाटील यांचा १९२६). ही त्रयी कथाकथनाचे कार्यक्रम करायची. त्यांच्या कथांतून त्यांनी नवकथेच्या युगाला ग्रामीण कथेची झळाळी दिली. तिघांनीही ग्रामीण जीवन आपल्या कथांतून उत्तमरीत्या चितारलं.

द.मां.ची खुसखुशीत विनोदी लेखनशैली/कथनशैली वाचक अथवा ऐकणा-याला एका वेगळ्या विश्वात घेऊन जाते.
दमांच्या कथेतील पात्रे आपल्याशी गावगप्पा करतात पण त्यांचा भवतालही प्रभावीपणे आपल्याशी बोलतो. वारा कसा वाहत होता, झाडांची पानं हालत होती का नव्हती. आकाशात ढग कसे होते, शेत कसं होतं, गाव घरं कशी होती आदी बारकावे आपल्यासमोर कथा घडल्याचा आभास निर्माण करतात.

दमांच्या कल्पकतेचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे." माझ्या बापाची पेंड" कथेत पेंड समजून कथेतलं शाळकरी पोर पेंडेत बापानं चोरुन विकायला ठेवलेला गांजा खातं अन शाळेत एकच धमाल उडते. तुमचं हसुन हसुन पोट दुखतं. भोकरवाडी हाय मध्ये विहिरीत लपवलेले घासलेटचे डबे लीक होतात आणि गावकरी भोकरवाडीतल्या विहिरीला तेलाचे झरे लागले असे समजतात. असे एक ना अनेक किस्से….

रोजच्या छोट्या-मोठ्या घडणा-या घटणा त्यांचे कथाविषय होतात. एखादी पेपरातली बातमी गणा मास्तर वाचतो आणि तिचा कथाविषय होतो‌.

त्यांच्या कथा वाचताना कथा पाहतोय असंच वाटतं. त्यांचा महाराष्ट्राच्या ग्रामीण जीवनाशी खूप जवळचा सबंध होता म्हणून ते एवढे समरसतेने त्यावर लिहित असत.

द.मा. मिरासदारांनी सत्यकथेतून लिहायला सुरुवात केली. सत्यकथेनं अनेक साहित्यरत्न उजेडात आणली त्यापैकी एक द. मा. मिरासदार.

गावाकडची माणसं साधी भोळी असं एक गृहितक आहे. त्याला द.मा.नी यशस्वी छेद दिला. द.मा. च्या ग्रामीण कथातून डोकावणारी पात्रे अगदी इरसाल पण सत्य वाटतात. याचे गमक बहूदा त्यांची सूक्ष्म निरीक्षणशक्ती आणि ग्रामीण जीवनाची सखोल माहिती असावे. विनोद म्हटलं की आपण थोडीफार अतिशयोक्ति गृहीत धरतो पण द.मा. च्या कथात अशी अतिशयोक्ती असली तरी वाचकाला त्याचा विसर पडावा अशा रंजकतेनं कथा लिहिली जाते. मला नेहमी त्यांच्या कल्पकतेचा हेवा वाटतो. याच कल्पकतेतून भोकरवाडीचा जन्म झाला. भोकरवाडीत आढळणारी विक्षिप्त पात्रे कुठल्याही खेड्यात तुम्हाआम्हाला सहज दिसतील. ही पात्रे काल्पनिक नाहीत असंच वाटत राहतं. त्यामुळे भोकरवाडीही काल्पनिक नाही असा पक्का समज होतो.

या पात्रांच्या समज गैरसमजातून, शंका, कुशंकातून निर्माण होणारा विनोद तुमची निखळ करमणूक करून जातो.

त्यांची ग्रामीण पात्रे आज पोरकी झाली. पण त्यांच्या बापाने त्यांना एवढं सुदृढ केलं की ती कितीतरी वर्ष तशीच जिवंत राहतील याची मला खात्री आहे.

आज त्यांच्या कथांतील भोकरवाडीतील प्रातिनिधिक पात्रे गणा मास्तराच्या ओट्यावर आपल्या बापाचा दुखवटा व्यक्त करतायेत.

गणा मास्तराच्या पुढ्यात रोजचं वर्तमानपत्र आहे पण त्याला दमांच्या निधनाची बातमी वाचाविशी वाटत नाही. पण काळजावर दगड ठेवून तो वाचतो. सगळ्यांचा कानावरचा विश्वास उडतो. त्यांना वाटतं कानानं चुकीच ऐकलं. सगळे खिन्न झालेत.

बाबू पैलवानाच्या पायाखालची माती सरकलीय. त्याला आज गावांसाठी नवीन आयडीया सुचत नाही. त्याला नाना चेंगटाला बुक्की घालाविशी वाटत नाही.

कुणी तरी मेलं तर त्याची बातमी गावभर पोचवणा-या नाना चेंगटाला सुताराच्या आंशीला आणि गावाला दमांच्या निधनाची बातमी द्यावशी वाटंना.

शिवा जमदाड्याला कुणाच्या शेतातला ऐवज धोतराच्या सोग्यात लपवून आणायला जावसं वाटंना.

रामा खराताची विडी कानामागं शांत बसली होती.

गोपाळ रेडे अंगठ्यानं माती उकरीत बसला होता.

भोकरवाडीतली भुतंखेतं, माणसंकाणसं सारी सुन्न होती.
त्यांचा बाप गेल्यांनं ती पोरकी झाली होती.

तेवढ्यात गणा मास्तर आवंढा गिळत म्हणाला
"कंपनी काळच्या पोटात काय दडलयं कुणाला ठाऊक पण मला नक्की वाटतया द.मा. जोवर भोकरवाडी हाय तो वर मरणार न्हाय. ते आपल्यातच हायती. तरी पण आपण त्यांना उभं राहून सरधांनजली वाहू. "

सगळे शांत दोन मिनिटे उभे राहिले. नंतर गुपचूप आपापल्या घरी गेले.
( आदरणीय दमांनां माझी भावपूर्ण श्रध्दांजली/आदरांजली )
© दत्तात्रय साळुंके

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भा॑वपूर्ण श्रद्धांजली !! मनोगत आवडले.

द मा माझे खूप आवडते लेखक. मिरासदारीचे बर्‍याच वेळा पारायण झाले.

लिखाण आवडले.
त्यांचे कथाकथन प्रत्यक्ष ऐकण्याचा योग कॉलेज जीवनात आला होता
माझीही त्यांना आदरांजली

छान लिहिलेय, मनापासून..

द.मा, व्यंकटेश माडगूळकर, शंकर पाटील हे समकालीन >>> मलाही ही नावे एकत्रच आठवतात.

दमांना श्रद्धांजली. ते कायम आपल्यात राहणारच.

खूप छान लेख, त्यांच्या कथा त्यांच्या आवाजात ऐकणे - सुख Happy

माझ्या एका मॅनेजर चे ते सख्खे काका होते. त्याच्या कडून त्यांचे बरेच किस्से पण ऐकायला मिळायचे.

मनापासून लिहिलेले मनापर्यंत पोहोचले. " मनाला/शरीराला मरगळ आली की कधीही त्यांचं हाताला लागेल ते पुस्तक वाचा तुमची मरगळ कुठल्याकुठे निघून जाईल. " हे एकदम परफेक्ट लिहिलयत. भोकरवाडीची पात्रे व्यक्ती आणि वल्ली सारखीच डोक्यात बसली आहेत.