पाककृती स्पर्धेसाठी काही युक्त्या

Submitted by Arundhati Joshi on 11 September, 2021 - 17:17

उपवास म्हणजे खरे तर देवाचा सहवास किंवा रोजच्या वैश्विक मोहापासून स्वतःला बाजूला करण्याचा दिवस. दररोज च्या आयुष्यामध्ये मोहाचा सर्वात मोठा वाटा असतो अन्नाचा . त्या मोहावर एक दिवसासाठी का होईना ताबा मिळवला तर आपली मानसिक ताकत/ चिकाटी निश्चित वाढते. सध्याचे बहुचर्चित इंटरमिटन्ट फास्टिंग हा ह्याचा मानसिक चिकाटीला चालना देणारा प्रकार झाला. पण आपल्या पूर्वजांनी अश्या उपवासांचे महत्व फार पूर्वीच हेरून त्याला रोजच्या दैनंदिन आयुष्यात समरस करून घेतले. शिवाय त्याला धार्मिक महत्व देऊन लोकांना ते उपवास पाळण्यासाठी प्रेरित केले. जसे दिवस पुढे गेले तसे इतर गोष्टींसोबत उपवास का करायचा ह्याचा मूळ हेतू झाकला जाऊन केवळ रूढी परंपरांची झालर त्यावर घातली गेली. कोणतीही गोष्ट केवळ करायची म्हणून करायची असे जेंव्हा होते तेंव्हा त्यामधून पळवाटा , मध्यमार्ग शोधले जातात. त्याच्याच परिणाम कि काय पण 'खाऊन पिऊन उपवास' अशी भन्नाट आयडिया अस्तित्वात आली आणि गेल्या अनेक पिढ्या मूळ धरून उभी आहे. 'उपवासाचा मेनू' अशी पाटी बघून आता तर आपल्याला हसू पण येत नाही इतकी ही गोष्ट अंगवळणी पडली आहे. गेल्या काही वर्षांपासून मात्र आपल्यामध्ये आरोग्य,आहाराबद्दल अधिक जागृती यायला लागली आहे. कोणत्याही टोकाची भूमिका घेणे आपण शक्यतो टाळतो शिवाय उपवासाचे काही पदार्थ आपल्या मनात इतके घर करून बसले आहेत कि त्यांना पूर्णपणे तिलांजली न देता त्यांना जरा मॉडिफाय करता आले तर बरे होईल म्हणून ही पाककृती स्पर्धा! आरोग्यदायी म्हणजे थोडक्यात एका पेक्षा अधिक पौष्टिक तत्वे असलेले अन्न. उपवासाच्या पदार्थांमध्ये बऱ्याच वेळा फक्त कर्बोदके असतात. ह्यासाठी खालील काही युक्त्या वापरून त्यांची आहार मूल्ये वाढवता येतील :
१. प्रथिनं - दही, ताक, तीळ,राजगिरा पीठ वापरून पदार्थ बनवावेत किंवा इतर पदार्थां मध्ये घालावेत. उदा: उपवासाच्या भाजणी मध्ये राजगिरा पीठ अधिक घालावे, हे पीठ पाण्याऐवजी दूध/दही/ताकात भिजवावे.
२. फायबर - उपासाच्या दिवशी आपल्या खाण्यात फायबर चे प्रमाण खूप कमी होते. उपासाला चालणाऱ्या भाज्या वापरून कोशिंबीर, आमटी , भाजी करावी. फळांचे काप, सॅलड करावेत. कुठलीही भाजी अगदी बटाट्यासकट साल ठेवून केली तर अधिक पौष्टिक होते. फळांचे सुद्धा तेच- साल न काढता, शक्य तितके कमी संस्कार (शिजवणे, रस काढणे इ. ) करून वापरा. एक विचार आला म्हणून इथे मांडते , पटला तर बघा हं -अनेकांना उपवासात अगदी कमी भाज्या चालतात. अशांनी जर उपवास हा आरोग्यासाठी करायचा आहे आणी त्यासाठी जर भाज्यांच्या बाबतीत स्वतःला थोडी सूट दिली तर उपवासामुळे होणारे अपचन, जड पणा, वजनाचा काटा झर्रकन वाढणे बऱ्यापैकी कमी होऊ शकते.
३. मिष्ठान्न : जितके नैसर्गिक गोडवा असणारे पदार्थ निवडाल तितके बरे. उदा, गूळ घालण्याच्या ऐवजी राजगिरा पीठ उसाच्या रसात भिजवून छोट्या पुऱ्या तव्यावर /ओव्हन मध्ये भाजून घ्याव्यात किंवा रताळ्याच्या खिरी मध्ये साखरे ऐवजी खजुराची पेस्ट/ खारीक पूड घालावी.
४ . प्रमाण - सर्व काही खा पण मर्यादे मध्ये खा असा आहार शास्त्राचा मूलमंत्र आहे. ह्याचाच अर्थ उपवासाच्या दिवशी पूर्ण दिवस केवळ पिष्टमय पदार्थ (साबुदाणा, भगर ,बटाटे) इतकेच खाण्यापेक्षा त्यामध्ये इतर आहार तत्वे जोडता आली तर बघा. उदा: भगर (वरीचे तांदूळ) + दाण्याची आमटी वेगवेगळी न करता, भगर करतानाच त्यात दाण्याचे कूट घालून त्यासोबत छान मसाला ताक (जिरे, कोथिंबीर,हिरवी मिरची , चालत असल्यास आले) घ्या.
५. चाकोरी बाहेर जाऊन थोडे- स्किम्ड मिल्क पावडर, छेन्ना (पनीर च्या आधीची स्टेप ज्यामध्ये प्रथिन युक्त पाणी असते), राजगिरा पीठ, भाजलेले शिंगाडा, शिंगाडा पीठ, कुळीथ, कुट्टू पीठ, तीळ, मगज (कलिंगड बिया), अक्रोड, मनुका, अंजीर , खजूर, तुळशी च्या बिया, लिंबू पाणी, नारळ पाणी,नीरा इ . वापरता येईल.
६. शिजवण्याची पद्धत : काय घालता इतकेच महत्वाचे आहे कसे तयार करता. कमी तेल/तूप वापरून, शक्य तितकी पोषक तत्वे टिकवून पदार्थ शिजवा. भाजणे , मोड आणणे, वाफवणे , बेक , ग्रील , रोआस्ट, शॅलो फ्राय केलेले उत्तम. शिजवण्याची साधने लोखंडी, तांब्याची असली तर उत्तम.
काय मग, काही आयडियास मिळाल्या नं? ही तर सुरुवात आहे, विचार करायला लागलात तर असे अनेक हेल्दी पर्याय सापडतील तुम्हाला. एक गुपित सांगू, तुमची आई, आजी,पणजी काय करायच्या ते आठवून बघा, १००% काहीतरी भन्नाट हाती लागेल आणि नव्याचा सूर गवसेल. बेस्ट लक. वाट बघतीये तुमच्या रेसिपीज ची!!

---------------------------------------------------------------
संयोजक : लेखिका रजिस्टर्ड डायटेशिअन असून सध्या आँटारियो कॅनडा मधे असतात. यापूर्वी त्यांनी यूके मधे ही रजिस्टर्ड डायटेशिअन म्हणून काम केले आहे. त्या मुळच्या नाशिकच्या आहेत आणि भारतात असताना महाराष्ट्र सरकारच्या बालेवाडी संकुलात क्रीडा डायटेशिअन म्हणून काम केले आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लेख.. पटला!!

उपवासाला कोथिंबीर चालते? आमच्या इथे नाही चालत, पण टोमॅटो चालतो...

मेक्स सेन्स! छान.
त्यात तुम्ही आमच्या ( जवळच्या) गाववाल्या! माबोवर आधी बघितलं न्हवत तुमचं लेखन. इथे स्वागत.