माझ्या आठवणींतली मायबोली - वंदना

Submitted by वंदना on 25 September, 2021 - 14:28

मी मायबोलीवर साधारण एक तप आयडी शिवाय आणि एक तप आयडी सह आहे. मायबोलीशी माझी ओळख माझ्या मेव्हण्याने करून दिली. मला मराठी वाचायला आवडतं असं कळल्यावर त्याने मला सांगितलं "अगं माझ्या मित्राने त्याच्या बायकोसाठी एक साईट सुरू केली आहे. मराठीतून गप्पा मारण्यासाठी. तू पण जा तिकडे, बाबांनाही ने".
मला भारीच कौतुक वाटलं त्याच्या मित्राचं. हल्लीच्या काळात कोण करतो इतकं स्वतःच्या बायकोसाठी!

दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये गेल्यावर लगेच त्याने दिलेल्या मायबोलीच्या पत्त्यावर दाखल झाले. विविध धाग्यांवर, विविध विषयांवर, विविध गप्पा सांडल्या होत्या. ते मिंग्लिश वाचण्यात खूप वेळ गेला आणि डोळे दुखायला लागले. तरीही मराठीच्या भुकेपोटी नंतर वेळ असेल तेव्हा जात राहिले, हळूहळू गप्पांची लिंक लागू लागली. पण मी तुरळकच आणि मुख्यत्वे वाचनमात्रच होते. तेव्हा हितगुज आणि गुलमोहर असे २ भाग होते, तर मी गुलमोहर मधे जास्त रमले. तेव्हा मराठी वाचनाची भूक मायबोलीने तृप्त केली.

एलायझा, ट्यूलिप सुंदर रोमॅंटिक कथा कादंबऱ्या लिहायच्या.
बेटीने मला वाटते २००२ च्या दिवाळीच्या सुमारास एक सुंदर दीर्घकथा लिहिली होती. मी त्या कथेने अगदी भारावून गेले होते. त्या कथेची प्रिंट आउट काढून माझ्या बहिणींना, मैत्रीणींना वाचायला दिली होती. अगदी आता आतापर्यंत माझ्या पुस्तकांसोबतच ती ठेवली होती, आता गहाळ झाली बहुतेक.

तेव्हा प्रसिद्ध लेखकांव्यतिरिक्तही हौशी नवोदित लेखक इतके सुंदर, सशक्त, दमदार लिहितात हे जाणवून या नव्या व्यासपीठाचे महत्व आणि क्षमता दोन्हीची चाहूल लागली.

हवाहवाईच्या कुजबुज अंकातून माझे मायबोलीचे सामान्य ज्ञान वाढायला लागले.
दिनेशदा, मनुस्विनी, मिनोती नंतर जागु यांच्या रेसिपीजनी माझ्या पार्ट्या, पॉट लक गाजायला लागल्या.
व्हिसी वरच्या मतमतांतरांनी माझ्या मित्रमंडळीतल्या चर्चा पेटू लागल्या.

नंतर २००७ मधे मी सदस्यत्व घेतले ते मला वाटते दादच्या लिखाणाला दाद देण्यासाठी. त्यानंतर अधूनमधून प्रतिसाद‌ देत राहिले. संयुक्ताची सभासद झाले, तिथे खूप वाचलं, फार थोडं लिहिलं. पण तो अनुभव फार समृद्ध करणारा होता.

प्रतिभावान लेखकांच्या मांदियाळीत अनेकांनी भर घातली. रैना, मंजुडी, लालू, हायझेनबर्ग आणि अनेक जण.
अनेक अप्रतिम कविता इथे वाचायला मिळाल्या. पुर्वीच्या जया एम, वैभव जोशी, बेफिकीर ते आताच्या मुग्धमानसी पर्यंत.
नर्मविनोदी ते फार्सिकल विनोदी, खुसुखुसु ते खदाखदा हसवणारे साहित्य वाचायला मिळाले. पूर्वी धुंद रवी, हवाहवाई ते आता मी_अनु‌, मामी, फारेण्ड पर्यंत.
सर्व प्रकारचे मराठी साहित्य इथे वाचायला मिळाले. कथा, कादंबरी, प्रवास वर्णने, कविता, ललित लेख. वन स्टॉप शॉप फॉर ऑल युवर मराठी रिडिंग निड्स. (हे खास झक्कींसाठी प्युअर मराठीत लिहलंय)

मायबोली सर्वांना बरोबर घेऊन सुखेनैव बदलत गेली, नवे तंत्रज्ञान, नवा इंटरफेस, नवे उपक्रम, नवी धोरणे, नवे‌ मैत्र, नवी भांडणे. मायबोली विस्तारत गेली, जुन्या नवीन पिढीतले नवनवीन सदस्य वाढत गेले आणि रेस्ट इज हिस्टरी!

तर मायबोलीने मला काय दिले?
मायबोलीवरील मराठी लिखाण, मराठी भाषा दिवस, गणेशोत्सव, दिवाळी अंक सारखे उपक्रम या सर्वांनी परदेशातही मला मराठीशी जोडून ठेवले. मायबोलीचे हे सर्वात मोठे ऋण आहे माझ्यावर.

मी मायबोलीला काय दिले?
एक कृतज्ञ वाचक

कोणत्या लेखांनी तुम्हाला गांजले?
मी मायबोलीवर मनोरंजनासाठी यायचे, येते. त्यामुळे मला कोणीही आणि काहीही गांजत नाही.

तुम्ही मायबोलीकरांना कसे गांजले?
हे असे! निमंत्रणावरून.
मी खरं तर मायबोली बाहेरच्या माझ्या परिचितांना मायबोली परत्वे खूप गांजले आहे. इथे मिळालेले ज्ञान तिथे पाजळून.

मायबोलीला, मायबोलीकरांना, अजय यांना, वेमांना आणि मुख्य म्हणजे सौ. गल्लेवालेंना या रौप्य महोत्सवासाठी अनंत धन्यवाद आणि पुढच्या सुवर्णमहोत्सवी वाटचालीसाठी खूप शुभेच्छा.

Group content visibility: 
Use group defaults

छान..
एक एक तप वाचनमात्र आणि सदस्य होऊन हे भारी आहे..

मला भारीच कौतुक वाटलं त्याच्या मित्राचं. हल्लीच्या काळात कोण करतो इतकं स्वतःच्या बायकोसाठी! ...... Biggrin

मी मायबोलीला काय दिले?
एक कृतज्ञ वाचक। ...... हे फार आवडलं.

तू नियमितपणे लिहायला हवंस. मस्त खुसखुशीत लिहीतेस. रच्याकने, माझं नाव लिहील्याबद्दल धन्यवाद.

आताच पाहिलं की या गणेशोत्सवाच्या निमित्ताने तू लिहू लागली आहेस. एक तप बाहेरून वाचन, एक तप सदस्य होऊन पाहिलंस होऊन तसं आता (किमान) एक तपाच्या लेखनाचं व्रत घेऊन टाक.

छान लिहिलं आहे. मनमोकळं.

प्रसिद्ध लेखकांव्यतिरिक्तही हौशी नवोदित लेखक इतके सुंदर, सशक्त, दमदार लिहितात
>> अगदी. मलापण असंच वाटायचं (अजूनही वाटतं)

छान लिहीले आहे (आणि धन्यवाद Happy )

प्रसिद्ध लेखकांव्यतिरिक्तही हौशी नवोदित लेखक इतके सुंदर, सशक्त, दमदार लिहितात >> याच्याशी एकदम सहमत. मलाही आठवले, की मी जेव्हा नव्याने इथे आल्यावर मायबोलीवरच्या कथा वाचल्या तेव्हा मलाही असेच जाणवले होते की मायबोलीवरच्या कथांचा, लेखांचा दर्जा तेव्हा (२००४-०५ च्या सुमारास) मासिके वगैरे मधे असलेल्या कथांइतकाच नव्हे, तर काही बाबतीच जास्त चांगला होता. तेव्हा मी भारतात गेल्यावर अधाशीपणे पेपर्सच्या लोकरंग/चतुरंग टाइप पुरवण्यांमधले विशेष लेख, कथा व मासिकांमधल्या कथा वाचायचो. पण त्यात नाविन्य वाटायचे नाही. मायबोलीवर एकदम वेगळ्याच, चालू काळाशी रिलेव्हंट कथांचा खजिना मिळाल्यासारखे झाले होते.

वा मस्त लिहिलय हेही
एक तप नुसती वाचनमात्र होतीस हे वाचून दंडवतच। इतका पेशन्स? Wink
चला आता एक तप लिहीतीच रहा बरं Happy शैली आवडलीय तुझी

मायबोलीवर एकदम वेगळ्याच, चालू काळाशी रिलेव्हंट कथांचा खजिना मिळाल्यासारखे झाले होते. >> अगदी! यू नेल्ड इट.
निरू, मामी, वावे, फारेण्ड, आरती, देवकी खूप आभार.
अगं अवल तेव्हा खरंच वाचण्यापुरताच वेळ आणि पेशंस होता.

खुप आवडलं मायबोलीची सुरवात पत्नी हट्ट पुरवण्याने झाली आहे ही नवीनच माहिती मिळाली. Happy सौ गल्लेवालेंना मनापासून धन्यवाद.

मायबोलीला, मायबोलीकरांना, अजय यांना, वेमांना आणि मुख्य म्हणजे सौ. गल्लेवालेंना या रौप्य महोत्सवासाठी अनंत धन्यवाद आणि पुढच्या सुवर्णमहोत्सवी वाटचालीसाठी खूप शुभेच्छा.>>+११११११११
आणि फारेण्डने म्हटल्याप्रमाणे मलाही आठवतंय, मी बाकीची मासिकं वाचायचं सोडून दिलं कारण मायबोलीवर इतकं दर्जेदार वाचायला मिळायचं. मला वरच्या नावांमध्ये साजिरा, संघमित्रा हि नावं पण ॲड कराविशी वाटतात. नीधप, लली, दाद ,नंदिनी, हे सर्व नावाजलेले लेखक. वंदना च्या आवडीच्या लेखकांना माझंही अनुमोदन. (+१)
( ह्यावरून मला एक जुनी गंमत आठवली एक शब्द वाचण्यात आला तो म्हणजे "टचेआले" मी डोकं खाजव खाजव खाजवलं. शोध शोध शोधलं. पण कुठ्ठे म्हणून उलगडा झाला नाही. आता बरेच वर्षांनतर मला परत हा शब्द आठवला आणि ट्युब पेटली कि हे टण्याचे आवडते लेखक Lol )

आणि सगळ्यात महत्वाचे मला मायबोलीवर आवडतं ते म्हणजे सगळ्यांचे प्रतिसाद वाचायला. ती एक मोठीच गंमत आहे.

खुप आवडलं मायबोलीची सुरवात पत्नी हट्ट पुरवण्याने झाली आहे ही नवीनच माहिती मिळाली. Happy सौ गल्लेवालेंना मनापासून धन्यवाद. >>>>. +१. हे मलाही माहित नव्हतं.

आणि सगळ्यात महत्वाचे मला मायबोलीवर आवडतं ते म्हणजे सगळ्यांचे प्रतिसाद वाचायला. ती एक मोठीच गंमत आहे.>>>>> मूळ लेखाआधी प्रतिसादच वाचले जातात असं वाटतं Happy

मूळ लेखाआधी प्रतिसादच वाचले जातात असं वाटतं Happy>>> हो, कधीकधी, पण एखादा छान लेख किंवा गोष्ट असेल तर पहिला प्रतिसाद मी टाकत नाही सहसा. काही जण प्रतिसाद किती सुरेख देतात वाचतच रहावेत, आणि कसं काय सुचतं असं वाटतं. मला तसं चमकदार लिहायला जमत नाही. तर सुरवात आपण कशाला करा असं वाटतं. हे खरं चुकीचं आहे वाटणं, पण तरी.

>>>>>>>>>>हो, कधीकधी, पण एखादा छान लेख ........................................ मला तसं चमकदार लिहायला जमत नाही. तर सुरवात आपण कशाला करा असं वाटतं. हे खरं चुकीचं आहे वाटतं, पण तरी.

होय चूकीचं आहे धनुडी!!! निखालस चूकीचे Happy