माझ्या बकेट लिस्ट चा प्रवास -- मनीमोहोर

Submitted by मनीमोहोर on 13 September, 2021 - 10:57

सामान्य माणसांची स्वप्न ही सामान्यच असतात. " लाखाची गोष्ट " सिनेमा सारखं एकदम लाखभर रुपये मिळाले तर खर्च करणे ही कठीण अशी आमची स्वप्न. तर माझ्या अनेक छोट्या छोट्या स्वप्नांपैकी हे एक ...

बँकेत जॉब करणाऱ्या प्रत्येकाची caiib ही परीक्षा उत्तीर्ण होण्याची मनोमन इच्छा असतेच. ही परीक्षा फार सोपी नसते कारण ती पास होणाऱ्याला बँकेकडून काहीतरी आर्थिक फायदा मिळणार असतो पण एवढी कठीण ही नसते की लोकं त्या बाजूला फिरकणार नाहीत आणि परीक्षा घेणाऱ्या institute चा परीक्षा फी हा मुख्य प्राप्ती स्रोत कमी होईल. ही परीक्षा indian institute of bankers ही स्वायत्त संस्था घेत असते. ह्या संस्थेचे caiib आणि इतर ही अनेक सर्टिफाईड कोर्स आहेत. असो.

रिजर्व बँकेत नोकरीला लागल्यावर इतरेजनांप्रमाणे माझं ही caiib पास होणं हे स्वप्न होतं. उत्साहाच्या भरात मी ही परीक्षा फॉर्म भरला , तीन विषयात पास ही झाले पण अकाउंटन्सी ह्या विषयावर गाडी अडली. मी आर्टस् ची विद्यार्थिनी असल्याने कॉलेज मध्ये हा विषय अजिबातच शिकलेला नव्हता. क्लास लावला तर जरा मार्गदर्शन मिळेल म्हणून त्यासाठी रुईया कॉलेज मध्ये रविवारचा असणारा स्पेशल क्लास ही लावला. दोन रविवार उत्साहाने गेले ही पण विषय फारच डोक्यावरून गेला. बेसिक डेबिट क्रेडिट च शिकवत होते पण मला जेव्हा एखादी entry डेबिट entry वाटे तेव्हा ती असे क्रेडिट enrty. माझा बेसिक्स मध्येच झोल होता खूप. त्यामुळे सहाजिकच इंटरेस्ट गेला आणि caiib ही काही आपल्या आवाक्यातली गोष्ट नाही म्हणून तेव्हा तो नाद सोडून दिला.

मध्ये अनेक वर्षे गेली. मुलंबाळं ,त्यांची आजारपणं, मग पुढे त्यांच्या शाळा अभ्यास, क्लास इतर प्रापंचिक जबाबदाऱ्या ह्यात caiib पार विसरून गेले. यथावकाश मुलं मोठी झाली, मुलीच लग्न झालं, मुलगा शिक्षणासाठी परगावी गेला. घरी आलं की थोडी सवड मिळू लागली. माझ्या मैत्रिणीची ही हीच परिस्थिती होती. तिने एक दिवस caiib चा विचार माझ्या मनात पुन्हा रुजवला. पहिल्यांदा आता रिटायर व्हायची वेळ आली , आता कुठे ह्या अभ्यासाच्या फंदात पडायचं असच वाटलं पण पुढचे काही दिवस लंच टाईम मध्ये आमच्यात ह्याच चर्चा रंगत गेल्या आणि ती माझी मैत्रीण माझं मत परिवर्तन करण्यात यशस्वी झाली. फॉर्म भरला , पुस्तक आणली ... वरवरची सगळी तयारी झाली. आता मुख्य अभ्यास बाकी होता.

ह्या नवीन फॉरमॅट मध्ये तीनच पेपर होते आणि परीक्षेचं स्वरूप mcq होतं. उरलेल्या दोन विषयात पास झालो तर accountancy च बघू अस ठरवलं होत आम्ही दोघीनी. पहिला पेपर बँकिंगचा होता. सरस्वती मराठी मिडीयम शाळेत आमचा नंबर आला होता. ह्या निमित्ताने मला एवढी प्रसिद्ध शाळा बघायला मिळाली म्हणून caiib चे मनोमन आभार मानले मी. आम्ही वर्गात जाऊन बसलो, टेन्शन आलं होतं ही आणि नव्हतं ही. प्रश्नपत्रिका वाटण्यात आली. उत्तरं ही त्यावरच लिहायची होती. एकेक प्रश्न कसा बसा सोडवत पुढे जात होते. पेपर अजिबातच सोपा वाटत नव्हता.पर्यायी उत्तर सगळीच बरोबर वाटत होती. पण केलेला थोडा अभ्यास ,थोडा कॉमन सेन्स ह्यावर तारून नेत होते. शेवट वेळ संपत आली, शेवटचे काही प्रश्न तर न वाचताच कशावर तरी टिक मारून कसे तरी सोडवले .

पहिला डाव देवालाच द्यावा लागणार आहे , आता दुसऱ्यावर तरी नीट लक्ष देऊ या म्हणून पुढच्या पेपरसाठी सरळ आठवड्याची रजा घेतली. अभ्यास नको वाटत होता म्हणून घरकामात फारच रस आला होता त्या आठवड्यात. वेळ फुकट जातोय हे कळत असून ही घरकाम संपवतच नव्हते मी. रोज नवा पदार्थ ,साफ सफाई, टीव्ही ह्यातच जास्त करून सुट्टी घालवली. अभ्यास फार थोडाच झाला. दुसरा पेपर ही कठीणच गेला. ह्यातून पार पडणं कठीण हा विचार पक्का होऊन caiib चा नाद परत एकदा जवळ जवळ सोडून दिला.

एक दोन महिन्यांनी result लागला आणि आश्चर्य म्हणजे काठावर का होईना मी दोन्ही विषयात पास झाले होते. त्यामुळे थोडा उत्साह आला आणि accountancy च शिवधनुष्य पेलण्यासाठी आम्ही क्लास लावला. तो शनिवार रविवार आणि सुट्टीच्या दिवशी असायचा. सुट्टीच्या दिवशी दुपारी जेवून खाऊन लोळत पडायचं सोडून क्लास ला जावं लागे तेव्हा जगात सर्वात दुःखी मीच आहे असं फीलिंग येत असे . पण पैसे भरले होते आणि मैत्रिणी कडून मिळणार मोटिवेशन हयामुळे जास्त बुडवले नाहीत क्लास. हळूहळू त्या विषयात रस ही वाटू लागला होता. परीक्षेसाठी एक आठवड्याची रजा घेतली , नीट अभ्यास केला आणि पेपर दिला.

फार खात्री नव्हती वाटत पण झाले पास accountancy मध्ये आणि पार्ट I पास झाल्याचा शिक्का पडला माझ्यावर. ऑफिस मध्ये ही काही तरी मोनेटरी बेनिफिट मिळाला अस अंधूकस आठवतंय. रिटायर होऊन ही अनेक वर्षे झालीयेत आता. असो.

पण ह्या मुळे उत्साही होऊन आम्ही पार्ट II चा फॉर्म भरला. Risk management, bank general msnagement अशी भारी भारी नावं असलेले विषय पाहूनच जीव दडपला. पण देवदयेने दोन्ही विषयात पास झाले. आता एकच accountancy चा पेपर राहिला होता. ह्या वेळेस ही क्लास लावला होता,परिक्षे आधी आठवड्याची रजा ही घेतली होती. त्यावेळेस माझा मुलगा ही mba करत होता आणि त्याला ही management accountancy हाच विषय होता. त्यामुळे आम्ही दोघांनी मिळून अभ्यास केला. मजा आली. त्यावेळच्या छान आठवणी अजून ही मनाला सुखावतात.

तो पेपर चांगला अभ्यास झाल्याने चांगला गेला, पास होईन अस वाटत होतं. त्याप्रमाणे चांगल्या मार्कानी पास झाले आणि caiib दोन्ही पार्ट उत्तीर्ण झाले मी. खूप मस्त फीलिंग होतं तेव्हा. एवढे दिवस काही यश मिळालं की मी मुलांना बक्षीस देत असे , ह्या वेळी मुलांनी मला गिफ्ट्स दिली.

ह्या परिक्षेमुळे आर्थिक फायदा खूप झाला अस मला वाटत नाही. पण accountancy च बेसिक लॉजिक , बँकिंग बद्दलची मिळालेली नवीन माहिती, रिस्क मॅनेजमेंट ह्या विषयाशी झालेली तोंड ओळख हे सगळं हुरूप वाढवणार नक्कीच होत. या शिवाय घर,ऑफिस संभाळून वयाच्या पंचावन्नव्या वर्षी ही caiib परीक्षेत आपण यशस्वी होऊ शकतो ही गोष्ट आत्मविश्वास वाढवणारी नक्कीच होती .

अश्या तऱ्हेने caiib पास होण्याचं अनेक वर्षांचं माझं स्वप्न सत्यात अवतरलं. अर्थात माझ्या मैत्रिणीच्या प्रेरणेमुळेच हे शक्य झालं. नाहीतर मी ह्या फंदात पडले नसते. असो.

छोट्या छोट्या गोष्टींनी का होईना पण अजून ही माझी बकेट लिस्ट ने भरलेलीच आहे. आसक्ती नको पण जीवनेच्छा टिकून रहाणं खूप महत्त्वाचं आहे असं मला वाटत.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप खूप प्रेरणादायी!! मायबोलीचा एकूण प्रघात बघता तुम्हाला मोदकांसाठी जास्त प्रतिक्रिया येतील, इथे कमी. पण माझ्यासाठी हे ही तितकंच प्रेरणादायी आहे. आर्थिक फायद्याचं म्हणाल तर तुम्ही करून घ्यालं तसं असतं. रिटायर झाल्यावर ह्या परीक्षेचे क्लास घेणे, कंसल्टींग इ इ जशी इच्छा असेल तसं बाप्पा पूर्ण करो.

खूफ छान..
असं काही वाचलं की नवीन प्रयत्न करायला उमेद येते.

छान लिहिलंय!

परीक्षेत आपण यशस्वी होऊ शकतो ही गोष्ट आत्मविश्वास वाढवणारी नक्कीच होती ....,.... हे खरे महत्वाचे!आर्थिक फायदा हा दुय्यम आहे.

छान.

मस्त.55 व्या वर्षी 'आता काय उरलं नोकरीत' विचार न करता इतके कठीण विषय पार पाडणं म्हणजे दंडवत.(हे बोलताना मनात अनेक करू करू म्हणून राहिलेल्या,फक्त अभ्यास मटेरियल जमा करून ठेवलेल्या सर्टिफिकेशन परीक्षा आल्या.हा लेख रोज वाचला पाहिजे.)

मस्त हेमाताई. छान लिहिले आहे. शेवटचे वाक्य खूपच पटले, माझ्या आईची आठवण आली, माझ्या कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला ती पण M.Ed करण्यासाठी परत कॉलेजला जायची. आम्ही दोघी सकाळी लवकर उठून एकत्र अभ्यास करायचो.

>>>>>>>>>अभ्यास नको वाटत होता म्हणून घरकामात फारच रस आला होता
असे होते खरे Happy

>>>>>>>>पण पैसे भरले होते आणि मैत्रिणी कडून मिळणार मोटिवेशन हयामुळे जास्त बुडवले नाहीत क्लास.
तुमची मैत्रीण आणि तुम्ही दोघींना प्रणाम.

फार प्रेरणादायी आहे तुमचा प्रवास. पुढील स्वप्नांच्या पूर्तीकरताही शुभेच्छा ममो.

मस्तच हेमाताई , प्रेरणादायी लिहिले आहे . तुमचे वाचून माझे जर्मन भाषा शिकण्याचे दिवस आठवले . 2 वर्ष पूर्ण केली रानडे इन्स्टिट्यूट मधून . नंतर मुलीची 10वी/12वी यात शेवटचे 1 वर्ष राहिले पूर्ण करायचे. पण आता ते मनावर घ्यावे असे वाटू लागले आहे.

हेमाताई खुप छान. सगळ्यात शेवटची ओळ अगदी योग्य. तुमची जिद्दही दिसून येते यात. मला आठवत तुम्ही रिटायर्ड झालात तेव्हा आपला गटग झाला होता.

खूप मस्त. प्रेरणादायी आहे हा लेख.

मला एक कोर्स एन्ट्रन्स द्यायची इच्छा होती पण अभ्यास काडीमात्र झाला नाही आणि शेवटी ते राहून गेलं. आता हा लेख वाचून पुन्हा जोर करून अभ्यास करावासा वाटतोय.

बँकेतल्या लोकांमधे फार प्रेस्टिजियस मानली जायची ही परिक्षा . माझ्या बिल्डिंगमधे ( स्टेट बॅंक मधल्या लोकांची ) काही लोकांनी आपल्या नेमप्लेटवर पण बी कॉम , सी ए आय आय बी असे लिहून घेतले होते . १९६०-७० च्या काळात ऑफिसर प्रमोशन मिळण्यासाठी पण ही परिक्षा आवश्यक असायची बहुतेक .

चिकाटीने पूर्ण केल्याबद्दल अभिनंदन !

भारीच! अभिनंदन तुमचं.
५५ वर्षी काही मॉनेटरी/ टँजिबल बेनिफिट नसताना एक ध्येय म्हणून परीक्षा देणं हे खरंच चिकाटीचं आणि शिस्तबद्ध स्वभावाचं (डिसिप्लिन्ड) काम आहे. Happy

आसक्ती नको पण जीवनेच्छा टिकून रहाणं खूप महत्त्वाचं आहे असं मला वाटत. ह्या वाक्याकरता तुला जे हवे ते इनाम.

खूप छान !

ममो, प्रचंड प्रेरणादायी आहे तुझा हा प्रवास. ___/\____

आताही तु कागदी फुले, क्रोशे वगैरे करतेस. स्वत:ला सतत चॅलेंज देत राहिले की माणुस तरुण राहतो.. Happy

सगळ्यांना मनापासून धन्यवाद. इथे किती कौतुक करणारी मंडळी आहेत. खूप छान वाटतय.

स्पेशल थँक्स सिमंतीनी ला , ती म्हणली मला म्हणून लिहिलं .
आर्थिक फायद्याचं म्हणाल तर तुम्ही करून घ्यालं तसं असतं. रिटायर झाल्यावर ह्या परीक्षेचे क्लास घेणे, कंसल्टींग इ इ जशी इच्छा असेल तसं बाप्पा पूर्ण करो. >> सि थॅंक्यु हा नवा विचार रुजवल्याबद्दल ...हे ही करता येईल कधी लक्षातच आलं नव्हतं.

मला आठवत तुम्ही रिटायर्ड झालात तेव्हा आपला गटग झाला होता. >> अगदी बरोबर जागु ,तुझ्या लक्षात आहे .. कमाल आहे.

बँकेतल्या लोकांमधे फार प्रेस्टिजियस मानली जायची ही परिक्षा . >>>येस मेधा ,म्हणूनच प्रत्येक बँकर ला वाटत की caiib करू या.

५५ वर्षी काही मॉनेटरी/ टँजिबल बेनिफिट नसताना एक ध्येय म्हणून परीक्षा देणं हे खरंच चिकाटीचं आणि शिस्तबद्ध स्वभावाचं (डिसिप्लिन्ड) काम आहे. Happy >> अमितव ,थोडा झाला फायदा पण कष्टाच्या मानाने नाही. तुम्ही म्हणलाय तसं पॅशन महत्वाची जी माझ्या मैत्रीणीने रुजवली माझ्यात.

आसक्ती नको पण जीवनेच्छा टिकून रहाणं खूप महत्त्वाचं आहे असं मला वाटत. >> हारपेन थॅंक्यु (बरोबर टाईप करता येत नाहीये) पण हे लिहिणं जेवढं सोपं आहे तेवढंच आचरणात आणण कठीण. ह्यातली सीमारेषा फारच अंधुक असल्याने जीवनेच्छा कधी आसक्ती होईल हे कळणार ही नाही. असो.

माझ्या कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला ती पण M.Ed करण्यासाठी परत कॉलेजला जायची. वंदना कमाल आहे तुझ्या आईची.

स्वत:ला सतत चॅलेंज देत राहिले की माणुस तरुण राहतो.. Happy साधना लाख बोललीस.

आता ज्याचं ज्याचं काही शिक्षण अर्धवट राहिलं आहे , त्यांनी मनावर घ्या आणि पूर्ण करा .

सुट्टीच्या दिवशी दुपारी जेवून खाऊन लोळत पडायचं सोडून क्लास ला जावं लागे तेव्हा जगात सर्वात दुःखी मीच आहे असं फीलिंग येत असे .>>>
हा अनुभव मला पण आहे. असाच एक क्लास लावला होता. दर रविवारी नं जाण्याचं कारण शोधायचे.

लेख खूपच छान.

खूपच प्रेरणादायी. शिक्षण घ्यायला वयाची गरज नाही. तुमचा लेख वाचून माझ्या वरिष्ठांची आठवण झाली. निरोप समारंभ द्यायला २ दिवस शिल्लक होते. संगणकावर मी एक काम वेगळी कमांड वापरून पटकन करून दिले. त्यांच्यासाठी ते नवीनच होते. काम झाल्यावर त्यांनी माझ्या मागे लागून ती युक्ती शिकून घेतली. तेव्हा मनात आले होते आता काय करणार आहे हा म्हातारा शिकून. निवृत्त झाल्यावर घरी आरामच तर करणार आहे. परंतु काही माणसेच अशी वेगळी ध्येयवेडी असतात. वयोमानानुसार काही जण नवीन ज्ञान आत्मसाद करण्याचे टाळतात त्यांच्यासाठी तुमचा हा लेख आदर्शच आहे. तुमची वेगळी ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद.

खूप छान प्रेरणादायी लेख !
>आसक्ती नको पण जीवनेच्छा टिकून रहाणं खूप महत्त्वाचं आहे असं मला वाटतं .
किती महत्वाचं लिहलंत. ! खूप आवडलं.

खूप छान लिहिलंय
ह्यातून शिकण्यासारखं बरंच काही आहे मला
धन्यवाद Happy

धन्यवाद पुन्हा एकदा सगळयांना. माझ्या आनंदासाठी मी लिहिते हे जरी खरं असलं तरी आपण लिहिलेलं कोणी तरी वाचतंय, त्यावर प्रतिसाद देतंय ही गोष्ट खूप हुरूप देणारी, उत्साह वाढवणारी आहे.
किशोर मुंढे , धन्यवाद , खर आहे , साधना म्हणलीय तसं challange राहिलं तर ताजतवानं ही राहता येतं.
पराग अजय , तुम्हा दोघांना स्पेशल थँक्स. मायबोलीच्या सर्वेसर्वां असणाऱ्या तुम्ही वेळात वेळ काढून माझ्या ह्या लेखाची दखल घेतलीत म्हणून खूप छान वाटलं.

Pages