माझ्या बकेट लिस्टचा प्रवास - माऊमैया

Submitted by माऊमैया on 18 September, 2021 - 13:46

मायबोली गणेशोत्सवानिमित्त जाहीर केलेले विविध उपक्रम पाहिले. 'बकेट लिस्ट' विभागात लिहायची इच्छा झाली, पण पाहिलं तर पूर्ण झालेल्या बकेट लिस्टचा अनुभव लिहायचा होता. माझ्या डोक्यात तर बकेट लिस्टमधल्या अपुऱ्या गोष्टी घोळत होत्या. मग मी नाद सोडून दिला. पण मागचे ५ दिवस सगळ्यांच्या बकेट लिस्टविषयी वाचत होते, तेव्हा पुन्हा विचारचक्र सुरु झालं आणि मग लक्षात आलं की, माझ्याही २-३ इच्छा मी पूर्ण करून घेतल्यात की! फक्त त्या बकेट लिस्टमधल्या इच्छा असतात, असं काही डोक्यात नव्हतं. असो, नमनाला घडाभर तेल पुरे आता.

तर, माझी पहिली इच्छा( किंवा हौस ) जी मी पूर्ण केली, ती म्हणजे एकदा तरी स्टेजवर नाचायचं. लहानपणापासून मी खूप शांत, लाजाळू, मितभाषी होते. त्यामुळे अभ्यासाव्यतिरिक्त इतर कोणत्याही गोष्टीत सहभागी होत नव्हतं आणि अभ्यासात हुशार असल्याने, घरच्यांनाही त्यात काही वावगं वाटत नव्हतं. एक - दोनवेळा बदली डान्सर म्हणून संधी मिळत होती, पण तीही हुकली लगेच. सहावीनंतर, मी घरी एकटी असेन तेव्हा रेडिओ किंवा टेपरेकॉर्डर लावून नाचायचे. खूप बरं वाटायचं तेव्हा. पण ते माझ्यापुरतंच. मोठी होत गेले तशी, मी बरी नाचू शकते, असं मला वाटू लागलं. तरी कोणासमोर नाचून दाखवायची हिंमत नव्हती.

पण पुढे कॉलेजला गेले, तेव्हा जरा जरा कोशातून बाहेर यायला लागले. तरीही, स्टेज डेअरिंग नव्हतीच. पण दरवर्षी स्नेहसंमेलन संपलं, की संध्याकाळी डीजे डान्स असायचा. तेव्हा सगळे धम्माल नाचायचे. पहिल्या वर्षी मी पळून हॉस्टेललाच जाणार होते, पण माझ्या दिदीला फोन करून माझी द्विधा मनस्थिती सांगितली, तर तिने मला "अभी नही तो कभी नही" असा धीर दिला. मग गेले परत आत. आणि त्या मंद प्रकाशात, मैत्रिणींसोबत नाचताना खरंच खूप मजा आली. मग दरवर्षी डीजेला थांबणं नक्कीच झालं. तरी स्टेजवर नाचण्याचा कॉन्फिडन्स काही येत नव्हता. पण शेवटंचं वर्ष आलं, तेव्हा मात्र आपली इच्छा पूर्ण करायची ही शेवटची संधी आहे, हे समजलं.

मग माझ्यासारख्याच हौशी रुममेटला माझ्यासोबत नाचायला तयार केलं.पण कार्यक्रमात नाचायला आमची हौशी नृत्यकला काही कामाची नव्हती. मग खूप शोधाशोध करून बजेटमध्ये एक कोरिओग्राफर मिळाला.
प्रॅक्टिससाठी कॉलेजच्या एक वर्गात जागा मिळवली.
आम्ही जे गाणं ठरवलं होतं, ते त्याला माहीतच नव्हतं. आधी थोडावेळ ऐकून मग त्याने स्टेप्स शिकवायला सुरुवात केली. मग खरी मजा सुरू झाली. मोठया डान्स क्लासमध्ये आरसे असतात, पण आमच्या वर्गात नव्हते. हे त्याच्या लक्षात नाही आलं. तो आम्हाला मागे उभं करून आमच्याकडे पाठ करून शिकवायला लागला. त्याच्या एवढ्या भारी स्टेप्स , त्यात भरीस भर ते वन टू थ्री फोर च्या तालात बसवणं. तो वन टू थ्री फोर चा ताल आमच्यासारख्या मुक्त, हौशी कलाकारांना जमेना. दुसऱ्या दिवशी त्याच्याही लक्षात आलं ते. मग तो म्हणाला की तुम्ही फोक डान्स करा, ते जमेल तुम्हाला. (थोडक्यात त्याने आमची लायकी दाखवून दिली. Wink ) थोड्या खट्टू होऊन आम्ही मग 'कोंबडी पळाली' वर नाचायचं ठरवलं.

त्या दिवशी एका कडव्याचा डान्स बसला. आम्ही रुमवर जाऊन प्रॅक्टिस केली.पण काही स्टेप्स आम्हाला जमत नव्हत्या, आवडत नव्हत्या. शेवटी आमची दुसरी रुममेट मदतीला धावली. तिने एक वर्ष आधी या गाण्यावर डान्स केला होता. तिला आठवेल तसं तिने आम्हाला शिकवलं. मग दुसऱ्या दिवशी , खोटं कारण सांगून आणि निम्मे पैसे देऊन कोरिओग्राफरला निरोप दिला. शेवटी आम्ही तिघींनी मिळून डान्स बसवला.

शेवटी तो दिवस उगवला. आयुष्यात पहिल्यांदाच स्टेजवर नाचणार, याची उत्सुकता, हुरहूर ,टेन्शन सगळं आदल्या रात्रीपासून दाटून आलं होतं. रात्रभर झोप लागली नाही. Butterflies in stomach म्हणजे काय याचं प्रत्यंतर आलं. काही खायचीही इच्छा नव्हती. शेवटी सगळी तयारी आणि मेकअप करून, स्टेजवर जायला आम्ही सज्ज झालो. उभं राहिल्यावर कळलं की समोर फक्त अंधार आहे. कोणीच दिसत नाहीये. मग आम्ही बिनधास्त होऊन नाचलो. आणि टाळ्यांच्या आवाजात डान्स संपला. खूप भारी वाटत होतं तेव्हा मला. नंतर सगळ्यांनी खूप कौतुक पण केलं. पहिल्यांदाच स्टेजवर नाचलीस, असं बिलकुल वाटलं नाही असं बरेच जण म्हणाले. तो दिवस कायम लक्षात राहिलाय.

त्यानंतर आजपर्यंत पुन्हा तसा योग आला नाही. एकदा पूर्ण तयारी केली होती, पण ऐनवेळी माघार घ्यावी लागली. आता एकदा डान्स क्लासला जाऊन रीतसर नृत्यकला शिकायची इच्छा बाकी आहे.

अजून एक मोठी गोष्ट म्हणजे दुचाकी शिकणे. हे माझ्यासाठी खूपच अवघड होतं. कारण शाळेत असताना सायकल शिकायचा अर्धवट प्रयत्न केला होता. सायकल येत नसताना दुचाकीवर तोल सांभाळायला शिकणे, मला अशक्यप्राय गोष्ट वाटत होती. पण तरीही गाडी शिकायचं मनावर घ्यायचं कारण म्हणजे, लग्न ठरल्यावर नवऱ्याला जेव्हा कळलं , की मला सायकल पण चालवता येत नाही, तेव्हा त्याने चिडवलं होतं. म्हणून लग्नाआधी दुचाकी चालवायला शिकायचीच असं ठरवलं.

पप्पानी गाडी शिकवण्यापूर्वी ५ मिनिटे, स्टार्ट बटण, ऍक्सेलेटर, ब्रेक हे समजावून सांगितलं आणि गाडी हातात दिली. मी गाडी सुरु केली आणि झपकन स्पीड वाढवला. पण बॅलन्स सांभाळता येईना.ब्रेक लावायचं सुचलंच नाही. मग आता मी पडणार हे लक्षात आल्यावर क्षणार्धात मी गाडी सोडून दिली आणि रस्त्यावर उभी राहिले. ( ही झटपट आत्मसंरक्षण कला मी कशी आत्मसात केलीय, ते माझं मलाच ठाऊक नाही. पूर्वी सायकल शिकतानाही एकदा वापरली होती. ) गाडी थोडी पुढे जाऊन कडेच्या झाडाला धडकली आणि पुढचं चाक बाजूला असलेल्या गटारात गेलं. पप्पा आणि शेजारच्या ग्राउंडवर क्रिकेट खेळणारी मुले धावत आली. त्यांनी धारातीर्थी पडलेली गाडी उचलून उभी केली. गाडीचा एक आरसा तुटला होता. पप्पांनी परत एकदा ब्रेकचं महत्त्व समजावून सांगितलं. मग परत मी गाडी सुरु केली. आता मी सावध होते. त्यामुळे हळूहळू गाडी पुढे नेली. मध्येच पाय टेकत होते. समोरून कुणी येताना दिसलं की घाबरगुंडी उडायची. दोन-तीन राउंड मारले आणि घरी गेलो. (राउंड मारताना क्रिकेट ग्राउंडजवळ गेले की ती मुलं माझ्या सन्मानार्थ २ मिनिटं खेळ थांबवायची आणि मी वळून गेले की पुन्हा सुरुवात करायची. ) पुढे ४ दिवस मी गाडी चालवायला शिकत होते. स्पीडब्रेकरवर मात्र ब्रेकच लागायचा. तिथल्या कट्ट्यावर बसणारे ज्येष्ठ नागरिक सुद्धा मला मौल्यवान सूचना द्यायचे. रोज गेले तर नक्कीच शिकेन असं वाटतं असतानाच पावसाळा सुरु झाला आणि आमची शिकवणी बंद झाली ती झालीच.

पुढे लग्न झाल्यावर नवऱ्याने त्याची बाईक विकली आणि दोघांनाही चालवता येईल, म्हणून नवीन Pleasure गाडी घेतली. गाडी घेतली तेव्हा मी आजारी होते. त्यामुळे २-३ महिन्यांनी नवरोबाने गाडी शिकवायला सुरुवात केली. सुरुवातीला तो मागे बसला आणि मला सूचना द्यायला लागला. गाडी जरा हलायला लागली की तो घाबरून ( म्हणजे मी त्याला पाडेन, या भीतीने ) लगेच हॅन्डल पकडायचा. मग मला वाटायला लागलं की तोच गाडी चालवतोय. त्यामुळे, दुसऱ्या दिवशी एक राउंड झाल्यावर मी नवऱ्याला उतरायला सांगितलं. तो माझा आत्मविश्वास बघून घाबरलाच होता, पण लग्नाआधी जशी एकटीने गाडी चालवली तशी आतापण जमेल, असं मला वाटतं होतं.

गाडी सुरु करुन थोडी पुढे गेले आणि मी रस्ता सोडून तिरकी बाजूच्या गार्डनच्या दिशेने जायला लागले. नवरा मागून ओरडत होता, " थांब, थांब. ब्रेक ब्रेक." मला काय करु कळेचना , घाबरून ऍक्सेलेटर गच्च धरला गेला आणि स्पीड अजून वाढला. नेमके चप्पल नवीन होते आणि मी नेहमीप्रमाणे (आत्मसंरक्षण ) उडी मारताना पाय खाली अडकला. मग त्या गार्डनच्या फूटभर उंचीच्या दगडी कंपाऊंडवरुन एक पलटी मारुन मी आतल्या हिरवळीवर लँड झाले. गाडी बाहेरच सोडून दिली होती. नवरा धावत तिथे येईपर्यंत मी कपडे झटकत उभी राहिले. माझ्याकडे काळजीने बघून त्याने गाडी उभी केली आधी. एवढ्या धडपडीत एका पायाला मुका मार बसला होता. समोरून चालत येणारी एक बाईसुद्धा, (माझी कोलांटी उडी प्रत्यक्ष पाहिल्याने) जवळ येऊन सगळं ठीक आहे ना ते काळजीने बघून गेली.
एवढं होऊनही पुन्हा गाडी चालवायची माझी तयारी होती. पण नवरा चांगलाच घाबरला होता. तो मला सरळ घरी घेऊन गेला. ४-५ दिवस पाय चांगलाच सुजला होता. मग ७-८ महिने तरी त्याने मला गाडीला हात लावून दिला नाही.

मग पुन्हा त्याला मस्का मारून गाडी शिकवायला तयार केलं. यावेळी मात्र तो गाडीवरून उतरला नाही आणि माझी पण त्याला सांगायची हिंमत झाली नाही. पण त्याला सलग ३-४ दिवसांपेक्षा जास्त वेळ सरावासाठी काढता येईना. एकदा थांबलो की परत सुरु करायला ५-६ महिने जायचे. त्यामुळे दरवेळी मला शून्यातून सुरुवात करायला लागायची. मग परत मुलीची चाहूल लागून, तिचा जन्म, बाळलीला यात २ वर्षे निघून गेली. आता परत गाडीचा श्रीगणेशा करायची वेळ आली. पुन्हा तसेच रखडत- थांबत आम्ही गाडी घेऊन जायला लागलो. पण आता जरा बरी जमत होती गाडी.सरळ रेषेत चालवताना बॅलन्स आला होता बऱ्यापैकी. कधीतरी बीचवरही गाडी घेऊन जायचो. तेव्हा एकटीने गाडी चालवायचे. आता गाडीसोबतही मैत्री झाली होती. नीट चालवली तर माझी गाडी मला पाडणार नाही, हा विश्वास निर्माण झाला होता.

पण नवरोबाने अजूनतरी माझ्यावर विश्वास ठेवला नव्हता. अजून गाडी वळवता येत नव्हती. शिवाय गाडी चालवताना समोर रस्त्यावर लक्ष ठेवण्यातच वेळ जायचा. आजूबाजूला लक्ष गेलं की हॅन्डल आपोआप तिकडेच वळायचं. त्यामुळे आरशात बघून मागे लक्ष ठेवणे, हॉर्न वाजवणे, गाडी वळवताना हात दाखवून इशारा देणे , हे सगळं मला कधी जमणार, याचं मलाही टेन्शन यायचं. मी आता गाडी कधी शिकणार, असा सर्वांनाच प्रश्न पडायला लागला. शेजारच्या बायका तर, "तुझ्याआधी तुझी मुलगीच गाडी चालवायला शिकेल", असं भविष्य सांगायला लागल्या. आमच्या गावातून हायवेपर्यंत एक किलोमीटर अंतर असेल सुमारे. नवरा नसताना, ते अंतर चालून जायची माझी तयारी असायची. पण सासूबाई मात्र धावपळ करून मला लिफ्ट मिळवून द्यायच्या. मग ते लिफ्ट देणारे किंवा चालत जाण्याची वेळ आली तर रस्त्यात भेटणारे बरेच जण 'तुला गाडी नाही जमत?' म्हणून आश्चर्य व्यक्त करायचे. मग प्रत्येक वेळी उत्तर देताना मनातून खंत वाटायला लागली.

घरी विषय निघाला की, नवरा म्हणायचा, "आधी सायकल चालवायला शिक." ( एकूण त्यालाही माझ्यावर विश्वास राहिला नव्हता. ) त्यावर मी म्हणायचे की, "तुला नीट शिकवताच येत नाही. ओरडून माझा कॉन्फिडन्स घालवतोस. म्हणून मला जमत नाही." असे आरोप - प्रत्यारोप झाल्यानंतर, आम्ही अलिबागमध्ये, एकुलती एक दुचाकी शिकवणारी, म्हणून प्रसिद्ध असलेल्या बाईंचा नंबर मिळवला. पण तिची फी, रोज पेट्रोल भरणे हे आमच्या मध्यमवर्गीय मनाला महाग वाटल्याने परत एकदा नवरोबाने मला शिष्य करून घेतलं. पुन्हा एक वर्ष वेळ मिळेल तसं आम्ही गाडी चालवत होतो. पण माझी फार काही प्रगती नव्हती.

गाडी घेऊन ५ वर्षे होत आली होती. त्यात, आता मला कामानिमित्त रोज सुमारे १० किलोमीटरचा प्रवास करावा लागत होता. (दोन ठिकाणी गाडी बदलून, शिवाय आमच्या घरापासून फाट्यावर चालत) नवरा वेळ असेल तेव्हा सोडायचा. पण आता दुचाकी शिकणं गरजेचं झालं होतं. त्यात एकदा एका चुलत चुलत सासऱ्यांनी, " सायकल येत नाही, तर तुला गाडी जमणं शक्यच नाही", म्हणून डिवचलं होतं. आता तर मला सगळयांना गाडी चालवून दाखवायचीच होती.

मग त्या दुचाकी टीचरला फोन केला. आता तिची फी एक हजाराने वाढली होती. पण आता, ती नवऱ्याच्या वेळेची किंमत, असं म्हणून क्लासचा श्रीगणेशा केला. रोज एक तास, असं १३ दिवसांत पूर्णपणे गाडी शिकवणार, असं मॅडमनी सांगितलं. ५ वर्षांचा माझा रेकॉर्ड पाहता, १३ दिवसांत गाडी कशी शिकणार, असा प्रश्न नवरोबाला पडला होता. पहिल्या दिवशी तर मॅडमनी मला पुढे बसवून गाडीची ओळख करून दिली. अगदी चावी लावून गाडी सुरु करण्यापासून सगळं सांगितलं. आणि मुख्य रहदारीच्या रस्त्यावर गाडी घेतली. गाडी त्या चालवत होत्या, पण मला हॅन्डल धरायला सांगितलं होतं. मध्येच सांगितलेल्या गोष्टींची उजळणी करून घेतली. रस्ता मोकळा असेल तेव्हा स्पीड वाढवणे, लगेच कमी करणे अशी प्रात्यक्षिकं करून घेतली. हात पाय सैल ठेवण्यासाठी सतत सूचना चालू होत्या. हातांची पोझिशन योग्य ठेवण्यासाठी मदत करत होत्या. पहिला दिवस एवढंच झालं. नवऱ्याने हे ऐकून कपाळावर हात मारून घेतला. म्हणाला, "असं लहान मुलांसारखं पुढे बसवून गाडी कशी शिकवणार?"

दुसऱ्या दिवसापासून गाडी चालवताना इंडिकेटर देणे, हॉर्न वाजवणे (खाली न बघता ) याचा सराव चालू झाला. मुख्य रस्त्यावर गाडी चालवत असल्याने पुढच्या मागच्या गाड्यांचा अंदाज घेत गाडी कशी चालवायची, याचं तोंडी आणि प्रात्यक्षिक ज्ञान एकत्रच मिळत होतं. हळूहळू हातापायांचे स्नायू आखडणे कमी झालं. सातव्या दिवशी गाडी थांबवून सगळ्या पार्ट्सची तोंडओळख करून दिली. गाडी मेन स्टँडवर लावून किक मारायला पण शिकवलं.माझा आत्मविश्वास वाढला होता. आता मॅडम मध्येमध्ये हॅन्डल सोडून, मला गाडी चालवू द्यायच्या. नंतर २ दिवस बीचवर गाडी नेऊन, गाडी वळवणे, अरुंद रस्त्यावर गाडी वळवून घेणे शिकवलं. मग बीचवर मला एकटीला गाडी चालवायला दिली.

आता आमची गाडी चालवतानाही मी आधीपेक्षा छान चालवू शकते, हे नवरोबाने कबूल केलं. शेवटी शेवटी घाटरस्ता, बाजारपेठ इत्यादी ठिकाणी गाडी चालवली मॅडमसोबत. अखेर १३ दिवसांचा क्लास संपला; पण जे ५ वर्षांत नवऱ्याला जमलं नाही, ते मॅडमनी शक्य केलं. त्यांची ख्यातीच तशी होती. मला वाटतं, त्यांच्या बोलण्यातच एक जादू होती. त्यानंतर गाडी चालवताना मनात भीती नाही राहिली कधी. मी हे करुच शकते, असा आत्मविश्वास निर्माण झाला. आता फक्त स्पीडब्रेकरवर व्यवस्थित ब्रेक लावणे आणि तोल जाऊ न देणे, खड्ड्याच्या रस्त्यातून न डगमगता गाडी चालवणे याचा सराव करणं बाकी होतं.

तेव्हाच कोरोनाचा भारतात शिरकाव झाला. मग सार्वजनिक वाहतूक नको, घरात लहान मुलगी; असे विचार करून माझं काम बंद झालं. ३-४ महिने तर घाबरण्यातच गेले. पण तरीही मी सकाळी लवकर किंवा संध्याकाळी, घरापासून फाट्यापर्यंत गाडी चालवायचे सरावासाठी. (बाकी कुठे नाही, पण घराजवळच ३-४ वेळा पडले. ) स्वतःच्या चुका लक्षात घेऊन सुधारणा करत गेले. नवऱ्यानेही बऱ्याच टिप्स दिल्या. तरीही हायवेवर एकटीने गाडी घेऊन जायची नाही, हा नियम होता. नंतर परत नोकरी लागल्यावरही गाडी फाट्यापर्यंत नेऊन पुढे रिक्षाने जाणं , असाच क्रम होता.

पण कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर पुन्हा लॉकडाऊन झाल्यावर, एकदा हिंमत करून गाडी घेऊन गेले. कारण अचानक बोलवलं होतं आणि नवरा घरी नव्हता. येईपर्यंत रात्र झाली होती. पण एक कलीग आमच्या पुढच्या गावात राहणारी होती, तिने सांगितलं," तुम्ही चला सावकाश माझ्यासोबत.अशी डेअरिंग कराल, तेव्हाच जमेल तुम्हाला." मग तिच्या गाडीमागे माझी गाडी, असे आम्ही फाट्यापर्यंत आलो. आणि मग तिथून तिचा निरोप घेऊन मी घरी आले. नंतर, रोजच गाडी न्यायला लागले. अर्थातच, तेव्हा रहदारी कमी असायची आणि फार लांब जायची गरज नव्हती.

पण आता जून महिन्यापासून, मुख्य शहरात जायची वेळ आली. आणि रस्त्यावरची रहदारीही आधीसारखीच वाढली होती. नवऱ्याने असंख्य सूचना देऊन मला जायची परवानगी दिली. ( कारण आधी २-३ वेळा त्याला मागे बसवून गर्दीत गाडी चालवली होती, तेव्हा त्याला अटॅक येण्यासारखे प्रसंग घडले होते. ) माझ्याही मनात धाकधूक होतीच. पण गाडी व्यवस्थित चालवली. एकटीने चालवताना जास्त बरं वाटत होतं.तेव्हा मॅडमनी सांगितलेलं आठवलं आणि पटलं,"गाडीवर दुसऱ्या माणसाला बसवलं की त्याच्या सूचनांप्रमाणे गाडी चालवताना गोंधळ उडतो."

आता रोज गाडी चालवून बरंचसं परफेक्शन आलंय. फक्त अजून कुणाला डबलसीट घ्यायची हिंमत नाही केली. त्यामुळे सासूबाई वेटिंगवर आहेत. अर्थात त्यांनाही भीतीच वाटत असेल. फक्त मुलीला पुढे उभी करून आमच्या शेतावर घेऊन जाते. पण गाडी शिकल्यामुळे खूपच स्वतंत्र झाल्यासारखं वाटतं. त्यात मध्येच, नवऱ्याला कोरोनामुळे वेगळं रहावं लागलं. तेव्हा त्याला डबे पोचवणे, घरातील सामान आणणे इत्यादी कामांना काहीच अडचण आली नाही. तेव्हा खरंच ' बरं झालं, गाडी येतेय,'असं वाटलं. अजूनही लायसन्स मिळवायचं काम बाकी आहे.

तर हा असा भलामोठा लांबलेला बकेट लिस्टचा प्रवास अखेरीस संपवते. याशिवाय, स्वकमाईतून दरमहा सासूबाईंना ( फक्त त्यांना स्वतःला हवी तशी खर्च करण्यासाठी, घरखर्च नाही) ठराविक रक्कम देणे, आयुष्यात एकदातरी मद्यपान करून बघणे, ह्या इच्छाही पूर्ण झाल्यात. पण ते किस्से लिहून आता अजून लांबण लावत नाही.
अजून बकेट लिस्टमधल्या बऱ्याच गोष्टी बाकी आहेत, त्याही होतीलच पूर्ण, अशी खात्री आहे.

ता. क. - एक मोठ्ठा लेख लिहून माबोकरांना पीडण्याची इच्छा पण आत्ताच पूर्ण झालीय.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिलेय. स्टेजवरच्या डान्सची बकेट लिस्ट अगदी अगदी झाले.
ता.क. - आता थांबू नका. अजून लिहा अजून पिडा

मस्त खुसखुशीत झालाय बकेट लिस्टचा प्रवास.

राउंड मारताना क्रिकेट ग्राउंडजवळ गेले की ती मुलं माझ्या सन्मानार्थ २ मिनिटं खेळ थांबवायची >>>> Biggrin

मस्त मस्त माऊमैया!!!
मजा आली तुमचे अनुभव वाचताना.
माझी सायकल शिकायची इच्छा कधी पूर्ण होईल कुणास ठाऊक....

मस्त लिहिलेय. मी दुचाकी व चारचाकी शिकत असतानाच्या आठवणी जाग्या झाल्या. नाचायला शिकणे ही एक इच्छा माझ्याही बकेटीच्या तळाशी कुठेतरी पडून आहे हे तुमची इच्छा वाचल्यावर आठवले. Happy

दुचाकी मी घरच्याघरीच शिकले. पस्तिशी ओलांडल्यावर मला सायकल घ्यायची बुद्धी झाली. ती घेतल्यावर बिचारा नवरा सायकलची सिट धरुन मागे धावतोय आणि मी भयंकर घाबरलेल्या चेह-याने सायकल दामटतेय हे दृश्य अख्ख्या कॉलनीने काही दिवस पाहिल्यावर मला सायकल चालवता यायला लागली. मग ती दोन चार वर्षे ताबडल्यावर कायनेटिक होंडा घेतली. ती यायला मात्र फारसा वेळ लागला नाही कारण सायकल्ची सवय होती. (हे सायकल, पोहणे वगैरेचे एक असते. तुम्हाला सायकलवर अजिबात तोल सावरता येत नाही, पाण्यात उतरल्यावर तुम्ही धावपळ करत परत पुलाच्या कडेला येता.. पण अचानक नकळत एक क्षण येतो की तोल आपोआप सावरला जातो, पाण्यावर आपोआप तरंगायला लागता. आणि त्या क्क्षणानंतर मुद्दाम प्रयत्न केला तरी तोल ढळत नाही की तुम्ही बुडत नाहीत.)

चारचाकी मात्र नीट मारुती ट्रेनिंगमधुन शिकले. तरीही घाबरायचे. आंबोलीला जाताना मी पहिल्यांदा सातारा ते कोल्हापुर गाडी चालवलेली. चालवायला घेतल्यावर आधी गाणी बिणी सगळे बंद केले, मला खुप त्रास व्हायचा गाडीतल्या रेडिओ, सिडि व एसीचा. गाडीतले इतर पसेंजर्स मला जोरात हसत होते आणि त्यांच्यावर भयंकर संतापुन आणि त्याचवेळी मनातुन घाबरत मी गाडी चालवत होते हे आजही आठवतेय. चालवताना मी इतकी स्टिफ व्हायचे की जराशी मान वळवुन शेजारी बघणेही जमायचे नाही.

मस्त लिहिलंय
मजेशीर.
नवऱ्याकडून(स्वतःच्या) कधी ही गाडी शिकू नये हा माझा सिद्धांत परत एकदा पक्का झाला Happy

वा! वा! तुझ्या अनुभवाने मला बुस्टर डोस मिळाला दुचाकी चालवायचा.

मी पण क्रिकेट थांबवून प्रेक्षक मिळवलेत, ब्रेक ऐवजी ॲक्सलरेटर दाबून नवरा आणि भावाला एकेकदा पाडलय, एका आजोबांची स्ट्रेस टेस्ट रस्त्यावर पार पाडलेय Lol पण एव्हढ करुन मग प्रयत्न सोडून दिलेत. (तो एक वेगळाच किस्सा आहे. अगदी प्रामाणिकपणे टेस्ट देऊन लायसन्स स्कार्फात पाडूनही गाडी पुन्हा हातात धरली नाही आणि आता तर लायसन्सची वाफ होऊन त्याचे ढग झाले तस्मात आता लायसन्स माझ्याकडे खरोखरच नाहीये.) पण आता परत कागदपत्रे जोडून ॲप्लिकेशन करुन किंवा नव्याने लर्निंग लायसन्स सकट प्रोसेस करुन यावेळी रस्त्यावर गाडी चालवण्यासाठी शिकायची आहे)

नवऱ्याकडून(स्वतःच्या) कधी ही गाडी शिकू नये हा माझा सिद्धांत परत एकदा पक्का झाला Happy>> अगदी Proud

आमच्या इथे अधूनमधून समोरच्या रस्त्यावर एक दोन बाया बाप्यांकडून शिकताना दिसतात. इतके प्रेमाने शिकवत असतात ते आणि अजिबात फुल्या फुल्या उधळत नाहीत. अगदी गर्लफ्रेंडला शिकवाव तस शिकवतात हे बघून मला त्या बायांचा आधी हेवा वाटला त्यानंतर हे विबास प्रकरण असाव अशी मीच माझी समजूत घालून घेतली.

नक्कीच विबासं किंवा एक बहुत अच्छा बी एफ एफ Happy
लग्नाचे नवरे किंवा जुने झालेले बॉयफ्रेंड इतक्या प्रेमाने गाडी शिकवणं शक्यच नाही.

आमच्या इथे अधूनमधून समोरच्या रस्त्यावर एक दोन बाया बाप्यांकडून शिकताना दिसतात. इतके प्रेमाने शिकवत असतात ते आणि अजिबात फुल्या फुल्या उधळत नाहीत. अगदी गर्लफ्रेंडला शिकवाव तस शिकवतात हे बघून मला त्या बायांचा आधी हेवा वाटला त्यानंतर हे विबास प्रकरण असाव अशी मीच माझी समजूत घालून घेतली.>>> खूप हसले..

मस्त खुसखुशीत झालंय. आवडलं.

मस्त लिहिलंय! गाडीचं लायसन्स घेऊन टाक लवकर.

मी सायकल शिकत होते. बहीण शिकवायची. ती मागे थांबली होती आणि मी तोल सावरत बऱ्यापैकी लांब गेले होते. तेवढ्यात समोरून एसटी आली. रस्ता अरुंद. मी जे हँडल वळवलं, ते थेट रस्त्याच्या कडेच्या शेतातच जाऊन पडले. बहीण घाबरून धावत धावत आली. एसटीच्या ड्रायव्हरने क्षणभर थांबून जास्त काही झालं नाही ना, एवढं बघितलं आणि पुढे गेला!

नवऱ्याकडून(स्वतःच्या) कधी ही गाडी शिकू नये हा माझा सिद्धांत परत एकदा पक्का झाला+१११११
खुसखुशीत लिहिलंय.

मी कधीच गाडी चालवताना नवऱ्याला मागे बसवत नाही.
असंख्य सूचना देतो, डोकं खराब होतं मग आणि गाडी आडवी टाक उभी टाक वगैरे भाषा decode होत नाही लवकर.

मला masters साठी clg ला जायला दुचाकीच लागणार होती, transport उपलब्ध नव्हता व्यवस्थित. बाबांनी second hand ऍक्टिवा घेऊन दिली. १००₹ चे पेट्रोल टाकले(२०१३ ची गोष्ट )आणि म्हणे आळंदीत सगळीकडे चालवत ने, पेट्रोल संपव.
मी आधी थोडीफार चालवली होती मावसभावाची गाडी, शिकण्यापूरती फक्त, रस्त्यावर नाही.
बहिणीने अमूल्य सूचना दिली, ताई गाडी पडली तरी चालेल पण तुला लागलं नाही पाहिजे.
मग त्या दिवशी गावभर गाडी चालवत फिरले एकटीच.
सायकल रहदारीतून चालवण्याचा अनुभव होता त्यामुळं आत्मविश्वास भरपूर होता. कुठेच पडले नाही.
पण २०ते०३०च्या speed ने आणि यू turn वर उतरून वळवत होते तसेच रस्ता cross पण करता येत नव्हता.
तरीही ह्याच स्किल वर clg ला जाणं सुरु केलं दुसऱ्या दिवशीपासून.
मग एक एक स्किल मैत्रिणीला विचारुन शिकत गेले.
मजा यायची तेव्हा
(ती Activa अजून शाबूत आहे )

भारी खुमासदार लिहिलंय की..
मला चार चाकी शिकायची आहे..पण या वयात जमेल आणि मला सहन करेल असा ट्रेनर मिळेल असं वाटतं नाही...मी प्रचंड घाबरते चार चाकी ला...का कुणास ठाऊक पण आत बसून डाव्या उजव्या बाजूला कुणी धडक दिलेली मला कळणार पण नाही असा feel येतो नेहमी...

प्रतिसादासाठी धन्यवाद सर्वांना....
ब्रेक ऐवजी ॲक्सलरेटर दाबून नवरा आणि भावाला एकेकदा पाडलय, एका आजोबांची स्ट्रेस टेस्ट रस्त्यावर पार पाडलेय >>>> Rofl
आमच्या इथे अधूनमधून समोरच्या रस्त्यावर एक दोन बाया बाप्यांकडून शिकताना दिसतात. इतके प्रेमाने शिकवत असतात ते आणि अजिबात फुल्या फुल्या उधळत नाहीत. अगदी गर्लफ्रेंडला शिकवाव तस शिकवतात हे बघून मला त्या बायांचा आधी हेवा वाटला त्यानंतर हे विबास प्रकरण असाव अशी मीच माझी समजूत घालून घेतली. >>>>> Lol

खूपच मस्त लिहीले आहे. खुसखुशीत आहे.
>>>>>>>>>>राउंड मारताना क्रिकेट ग्राउंडजवळ गेले की ती मुलं माझ्या सन्मानार्थ २ मिनिटं खेळ थांबवायची आणि मी वळून गेले की पुन्हा सुरुवात करायची.
Proud Proud Proud

There is no doubt, you have perseverance and confidence… Keep it up !
>>>अजून बकेट लिस्टमधल्या बऱ्याच गोष्टी बाकी आहेत, त्याही होतीलच पूर्ण... >>> हा लेख वाचल्यावर तर याविषयीं अजिबात शंका नाही. Happy
 Good Luck !

मस्त आहे तुमची बकेटलिस्ट. नाचणे थांबवू नका. आता मुलीबरोबर नाचता येईलच. गाडी चालवणे नाहीच थांबवणार तुम्ही. Happy
बाकी बकेटलिस्ट पूर्ततेसाठी शुभेच्छा.