माझ्या आठवणीतील मायबोली -- मनीमोहोर

Submitted by मनीमोहोर on 17 September, 2021 - 05:32

आज तुमचा विश्वास नाही बसणार पण साधारण वीसेक वर्षांपूर्वी ऑफिस मध्ये नेट वापरण्यासाठी आम्हाला ट्रेनिंग मिळायचं , नेट वापरासाठी प्रोत्साहन दिलं जायच. मग हळूहळू नेटची दुर्मिळता संपली , घरोघरी पीसी आले . जणू काही सगळं जगच एक क्लिकवर आपल्या हातात आलंय असं वाटू लागलं. सर्फ करून निरनिराळी माहिती मिळवणे अगदी सहज शक्य झालं.

एक दिवस असच काही तरी रेसिपी शोधताना अचानकच मायबोली हे रत्न ह्या आंतरजालाच्या महासागरातून माझ्या हाती आलं. सुरवातीच्या काळात वाचनाचा धडाकाच लावला मी. नंदिनी, बेफिकीर ह्यांच्या कथा, चिमण ह्यांच्या विनोदी कथा,जागु च्या रेसिपी, जिप्सीचे फोटो, गावानुसार रंगणारे गप्पांचे फड, निसर्गाच्या गप्पा , इथल्या शॉर्टफोर्म्सचा धागा, (विशेषतः "हेमशेपो " लिहून सुमडीत काडी टाकून निघून जाई कोणीतरी ) आयडी मागील कथा, तसेच लग्नाला यायचं हं, घरात शिरलेल्या उंदराला बाहेर कसे काढावे, मला ऐकू आलेली चुकीची गाणी ह्या सारखे विनोदी धागे, प्रवासवर्णन, काही म्हणता काssही सोडलं नाही. हळू हळू मायबोलीच्या प्रेमातच पडले मी. कधीतरी ट्रोलिंग ही मिळायचं वाचायला पण मी रोमात असल्याने "पर दुःख शीतल" अशी भावना होती.

खूप वर्ष रोमात होते. मग कधीतरी जागूच्या कोणत्यातरी माश्याच्या रेसिपीवर प्रतिसाद देण्यासाठी अंडं ही न खणाऱ्या मी सभासदत्व घेतलं. सुरवातीला छान , सुंदर ह्या पलीकडे माझी मजल जात नसे. इंग्लिश टाईप केलं की मराठी उमटत आणि आपण लिहिलेलं साता समुद्रापलीकडची मंडळी ही वाचू शकतात ह्याचंच अप्रूप वाटे तेव्हा. हळू हळू प्रतिसाद देणं वाढू लागलं, पूर्वी पिकासा वरून फोटो अपलोड करावे लागत . महत्प्रयासाने ते तंत्र शिकून एखाद दुसरा फोटो अपलोड करू लागले . एक दिवस थोडा धीर चेपला आणि आमच्या कोकणातल्या घराचे, परिसराचे फोटो दोन दोन वाक्यांच्या टिप्पणीसह अपलोड करून खेड्यामधले घर कौलारू नावाचा धागा उघडला . त्याला खूप छान प्रतिसाद मिळाला . आता मायबोली बघितली नाही असा एक दिवस ही जात नाही. कधी टेक्निकल कारणासाठी मायबोली उघडत नसेल तर चुकल्या चुकल्या सारखं होतं अगदी.

शाळेत असताना निबंध हा फार कठीण विषय वाटत असे मला. पुढे शिक्षणासाठी शहरात हॉस्टेल वर राहायला लागल्यावर घरी खुशालीच पोस्ट कार्ड (तेव्हा पोस्ट कार्ड होती अस्तित्वात ) ही भरणं अवघड होतं माझ्यासाठी. '" बाकी सर्व ठीक मी मजेत आहे" हे कमीत कमी चार वेळा तरी लिहिलं जाई त्या कार्डात. मी इथे आल्यावर इतरांचं बघून लिहायला शिकले. आतापर्यंत मी जे पांढऱ्यावर काळं केलं आहे ते फक्त आणि फक्त मायबोलीमुळे. ही फुकट मिळालेली जागा नसती तर मी लिहिणं अशक्य होतं. Bw

इथले सुंदर सुंदर फोटो बघून आपण ही फोटो काढावेत, इथे दाखवावेतअसं खूप वाटे मला. पण माझं त्या बाबतीतल ज्ञान अगाध होतं. मुलगा आम्ही कुठे ट्रिप ला जायच्या आधी पाच मिनिटं कॅमेरा हातात द्यायचा आणि सांगायचा "आई हे बटण दाब आणि फोटो काढ". प्रत्यक्षात कॅमेऱ्याची सतराशे साठ बटन हाताळताना पोपट व्हायचा . एक फोटो धड यायचा नाही. मग केवळ इथे फोटो दाखवता यावेत म्हणून कॅमेऱ्याच तंत्र शिकले आणि पिकासा वरून फोटो अपलोड ही करायला शिकले. ह्या गोष्टी माझ्यासाठी फार मोठं learning होत्या, पण मजा येत होती झगडताना. असो. एका माबोकरांना माझा एक फोटो इतका आवडला की तो त्यानी त्यांच्या डेस्क टॉप वर ठेवला हे मोठंच सर्टिफिकेट होत माझ्यासाठी. तसेच मी काढलेला एक फोटो maayboli.cc ने ही निवडला होता तेव्हा ही फार भारी वाटलं होतं.

काही वर्षांपूर्वी लोकसत्तेत ‘ घर कौलारू ‘ नावाचं गावाकडच्या घराचं वर्णन करणारं एक सदर दर शनिवारी प्रसिद्ध होत असे. आपण पण आपल्या घरावर त्यात लिहावं अस मला फार वाटे. पण हे जमायचं कसं ? पेपरमध्ये लिहायचं तर त्याना लिखाण आवडायला हवं, तर ते प्रसिद्ध करणार. म्हणून आमच्या घरावर काही लिहायची आणि ते लोकांपर्यंत पोचवण्याची माझी अंतरीची उर्मी मनातल्या मनातच राहत होती.

कोकण , तिथलं आमचं घर, परिसर, खाद्य संस्कृती इत्यादी गोष्टी चार लोकांपर्यंत पोचवण्याची माझी इच्छा ही मायबोलीनेच पूर्ण केली. इथली मला आवडलेली सर्वात छान गोष्ट म्हणजे इथे संपादन नाही . सगळं जवळ जवळ सभासदांवरच सोडून दिलं आहे. अगदीच अति झालं तर संपादकीय हस्तक्षेप होतो. म्हणून ज्याला जे हवं ते तो प्रकाशित करू शकतो . आवडलं तर तसं सांगतील सभासद नाहीतर इग्नोरास्त्र मारतील. नाहीतर त्याला कुठून लिहिलं अस करतील. मी माझा लोणच्यावरचा लेख लिहिला तेव्हा save बटण प्रेस करताना माझ्या छातीत प्रचंड धडधडत होतं कारण मी वाचन मोड मध्ये असताना इथलं ट्रोलिंग ही बघितलं होतं मी. जास्त वाद घालायचा नाही हे मनाशी ठरवून हिम्मत एकवटुन प्रेस केलं save बटण. माबोकरांच्या कृपेने तसं काही झालं नाही. तो लेख आवडला सगळ्यांना. मग मी वाचक गांजले जातील एवढं लिहिलं कोकणातल्या आमच्या घरावर. ह्या लेखांचं पुस्तक काढून ते आमच्या कोकणातल्या घराच्या पुस्तकांच्या कपाटात ( ज्याला आम्ही लायब्ररी म्हणतो कारण काही वर्षपूर्वी मुलांनी सगळ्या पुस्तकांची एका वहीत नोंद केली होती . पुस्तक वाचायला घेताना आणि ठेवताना ही नोंद करत असत मुलं म्हणून ही लायब्ररी ) विराजमान करण्याचं माझं स्वप्न लवकरच सत्यात येण्याच्या मार्गावर आहे. त्याच सगळं श्रेय मायबोलीला आहे. त्यासाठी मी कायम मायबोलीच्या ऋणात आनंदाने राहीन.

मी स्वभावाने तशी फार मोकळी नाहीये, चटकन कोणावर माझा विश्वास बसत नाही. एखाद्याशी मैत्री व्हायला मला थोडा वेळ लागतो पण माबो ची काय जादू आहे माहीत नाही इथे मी एकदम रिलॅक्स असते. माबो मुळे मला अनेक चांगले मित्र मिळाले आहेत ज्यांच्या बद्दल मला विश्वास वाटतो . आधार वाटतो. गेल्या वर्षीच्या कडक लॉक डाउन च्या काळात ह्या पैकीच एका मित्रांनी स्वतः मला भाजी घरपोच आणून दिली तेव्हा मी फारच भावनावश झाले होते

जगभर पसरलेल्या इथल्या , आपापल्या क्षेत्रात कुशल असणाऱ्या सभासदांच्या पोस्ट्स माझ्या माहितीत कायम भर टाकत आल्या आहेत. इथल्या तरुण मंडळींमुळे मला ही उत्साहित राहायला मदत होते. सोशल मीडियावर वावरताना विचार पटले नाहीत तरी मी वाद घालणार नाही हे मी स्वतःच स्वतःला घालून घेतलेले बंधन आहे कारण कधी ही न बघितलेल्या कोणामुळे मी माझी मन: शांती घालवावी अस मला वाटत नाही. असो.

फार गाजलं असं कोणतं लिखाण मी सांगू शकत नाही . उलट माझ्या अतिरेकी कोकण प्रेमामुळे आणि कळशी , खुर्ची, दागिने, फुलं ह्यासारख्या विषयावर ही लेख पाडल्यामुळे माबोकर पकले गेले असण्याची दाट शक्यता आहे. पण त्याला माझा इलाज नाही. स्क्रोल डाउन करणे हाच एक उपाय आहे. Biggrin Biggrin Biggrin

"सहजची जीवनाचा अविभाज्य भाग झाली " ह्या शीर्षक गीताच्या ओळींची प्रचिती मायबोलीवर आलं की नेहमीच येते. हे गीत माझं आवडत ही आहे आणि माझा अभिमान ही आहे. पण हल्ली ते ऐकताना अडचणी येतायत .डाउन लोडनीट होत नाहीये. त्या अडचणी दूर करून ते सहज उपलब्ध करून देता येईल का ? तसेच फोटो अपलोड करणं ही बाब ही फारच क्लिष्ट आहे ह्यात काही सुधारणा होऊ शकेल का ?

गेल्या पंचवीस तर सोडाच पण मी सभासद झाल्यापासूनच्या सात आठ वर्षातच मायबोली बदलतेय असं मला वाटत. ते स्वाभाविकच आहे. बदल होत राहणारच. जुनी लेखक मंडळी इकडे हल्ली फिरकत ही नाहीत. गप्पांची पानं wa मुळे ओस पडली आहेत. संयुक्ता बंद झाल्यापासून कायम active असणारा स्त्री सभासदांचा मोठा गृप इथे येत नाही असं माझं निरीक्षण आहे. एकंदरच मराठी वाचन लिखाण कमी झाल्याने ( दृक श्राव्य माध्यमं वाढली आहेत ) नवीन सभासदांना कदाचित माबो तेवढी आकर्षक वाटत नसेल. परंतु अशी अनेक आव्हानं पेलत आज पंचवीस वर्षे मायबोली पाय घट्ट रोवून उभी आहे ह्याचा मला सार्थ अभिमान आहे. मायबोलीने आपला सुवर्ण महोत्सव ही असाच दिमाखात साजरा करावा ही सदिच्छा कायम मनात राहिल. त्या समारंभात ही मला असंच सहभागी होता यावं हे बकेट लिस्ट मध्ये घालून ठेवत आहे. Happy

लेख विस्कळीत झाला आहे ह्याची कल्पना आहे आणि माबो पेक्षा मीच अधिक दिसतेय हे ही जाणवतंय .असो. माबो बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी ह्या उपक्रमाने दिली म्हणून संयोजकांना हार्दिक धन्यवाद आणि मायबोलीला पुन्हा एकदा अनेक शुभेच्छा .

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अंतःकरणापासून लिहिले आहे हे जाणवते आहे.
लिखाण आवडले हे वे. सां. न.
पहिल्या प्रतिसादाबद्दल तुझ्याकडून कौतुक करून घ्यायला मिळणार म्हणून मी खूष आहे.

थॅंक्यु हार्पेन पहिल्या प्रतिसादाबद्दल. ते खेड्यामधले घर कौलारू हे निळ्या रंगात ( लिंक ) आणण्यासाठी धडपडतेय ,तेवढ्यात आला प्रतिसाद .
थॅंक्यु आणि मृ

मस्त!
तुमचे कोकणातल्या घरावरचे आणि सगळेच लेख खूप छान, साधे, घरगुती असतात. त्यांचं पुस्तक निघतंय हे किती छान!

खरंच खूप मस्त वाटतंय या विषयावरचे सगळ्यांचे लेख वाचायला!

मनीमोहोर , मनोगत आवडले . अगदी मनापासून लिहिले आहे . तुमच्या कोकणातील लेखांचे पुस्तक येणार आहे हे वाचून आनंद वाटला . उपलब्ध झाले की जरूर कळवा . माझ्या घरच्या लायब्ररी मधली एक जागा नक्की असेल त्यासाठी.

मनोगत आवडले.

कधी टेक्निकल कारणासाठी मायबोली उघडत नसेल तर चुकल्या चुकल्या सारखं होतं अगदी.>>>+१.

मनीमोहोर... आवडलं मनोगत...तुमचे कोकणातले लेख पण खूप आवडतात....अप्रूप पण वाटतं ..मोदक रेसिपी हिट आहे तुमची..तरल आणि साधं सोप लिहिता तुम्ही.
जुने लेखक हल्ली लिहीत नाहीत हे मात्र फार जाणवत.....त्यांनी पुन्हा लिहीत व्हावं...

मनीमोहोर, खूप छान लिहिले मनोगत.. तुमचे साधे सोपे सुंदर लेख, रेसिपी फार आवडतात.. तुमचे कोकणातल्या घरावरचे लेख, वाचुन तर एक्दातरी तिथे जाऊन रहावं अस फार वाटतं..

ममो, छान लिहीलंस! तुझ्यासमोर बसून मनोगत ऐकतोय असं वाटलं...
खूपच रिलेट झालं .... बरचशी तुझ्या सारखीच लिखाणाची सुरुवात झाली अन् खास करुन फोटो टाकायची धडपड ...
अजून ती निळी लिंक द्यायला शिकायचंय ...
माझ्या बकेट लिस्टीत तुझं कोकणातलं घर आहे बर का ...

किती छान लिहीलय, काही काही ठिकाणी अगदी अगदी झालं. मी तुझी मोदकाच्या उकडीची रेसीपी आमच्या नातेवाईक, मैत्रिणींमध्ये ,बहिणींमध्ये फेमस केली आहे. गव्हल्यांचा लेख पण. बऱ्याच जणांना लिंक पाठवली. तुझे मोदक अभिमानाने मिरवले मी "माझ्या मायबोलीवरच्या मैत्रिणीचे मोदक" म्हणून. Happy

हेमाताई खुप सुंदर लेख.

आपले ऋणानुबंध मायबोलीमुळे जोडले गेले. तुमचे लिखाण तुमच्या कोकणातील गावासारखेच हिरवेगार, विशेष असते.

छान लिहिलं आहे.
>>उलट माझ्या अतिरेकी कोकण प्रेमामुळे आणि कळशी , खुर्ची, दागिने, फुलं ह्यासारख्या विषयावर ही लेख पाडल्यामुळे माबोकर पकले गेले असण्याची दाट शक्यता आहे. >> Lol नका हो असं (मनातलं) लिहू. Wink तुमचा आरामखुर्ची लेख बघुन आता मनीमोहर कोकणच्या माजघराला असलेला उतार यावर पुढचा लेख लिहितील यावर पैजा लावणार होतो. Proud
विनोद बाजुला राहुदे. तुमचं मनापासून लिहिणं आवडतं. तुम्ही लिहित रहा. खोड्या काढायचा स्वभाव असला तरी प्रामाणिकपणे लिहिलेलं दिसलं की खोड्या काढवत नाहीत. Happy शुभेच्छा.

सगळ्यांना खूप खुप धन्यवाद.
अखेर लेखाची लिंक निळ्या अक्षरात देण्याचं जमलं मला. वेळ लागला , झगडावं लागलं पण मी नादिष्ट असल्याने प्रयत्न सोडले नाहीत. मध्यंतरी वाड्यावर कोणीतरी लिहिलं होतं त्याबद्दल ते save करून ठेवलं होतं, ते follow करून जमवलं. थॅंक्यु ... नाव नक्की आठवत नाहीये आता , अमितव नेच लिहिलं होतं का ?
अमितव लयच भारी हो ...अहो तुम्ही तोंड देखल तरी पुढे नाही हो म्हटलंय , आमच्याकडे माझी सकखी भावंड ह्याच्या ही पुढे जातात. हेमाचा पुढचा लेख नाडण ची धुण् वाळत घालायची काठी किंवा खळ्यातल्या फरश्या किंवा आमचा हात फोडणीचा भात किंवा ताकभात यावर येईल वैगेरे चालतं Lol Lol Lol ...अर्थात मी हटत नाही तो भाग निराळा Lol Lol Lol

>>>>>>>>>हेमाचा पुढचा लेख नाडण ची धुण् वाळत घालायची काठी किंवा खळ्यातल्या फरश्या किंवा आमचा हात फोडणीचा भात किंवा ताकभात यावर येईल वैगेरे चालतं Lol Lol Lol ...अर्थात मी हटत नाही तो भाग निराळा Lol Lol Lol

Happy ज्जे बात!!! छान लिहीता हो. अज्जाबात हटायचं नाय म्हंजे नाय.

हेमाचा पुढचा लेख नाडण ची धुण् वाळत घालायची काठी >> Lol हे भारी आहे! तुमच्या लेखातून कोकणातल्या साध्या साध्या गोष्टी, चाली रिती कळतात ज्या आमच्यासारख्या नॉन कोकणी , शहरी लोकंना माहित नसतात.
मोदकाच्या उकडीची रेसिपी साठी मी फार फार ऋणी आहे तुमची Happy फार फेलसेफ रेसिपी आहे ती. खूप लोकांना त्या रेसिपीची लिन्क दिलेली आहे.

मनीमोहोर, तुझं लिखाण खूप प्रामाणिक असतं. तुझ्या कोकणप्रेमात आम्ही देखिल भरपूर डुंबलो आहोत. छान लिहिलायस हा देखिल लेख.

हेमाचा पुढचा लेख नाडण ची धुण् वाळत घालायची काठी किंवा खळ्यातल्या फरश्या किंवा आमचा हात फोडणीचा भात किंवा ताकभात यावर येईल वैगेरे चालतं Lol Lol Lol ...अर्थात मी हटत नाही तो भाग निराळा Lol Lol Lol>>>>> Lol ममो, भारीच. आमची एक ट्रेन फ्रेंड होती, ती रेसिपीज अशा काही मस्त प्रकाराने सांगायची की ऐकणाऱ्या च्या तोंडाला पाणी सुटेल. तिला ग्रुप मधल्या टवाळ मैत्रिणी कधी कधी पिडायच्या " इतना क्या क्या बात रही है, और बन क्या रहा है साधा कर्ड राईस ना " Lol

छान लिहिलंय. तुमचे इतर लेखही आवडतात.

मी स्वभावाने तशी फार मोकळी नाहीये, चटकन कोणावर माझा विश्वास बसत नाही. एखाद्याशी मैत्री व्हायला मला थोडा वेळ लागतो>> +1
मला तर फार वेळ लागतो. कदाचित पूर्वीचे कटू अनुभव विसरले जात नसावेत. पण एखाद्या व्यक्तीशी स्वभाव, विचार जमले तर कायमची मैत्री होते हे ही तितकंच खरं.

फारच गोड झालाय हा लेख... एकदम आवडेश !
>>>हेमाचा पुढचा लेख नाडण ची धुण् वाळत घालायची काठी किंवा खळ्यातल्या फरश्या किंवा आमचा हात फोडणीचा भात किंवा ताकभात यावर येईल वैगेरे चालतं...>>> Lol
>>>अशी अनेक आव्हानं पेलत आज पंचवीस वर्षे मायबोली पाय घट्ट रोवून उभी आहे ह्याचा मला सार्थ अभिमान आहे. मायबोलीने आपला सुवर्ण महोत्सव ही असाच दिमाखात साजरा करावा ही सदिच्छा कायम मनात राहिल. त्या समारंभात ही मला असंच सहभागी होता यावं हे बकेट लिस्ट मध्ये घालून ठेवत आहे.>>> हे खूपच आवडलं... आमेन ! Happy

क्या बात!
नेट शिकणे ते मूकवाचक ते पहिला लेख पोस्ट करणे हिंमतीचे काम वाटणे ते कोकणाच्या मातीचा वास आणि स्पर्श असणारे ईतके सुंदर लेख आणि आता त्या लेखांचे पुस्तक... हा प्रवास असाच पुढे चालत राहो.
गावाला जाणे होत नसले तरी मनातले कोकणप्रेम काही कमी होत नाही माझ्या. त्यामुळे आपले सारे लेख आवर्जून वाचतो Happy

पुन्हा एकदा धन्यवाद सगळ्यांना.

पुस्तकासाठी दिलेल्या शुभेच्छा वाचून खूप छान वाटलं
उपलब्ध झाले की जरूर कळवा . माझ्या घरच्या लायब्ररी मधली एक जागा नक्की असेल त्यासाठी. >> नक्की अश्विनी ११ मी ही उत्सुक आहे खूप ह्यासाठी पण सध्या बाहेर जाण्यावर निर्बंध आहेत म्हणून लेट होतोय.
मंजू होय ग जायला हवंय सगळ्यानी मिळून एकदा कोकणात आमच्या घरी.

आपले ऋणानुबंध मायबोलीमुळे जोडले गेले. तुमचे लिखाण तुमच्या कोकणातील गावासारखेच हिरवेगार, विशेष असते >> हो ग जागू. आणि तुझ्यामुळे मला आणखी ही अनेक मित्र मिळालेत.

मोदकांचा उकडीची रेसिपी आवडली, मोदक छान होतात त्या रेसिपीने ...सगळ्यांना थॅंक्यु
मी तुझी मोदकाच्या उकडीची रेसीपी आमच्या नातेवाईक, मैत्रिणींमध्ये ,बहिणींमध्ये फेमस केली आहे. गव्हल्यांचा लेख पण. बऱ्याच जणांना लिंक पाठवली. तुझे मोदक अभिमानाने मिरवले मी "माझ्या मायबोलीवरच्या मैत्रिणीचे मोदक" म्हणून. Happy °>> धनुडी थॅंक्यु.

ममो, भारीच. आमची एक ट्रेन फ्रेंड होती, ती रेसिपीज अशा काही मस्त प्रकाराने सांगायची की ऐकणाऱ्या च्या तोंडाला पाणी सुटेल. तिला ग्रुप मधल्या टवाळ मैत्रिणी कधी कधी पिडायच्या " इतना क्या क्या बात रही है, और बन क्या रहा है साधा कर्ड राईस ना >> धनुडी Biggrin Biggrin Biggrin

नेट शिकणे ते मूकवाचक ते पहिला लेख पोस्ट करणे हिंमतीचे काम वाटणे ते कोकणाच्या मातीचा वास आणि स्पर्श असणारे ईतके सुंदर लेख आणि आता त्या लेखांचे पुस्तक... हा प्रवास असाच पुढे चालत राहो. ऋ छान लिहिलं आहेस. थॅंक्यु.

मंजू , निळी लिंक कशी करायची ते इथेच सांगते थोड्या वेळात, आता save करून कुठे ठेवलं आहे ते सापडत नाहीये अजिबात.

वाह, छान मनोगत.

कोकणचे लेख मला अजिबात पकवत नाहीत, जाम रिलेट करते. तुमची कलात्मक दृष्टी आणि ऑलराऊंडऱ व्यक्तिमत्व फार भावते मला.

छान लिहिले आहे. तुमचे लेख छान असतात.

मोदकाच्या उकडीची रेसिपी साठी मी फार फार ऋणी आहे तुमची Happy फार फेलसेफ रेसिपी आहे ती. खूप लोकांना त्या रेसिपीची लिन्क दिलेली आहे.>>+१

अंजू, sonalisl धन्यवाद.

मंजू, हे बघ कशी करायची लिंक निळ्या अक्षरात ते. करून बघ ट्राय नक्की जमेल. मस्त instructions दिल्या आहेत. कोणीतरी वाड्यावर लिहिलं होत ते save करून ठेवलं होतं . ते कुठेतरी गायबल होतं. आज मिळालं.

हायपर लिंक द्यायची आहे का? म्हणजे निळं टेक्स्ट ज्यावर क्लिक होईल?
त्याला आणखी सोपी पद्धत म्हणजे
१. जे लिहायचं आहे ते लिहुन घ्या.
२. आता जी अक्षरं निळी दिसायला हवी आहेत ती सिलेक्ट करा.
३. पृथ्वी/ साखळी आयकन (म/E आणि डोळ्याच्या मधील) क्लिक करा.
४. विंडो उघडेल, त्यात Link href बॉक्स मध्ये जी हवी ती लिंक (युट्युब किंवा काय जी असेल ती) कॉपी करा.
५. ओके ला क्लिक करा, की विंडो जाईल आणि प्रतिसाद विंडो मध्ये एचटीएमएल टॅग तयार होऊन आला असेल. झालं. आता सेव्ह करा

Pages