कशास इतके अर्थ शोधता?

Submitted by निशिकांत on 14 September, 2021 - 08:09

कशास इतके अर्थ शोधता?
जगणे आहे एक व्यर्थता

म्हणे सुखी वृध्दाश्रमात ती!
मिळते का मृगजळी आर्द्रता?

फक्त जनीच्या घरी विठ्ठला
का दळता, तिजसवे कांडता?

जुळी जन्मली! मुलगी मेली
तरी साजरा उत्सव करता?

सुशिक्षितांच्या सभेत नाही
कधीच दिसली एकवाक्यता

पाप कराया ना हरकत, पण
दुष्कर्मांची नको वाच्यता

गौतम बुध्दा जरा सांग ना!
मनी रुजवली कशी शांतता?

काळे धन कमवूनही हवी
बगळ्याची नेत्यास शांतता

जसा एकदा निवडुन आला
कशास पुसता अता पात्रता?

तालिबानच्या चमच्यांनो का?
देशविरोधी गरळ ओकता

खरे तेच "निशिकांत' सांगतो
कशास पडताळता सत्त्यता?

निशिकांत देशपांडे, पुणे.
मो. क्र. ९८९०७ ९९०२३
वृत्त--पादाकुलक
मात्रा--८+८=१६

Group content visibility: 
Public - accessible to all site users