विनोदी लेखन उपक्रम - मायबोली २४ तास - पायस

Submitted by पायस on 15 September, 2021 - 18:53

(घोषणेत उदाहरणादाखल दिलेल्या नमुन्यापेक्षा स्वरुप थोडे वेगळे आहे पण दहा बातम्या आहेत, चिंता नसावी. गरज भासेल तसे प्रतिसादांत संदर्भांची संत्री सोलण्याचे अवश्य करावे ही विनंती!)

________________________

निवेदक कवी कुमार आरशात बघून आपला टाय सारखा करत होता. आज फार फार महत्त्वाची बातमी प्रसारित होणार असल्याची त्याला कल्पना होती. त्याबाबत चॅनेलने खूपच गोपनीयता बाळगली होती. आपल्या कॉल टाईमच्या सुमारास तो सेटवर पोहोचला तर तिथे त्याला तीन व्यक्ती दिग्दर्शकाशी हुज्जत घालताना दिसल्या.

"अहो साहेब आमच्या चॅनेलचे नाव नो भानगड टीव्ही अर्थात एन.बी.टी.व्ही आहे. आम्ही कुणाच्याच भानगडीत पडत नाही. मग इथे कशाला कसली गडबड होतेय?"
"दया याला चिठ्ठी दाखव."
दयाने एक चिरकुट कागद दिग्दर्शकाच्या पुढ्यात धरला -

भानगडीत न पडता जे राहती अधांतरी | तेथेची आजिया होईल काहीतरी ||

"काहीतरीचा अर्थ कुछ तो गडबड हैं सोडून दुसरा काय असू शकतो, हॅ?" - अभिजीत.
तिसरी व्यक्ती अजूनही पाठमोरी असली तरी ती एसीपी साहेबच असणार हे निवेदकाने ताडले.
"सर, तुम्ही सेटवरच थांबा ना. तुम्ही समक्ष हजर असताना कोणाची बिशाद आहे गडबड करण्याची?"
"सीआयडीला आपलं काम करता येतं. आम्ही तसेही थांबणारच होतो."
"अर्थातच सर. जरा असे इकडे बाजूला थांबता का?" (आज पंखा व एसी दोन्ही बंद आहेत. इकडून बरोबर अ‍ॅंगल येईल. हे मनातल्या मनात)

कवी कुमारला हे घडणार याची कल्पना होतीच. त्याने घसा खाकरून बातम्यांना सुरुवात केली.
________________________

नमस्कार! नो भानगड टीव्हीच्या एक गाव बारा भानगडी कार्यक्रमात, मी कवी कुमार तुमचे स्वागत करतो. जे न देखे रवी ते देखे कवी. तसेच इतर चॅनेलचे वार्ताहर ज्या बातम्या आणू शकत नाही त्या बातम्या कवी कुमार आणतो. सर्वात आधी आजच्या ताज्या घडामोडी

१) "बूम बूम बूमर, हमारा प्यारा बूमर" मुख्यमंत्र्यांचे उद्गार, विरोधी पक्षातून उमटले नाराजीचे सूर

माननीय मुख्यमंत्री शिवाजीराव गायकवाड यांनी आज विरोधी पक्षनेते बलराज चौहान यांचा बूमर असा उल्लेख केला. विधानसभेच्या सदस्यांकरता सुरु केलेल्या डिस्कॉर्ड सर्व्हरवर चौहान यांनी "झूम मीटिंगही अजून झेपत नसताना मुख्यमंत्र्यांनी ही नवीन थेरं कशाला अंगावर घेतली आहेत" अशी टीका करत मुख्यमंत्र्यांच्या भाषणात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला. यावर मुख्यमंत्र्यांनी "ओके बूमर" म्हणून चौहान यांच्यावर इग्नोरास्त्र सोडले. चौहान यांनी निषेधार्थ तात्काळ सभात्याग केला. चौहान यांचे प्रवक्ते पांडुरंग यांनी मुख्यमंत्र्यांनी एका बुजुर्ग राजकारण्याचा बबलगम म्हणून उल्लेख करणे चुकीचे असल्याचे प्रतिपादन करून माफीनाम्याची अपेक्षा केली आहे. प्रत्युत्तर म्हणून आपला माफीनामा टाईप करणार्‍याचे सस्पेन्शन लेटर मुख्यमंत्र्यांनी स्वतः टाईपरायटरवर टाईप केल्याची वदंता आहे.

२) "आणि हे म्हणे ५०० कोटींचे मालक" पेटिएम, गूगल पे यांनी ओढले ताशेरे

माझी तुझी रेशीमगाठ फेम, ५०० कोटींचे मालक, यशवर्धन "यश" चौधरी यांनी नेहा व परीसोबत ब्रंच करत असताना कॅश संपल्यानंतर डिजिटल पेमेंट करण्याऐवजी मित्राची ओळख काढून बिल माफ करवून घेतले. या घटनेचा ट्विटरवर पेटिएम, गूगल पे यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे. आमच्या संवाददात्यांशी बोलताना पिचाईभाऊ म्हणाले की "मान्य आहे की आपली ओळख लपवायची असल्याने नेहासमोर तुम्ही क्रेडिट कार्ड वापरू शकत नाही. पण गूगल पेकरवी किरकोळ पाचशे रुपये सुद्धा तुम्ही खर्च करू शकत नाहीत? अशावेळी कुठे जातात तुमचे पाचशे कोटी?" चौधरी यांनी कसलीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. ५०० कोटींचे दुसरे प्रसिद्ध मालक, देव रंजन चोप्रा यांनी यश चौधरींना रोज चालण्याचा, चालून चालून थकण्याचा, पडण्याचा, उठण्याचा, आणि परत चालण्याचा सल्ला दिला आहे.

३) इलॉन मस्क यांनी घेतले उद्योगभूषण यदुनाथ जवळकरांचे मार्गदर्शन

डिजिटल पेमेंटचा विषय चालू आहे तर बिटकॉईनची आठवण होणे साहजिक आहे. क्रिप्टोकरन्सी हा तुमच्या-माझ्यासारख्या नवशिक्या गुंतवणूकदारांचा जिव्हाळ्याचा विषय! या विषयात खोल बुडालेले आपले श्रद्धास्थान इलॉन मस्कदादा, तर डॅझलिंग डायमंड या हिर्‍यांच्या सर्वात मोठ्या कंपनीचे मालक उद्योगभूषण यदुनाथ जवळकर हे जगातील दोन महान उद्योजक. मस्कदादा सध्या इलेक्ट्रिक गाड्यांवर लादलेल्या नवीन करांनी गांजले आहेत. काही दिवसांपूर्वीच मस्कदादांनी "जवळकर साहेबांची तब्येत ठीक नसते, अन्यथा त्यांचे मार्गदर्शन घेण्याकरता मी उत्सुक आहे. त्यांच्याखेरीज इतर कोणी आशेचा किरण दिसत नाही." असे ट्विट केले होते. काल अचानक त्यांच्या नजरेस वक्रगतीने मार्गस्थ होणारी एक कटिका दृष्टीस पडली. या कटिकेतून बाहेर येत महेश जवळकरांनी "डॅम इट, अहो माझे वडील ठणठणीत आहेत. ते असेच वॅख्ख्या विख्खी वुख्खू करत असतात" हा खुलासा करताच मस्कदादांनी फोन फिरवला. "जवळकर साहेबांसारख्या नवकोट नारायणाचे मार्गदर्शन माझ्यासारख्या अतिसामान्य माणसास लाभत आहे हे मी माझे परमभाग्य समजतो." असे ट्विट मस्कदादांनी केले आहे.

________________________

अभिजीत, जवळकर साहेबांच्या कृपेने आपली इन्व्हेस्टमेंट वाचणार असं दिसतंय. - दया
तसं झालं तर बरंच होईल. टिंडर वर मॅच झाल्यापासून पगार पुरत नाही रे. प्रमोशनही होत नाही आहे.
दया, अभिजीत. टाईमपास काय करता आहात. इतर न्यूज सेक्शन्स मध्ये जाऊन या. या जागेचा चप्पा-चप्पा छान मारा. वाटलं तर आपल्या इतर टीमलाही लावा कामाला. कधीही ते "काहीतरी" होईल आणि नेमका हा साळुंखे अशावेळी कुठे तडमडला आहे कळत नाही.
________________________

"नमस्कार. हॅलो डॉक्टरच्या आजच्या परिसंवादाचे आपले प्रमुख पाहुणे आहेत डॉ. आर. पी. साळुंखे"
एसीपी आ वासून बघतच राहिले. त्यांच्या मनात क्षणभरच का होईना, पण साळुंखेच्या नावात एक आय घुसडायचा विचार येऊन गेला.

४) "आजच्या आपल्या परिसंवादाचा विषय आहे नशा"

"मादक पदार्थांची तस्करी हा काही नवीन विषय राहिलेला नाही. गेल्याच आठवड्यात आमच्या चॅनेल स्टिंग ऑपरेशन करून औषधांच्या कॅप्सूलमधून मादक पदार्थांची तस्करी होत असल्याचे शोधून काढले होते. डॉ. साळुंखेंनी विकसित केलेल्या अभिनव चाचणीचा आम्हाला यात खूपच उपयोग झाला होता. त्याविषयी काय सांगाल सर?"
"खरं सांगायचं तर जेव्हा ती अजरामर केस, एपिसोड नं. १३७७ राज बंद कमरे में खून का, माझ्याकडे आली तेव्हा मी 'लाश के फिंगरप्रिंट लाश के ही हैं या नही?' या प्रश्नावर काम करत होतो. पण केस अधिक महत्त्वाची. मग मी म्हटलं बॉस, फिकर नॉट. मी आहे ना."
"आणि तुम्ही होताच. आमच्याकडे तुमची ती सुप्रसिद्ध चित्रफीतही आहे - चित्रफीत"
"असेच टेस्टर्स आम्ही ट्रेन करत आहोत. आमच्या अपेक्षेपेक्षा कैक पटीने जास्त प्रतिसाद या टेस्टर पोझिशन्ससाठी आला आहे."
"साळुंखे उन टेस्टर्स को मारो गोली." - एसीपीसाहेबांना आता राहवत नाही.
"बॉस तुम यहां?"
"साळुंखे आपल्याला केस सॉल्व्ह करायची आहे. चल माझ्यासोबत."

________________________

५) सिंगळूंचे आंदोलन - आमच्या फील्डवर्क स्पेशालिस्टचा स्पेशल रिपोर्ट

नेहमीप्रमाणे फील्डवर्कसाठी विवेकची नेमणूक झाली होती. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन वृत्तीचा तो तडफदार तरुण दिसेल त्याचे फोटो काढत होता. मेमरी कार्ड विकत घेण्यासाठी भत्ता वाढवण्याचा विचार त्याच्या मनात शिरला, तो त्याने तसाच झटकून टाकला. त्याच्या सोबत आलेल्या एन.बी.टी.व्ही. पत्रकाराने, तुमचे फोटो कितीला विकता अशी विचारपूस करताच, विवेकने 'स्पायडरमॅनप्रमाणे भिंतींवर चढत असलो तरी मी पीटर पार्कर नाही' असे बाणेदार उत्तर दिले. तेवढ्यात समोर मुख्य आंदोलक तावातावाने बोलू लागला
"आम्हा सिंगळूंचे हाल तुम्हाला मी काय सांगू? जिन्न असला म्हणून काय झालं, आमच्या अमानला ती रोशनी शब्दश: चंद्राचा तुकडा आणायला सांगते? तो काय नील आर्मस्ट्राँग आहे? त्या बिचार्‍या सॅमीला किती दिवस "राधा तू ग्रेट आहेस यार" म्हणून झुलवलं. वर जखमेवर मीठ चोळायला गॅरीला राधिका, शनाया आणि वर माया? यानंतरही आम्ही गप्प होतो पण अन्याने संजनासोबत संसार थाटल्यावर मात्र आमच्या संयमाचा बांध फुटला. या अन्याया विरोधात आम्ही आजपासून आमरण मद्यपानाचे हत्यार उपसत आहोत..."
विवेकला अचानक जाणीव झाली की तारिका शेकडो एपिसोड टिकलेली असताना, आपल्या आवडत्या डॉ. न्यालाची मात्र सोळा एपिसोडमध्ये गच्छंती केली होती. त्याच्यातला सिंगळू जागा होणार इतक्यात त्याला फोनवर मेसेज दिसला - विवेक, लवकरात लवकर स्टुडिओत ये - एसीपी. सुस्कारा टाकून त्याने काढता पाय घेतला.

________________________

सिनेजगतातील बातम्या बघूयात, असा विचार करून पूर्वी आणि तारिकाने तो सेक्शन गाठला. मुलाखत सुरु होण्यास थोडाच अवधी बाकी होता.
"काय डॉ. तारिका? केलंत की नाही राईट स्वाईप?"
"केलं ना. मॅच पण झाला. पण तुला तर माहितीच आहे की एसीपी सर आणि साळुंखे सर...."
"कधी दोघे अठावन्न वर्षांचे होणारेत देव जाणे. अ‍ॅप्रेजल काय असतं कळतंच नाही त्यांना. आजकाल सगळ्याच वस्तुंचे भाव वाढत चालले आहेत. एकट्या तरुणीला मुंबईसारख्या शहरात किती खर्च असतात त्यांना कळतच नाही."
तारिका काही बोलणार इतक्यात मुलाखत सुरु झाली.

६) जॉन्सन आणि डिझल रेसमध्ये झळकणार

"सर, आमच्या कानी आले आहे की पुढची रेस पुढच्या वर्षी असणार आहे. त्याविषयी काय सांगाल?"
"आम्ही यावेळेसची रेस अधिक वास्तववादी करणार आहोत. त्याकरता भाईंसोबत खास ड्वेन जॉन्सन भाऊ आणि विन डिझल अण्णांना आम्ही साईन केले आहे. फारच उत्तम अनुभव होता. बाकी धमाल तुम्ही पडद्यावर बघालच."
"सर आमच्या कानी असेही आले आहे की यावेळेस तुम्ही स्टंट्ससाठी नील डिग्रा टायसन यांचे मार्गदर्शन घेतले आहे."
"हो, तसा प्रयत्न होता खरा. यावेळेस आम्हाला भौतिकशास्त्रातील अचूकता हवी होती. भाई गुरु ग्रहावर जाऊन साबूसोबत फाईट करणार असा सीन होता. पण डॉ. टायसन यांनी प्रकृति अस्वस्थ असल्याचे कारण पुढे करून हिमालयाची वाट धरली. त्यांनी संन्यास घेतल्याची अफवा तुम्ही ऐकली असेल, पण आम्ही सांगू इच्छितो की ही अफवाच आहे."
"शेवटचा प्रश्न - तुम्ही आज शुभ्र धवल रंगाऐवजी करड्या रंगाचा सूट का घातला आहे?"
"कथेत ग्रे शेड्स आणता आणता आमचे सूटही करड्या रंगाचे झालेत."

"ए साबू कोण गं?" पूर्वीच्या या प्रश्नावर हताश झालेल्या तारिकाची सुटका साळुंखे सरांच्या मेसेजने केली.

________________________

"नमस्कार! मी कवी कुमार तुमचे पुन्हा एकदा स्वागत करतो. आजच्या अखेरच्या काही बातम्या ..."

७) सिमर करते आहे ट्रॅव्हल टूर सोबत टायअप. नवीन आकर्षक पॅकेज जाहीर

इंद्रावती, चंद्रामणी, महामाया आणि अशा इतर अनेक डायनांचा पराभव करण्यासाठी सिमर भारद्वाज प्रसिद्ध आहे. मध्यंतरी पाताली देवी आणि शैतान द डेव्हिल यांचा सामना करण्यासाठी नरकात जाताना मध्येच डिटूर घेऊन सिमरने स्वर्गालाही भेट दिली होती. या प्रवासवर्णनाने प्रभावित होऊन एका नामांकित ट्रॅव्हल कंपनीने आपल्याला ऑफर दिल्याचे ट्विट सिमरने केले होते. त्यानुसार नरक-व्हाया-स्वर्ग या अभिनव ट्रॅव्हल पॅकेजची घोषणा आज झाली. अ‍ॅड्व्हान्स बुकिंगकरिता स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवर फोन करा.

८) पवित्र प्रभाकर - मीरा जैन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार

मार्व्हलचे श्री. केविन फीज यांनी आज आपण एका भारतीय दिग्दर्शकासोबत काम करत असल्याचे सूतोवाच केले. पवित्र प्रभाकर या स्पायडर-व्हर्समधील भारतीय स्पायडरमॅनवर आधारित हा प्रोजेक्ट असणार आहे. दिग्दर्शकाचे नाव आणि इतर कसलीही माहिती देण्यास फीज यांनी नकार दिला पण पवित्रच्या भूमिकेत रणवीर आणि मीरा जैनच्या भूमिकेत दीपिका याबाबतीत दिग्दर्शक आग्रही असल्याचे मात्र त्यांनी सांगितले. मायामावशीच्या भूमिकेत प्रियांका झळकणार या अफवेबाबत त्यांनी मौन बाळगले. पवित्रचे भीमकाका जगणार का या प्रश्नावर मोठमोठ्याने हसून त्यांनी आमची रजा घेतली.

९) ३०० हा आहे सर्वाधिक भाग्यशाली अंक - बेजान दारुवाला

३०० पेक्षा अधिक भाग्यशाली अंक दुसरा कोणता नसल्याचे वक्तव्य आज बेजान दारुवाला यांनी केले. डग्लस हॉफस्टॅडर यांनी ४२ विषयी भ्रामक कल्पना पसरवल्या असल्याचे सांगून त्यांनी आमच्या संवाददात्यांचे लक्ष राधिका मसाल्यांकडे वेधले. आज राधिका सुभेदार ३०० कोटींच्या मालक आहेत. याचप्रमाणे आसावरी राजे व शुभ्रा राजेही ३०० कोटींच्या मालक झाल्यात. असे म्हणतात की विक्रांत सरंजाम्यांची मार्केट व्हॅल्यूही ३०० कोटी होती. अगदी पर्शियनांचा बीमोड करायला लिओनिडासही ३०० च लोक घेऊन गेला होता. ३०० वी मूळ संख्या १९८७. भारतासाठी १९८७ सालाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे कारण याच वर्षी मिस्टर इंडियाने मोगॅम्बोचा बीमोड केला होता. ३०० च्या या महिम्यावर ते पुस्तक लिहित असल्याचे त्यांनी सांगितले.

"पुस्तक तर आता आम्ही लिहिणार आहोत." - एसीपी सर गरजले.
"बॉस, तुमच्या स्टेशनरीचा आणि या चिरकुट कागदाचा डीनए शंभर टक्के मॅच होतो आहे. हा काय प्रकार आहे ते लवकर सांगा नाहीतर दयाला तुमच्याकडून सत्य काढून घेणं काही कठीण नाही."
कवी कुमार दिलखुलासपणे हसला. तो कॅमेर्‍यात बघत उत्तरला - श्रोतेहो, आजची शेवटची बातमी

________________________

१०) संपूर्ण सीआयडी टीमला प्रमोशन जाहीर

दोन दशकांहून अधिक काळ नागरिकांच्या सेवेत अहोरात्र रममाण असलेल्या संपूर्ण सीआयडी टीमला प्रमोशन देण्यात येणार असल्याचा निर्णय आज एकमुखाने घेण्यात आला. एसीपी प्रद्युमन कमिशनर तर इन्स्पेक्टर अभिजीत एसीपी बनतील. इतरांचेही पे-स्केल एक ग्रेडने वाढवण्यात येईल. अभिनंदन एसीपी सर आणि टीम!

एसीपी जोरजोरात हसले. ते हास्य प्रसन्न होते की आणखी काही हे सांगणे मात्र कठीण होते.
"आम्ही हे प्रमोशन नाकारत आहोत."

............
............

"सर असं काय करता, जवळकर साहेबांना थोडा अवधी तर द्या."
"काय बोलतो आहेस तू दया?"
"सर मुंबईत एकट्या तरुणीचे आजकाल खर्च केवढे वाढलेत, त्याचा तरी विचार करा."
"पूर्वीचं अगदी बरोबर आहे सर. मॅच झाल्यापासून काय सांगू तुम्हाला?"
"कसली मॅच अभिजीत?"
"..... तारिका जी..."
"अभिजीत, राईट स्वाईप करणं महागात पडणार असं दिसतंय."
"सर न्यालाला परत आणा ना फॉरेन्सिकमध्ये...." विवेककडे नेहमीप्रमाणे कुणीही लक्ष दिले नाही.
"अरे अभिजीत, तुला कळत कसं नाही? हा सगळा डीसीपी चित्रोळेचा प्लॅन आहे."
"एक्झॅक्टली बॉस! मला सुद्धा असंच वाटलं. वाटलं तर आपण कन्फर्मेशनसाठी या रिपोर्टचा एक्सरे काढून पाहू."
"????? पण चित्रोळे सर तर दिल्लीला चाललेत. ते कशाला असं काहीतरी करतील?"
"अरे दिल्लीत बसूनही त्याचं सारं लक्ष आपल्याच टीमवरच असणार आहे. आपल्याला प्रमोशनची लालूच दाखवून चित्रोळे काहीतरी कार्यभाग साधण्याचा डाव रचत आहे. बघ पुढच्या एपिसोडमध्ये हे उघडकीस येतं का नाही..."
कसले डोंबल्याचे एपिसोड्स आता? अभिजीत आणि प्रभूतींनी मनातल्या मनात चरफडत ऑफिसची वाट धरली.

________________________

"पण त्यांनी प्रमोशन का नाकारलं कवी कुमार?"
"आता मला काय माहिती सर? पण अंदाज बांधायचा झालाच तर त्यांची निष्ठा आपल्या कामाशी आहे. त्यांना प्रमोशन नको तर आणखी काम पाहिजे असणार. बाकी जे तुम्हाला कळलं नाही ते मज पामरास कसे कळणार?"
"हम्म. ठीक आहे तर." शिवाजीराव गायकवाडांनी फोन ठेवला.
"बन्सल साहेब, टाईपरायटर आणा."
"का सर?"
"असा वाह्यात सल्ला दिल्याबद्दल डीसीपी चित्रोळेंचे सस्पेन्शन लेटर टाईप करायचं आहे."

(समाप्त)

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

माननीय मुख्यमंत्री शिवाजीराव गायकवाड >>> याकरता एक सुपरलोल Lol बाकी बरेच संदर्भ अजून लागले नाहीत पण पुन्हा वाचतो.

मला सीआयडी चा कोणताच संदर्भ लागला नाही. पण यदुनाथ जवळकर (ते "नवकोट नारायण" लिहायचे राहिले Happy ते नुसते लिहीले तरी यदुनाथ जवळकरांच्या त्या आग्रही चिरक्या आवाजातच ऐकू येते ) व ते असेच वॅख्ख्या विख्खी वुख्खू करत असताना त्यांची तब्येत बिघडल्याच गैरसमज होणे हे धमाल आहे. तसेच डॉ टायसननी फाइटमधली अचूकता शोधायच्या ऐवजी हिमालयाची वाट धरणे हे ही Happy

पायसने अनेक टीव्ही सिरीज, मार्व्हल वगैरेंची फ्रॅण्चायझी यातील बरेच संदर्भ वापरलेले आहेत. ते मला समजले नाहीत. त्या त्या सिरीज चे फॅन्स असणार्‍यांपर्यंत पोहोचतील बहुधा.

बाय द वे शिवाजीराव गायकवाड चा संदर्भ बहुतेकांना लागला असावा Happy

शिवाजीराव गायकवाड, जवळकर हे संदर्भ लागले. मजा आली.
बाकी संदर्भ लागले नाहीत. माझं चित्रपटसुष्टी, टीव्ही, वेब मालिका, राजकारण यांचं ज्ञान अत्यंत कमी आहे.

सर्व प्रतिसादांचे आभार Happy

अनेक टीव्ही सिरीज, मार्व्हल वगैरेंची फ्रॅण्चायझी यातील बरेच संदर्भ वापरलेले आहेत. >> हो. सगळी संत्री सोलत बसण्यात काही हशील नाही. दोन संत्री तेवढी सोलतो

देव रंजन चोप्रा कोण ते शोधतेय अजून. >> अर्थात सुनील शेट्टी! (https://youtu.be/st0RqC-o3S0)

भाग्यशाली अंक ३०० >> माझे निरीक्षण असे आहे की झी मराठी वाल्यांना ३०० आकड्याचे जबरदस्त आकर्षण आहे. त्यांच्या प्रत्येक मालिकेत कुठल्याना कुठल्या स्वरुपात ३०० प्रकटतोच. अगदी देवमाणूसचा डॉक्टरही नंतर ३०० रुपये फी घेताना दाखवला आहे. Happy

पण काहीतरी भारी जे मला झेपलं नाहीये असं असणार हे नक्की. >>> +१
युट्यूब वर टेनेट एक्प्लेन्ड सारखा रिव्ह्यू आला की बघणार.

सीआयडीची संत्री सोलत नाही पण बाकी गोष्टी समजत आहेत तश्या लिहीतो Wink

सुरूवातीलाच कवी कुमार म्हटल्यावर मला आपला मुलेठी घेऊन जाणारा राजा रबिश कुमार आठवला Lol https://youtu.be/FZdjeCjHR5k?t=54

ओके बुमरचा संदर्भ न्युझिलंडचा आहे ना?

जीन्न म्हणजे तो आपला जगप्रसिद्ध व्हिडो - चंद्राला खेचून पृथ्वीवर आणणारा https://www.youtube.com/watch?v=pigiupcUh50

भाई गुरु ग्रहावर जाऊन साबूसोबत फाईट >> हाईट Lol यावर चाचाजी आणि चाची काय म्हटले असतील असा मी विचार करतो आहे Lol कंप्युटर से तेज चलनेवाला दिमाग वापरून चाचाजींनी ही फाईट साबूला जिंकवली असेल का? आणि भाईला गुस्सा आल्यावर कुठे ज्वालामुखी फुटला असेल Proud

सिमर करते आहे ट्रॅव्हल टूर >> हे ससूराल सिमर का मधले आहे का? अर्थात तीच एक जगप्रसिद्ध सिमर होणारी रेसेपी आहे Proud

पवित्र प्रभाकर >> Lol हे नाव खुप दिवसांनी वाचले. त्याचे पुढे काही झाले का रे? कॉमिक्स आले होते का?

"बन्सल साहेब, टाईपरायटर आणा." >> Lol चित्रोळे या जन्मात तरी एसिपीला सोडून जात नाही, आखीर पुरा प्रॉडक्शन ही उनके मालकीका है Biggrin

सगळे संदर्भ भारी स्पेशली सीआयडी वाला ,वर एपिसोडची लिंक मस्तच .
झी वाल्यांचा ३००फेवरेट आकडा आहे .अगदी स्वीटू च्या सिरीयलीतही (येऊ कशी तशी)300 चपात्या करून विकत होते साळवी ,उद्या स्वीटू ही 3oo कोटींची मालकीण झाली तर नवल वाटायला नको.

नवीन प्रतिसादांचे आभार. संत्री सोलल्याबद्दल धन्यवाद धनि. सगळे संदर्भ बरोबर लागले की Happy

राजा रबिश कुमार - ही एक फार भारी आणि अंडररेटेड सीरिज आहे. शिवकांत परिहार रबिश कुमार म्हणून अगदी शोभून दिसला आहे.

ओके बुमरचा संदर्भ न्युझिलंडचा आहे ना? >> हो. लिंकही देऊन टाकतो (https://youtu.be/OxJsPXrEqCI)

त्याचे पुढे काही झाले का रे? कॉमिक्स आले होते का? >> हो. स्पायडरमॅन इंडियाचे चार इश्यू आले होते आणि त्याशिवाय स्पायडर व्हर्स, सीक्रेट वॉर, आणि वेब वॉरिअर्स या कॉमिक्समध्ये सुद्धा होता तो.

अगदी स्वीटू च्या सिरीयलीतही (येऊ कशी तशी)300 चपात्या करून विकत होते साळवी ,उद्या स्वीटू ही 3oo कोटींची मालकीण झाली तर नवल वाटायला नको. >> Lol होईल, नक्की होईल.