एक वाक्य

Submitted by पाचपाटील on 23 September, 2021 - 05:44

रस्त्यात अचानक खड्डा आल्यामुळे समजा आपण करकचून ब्रेक मारल्यानंतर पाठीमागचा एखादा आपल्यासारखाच मध्यमवर्गीय गाडीवाला आपल्यावर येऊन आदळला असता सदर घटनेमध्ये नेमकी चूक कुणाची हे निश्चित करण्याचा
प्रयत्न करण्यात काहीच अर्थ नसतो ह्याचं साधं कारण असं आहे की आपल्याकडे कोणत्याही रस्त्यावर गाडी चालवताना अचानकपणे फूटभर खोल खड्डा समोर येतच असतो, हा
सिद्धांत अगदी लहानपणापासूनच आपल्या सगळ्यांच्या
अंगवळणी पडत आल्यामुळे एव्हाना तो आपल्या एकूणच
जगण्याचा भाग झालेला असतो‌ तरीही यामागचं खरं कारण
म्हणजे जनतेचं ध्यान चालू क्षणावर तल्लखपणे टिकून रहावं ह्या उदात्त भूमिकेतून मायबाप सरकार, अधिकारी आणि
कंत्राटदार वगैरे मंडळी एका अतूट निष्ठेनं एकमेकांची मूठ गार करत दिवसरात्र खड्डेनिर्मितीत गुंतलेली असतात कारण खड्डे हे आपल्यासारख्या जनतेच्या मानसिक स्वास्थ्यासाठी
अतिआवश्यक असतात किंवा त्याहीपुढे जाऊन असं म्हणता येईल की खड्डेनिर्मितीच्या ध्येयाने झपाटलेले लोक म्हणजे खरंतर अत्यंत पोहोचलेले झेन गुरू किंवा बाऊल फकीर किंवा तत्सम उच्च दर्जाचे आत्मज्ञानी वगैरे लोक असतात, ही मूलभूत बाब आपण एकदा समजून घेतली की मग आयुष्यात काही म्हणजे काहीच अडचण उरत नाही कारण शेवटी असं आहे की घरातून आपण एकदा बाहेर पडलो की गोष्टींवरचा कंट्रोल आपल्या हातात राहत नाही आणि हे उदाहरणच देऊन सांगायचं झालं तर समजा सिग्नल सुटण्याची वाट बघत आपण अगदी घाईला आलेलो असतानाच
भरचौकातला एखादा फ्लेक्सचा सांगाडा अकस्मात
आपल्यावर कोसळला किंवा पोटावरचे चरबीचे थर कमी
करण्याच्या हेतूने, ओह् माफ करा, म्हणजे हेल्दी वगैरे
राहण्याच्या हेतूने एखाद्या पहाटवेळी समजा आपण
ओळखीच्याच रस्त्यावरून रमतगमत फिरायला वगैरे
निघालेलो असताना अचानक एखाद्या उघड्या ड्रेनेजच्या मॅनहोलमधून आपलं शरीर गायब होताना पाहून स्वतःस आश्चर्यचकित वगैरे करण्याची संधी ही काही पतंगाच्या
मांजात अडकून परस्पर आपल्याला कुणीतरी ॲडमिट
करण्याच्या संधीपेक्षा कमी दर्जाची म्हणता येणार नाही किंवा जाताजाता वीजेच्या डांबाला चिकटून तात्काळ जीवन्मुक्त
होण्यापेक्षा एखाद्या मूड खराब असलेल्या ड्राइव्हरने समजा आपल्याला कट मारून हातपाय वगैरे मोडण्याचं बक्षिस दिलं तर त्यातल्या त्यात ते चांगलंच म्हणावं लागेल आणि
अगदीच काही नाही तर समजा आपण गाडी किंचित
पार्किंगच्या लाईनबाहेर लावली असल्यामुळे एखाद्या
कर्तव्यदक्ष वगैरे ट्रॅफिक पोलिसाच्या भावना दुखावल्या
गेल्यास निगोशिएशनची तुटपुंजी कौशल्ये पणाला लावून
प्रकरण थोडक्यात मिटवायच्या संबंधाने हालचाली
करण्याचा अनुभव तर आपल्याला हरहमेश उपलब्ध होत असतोच म्हणूनच खरंतर एवढं लांबलचक वाक्य
लिहिण्यापेक्षा आपल्या अस्तित्वाला आपणच जबाबदार असतो अशा प्रकारचा अस्तित्ववादी निष्कर्ष सुरूवातीलाच
डिक्लेअर केला असता तर जमलं असतं पण म्हटलं की उगाच ते अस्तित्व की फिस्तित्ववादी लिहून वाचणाऱ्यांचे डोळे भरून वगैरे आले तर मग ते त्यांना जरासं अडचणीचंच होणार कारण एकतर रूमाल वगैरे सामुग्री घेऊन वाचायला बसण्याएवढा महान कुणीच नसतो आणि समजा वाचता
वाचता रडायला बिडायला यायला लागलेलं असतानाच
नेमकं त्याच वेळी कुणी त्यास पाहिलं तर आपण म्हणजे
अगदीच काही अलका कुबल वगैरे नाही हे पटवून
देण्यासाठी माणसं छे! छे! तसं काही नाही‌ वगैरे स्वरूपाचे उद्गार त्वरित काढायला लागतात आणि
यामागं समाजशास्त्रीय कारण काय असावं हे शोधून
काढण्यासाठी आपल्याकडच्या तुपाळ पोटबाबूंचा आयोग
वगैरे नेमण्यापेक्षा सरळसरळ एखाद्या बलाढ्य मल्टीनॅशनल
कंपनीला हे कंत्राट देऊन त्यांनाच मानवी दु:खांची मूळ
कारणं आणि तत्संबंधी उपाय वगैरे शोधायला सांगावं कारण हे मल्टीनॅशनलवाले कार्पोरेट्स आपल्या जीवनात
आनंदीआनंद आणण्याच्या कामात भलतेच उत्साही दिसतात परंतु आपल्याला आनंदी करण्याच्या प्रोसेसमध्ये
आपल्याकडे जे काही थोडंफार शिल्लक राहिलेलं असतं
तेसुद्धा लुटून फस्त करून आपल्याला पूर्ण कंगाल भणंग
केल्यानंतर ह्या जगङव्याळ कार्पोरेट यंत्रणा बहुदा शांत
होतील पण तरीही समजा भविष्यात आपण सगळेच
ग्राहकलोक भिकेला लागून नष्ट झालो तर ह्या कार्पोरेट
मालाला उठाव कसा मिळणार म्हणून कदाचित ते
आपल्याला पूर्णपणे खलास करणार नाहीत तर थोडी
धुगधुगी आपल्यात शिल्लक ठेवतील ही आशा आपण
बाळगायला हरकत नाही..!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हुश्श! Lol
शंकर महादेवनला विचारा चाल लावून गाता येईल का ते Wink

वावे,
शंकर महादेवन हे अतिशय तगडी फुफ्फुसं धारण करत असल्यामुळे त्यांना सदर कामगिरी शक्य आहे किंवा कसे यासंबंधी विचारणा केली असता अरेच्चा शक्य आहे का म्हणून काय विचारता आम्हास काहीही अशक्य नाही असे उद्गार काढत त्यांनी समजा कोई जो मिला तो मुझे ऐसा लगता था जैसे मेरी सारी दुनिया में गीतों की रुत और रंगों की बरखा है खुशबू की आँधी है वगैरे वगैरे ब्रेथलेस सुरू करून दिलं असता त्यांच्या त्या प्रसिद्ध लांबलचक श्वासाच्या लाटालाटांच्या हिंदोळ्यावर ऐकणाऱ्यांस समजा वरखाली डुलत डुलत आपलाच श्वास मधातच अटकतो की काय हे चेक करावं लागत असलं तरी एकूणच ऊर्जामुक्तीच्या दृष्टीने ही एक चांगलीच फैनाबाज प्रोसेस असते असं म्हणावं लागेल.
Lol

उभयान्वयी आणि शब्दयोगी अव्ययांची लयलूट!
लिखाण बरे आहे म्हटले असते आणि न थांबता वाचले
असते पण सारखी अव्यये लागत गेली म्हणजे भेटत गेली आणि विरामचिन्हे लुप्त झाली म्हणजे नाहीतच अशी स्थिती झाल्यानंतर पुढे वाचावे किंवा कसे असा प्रश्न पडला आणि उत्तर शोधण्याच्या भानगडीत पडण्यापेक्षा पटकन पुढचे वाचून टाकावे असे ठरवून नेटाने वाचायला बसल्यावर धाप लागली आणि आता इनहेलर घ्यावा लागतो की काय अशी शंका येऊ लागल्यावर तात्पुरता उपाय म्हणून एक दीर्घ श्वास घेतल्यामुळे थोडा हुरूप आल्यासारखे वाटते न वाटते तोच किंचित गुंगी आल्यासारखे वाटू लागले म्हणजे आता ह्यावर इलाज करणे आलेच म्हणताना ही मेंदूची बधिरता तर नव्हे ह्या विचाराने धक्का बसून हाताने डोके बाहेरूनच चाचपून बघताना शंका आली की डोक्यात मेंदू आहे की नाही किंबहुना डोक्यात मेंदू असतो का अथवा मेंदू डोक्यात(च) असतो का म्हणून आता हे असे त्रांगडे झाल्यावर हे आधी निस्तरावे म्हणून साहाय्यासाठी कोणाला फोन करावा वगैरे विचार करीत असतानाच लेख वाचून संपला म्हणजे आता त्यावर बरे वाईट म्हणणे आलेच तर लेख चांगला होता असे म्हणून टाकावे झाले!
ता. क. लेख आवडला.

अरे काय चाललय काय इथे ते तरी कोणितरी मज पामराला सांगाल की आपलं उगाचच , वेळकाढूपणा अर्थात टाइमपास करत, टवाळक्या करत म्हणजे मी काय म्हणते ते लक्षात घ्या की वेळच वेळ मिळाला की आपलं हे असं काहीतरी कीबोर्डावर टंकायला तुम्हा सर्वांना काहीच म्हणजे काहिच वाटत नाही का?

हीरा, सामो प्रतिसाद आवडला Happy
वाक्यात विरामचिन्हांचा वगैरे वापर न केल्यामुळे आता हा बाबा थांबतोय की नाही ह्यासंबंधाने विचार करत करत एका वाक्यावरून दुसऱ्या वाक्यावर उड्या मारत मारत चाललेलो असतानाच मध्येच काही मजकूर असा येतो की ज्यामध्ये एकाच वाक्यात तब्बल तीन तीन नकार वापरलेले दिसतात आणि मग माफक चीडचीड व्हायला लागते की आता ह्याचा नेमका अर्थ काय लावावा की हा नादच सोडून देऊन हरी हरी करत बसण्याचं आपलं मुक्त स्वातंत्र्य वापरावं म्हटलं पण मग खरी गोष्ट लक्षात येते की ह्या माणसाला मोठ्या वाक्याच्या कवचाखाली दडून असंबद्ध बडबड धूर्तपणे वापरण्याची भलतीच खोड दिसते आहे हे ही एकवेळ समजा सहानुभूतीपूर्वक समजून घेतलं तरीही त्या असंबद्ध बडबडीलाच जर तो मराठी साहित्यातील ह्या शतकातील महान आविष्कार म्हणून पटवून देण्याचा प्रयत्न करायला लागला असेल तर त्यास तातडीने येरवडा किंवा ठाणे किंवा मिरज वगैरे ठिकाणी जेथे मानसिक चंचलतेसंबंधी उपचार करणाऱ्या संस्था उपलब्ध आहेत तेथे नेऊन सोडण्यासंबंधी गुपचूप हालचाली कराव्या म्हटलं तरी त्या संस्था सुद्धा अॉलरेडी हाऊसफुल्ल भरून वाहत असल्याचे निदर्शनास येईल कारण सांप्रतकाळी शहाणे आणि वेडे यातला फरक करणे एवढे मुश्किल होत चाललेलं आहे की वेडेपणासंबंधी जुने जे निकष होते ते बदलण्याची महत्वाची कामगिरी केवळ एका देशाच्या पार्लमेंटला वगैरे झेपणारी नसल्यामुळे ते काम तात्काळ युनो किंवा वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन वगैरे संस्थांकडे सुपूर्द केले पाहिजे कारण जगभरातील सगळे शहाणे चतुरलिंगम लोक त्याच ठिकाणी दबा धरून बसलेले असतात आणि हे मत समजा लोकसत्तेच्या संपादकांस पाठवले असता त्यांस माफक क्रोध येईल की काय असे भय वाटते कारण त्यांची वैश्विक संपादकीय दृष्टी हरहमेश जागतिक पातळीवरील समस्यांचं विश्लेषण करण्यात एवढी बुडून गेलेली असते की इथल्या तमाम फाटक्या तुटक्या लोकांनी विमान वगैरे पकडून किंवा विमानाचे तिकीटाचा विचारही हास्यास्पद वाटण्याएवढी हालत खस्ता असल्याने सरळसरळ समुद्रमार्गे पोहत पोहत अमेरिका ब्रिटन जर्मनी फ्रान्स किंवा तत्सम कॅनडा वगैरे देशांकडे प्रस्थान केले असता आपण सगळेच एका झटक्यात जागतिक वगैरे होऊन सगळ्यांसाठीच बहुदा विन-विन की काय म्हणतात तसली सिच्युएशन होऊन जाईल..!

Happy

>>>>>सामो तुम्ही पण!
+११

क्या बात है!!! कळ्ळलं बर्का कळ्ळ्लं. शब्दाचं अ‍ॅव्हरेज शून्यावर आणलेलं. अरे कहीं का नहीं छोडा हमे. Wink