माझ्या आठवणींतली मायबोली - नीधप

Submitted by नीधप on 21 September, 2021 - 14:48

मला माबोकर होऊन २१ वर्षे आणि ११ महिने झाले आहेत त्यामुळे 'आमच्यावेळी...' वगैरे सूर आळवत या उपक्रमात हजेरी लावायला मी जामच एलिजिबल आहे.
२१ वर्ष ११ महिने म्हणजे ९८ चे ऑक्टोबर-नोव्हेंबर महिने (योग्य साल आहे!). तेव्हाचं रजिस्ट्रेशन. ऑलमोस्ट गद्धे पंचविशीत, सदाशिव पेठेतून उड्डाण करून अ‍ॅयथेन्स गावी जॉज्या प्रांती शिकायला पोचून महिना दीड महिना झाला होता. मराठी बोलायला/ ऐकायला मिळत नव्हती. स्कूलमधे कॉम्प, इंटरनेट नुकतेच ओळखीचे झाले होते. इंटरनेटवर शोधता येतं याचा पत्ता लागला होता. त्यावेळी काहीतरी शोध घेताना मायबोलीवर पोचले होते. अचानक अनेक लोक रोमनातून का होईना पण मराठीत गप्पा मारताना दिसले. म्हणजे वाचायला मिळाले.

जे चालू होते त्या गप्पांच्यात उडी घेतली. खूप मस्त वाटलं होतं. आळेकरांच्या प्रभावामुळे मुद्दामून मराठीतले प्रचलित नसलेले शब्द वापरायची, किंवा ज्याला अतिमराठी म्हणू तसे बोलायची सवय होती. मग ते माझे मराठी वाचून कुणीतरी मला गटणे म्हणाले. माझी ट्यूब नेहमीप्रमाणे तेव्हा पेटली नाही आणि मी काहीतरी रिअ‍ॅक्ट झाले. पण मग टाइमपास करायची वेळ संपली आणि मी ब्राउजर बंद करून निघून गेले. तेव्हा बहुतेक रजिस्ट्रेशन जरूरी नव्हते. ब्राउजरवर साइट बुकमार्क करता येत होती की नाही लक्षात नाही पण मला हे असे बुकमार्क करणे वगैरे काही माहिती नव्हते. काय शोधताना माबोवर पोचले होते तेही लक्षात नव्हते त्यामुळे दुसर्‍या दिवशी साइट काही सापडली नाही. मग अर्थातच पुढे काय झाले कधी कळले नाही. ही पहिली भेट

त्यानंतर काही दिवसांनी असंच इतर काहीतरी शोधताना परत साइट सापडली. रजिस्ट्रेशन सुरू झाले होते. अर्थात बिना रजिस्ट्रेशनचेही उंडारता येत होतेच. मी तेव्हा दिसेल तिथे, जाहिरात येईल तिथे रजिस्ट्रेशन करायचे म्हणजे याहू चॅट, पुणेसिटी चॅट वगैरे कुठेही. तर इथेही करून टाकले आणि मी माबोच्या गळाला लागले. तेव्हा अश्या साइटसवर आपल्या नावाने करायचे नाही रजिस्ट्रेशन असे पक्के होते डोक्यात. त्यामुळे मी वेगळे नाव घेतले. त्या नावाचा इतिहास एकदाचा सांगून टाकलाच पाहिजे.

माबोवर रजिस्टर करायच्या जस्ट आधी मी याहूवर स्वतःच्या नसलेल्या नावाने इमेल उघडला होता. नुसते नीरजा मिळत नव्हते मला ती १२३४५ वगैरे वाली गाडी जोडायची नव्हती. मग काहीतरी युनिक आणि सोपे नाव हवे म्हणून मी खूप विचार केला. आमच्या विभागप्रमुख डॉ. फार्ली रिचमंडने मला नुकतेच एका संस्कृत प्रहसनाचे इंग्रजी भाषांतर वाचायला दिले होते. ते प्रॉडक्शन करायचे आमच्या विभागात घाटत होते. (मी थिएटर स्कूलला होते.) त्या प्रहसनाचे नाव होते 'भगवदज्जुकेयम'. त्यात दोन पात्रे होती भगवद म्हणजे बौद्ध भिख्खू आणि अज्जुका नावाची नटी/ गणिका. ते झाले असते तर मी अज्जुकेचा रोल करणार होते. काय सुचलं मला आणि मी अज्जुका या नावाने याहू इमेल उघडला. मग तेच नाव इथेही घेतले. पुढे अज्जुका हे नुसते त्यातल्या गणिकेचे नाव नसून अज्जुका या शब्दाचा अर्थ गणिका असाही होतो हा उलगडा झाला. तोवर हे नाव इथे प्रचलित झाले होते. आणि नाव बदलता येण्याची सोय नव्हती. नशिबाने खूप लोकांना हा एवढा विषय खोल माहिती नसतो त्यामुळे मी सुटले. पण असाम्याला आणि बहुतेक जयाला मीच बावळटासारखे हे सांगितले होते. मग काय माकडाच्या हातात कोलित. मुद्दामून गटगला, बाफवर मधेच विषय बदलून अज्जुकाचा अर्थ काय असे हे लोक जोरात विचारायचे. मी गपा रे वगैरे काहीतरी म्हणलं की झालं. "चिल्डी चिल्डी!" सुरू! मग ते पसरलं. ज्यांना काही माहिती नाही ते ही मजा म्हणून असं विचारू लागले. असं विचारलं की नीरजा प्रचंड चिडते आणि समोरच्याचे 'खून पी जाती है' वगैरे अश्या आख्यायिका निर्माण झाल्या. अखेर २००७ च्या (हो ना? ) नव्या माबोमधे नाव बदलायची सोय मिळाली आणि माझी त्या नावापासून सुटका व्हायला सुरूवात झाली.

नमनालाच पाल्हाळ खूप झाले. तर परदेशात शिकताना मराठी बोलण्याची गरज यातून माबो रोजच्या जगण्याचा अविभाज्य भाग बनली. ९९ च्या डिसेंबरमधे मी सुट्टीसाठी भारतात आले होते तेव्हा मी, Storvi आणि milya अश्या तब्बल तीन माबोकरांचे अखिल मायबोली अधिवेशन अर्थात AMBA झाले होते. हे बहुतेक माबोवरचे पहिले आंबा. नंतर मग बर्‍याच आंबा आणि गटगंना हजेरी लावली. पहिल्या वहिल्या सिंहगड रोडच्या वविला हजेरी लावली होती. नंतरही काही वविंना गेले होते. वविला जाण्याचे नसतानाही टिशर्ट घ्यायला शिवाजी पार्कच्या गटगला खूप वेळा गेले.

माझ्या लिखाणाची सुरूवात इथे झाली असं म्हणणार नाही कारण माबोपूर्व काळात फिरोदियाला वगैरे लिखाण केलेले आहे. लिहायला आवडायचे आणि अक्षर वाइट असल्यामुळे लिखाणाचा कंटाळा यायचा असा काहीतरी प्रकार होता. त्यामुळे मी जास्त कविताच लिहायचे माबोपूर्वी. पण माबोवर लिहायचे म्हणजे वाइट अक्षराचा मुद्दाच नाही. आणि मग मी धडाक्यात लिहू लागले.

जुन्या माबोमधे जया आणि असामी लिहित असलेल्या कादंबरीत जयाने घुसू दिले नाही लिहायला म्हणून एक नाटकही लिहून काढले होते. शिवाजी फॉण्टपण नव्हता तेव्हा. ते सगळे रोमनमधेच लिहायचो आम्ही आणि तसेच वाचायचे सगळे. आता ते नाटक माझ्याकडेही नाही आणि माबोवरूनही गडप झालेय. अगदी पहिल्या का दुसर्‍या माबो दिवाळी अंकांमधे दागिन्यांबद्दल सालंकृत नावाचा लेख लिहिला होता. मग गॉन विथ द विंडच्या स्कार्लेट बद्दल लिहिले होते. आणि मग अखेर २००६ मधे कथालेखनाला सुरूवात केली पहिली कथा लिहायला सुरू केले आणि तीचा शेवट मिळेना. दुसरी कथा लिहिली ती ठिकच होती. मग 'मला पण लिहिता येतं!' अश्या खुन्नसवर तिसरी कथा लिहिली. त्यावर्षी साप्ताहिक सकाळच्या स्पर्धेत दिली आणि चक्क तिला बक्षीस मिळालं. मग पुढे अजून २-३ कथांना विविध ठिकाणी छोटीमोठी बक्षिसे मिळत राह्यली. एका कथेच्या बाफवर माझ्या बहुतेक सगळ्या कथांच्या लिंका आहेत. नाहीतर माझ्या लेखनात मिळतीलच.

खूप पाल्हाळ झालेय त्यामुळे आता लिहायचेत ते मुद्दे थोडक्यात लिहिते.

माबोवरचा माझा प्रवास हा माझे शिक्षण, मग भारतात परतणे, लग्न, करीअरची सुरूवात वगैरे माझ्या आयुष्यातल्या महत्वाच्या गोष्टींबरोबर समांतर चालू होता. ते सगळे वेळोवेळी माबोकरांबरोबर शेअर करणे हा माझ्या आनंदाचा भाग होता. पहिल्याच सिनेमाच्या मेकिंग पासून ते मिळालेल्या यशापर्यंत माबोकरांनी ऐकले आहे. अनिलभाई, एसव्हिएस यांनी तर लागेल तिथे मदत केली आहे. एसव्हिएसच नाही तर तो आणि प्रिया दोघांनी मला माझ्या सिनेमासंदर्भातल्या अमेरिका दौर्‍यादरम्यान आपल्या घरात काही काळ सहनही केले आहे.

आता संयोजकांचे प्रश्न (अनिवार्य नाहीयेत माहितीये पण तरी... )
तुम्ही मायबोलीवर यायला लागल्यापासून तुम्हाला काय बदल जाणवले,
जग जसं बदलतं तशीच मायबोली बदलत गेली. टेक्निकल प्रगती आणि त्यामुळे मानसिकतेतही काहीसा फरक नक्की आहे. पण मुळात माणसे गाभ्यात तीच तशीच असतात सगळीकडे. जगभरात पोलरायझेशन होते आहे प्रचंड प्रमाणात त्याचे प्रतिबिंब इथेही दिसत असावे. मी रेग्युलर यायचे इथे तोवर ते लक्षात यायला लागले होते. पुढचे माहीत नाही. म्हणून असावे.

इथली कुठली सोय तुम्हाला एकदम आवडली,
मला अजूनही ट्री व्ह्यू हा सगळ्यात आवडलेला आहे. त्यानंतर अत्यंत सोपे देवनागरी लिखाण. जेव्हा संयुक्ता होते तेव्हा संयुक्ता.

कुठली सोय तुम्हाला कित्येक दिवस माहितच नव्हती,
आजही माहितच नसेल.

गेल्या २५ वर्षात मायबोलींनं तुम्हाला काय दिलं,
सगळ्यात महत्वाचे म्हणजे लिखाणाला बळ. देवनागरी टायपिंग आणि लोकांचे प्रतिसाद दोन्हीमुळे. विविध चर्चा आणि वादांमधून आपली मते/ मुद्दे मांडताना करायची मांडणी, आपलेच विचार घासून पुसून पक्के होत जाणे किंवा तुटून गळून पडणे. काही प्रमाणात रेट्रोस्पेक्शन. खूप मित्रमंडळी दिली. बाहेरच्या जगात न जाता जगाचे अनुभव दिले. परदेशात असताना एकटे पडू दिले नाही.

तुम्ही मायबोलीला काय दिलं ,
हे विचारता आणि मग उत्तर दिलं की लोक म्हणणार मी मी करते. तर आता मी मी करतेच. सगळ्यात पहिलं म्हणजे मी माबोला इतर सर्व सदस्यांप्रमाणेच भरपूर वेळ दिला. काही सदस्य आणले. माबोच्या अफाट पसार्‍यात माझ्या लिखाणाचे थोडे कपटे सोडले. दिवाळी अंक, गणेशोत्सव वगैरेंसाठी लिखाण केले. कोणे एके काळी गणेशोत्सव संयोजन समितीमधे काम बघितले. संयुक्ता होते तेव्हा काही काळ संयुक्ता व्यवस्थापनात काम बघितले. तसेच संयुक्तातर्फे महिला दिनानिमित्त 'लिंगनिरपेक्षता' या विशेषांकाचे संपादन केले.

तुमचं कुठलं लेखन गाजलं,
मी माझे आडनाव न बदलल्यामुळे आलेल्या अनुभवांवर लिहिलेला लेख गाजला आणि वाजला सुद्धा. तरी नशीब पहिल्यांदा तो माबोवर टाकला होता त्यावेळेचा वाद मी तो धागाच उडवून टाकल्याने आता उपलब्ध नाही. स्त्रियांसाठी स्वच्छतागृहे या विषयावरचा २०१० की २०११ च्या दिवाळी अंकातला लेख प्रचंड गाजला. दुर्दैवाने आजही तो लेख तितकाच रेलेव्हंट आहे. माझी लेमन राइसची रेसिपी आणि फ्लॉवरची सा-खि भाजी रेसिपी आणि हेतेढकल खाकरा भेळ रेसिपी लोकांना भरपूर आवडली. आणि माझ्या कथा. मी आणि नवा पाऊस, एका हरण्याची गोष्ट, देहाची तिजोरी या कथा मुख्यत्वेकरून लोकांना आवडल्या/चर्चिल्या गेल्या. मी आणि नवा पाऊस जुन्या माबोवर लिहिली होती. तेव्हा ती लिहिली जात असतानाचे प्रतिसाद आता सापडणार नाहीत.
मी श्वास चित्रपटाच्या मेकिंग संदर्भाने एक सिरीज लिहायला सुरू केले होते. ते अर्ध्यावर सोडले. सिरीजचे नाव होते 'माझा श्वास'. जुन्या माबोवरच्या रंगीबेरंगीत( बहुतेक) होते ते लेख. त्यालाही भरपूर प्रतिसाद मिळाला होता. काल मला वाटले की जुने हितगुज नष्ट झालेय पण त्याचे अर्काइव्ह्ज आहेत अजून. तर ही माझा श्वास सिरीज

कूठल्या लेखांनी तुम्ही मायबोलीकरांना गांजलं
माझ्या लिखाणापेक्षा माझ्या विविध वादातल्या भूमिका आणि माझी झालेली भांडणं यामुळेच जी काय गांजागांज झाली असेल माझ्याकडून ती असेल. अर्थात मी १० गांजलं तर त्यावरून माबोकरांनी मला १०० गांजलेलं आहे त्यामुळे मिच्छामि दुक्कडम मोडमधे मी जाणार नाही. गेले तर माझा आयडी हॅक झालाय का अशी शंका नाही का येणार लोकांना.

तर माबोवर भरपूर गप्पा मारल्या, दंगा केला, चर्चा केल्या, वाद घातले. भांडणेही झाली. पण काही तुरळक लोक वगळता ते मजेने घेतले जायचे. पण नंतर ती मजा निघून गेली. गद्धेपंचविशीत, तिशीत खाल्लेली माती म्हणजेच मी हे गृहित धरूनच लोक बोलत मग शब्दाला शब्द वाढत जाई. मला भाषेवरून लेक्चर देणार्‍या प्रत्येकाने त्या लेक्चरमधेच इतकी जहरी भाषा वापरलेली आहे की मला त्या लेक्चर्सचा एकीकडे राग आणि एकीकडे हसायला यायला लागायचे. असो असो

जुन्या माबोवरच्या इतक्या आठवणी आणि किस्से आता सुचत होत्या की काय काय लिहू असे झाले होते. पण थांबायला हवे त्यामुळे आता शेवट. नक्की..

माबो विशेष वरच्या लिखाणाचा प्रताधिकार यासंदर्भाने प्रसिद्ध झालेल्या नियमावली, त्यातल्या वाक्यातून ध्वनित होणारा अर्थ वगैरे चर्चेदरम्यान आलेल्या विधानांमुळे मला इथे नवीन काही लिहिण्याबाबत डिस्कम्फर्ट नक्की निर्माण झाला.
तीन चार वर्षे सुखाने चाललेल्या आणि एक सुरक्षित वातावरण असलेल्या संयुक्ताचे अचानक सगळे सुरक्षित कवच काढून घेतले जायचे वारे वाहू लागले आणि माबोवरच्या विश्वासाला तडा गेला.
एकेका शब्दाचा मुद्दामून वाकडा अर्थ काढणे आणि मग त्यावरून वाटेल त्या लेव्हलला जाऊन मला बोलणे हे फार व्हायला लागले. पूर्ण दोष मी त्यांना देत नाही तसाच पूर्ण दोष माझ्याकडे घेणार नाही. मी एक विरूद्ध अनेक अश्या प्रकारे हे घडत बुलिंगच्या पातळीपर्यंत जायला लागले. २०१५ मधे उघडपणे काही व्यक्ती एका वाहत्या बाफवर "आपण सगळ्यांनी मिळून हिला सोशल मिडियावरून हाकलून देऊ." वगैरे चर्चा करताना दिसल्या.

मायबोलीवर माझे घर आता उरले नाही याची स्पष्ट जाणीव झाली. वाइट वाटले पण थोडे अंतर ठेवणे हेच बरे आहे हे पक्के कळून चुकले. कधीमधी चक्कर मारायला. इतर ठिकाणी प्रसिद्ध केलेले लिखाण इथे परत टाकायला, नुसतेच वाचायला उगवते मी अजूनही. पण ते तेवढेच.

मला सोशल मिडियावरून हाकलून द्यायची स्वप्ने बघितली गेली असली तरी सोशल मिडिया हाताशी धरून २०१५ मधे मी माझा तारकामांचा नी या नावाने ब्रॅण्ड सुरू केला. माझ्या इतर सर्व कामांबरोबर तो ब्रॅण्ड सुखेनैव चालू आहे, मुंगीच्या गतीने वाढतो आहे.

- नी

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वा, पार्लरवाल्या मॅडम चा आठवणीचा लेख. मस्त लिहिलाय लेख.

झुंडीनी त्रास देतात असं का वाटतं आपल्याला? जेव्हा तुमच्या मताशी सहमत होणारे असतात तेव्व्हा ते सुद्धा झुंडीनी सहमत होतात असं वाटत का? की केवळ तुमच्या मताला विरोध करणारे झुंडीनी येतात असं वाटतं? हे चुकीचा विचार आहे असं नाही का वाटत? असं व्हिक्टिम कार्ड का खेळता? तुमचं मत मांडलं की काहीजण तुम्हाला सपोर्ट करतील आणि काहीजण त्याला विरोध करतील इतकं सोपं आहे. त्यात झुंड कुठुन आणली? जर विरोध करणारे झुंड तर सपोर्ट करणाअरे पण झुंड. की तुम्हाला विरोध सहन होत नाही? यावर सखोल विचार करावा ही विनंती.

काल प्रतिसाद लिहीला होता तो काढला कारण उगीच सलगी दाखवते आहे असे वाटेल - केवळ या भीतीमुळे. पण काही जणांनी वरती तुझ्याशी फारशी मैत्री नसतानाही मनातले विचार मोकळेपणाने मां डलेले आहेत त्यामुळे माझीही भीड चेपली. परत तो प्रतिसाद टा कते. तुझ्या नावापासून सारेगमपधनीसा ते लिखाणापर्यंत इन्क्लुडिंग प्रतिसाद व अ‍ॅटिट्युड सर्व आवडतं. माझ्या कयासाप्रमाणे तू इन्टेन्स, मनस्वी असावीस. कलाकार तर आहेसच, तुझ्या कविता ज्या की वरती दिलेल्या आहेत, वाचून हे मत बनलेले आहे. लास्ट पॅरा मला पेनफुल वाटला. कविता लिहीत जा. कारण मस्त लिहीतेस. सच्च्या असतात.

नी, छान लिहिलेस. आवडले. मला तुझ्या एकुणच कामाबद्दल खुप उत्सुकता वाटते. श्वासचा पुर्ण प्रवास लिहायला हवा होता असे आजही वाटते. तेव्हा मी तुला व्यक्तिगतरित्या ओळखत नव्हते पण ह्या साईटवर वावरणारी एक व्यक्ती ओस्करपर्यन्त पोचुन आलीय याचे खुप अप्रुप वाटले होते.

तुझ्या सगळ्या कथा, कविता वाचलेल्या आहेत. खरेतर कविता हा माझा प्रांत नाही पण तुझी कविता दिसली की ती वाचतेच. तुझ्या लेखांतुन व प्रतिसादांतुन मला माहिती नसलेल्या अनेक गोष्टींची माहिती मिळालीय त्याबद्दल तुझे आभार व मायबोलीचे आभार.

इथले सगळे वादही वाचले आहेत. खुप वेळा तुला मुद्दाम डिवचण्यासाठी काही शब्द लिहिले जायचे तेव्हा वाईट वाटायचे आणि तु दुर्लक्ष करावेस असेही वाटायचे कारण कित्येकदा त्या वादंगात मुळ विषय कुठल्याकुठे भिरकटवला जायचा आणि केवळ दुखावले जाणे उरायचे.
कुणालाही असे मुद्दाम डिवचुन काय आनंद मिळतो असा प्रश्न तेव्हा पडायचा पण सोमिवर असेही लोक असणार हे आता स्विकारले आहे.

छान!
अज्जुकाचा अर्थ आज कळला. तेव्हा ते नाव आवडलं होतं.

२००९ च्या वविच्या वेळी आपली ओळख झाली. बसप्रवासात अनेक वर्षांची ओळख असल्यासारख्या गप्पा मारल्या होत्या आपण Lol

आज पुन्हा वाटलं - जुन्या मेंबर्सची इथे पुन्हा वर्दळ वाढायला हवी.

२००९ च्या वविच्या वेळी आपली ओळख झाली. <<
यास यास!!
वविच्या आधीचे शिवाजी पार्कचे टीशर्ट गटग. पोस्टमनसारख्या स्लिंग बॅग्ज वापरायचो आपण. तिथे 'हाथ मिलाओ!' झाले. तेव्हा त्या ट्रेंडी नव्हत्या तितक्या.
त्याच वर्षी स्टेशनवर तुझ्या छत्रीच्या दांड्याचे मिसाईल झाले होते ना? की ते नंतर?

बसप्रवासात अनेक वर्षांची ओळख असल्यासारख्या गप्पा मारल्या होत्या आपण <<
Lol
स्लिंग बॅग वापरणाऱ्या भेटलो आपण एकमेकींना. मग दुसरे काय होणार लले?

साधना, हो. मला सुरुवातीला कळायचे नाही ते मुद्दामून डीवचणे. कळायला लागल्यावर तिकडे इग्नोर मारू लागले. पण लोक थकत नाहीत बघ.

बाकी सर्वांनाच थँक्यू!

धनुडी, सामो,
मी खात नाही! Wink

मी खात नाही >>>> Rofl

मी रुमाल टाकून ठेवते. मला पण तुला काय काय म्हणायचं आहे Lol

धनुडी, सामो,
मी खात नाही! Wink>>> Lol दोन सेकंद मी विचार केला कि मी काय खाण्यासाठी ऑफर केलं? मग पेटली Lol

तिथे 'हाथ मिलाओ!' झाले. >>> अरे हो की! 'हाथ मिलाओ' कसं विसरले मी Lol कशाकशावरून हाथ मिलाओ झालंय आतापर्यंत त्याची मोठी यादी होईल.

मिसाईल छत्री - २०१० सालच्या ववि शिपा गटगच्या वेळची Rofl

कडू-गोड आठवणींचा छान आढावा घेतला आहे.
अज्जुकाचा अर्थ आज कळला. >>+१
तुमची कापडाचोपडाच्या गोष्टी ही लेखमाला आवडली होती.

माझी लेमन राइसची रेसिपी आणि फ्लॉवरची सा-खि भाजी रेसिपी आणि हेतेढकल खाकरा भेळ रेसिपी लोकांना भरपूर आवडली. >>>>

तो लंब बेटावरील बर्फाळ चहा पण अ‍ॅड कर यात. मला मुद्दाम दुकानात जाऊन दारवा घ्याव्याशा वाटल्या यासाठी...

नीधप खूप छान लिहिलंयस. एकदम मनमोकळं!
मला अशी रोखठोक लोकं आवडतात. विचारात स्पष्टता असते ते छान वाटतं.
तुझं तारकामाचं पेज खूप आवडतं. एकदा तरी तुझ्याकडून काहीतरी बनवून घ्यायचं मला.

आपल्यावर कश्शाचा परिणाम होऊ द्यायचा नाही ही माझी जुनी सवय. Wink

मायबोली ३० वर्षांची होईल ना तेव्हा लिहिन बरे ते किस्से.

तुझं तारकामाचं पेज खूप आवडतं. एकदा तरी तुझ्याकडून काहीतरी बनवून घ्यायचं मला. >> +१०० पण माझे स्वप्नरंजन तरी function at() { [native code] }इ function at() { [native code] }इ aatich jaast atiranjit आहे.

मला तुझ्या व्यवसायात इंव्हेस्ट करायचे आहे नि मग बाकीच्या वर्कशॉप गर्ल्स-गाईज इतरांच्या ऑर्डर्स करतील नि इंव्हेस्टर लोकांसाठी न्यू कलेक्शन निमित्त तू स्वत: काही ज्वेलरी करशील. तसलं एक खास स्टेटमेंट पीस माझ्याकडे असेल.... व्हेन इज कपिलाषष्ठी धिस ईयर??!!

बाकीच्या वर्कशॉप गर्ल्स-गाईज <<
हे सगळ्यात भारी स्वप्न आहे. किधर है वो लोग. कबसे ढूंढ रही हूं!

तूर्तास नवरात्रीत नवीन कलेक्शन येणार हे. कुठे बघायचे वगैरे तुला माहितीच आहे

व्हेन इज कपिलाषष्ठी धिस ईयर??!! >>> Lol

मला कालपासून इतक्या एकेक गोष्टी आणि किस्से आठवतायत की अजून एक लेख लिहावा लागेल. >>> हाथ मिलाओ Proud

लले Lol
एकदा बसून करूच या यादी हाथ मिलाओ ची.

नीधप तुमचं लिखाण नेहमीच वाचलं आणि आवडलं आहे. Happy
पण नेहमीच वाचनमात्र असल्यामुळे याआधी कधी प्रतिसाद दिला नाही. शेवटचा पॅरा एकदम आवडला. खासच.

Pages