जागत असतो रात्र रात्र मी

Submitted by निशिकांत on 28 September, 2021 - 10:19

(ही कविता फेसबु या विषयावर असल्यामुळे अपरिहार्यपणे इंग्रजी शब्द आले आहेत)

नातू नाती मला शिकवती
शिक्षक ते अन् जणू छात्र मी
फेसबुकाची किमया सारी
जागत असतो रात्र रात्र मी

तरुणाईला साद घालण्या
तरल भाव गजलेत पेरतो
वेगावेगळ्या समुहावरती
"लाइक" सारे मोजत बसतो
कटुंबियांना यक्षप्रश्न हा
वागत आहे का विचित्र मी?
फेसबुकाची किमया सारी
जागत असतो रात्र रात्र मी

जगात व्हर्च्युअल क्लिक करता
विसरून जातो जहाल वास्तव
फॉर्मॅटिंग दु:खाचे होते
चटके विसरुन जातो विस्तव
तुसडा माझा स्वभाव असुनी
नवे जोडतो रोज मित्र मी
फेसबुकाची किमया सारी
जागत असतो रात्र रात्र मी

मार्क झुबेरा! शोध लाव, कट
पेस्ट कसे भाग्यास करावे
चोरुन प्राक्तन मंत्री केंव्हा
योगीबाबा जरा बनावे
फलद्रूप व्हावया आस ही
जगेन असुनी गलितगात्र मी
फेसबुकाची किमया सारी
जागत असतो रात्र रात्र मी

असो काल्पनिक. वास्तववादी
जीवन सारे बकाल आहे
किती नाटके, रंगरंगोटी !
रंगमंच हा विशाल आहे
माझे कसले? जे लिहिले ते
बडबडणारे एक पात्र मी
फेसबुकाची किमया सारी
जागत असतो रात्र रात्र मी

गार्‍हाण्याची फाइल माझ्या
पाठवीन मी अटॅच करुनी
जगेन म्हणतो, मला जरासे
माझ्यापासुन डिटॅच करूनी
निकाल देइल देव वॉलवर
बाळगतो ही आस मात्र मी
फेसबुकाची किमया सारी
जागत असतो रात्र रात्र मी

निशिकांत देशपांडे, पुणे.  
मो. क्र. ९८९०७ ९९०२३

Group content visibility: 
Public - accessible to all site users

चटके विसरून जातो विस्तव....
मार्क झुबेरा! शोध लाव, कट
पेस्ट कसे भाग्यास करावे...

क्या बात है|