संभाव्याच्या अब्ज छटांतून

Submitted by अनन्त्_यात्री on 23 September, 2021 - 06:01

संभाव्याच्या अब्ज छटांतून
वर्तमान उलगडे कशाने?
कोण ठरविते? किंवा सारे,
यदृच्छयाच घडून जाते?

भूतभविष्यातील भासांचे
इंद्रजाल मायावी छेदून
काल-प्रवाहा स्तब्ध करोनी
ऐलपैल वर्तमान उरते

कालौघाची गाज अनाहत
चराचराला व्यापुनी उरते
क्षण आत्ताचा क्षणजीवी नच
क्षणोक्षणी वर्तमान कथिते

Group content visibility: 
Use group defaults

सुंदर....