माझ्या आठवणीतली मायबोली - मामी

Submitted by मामी on 19 September, 2021 - 11:05

सदस्य झाल्यापासूनचा कालावधी - 11 वर्ष 2 months
म्हणजे माझ्या सदस्यत्वाचा आणि मायबोलीचा कालावधी जवळजवळ सारखाच आहे. कारण ११ गुणिले २ म्हणजे २२ त्यात फक्त ३ मिळवले की आलेच की २५. त्यामुळे मी देखिल आठवणी लिहिण्यास लायक आहे असं मी मानते.

तर..........

तो ट्री व्ह्यू, त्या रंगलेल्या V&C, ते रंजक आणि मनोरंजक बाफ, त्या व्यक्ती, वल्ली आणि व्यक्तिमत्त्व, ती सुप्रसिद्ध भांडणं, ते तरुण-तरुणींचे एकमेकांना मायबोलीवर भेटणे आणि कायमचे जोडिदार बनणे, पहिला ववि/गणेशोत्सव्/दिवाळी अंक्/गटग या सेपिया टोनमधल्या सर्व आठवणी माझ्या नाहीत. या सर्व ऐकीव आहेत आणि ऐकून उत्सुकतेनं जुन्या वाटांनी आतल्या रम्य दालनांत जाऊन वाचलेल्या आहेत. फार फार भारी आहेत त्या सर्व.

माझ्या आठवणी नव्या मायबोलीच्या. याआधी मी कोणात्याही संकेतस्थळावर नव्हते, कोणताही ब्लॉग वगैरे वाचला नव्हता. ऑर्कुटवर अगदी किंचित प्रमाणात अ‍ॅक्टिव्ह होते. मानव पृथ्वीकरची ओळख तिथली. मायबोलीवर मी अगदी पहिला बाफ वाचला तो 'मला चुकीची ऐकू आलेली गाणी'. वेडी झाले मी तो वाचून आणि प्रचंड हसून. हे काहीतरी सॉल्लिड आपल्याला भावणारं प्रकरण आहे हे लक्षात येऊन लगेच मेंबर झाले. हळूह्ळू प्रतिसाद देत राहिले, चिकार वाचत राहिले. अगदी दांडगा अभ्यास केला असणार मी जुलै २०१० ते ऑक्टोबर २०१० च्या दरम्यान कारण पहिलीच प्रसुती विडंबन काव्याची होती. एक फॅनक्लब निघाला होता त्यावर एक कविता (कशी काय कोण जाणे!) पण अचानक स्फुरली - क्लब नावाची. लोकांना बर्‍यापैकी भावली ती.

ड्यु आयडी हा मायबोलीवरचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय. ड्युआयडींची सतत भरती-ओहोटी सुरू असते पण मायबोली या जमातीविना कधीही दिसत नाही. असतातच ते. जेव्हा मला ही कन्सेप्ट कळली तेव्हा भयंकरच मजा वाटली होती आणि याचाही दांडगा अभ्यास करून एक अभ्यासपूर्ण थिसीस लिहिला - ड्युआयड्यांची व्यवच्छेदक लक्षणे आणि मीमांसा

गप्पांच्या अनेक पानांवरून बागडताना बर्‍याच ओळखी झाल्या आणि सदस्य झाल्यानंतर एक वर्षानं माझं पहिलं वहिलं मायबोलीचं गटग घडलं. यानिमित्तानं जिप्सी आणि दिनेशदा हे दोन मायबोलीकर माझ्या घरी पहिल्यांदा आले आणि मी साधना आणि जागूच्या घरी भेट दिली. मी नवी असल्याने अर्थात वृत्तांताची जबाबदारी माझ्यावर आली - जागूकडचे मत्स्यमयी गटग - रविवार, १७ जुलै २०११, उरण

तेव्हा पुपु, पार्ले, गप्पाटप्पा, कट्टा असे अनेक वाहते धागे होते. मी असायचे इथे पण फार काही रमले नाही. मात्र या गप्पांच्या धाग्यांवरून चिक्कार मौलिक माहिती मिळायची. शिवाय आतल्या गोटातले असे अनेक दुवे, धागेदोरे मिळायचे. त्यामुळे मी वाचत असे हे धागे. मायबोलीचे एकूणच स्वरूप, आवाका आणि तिचे सदस्य, त्यांच्यातले नातेसंबंध हळूहळू उलगडत गेले. समहाऊ त्यावेळी गप्पांचे वाहते धागे हे सर्वांत जास्त जिवंत असत. आपापले अड्डे बनले होते आणि इतरांवर खरपूस टिप्पण्या होत. अधूनमधून इथे भांडणं होत. वेळेत हजेरी लावली नाही तर संभाषण वाहून जाई. पण हे शत्रुत्व इतर लिखाणांच्या धाग्यांवर कंटिन्यु केलं जाई. 'धागा पेटला' हा कळीचा शब्द होता. अनेक सदस्य होते, त्यांच्या अनेक सवयी, लकबी, स्वभावविशेष होते. आपापल्या क्षेत्रात, कलेत, छंदांत, लेखनात उच्च पातळी गाठलेले खूप जण इथे भेटले. दिग्गज आहेत सर्व मायबोलीकर.

त्यावेळी तरुण माबोकरांचा गड-डोंगर चढणारा गृप होता. एकसे एक भारी वृत्तांत आणि फोटो यायचे यांच्याकडून. हे लिखाण मला फार आवडे. घरबसल्या गडभ्रमंती करवत हे लोक. दुचाकी घेऊन लेह लडाख केलेल्यांचे लेखही फार आवडले होते मला. इथली प्रवासवर्णनं वाचून त्यापासून स्फुर्ती घेऊन मग मी ही माझ्या काही हटके भटकंत्यांचे लेख कम प्रचि फीचर्स पाडले :

ग्लेनबर्न टी-इस्टेट, दार्जिलिंग : एक आगळावेगळा अनुभव
अथिरापल्लीचे अद्भुत
नीमराणा फोर्ट - राजस्थानची देखणी झलक

२०१५ च्या जून-जुलै मधे आम्ही तब्बल ५० दिवसांची कॅलिफोर्नियाची टूर केली. आमची आमची. त्याची मालिका लिहिली - थोडी मायबोलीकरांच्या उपयोगी पडावी म्हणून आणि बरीचशी आपल्या ट्रिपचा सविस्तर वृत्तांत आपल्यालाच वाचायला उपलब्ध व्हावा म्हणून. आठ भागांच्या या मलिकेचा पहिला भाग इथे आहे - कॅलिफोर्निया २०१५ : (१) ट्रिप - एक आखणे. या ट्रिपच्या आधी माहिती मिळवण्यासाठी एक धागाही काढला होता आणि मायबोलीकरांनी चिकार माहिती पुरवली होती.

विशाल कुलकर्णी, कवठीचाफा, पायस, प्रकाश कर्णिक अशा लोकांच्या अप्रतिम रहस्य्/भय कथा वाचल्या. मी देखिल २-४ लिहिल्या. त्यातल्या या दोन माझ्या आवडीच्या - बंटीचे आईबाबा आणि निळ्या अनंतिकेच्या शोधात.

मायबोलीवरचे काही धागे तर विनोदी सदरात काढले जातातच पण अगदी सिरीयसली शंका/मदत विचारलेल्या धाग्यांवर कधी कधी असले काही अतरंगी प्रतिसाद येतात की तो धागा प्रचंड विनोदी बनतो. या धाग्यांची एकत्रित नोंद केली म्हणजे मायबोलीकरांना सोईचं पडेल या हेतूनं मायबोलीवरचे धम्माल धागे - संकलन हा धागा काढला. लगोलग मग मायबोलीवरील थरारकथा - संकलन हा देखिल धागा काढला. मायबोलीकरांनी या दोन्ही धाग्याला चिकार प्रतिसाद दिला आणि त्यांचा उपयोगही केला याचं समाधान आहे.

हिंदी मराठी गाण्यांवर आधारित कोड्यांचा खेळ मी सुरू केला आणि तो फार गाजला. नुकताच पुन्हा एकवार तो खेळ पुढे आला आहे. - ..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग ८)

मायबोलीचा गणेशोत्सव हे एक वेगळंच प्रकरण आहे. पहिल्या वर्षी गणेशोत्सव ऑनलाईन म्हणजे काय करणार देव जाणे, बघुयात तरी अशी उत्सुकता होती. गणेशोत्सवाचं स्वरूप पाहून मी थक्क झाले. अगदी खर्राखुर्रा गणेशोत्सव होता तो. मंडप, आरती, नैवेद्य, स्पर्धा, गुणदर्शक उपक्रम ... अहाहा! अप्रतिम! नशिबानं लगेच पुढच्या वर्षी गणेशोत्सवाच्या संयोजनात भाग घेण्याची सुसंधीही मिळाली. मायबोली शीर्षक गीत आमच्या
गणेशोत्सवातील एका स्पर्धेतून तयार झालं आहे आणि या अभिनव संकल्पनेची निर्माती आहे लाजो.

मायबोलीवरचे सर्वच उपक्रम भारी होते / असतात. दिवाळीअंक, मभादि, ववि, गणेशोत्सव. काही अजूनही सुरू आहेत काहींनी थोडी टँप्लिज घेतली आहे. हे सर्व पुन्हा सुरू व्हावं अशी फार इच्छा आहे. नवे सदस्य आहेत त्यांनी यासाठी पुढाकार घ्यायला हवा असं वाटतं.

आता रॅपिड फायर प्रश्न घेते :
तुम्ही मायबोलीवर यायला लागल्यापासून तुम्हाला काय बदल जाणवले : मायबोलीवरचं मैत्रीचं वातावरण जरा कमी झालंय असं वाटतं. अर्थात दहा वर्षांत मी देखिल बदलले आहे शिवाय नव्या सदस्यांचा वयोगट तरुण आहे त्यामुळे असेल कदाचित .....

इथली कुठली सोय तुम्हाला एकदम आवडली : इंग्लिश कीबोर्ड वापरून मराठीतून सहज लिहिता येतं हे मला फार आवडतं.

कुठली सोय तुम्हाला कित्येक दिवस माहितच नव्हती : स्माईल्या कश्या द्यायच्या हे मला अनेक दिवस माहित नव्हतं.

तुम्ही मायबोलीला काय दिलं : मी माझ्या कुवतीनुसार काही आनंदाचे आणि विनोदाचे क्षण काही काळासाठी काही मायबोलीकरांच्या जीवनात निर्माण केले असावेत अशी शंका घ्यायला वाव आहे.

तुमचं कुठलं लेखन गाजलं : . माझा विबासं वरचा लेख - माझ्या जीवनातील एक सकाळ आणि विबासं - या लेखामुळे मला विबासंवाल्या मामी म्हणून प्रसिद्धी मिळाली. काय तरी प्रसिद्धी म्हणायची ही! Biggrin , बिस्किटे कशी कशी खावीत.. हा लेख आणि लिझिकीचे जग हा लेख, मुंबई मुंबई - माहिती, टिप्स, खास जागा, जुने फोटो, आठवणी हा मुंबईविषयक माहितीचा धागा. हा धागा मी जरी काढला असला तरी इतर मायबोलीकरांनी त्यावर भरभरून उत्तम माहिती लिहिल्यामुळे खूप माहितीपूर्ण आणि वाचनीय झाला आहे.

कुठल्या लेखांनी तुम्ही मायबोलीकरांना गांजलं : सर्वच! आता माझ्या नव्या छंदात गुंतून गेल्यामुळे लिखाण कमी झालंय त्यामुळे इतरांना गांजणं कमी झालंय. माझ्या या नव्या छंदाबद्दल मी इथे लिहिलं आहे - आनंदछंद ऐसा - मामी

गेल्या २५ वर्षात मायबोलींनं तुम्हाला काय दिलं : सुरवातीच्या काळात मी मायबोलीच्या संकल्पनेमुळे आणि तिच्या भव्य कॅनवासमुळे प्र चं ड प्रभावित झाले होते. हातात असलेल्या तंत्रज्ञानातून हे एक जागतिक पातळीवरचं संपूर्ण जीवनाला कवेत घेऊ शकणारं भव्य दिव्य असं हे नक्की काय आहे याचा अंदाज जसजसा येत होता तसतशी मी अधिकाधिक भारावून जात होते. हे केवळ मराठी लोकांसाठी तयार केलेलं साहित्यिक व्यासपीठ नव्हतं . इथे ज्याला जे हवं ते इथे उपलब्ध होतं. सांस्कृतिक, साहित्यिक, सामाजिक, माहिती, मदत, भेटीगाठी काय हवं ते विविध स्वरुपात सहज उपलब्ध होतं. एकमेकांना समोरासमोर न भेटलेले लोकं केवळ 'मायबोलीकर' आहेत म्हणून दुसर्‍यांवर विश्वास टाकत होते आणि तो सार्थ होता हे देखिल सिद्ध होत होतं. आणि हे एकाचवेळी जागतिक होतं आणि एकाचवेळी अतिशय जवळचं होतं. खरंतर मी अजूनही तितकीच भारावलेली आहे. यानिमित्तानं अजय आणि समीर यांचे आभार मानते. मायबोलीच्या २५व्या वाढदिवसाच्या निमित्तानं या दोघांचीही मनोगतं वाचायला मिळावीत अशी मागणी करते.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिलंय मामी...
तुमचं धमाल धागे संकलन माझ्या निवडक १० मध्ये आहे. कधीही जाऊन मनोरंजन सफर होते.

छान!

मामी
मस्त लिहिलंस.तू कमी लिहितेस पण तुझ्या काही पोस्ट म्हणजे माझ्या आयुष्यातले स्ट्रेस बस्टर आहेत.ती प्रेम रतन धन पायो पिक्चर मधल्या अंतर्वक्र सोफ्यावर रेललेली सोनम कपूर विशेषतः. (सापडली तर लिंक देते.)
जास्त लिहीत राहा.

https://www.maayboli.com/node/56396
पान 3 पहा.

छान लिहिले आहे मामी पण तेवढे लिहिणे सोडू नका. स्पेशली विनोदी अणि खुशखुशीत. तुमचे लिखाण बहुधा हल्ली गणेशोत्सवातच वाचायला मिळते..

छान लिहीले आहेत मामी!

धमाल धाग्यांच्या संकलनाबद्दल स्पेशल आभार. तसेच "तो/ती कुठलं गाणं म्हणेल" हा एकदम फेवरिट धागा आहे Happy ड्यु आयड्यांबद्दलचा धागा आठवतोय पण पुन्हा वाचावा लागेल. तसेच कॅलिफोर्नियाबद्दलचाही. ती टाइमलाइन पाहिली तर मी तेव्हा बे एरियातून मूव्ह होण्यात बिझी होतो, त्यामुळे बहुधा वाचला नसेल. ते दोन्ही धागे इन्टरेस्टिंग दिसत आहेत.

विबासंवाल्या मामी >>> Lol (विपु किंवा संपर्क इमेल वाढल्या का त्यानंतर? Wink )

यानिमित्तानं अजय आणि समीर यांचे आभार मानते. मायबोलीच्या २५व्या वाढदिवसाच्या निमित्तानं या दोघांचीही मनोगतं वाचायला मिळावीत अशी मागणी करते. >>> याला १००+

विबासंवाल्या मामी >>> Lol
मस्त आठवणी. तुझे धमाल धाग्यांचे आणि थरार कथांचे संकलन हे फार बेश्ट काम केलेस तू. मी खुप लोकांना त्याच्या लिन्क्स दिल्या आहेत आणि कुत्रा गावी कसा न्यावा वगैरे असे महा धमाल धागे शोधायला अजून केव्हाही ते धागे रेफर्न्स ला वापरते Happy

मस्त!
अ‍ॅडमिन आणि वेमांनी आपली मनोगतं/आठवणी लिहाव्यात याला +९९९

मामे, आपलं एक गटग मला आठवतंय - काळा घोडा. रुनी पॉटरला भेटण्यासाठी आपण जमलो होतो. खूप मज्जा आली होती त्यादिवशी.
पण आताशा तू कमी दिसतेस माबोवर...

मामे, आपलं एक गटग मला आठवतंय - काळा घोडा. रुनी पॉटरला भेटण्यासाठी आपण जमलो होतो. >> मी पण भेटून गेले होते बहुतेक तुम्हाला तिथे. Rhythm house च्या बाहेर पार्किंग लॉटच्या अलीकडे भेटले होते अगदी पाच दहा मिनिटासाठी. मग गाडी बुला रही है मोड ऑन होऊन पळत सिएसटी गाठल होतं Lol

मस्त लिहिलंय.
तुमचे मनोरंजन वाले धागे छान असतात

मस्त लिहीलयस मामी.
गटगच्या लिंकने पुन्हा आठवणी जाग्या झाल्या.

मामी, you're my favorite! तुमचे saglech लेखन खूपच आवडते. विनोदी लेखन, प्रवास वर्णन, पाककृती, DIY craft, saglach वाचनीय असतं!

मामी मस्त ग Happy
हीच माझ्याही ओळखीची मायबोली

मस्त!
माझ्याही सदस्यत्वाचा कालावधी साधारणपणे एवढाच.
विबासंच्या काळात मी माबो फारशी वाचत नव्हते. ते सगळं नंतर वाचलं. लिझिकीची ओळख मात्र एकदमच आवडली होती. तो/ती कुठलं गाणं म्हणेल या धाग्यावर खूप मजा केली आहे.
ॲडमिन आणि वेबमास्तरांची मनोगतं वाचायला खरंच खूप आवडतील. आणि एक मोठं गटगही व्हायला पाहिजे!

छान लिहिलंय...!!
तुमचं काही लेखन वाचायचं आहे... ते मी नक्की वाचणार आहे.
तुमचा लिझिकेचे जग हा धागा वाचून मी काही episode पाहिले होते... आणि आवडलेही होते.

एकमेकांना समोरासमोर न भेटलेले लोकं केवळ 'मायबोलीकर' आहेत म्हणून दुसर्‍यांवर विश्वास टाकत होते आणि तो सार्थ होता हे देखिल सिद्ध होत होतं. >> मामी, आपण एकमेकांना न भेटता देखिल तु मला एक क्लाएंट मिळवुन दिलास Happy

हो,मी पण हे लिहायला विसरले. मला कितीतरी नव्या गोष्टींचा शोध तुझ्या धाग्यांमुळे लागलाय. लिझीकीचं जग पण तुझ्यामुळे कळलं. आणि मग वेडंच लागलं तिचं. मग चंपक ठकठक चांदोबा ह्या मासिकांचा पण एक धागा काढला होतास ना? धागा शोधण्यासाठी चा धागा. बरेच ऊपयुक्त धागे काढलेस

एकमेकांना समोरासमोर न भेटलेले लोकं केवळ 'मायबोलीकर' आहेत म्हणून दुसर्‍यांवर विश्वास टाकत होते आणि तो सार्थ होता हे देखिल सिद्ध होत होतं. आणि हे एकाचवेळी जागतिक होतं आणि एकाचवेळी अतिशय जवळचं होतं. खरंतर मी अजूनही तितकीच भारावलेली आहे. >>>
माय सेंटीमेंट्स एग्झॅक्टली.

पूर्ण मनोगत आवडले पण शेवटचा पॅरा आवडलाच.
>>>सुरवातीच्या काळात मी मायबोलीच्या संकल्पनेमुळे आणि तिच्या भव्य कॅनवासमुळे प्र चं ड प्रभावित झाले होते. हातात असलेल्या तंत्रज्ञानातून हे एक जागतिक पातळीवरचं संपूर्ण जीवनाला कवेत घेऊ शकणारं भव्य दिव्य असं हे नक्की काय आहे याचा अंदाज जसजसा येत होता तसतशी मी अधिकाधिक भारावून जात होते.

किती चपखल मांडले आहे.

वा वा मामी, मस्त लिहिलंस.
तु दुसरा छंद सांभाळ ना, पण इथे लिहिणं कमी नको करुस. तुझे वेगवेगळ्या विषयावरचे, धागे, मजेशीर खेळ… संयोजन मंडळात असताना घेतलेले खेळ, परिक्षा जबरदस्त होत्या.
लिही पुन्हा प्लीज.
मायबोलीच्या २५व्या वाढदिवसाच्या निमित्तानं या दोघांचीही मनोगतं वाचायला मिळावीत अशी मागणी करते. >> याला खूपवेळा अनुमोदन.

मस्त लिहिलं आहेस मामी, तुझ्या स्टाईलने.
मी माबोवर आल्यावर तुझी भेट झाली आणि इथले वाचनीय धागे, संकलन वर काढून दिलस तेव्हा मला वाटले तू इथे ऍडमिन वगैरे आहेस.
तुझे बरेच लेख, कथा वाचल्या नाहीत, वाचतो आता.

मामी, मस्त लिहिले आहेस. तुझे लेख, कथा, धागे, प्रतिक्रिया सर्वच आवडते. विबासं लेख तर फारच अविस्मरणीय भारी होता. पण माझ्या लक्षात राहिलेली आवडतं लिखाण म्हणजे तुझी कथा निळ्या अनंतिकेच्या शोधात.

Pages