आम्ही कोण म्हणूनी काय पुसता..

Submitted by SharmilaR on 30 September, 2021 - 01:26

आम्ही कोण म्हणूनी काय पुसता..

लोकांमध्ये ना, आम्हाला नावं ठेवायची हल्ली फॅशनच आली आहे. जो उठतो तो आमच्या नावाने ओरडतो. जरा उघड्या डोळ्यांनी आसपास बघा म्हणावं.

आम्हाला म्हणे वेळेचं भान नसतं. बघा, जरा सिग्नलला उभं रहा आणि बघा. आम्ही एक-एक सेकंद वाचवण्याची किती धडपड करतो ते. साठ-सत्तर सेकंद नुसतच काय थांबायच तिथे? वेळे बरोबरच पेट्रोल पण किती वाया घालवायचं? गाडी उगाच बंद करून चालू करण्यात पण वेळ वाया जातोच की. आम्ही असं होऊच देत नाही. आम्ही सरळ (किंवा वेडीवाकडी) आम्हाला हव्या त्या दिशेने कूच करतो. कधी कधी लोकांचं आमच्याकडे लक्षच नसतं, ती चूक पूर्णपणे त्यांचीच. जरा उघड्या डोळ्यांनी बघा म्हणावं. आम्ही मात्र सटकन काही अपघात होण्याच्या आधीच तिथून पसार होतो. कधीकधी होतातही अपघात. पण ते लोकं आमच्याकडे लक्ष देत नाही म्हणून. आम्ही तर वेगाने तिथून अपघात होण्याच्या आधीच जाण्याच्या तयारीत असतो. बघा वाचवतो की नाही आम्ही वेळ?

तसंच पैशाबद्दल. उगाच महागड्या हेल्मेटवर खर्च करण्यात काय अर्थ आहे? काही गरज आहे का, अगदी एवढं डोकं, कान झाकायची? अपघाताचे म्हणाल तर, पूर्ण शरीरालाच गरज आहे लोखंडी आवरणाची. आम्ही नाही हे हेल्मेट घालून फालतू लाड करून घेत स्वत:च्या डोक्याचे. हां, आता सरकारनी कंपल्सरी केलेलं आहे हेल्मेट. त्याशिवाय पेट्रोल मिळत नाही म्हणे. पण त्यावरही उपाय आहेच की. एक तर पेट्रोल पंपावरचे दादा, काका भारी प्रेमळ. ते लगेच आम्हाला हळूच सांगतात, “हेल्मेट घाला, हेल्मेट घाला. साहेबांचा राऊंड आहे. उगाच पकडले जाल.”
पेट्रोल पंपाच्या बाहेरच्या बाजूला कुणीतरी हेल्मेट उधार द्यायला उभा असतोच की. पाच-दहा रुपये दिले की पाच मिनिटात पेट्रोल भरून त्याचं हेल्मेट त्याला परत. थोडेस्से पैसे जातात, पण पुढे हेल्मेट सांभाळायचा त्रास वाचतो ना.

हेल्मेट सांभाळणं किती जिकिरीचं असतं! मोटर सायकल वर तर डिकी पण नसते. लॉक केलं तरी चोरीची भीतीच. स्कूटरच्या डिकीत हजारो गोष्टी बसवायच्या असतात. त्यात आणखीन हेल्मेट कुठे सांभाळायचं?

आणि ते सीटबेल्ट वगैरे फालतू गोष्टींबद्दल पण नका हं उगाच सांगू आम्हाला. आम्हाला नाही आवडत स्वतःला असं बांधून घ्यायला. हां, आता गाड्यांना सीटबेल्ट कंपल्सरी असतात, नाही लावलं तर गाडीचा उगाच टॅ..टॅ.. आवाज येतो. पण त्यावरही उपाय आहेच की आमच्याकडे. आम्ही बक्कल मध्ये सीट बेल्ट अडकवूनच ठेवतो कायमचा. त्यामुळे आम्हाला त्यात बांधून घ्यायची गरजच राहत नाही मग.

आम्ही मित्र कर्तव्याला पण किती जागतो ते बघा. म्हणजे असं बघा, आम्ही तिघे मित्र असतो तेव्हा एकट्याला कुठे सोडून द्यायचं? मग आम्ही घेतो आमच्या टू व्हीलर वर त्याला पण. कधीकधी तर चौथा असतो तेव्हा त्यालाही जरा ऍडजेस्ट करून घेतोच. अरे, मित्रांकरता काहीही!!!

तसंच ओव्हर टेकिंग करण्याबद्दल. अहो, लोक किती हळू गाडी चालवतात!!! वेळे-काळाचं काही भान आहे की नाही? आम्हाला पोहोचायचं असतं कुठेतरी वेळेत. हं, आता घरून लवकर निघायला वैगेरे सांगूंन उगाच लेक्चर नका मारू. होतात आम्हाला रात्रीची जागरणं. झोप तरी पूर्ण व्हायला हवी की नको? आता आमचे जागरण यावर नका येऊ. आम्ही का जागतो ते.... असतात आम्हाला बरेच उद्योग. तर आम्ही सांगत होतो, आमच्या ओव्हर टेकिंग बद्दल. रस्त्याने कुणी हळू गाडी चालवत असेल, तर आमचा काय दोष? तर, आम्हाला पुढे जायला हवं की नको? बरेचदा नाही मिळत उजवीकडून जायला रस्ता. मग जातो डाव्या बाजूने. शिवाय खरं सांगू का, आम्ही एवढं डावं-उजवं पाळतच नाही. आम्ही कुठूनही गेलो ना, तरी समोरच्याने उगाच दचकून जाऊ नये. अपघात होण्याचा धोका असतो हे लक्षात ठेवावं.

आता आमच्या मल्टीटास्किंग बद्दल. तुम्ही करून दाखवा बरं, तुम्हाला जमतय का ते? एका हातात हँडल पकडून दुसऱ्या हाताने आम्ही फोन घेतो. आणि फोनवर नुसतं बोलत नाही, तर गाडी चालवत असताना व्यवस्थित नंबर पण शोधतो आणि लावतो, मग बोलतो. जमू शकेल तुम्हाला हे? तुम्ही तर एक क्षण पण रस्त्यावरची नजर हटवायला तयार नसता. म्हणे “नजर हटी दुर्घटना घटी। ” आम्ही सांभाळतोच ना हे सगळं? आता आम्ही गाडी चालवत असताना, आला कोणाचा फोन तर घ्यायला नको? अरे समोरच्या माणसाबद्दल काही रिस्पेक्ट आहे की नाही? आम्ही घेतो फोन. आम्ही कुठे आहोत हे समोरच्याला जाणून घ्यायचं असतं. आम्ही सांगतो मग. “आलो आलो”, “इथेच आहे मी.” वगैरे. विचारतो, “कुठे आहेस तू?” वगैरे. होतात जरा प्रश्न उत्तर. आणि आम्ही फोन मध्ये बिझी आहोत, हे तुमच्या लक्षात आल्यानंतर तुम्ही जरा आमच्याकडे लक्ष देऊन जपून चालवा की तुमची गाडी. एवढं पण लक्ष द्यायचं नाही म्हणजे काय?

असतो आमचा वेग जरा सुसाट. पण त्याचा फायदे बघा ना. तुम्हाला होतो तसा आम्हाला रस्त्यांवरच्या खड्ड्यांचा त्रास नाही होत. गाडी खड्ड्यात जायच्या आधीच त्यावरून निघून गेलेली असते. तुम्ही कधी सर्कस किंवा मृत्यूगोल नाही बघितला का? वेगात गाडी तिथून काढली ना, की अपघात होतच नाही, आणि खड्डेही लक्षात येत नाहीत. तुम्ही बसा आपलं खडदयांबद्दल ओरडा-आरडी करत, आणि पेपर मध्ये त्यावर लेख लिहत. आम्ही नाही असल्या फालतू गोष्टींमध्ये वेळ घालवत. कारण आम्हाला वेळेचं महत्त्व आहे
तसच आणखी एक, आम्ही आमच्या गाड्यांचे ब्रेक पण किती जपून वापरतो बघा. उगाच नाही तुमच्यासारखे सतत ब्रेक लावत बसत. झिजतात ना मग ते! त्याऐवजी एक बोट ठेवायचं की सतत हॉर्न वर. हॉर्न वाजवत राहिलं ना, की लोक आपोआपच बाजूला होतात. कधी घाबरूंन तर कधी दचकून तर कधी थोड्या वैतागाने. पण आम्हाला जागा मिळते जायला.

उगाच आता ध्वनिप्रदूषणाच्या नावाने तुम्ही शंख नका करू. गाड्यांचे हॉर्न तर तुम्हीच कुणीतरी तयार केलेत ना चित्रविचित्र आवाजांचे. ते आम्ही फक्त आमच्या गाड्यांना लावून घेतलेत. आता मार्केट मध्ये जे अव्हेलेबल आहे, ते आम्ही घेणारच की. अर्थव्यवस्था चालायला नको? बघा आम्ही करतो की नाही प्रॉपर विचार!!!
अहो, गाड्या ही आमची नुसती गरजच नाही तर श्वास आहे तो आमचा. कॉलेजेस.. क्लासेस.... हे सगळं कसं सांभाळणार? त्याशिवाय इतर उद्योग पण असतातच. मग त्याबरोबरच मित्रांबरोबर भटकणं वगैरे येतच. गाड्यांशिवाय आम्हाला आहे का काही पर्याय? चांगला पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे का तुमच्याकडे अवेलेबल? नाही ना? मग आम्ही तरी काय करणार? आणि देऊ शकतात आमचे आईबाप आम्हाला गाडी. (परत अर्थव्यवस्था!!!).

ते शिस्ती-बीस्ती चे धडे उगाच नका आता चालू करू. आमचं धावपळीचं आयुष्य..... आमची टेन्शन्स.. तुम्हाला नाही कळायची. सिग्नलवरच्या दहा-बारा सेकंदांनी काय होतं म्हणे! कशाला आपण वाया घालवायचा तो वेळ? त्यापेक्षा इतरांनी पण भान राखावं ना, जरा इकडे तिकडे बघण्याचं.
हां, आता आम्हाला कधीतरी उजवीकडे वळायचं असतं सिग्नल वरून. पण आमच्या पुढे ऑलरेडी इतक्या गाड्या उभ्या असतात ना, की पुढे जायला जागा मिळतच नाही. मग वाट काढत कसं-बसं आम्ही रहातो डाव्या बाजूला. आणि कधीतरी सिग्नल करता थांबतो पण बरं का! आणि सिग्नल सुटताच आम्ही उजवीकडे मुसंडी मारतो. तुम्ही जरा दमाने घ्या की. आम्ही वळतोय ना उजवीकडे? मग तुम्ही थोडं बघा ना! आम्हाला आधी जाऊ द्या, आणि मग तुम्ही जा सरळ तुमच्या मार्गानं. उगाच आमच्या गाडीवर येऊन धडपडू नका. नाहीतर अपघात होईल. तुम्हीच म्हणता ना, “नजर हटी दुर्घटना घटी”? मग व्यवस्थित नजर ठेवा, आम्ही जातोय तिकडे जाऊ द्या आधी आम्हाला. खूप बिझी असतो आम्ही. तसंच “अति घाई, संकटात नेई..” नका सांगू आम्हाला! आम्हाला संकट यायच्या आधीच पळायचं असतं ना तिथून! तुम्ही या सावकाश आमच्या मागून, धीराने संकटाचा सामना करत. उगाच आमच्या मागे लागू नका.

अजूनही तुम्हाला प्रश्न पडलाय का, आम्ही कोण ते? अहो आम्ही म्हणजे “मी” आहे, “मी सर्वांच्या पुढे” क्लबचा प्रतिनिधी. मी स्वतःला आदराने “आम्ही” संबोधतो. आम्हाला आहे बाबा आमच्या बद्दल प्रचंड आदर! तुम्हाला नाही (आमच्याबद्दल आदर?)? आम्ही तर बाबा ट्रॅफिक पोलिसांबद्दल पण प्रचंड आदर बाळगून आहोत. त्यांना मामा म्हणतो आम्ही चांगलं प्रेमाने. त्यांनी थांबवलं तर आम्ही बघा, किती लीनतेने त्यांच्याशी बोलतो ते. आता काही मामा पण आमच्यावर प्रेम करतात आणि आम्हाला देतात थोडी मोकळीक. असतात असेही प्रेमळ लोक जगात. आणि आम्हाला त्यांच्या प्रेमाची “किंमत” आहे.

कळलं ना आता आम्ही कोण ते? आता पुढच्या वेळी रस्त्यावर याल, पाई किंवा गाडीने, तर आमच्या कडे लक्ष असू द्या बरं का! जरा जपून! आम्ही तुमच्या आजूबाजूलाच आहोत.

*********************************

Group content visibility: 
Use group defaults

धमाल Lol

छान लिहलयं! Happy

आम्ही कोण हे आम्हाला उमजायला हवं पण!

थॅंक्स डिजे आणि कृष्णा.

आम्ही कोण हे आम्हाला उमजायला हवं पण! >>

ते आपण वाहन चालवतांना कसे वागतो, त्यावर अवलंबून आहे.