सहसा जो रुंदावत नाही

Submitted by निशिकांत on 30 September, 2021 - 10:13

घेत भरारी उंच उडावे, असे कुणाला वाटत नाही?
ज्याचा त्याचा परीघ असतो,सहसा जो रुंदावत नाही

पाय भुईवर ठेवत वास्तव जगणार्‍या जागृत लोकांना
भव्यदिव्य स्वप्ने बघण्याचे भाग्य कधीही लाभत नाही

प्रसंग बघुनी कधी नरम तर कधी गरम वागणे असावे
"सदा वाकणे हीच लीनता" तत्व मनाला भावत नाही

पाय घसरण्याच्या भीतीने ग्रस्त जाहलेल्या सभ्यांनो !
ध्यान असू द्या रस्त्यावरती ना येताही भागत नाही

करार केला आयुष्याशी हास्य लेवुनी जगावयाचा
दु:ख गाडले खोल अंतरी, डोळ्यातुन ते झिरपत नाही

नवीन व्याख्या समाजातल्या समानतेची अशी असावी
"जोखड मानेवरती ठेवुन कुणी कुणाला जुंपत नाही"

मंगळ आला आवाक्यात नि गर्व वाटला. आम जनांना
विरोधकांना गौरवशाली दिवस टिकेविन बघवत नाही

प्रजातंत्र हे आमजनांच्या कल्याणाचे साधन आहे
राजकारणी नेत्यांसाठी लाच खायची पंगत नाही

एक आठवण पुरून उरली "निशिकांता"ला जगण्यासाठी
मनात वावर, तिचाच दरवळ वसंत सरता संपत नाही

निशिकांत देशपांडे, पुणे.
मो. क्र. ९८९०७ ९९०२३
वृत्त--वनहरिणी
मात्रा--८+८+८+८ =३२

Group content visibility: 
Public - accessible to all site users