पितृपक्ष

Submitted by विजयश्रीनन्दन on 28 September, 2021 - 11:16

आज पहाटेपासून मन जरा उद्विग्न होतं. सकाळपासूनच घराच्या टेरेसवर येरझार्या घालत होतो. घरात पूजा सुरू होती. मंत्रोच्चार ऐकू येत होते. मुलगा सगळं व्यवस्थित करत होता. त्यामुळे काही काळजी नव्हती. आणि मुख्य मृहणजे माझं काहीच काम नव्हतं त्याच्यात. मग मी आपला गच्चीवर बरा होतो.

मुलाचं सासर पण शेजारच्या कॉलनी मधलं. जुनी ओळख. मित्राची मुलगी सून म्हणून घरात आणायचा हट्ट माझाच. आज पूजेसाठी तिच्या माहेरचे पण आलेले.

इतक्यात आई बाबा पण टेरेस वर आले. खूप वर्षांनंतर आज भेट घडून आली होती. साश्रू नयनांनी वंदन केलं. गप्पांचा ओघ सुरू झाला.

किचन मधून सुनबाई चा आवाज ऐकू येत होता. तिच्या आईजवळ कागाळी सुरू होती. आमचा आवाज ऐकून ती म्हणाली. "जरा दम नाही निघत मामंजींचा. थोडा वेळ म्हणून शांत नाही बसवत. पूजा तरी उरकू द्यावी. किती जोरात कोकलतायतं"

मी कसंनुसं हसत बाबांकडं पाहिलं. आई बाबांनी पण ते ऐकलं होतं. आई म्हणाली "तुझीच लाडकी बाबा ती. तूच आणलयं तिला" आणि ते दोघेही हसायला लागले..

मंत्रोच्चार बंद झाले. पूजा उरकली असावी. इतक्यात मुलगा जेवणाचं ताट घेऊन वर आला. ताट मांडल. बाबा म्हणाले "आपल्या साठी आहे हे. कर सुरूवात"

मुलाचे डोळे भरून आलेले. तो गप्पच होता. आता बोलण्यासारखं काही शिल्लकही नव्हतं. मी लाडवाचा घास तोडला. एक शब्दही न बोलता मुलगा मागे फिरून जड पावलांनी निघून गेला.

किचन च्या खिडकी मधून बघत सूनबाई म्हणाली. "कावळा शिवला बाई जेवणाला. चला आपण पण जेऊन घेऊ आता." नातवाने मुलाला विचारलं "पप्पा, खरचं आजोबा कावळा बनून आलेत का?"

मी दचकलो. बाबांनी माझी मनस्थिती ओळखली आणि म्हणाले "सवय करून घे. तुझं पहिलच श्राद्ध आहे"

गच्चीवर मी, आई, बाबा, माझे आजे, पणजे त्या केळीच्या पानावर ठेवलेल्या जेवणावर ताव मारत होतो.

गच्चीवर फक्त आम्हा कावळ्यांचा कलकलाट ऐकू येत होता....

.
.
.
.
.
.
.
.

विजयश्रीनंदन

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिलंय.... वाचताना धक्के बसत बसत शेवटाकडे आल्यावर "अरेच्चा..! हे असंय होय...?" वाटुन चेहर्‍यावर आपोआप स्मित उमटलं...! Bw

सवय करून घे. तुझं पहिलच श्राद्ध आहे".... हे आधी वाचले.म्हटले काहीतरी टायपो आहे.मग पहिल्यापासून वाचले.
मस्त आहे.

बापरे
वेगळी आहे लघुकथा.या सगळ्यात ज्याचं श्राद्ध होतंय त्याच्या बायकोचा अँगलही आवडला असता.ती ही गच्चीवर असेल किंवा घरात तयारीत असेल.

छान..

छान.