"शल्य" कथा

Submitted by सतीशगजाननकुलकर्णी on 10 September, 2021 - 05:13

शल्य

घड्याळात पाच वाजले आणि अजय देसाईनी हातातला “इकोनोमिक टाईम्स”बाजूला ठेवला. वास्तविक, आज रविवारच होता. अजुनी थोडा वेळ पेपर वाचायची त्यांची इच्छा होती. पण आज एका पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाला त्यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले होते. बँकेचा जनरल मनेजर आणि पुस्तक प्रकाशन.!! अजय स्वत:शीच हसले. कारण गेल्या पंचवीस वर्षात साहित्याचा आणि त्यांचा सुतराम सुद्धा संबध आला नव्हता. केवळ आपल्या बँकेने हा कार्यक्रम स्पॉन्सर केला म्हणून हा सर्व खटाटोप.
समोर पडलेल्या कार्यक्रमाच्या पत्रिकेकडे त्यांनी नजर टाकली. कोणा वी. ग. सबनीस नावाच्या लेखकाची “प्रारब्ध” नावाची पंचविसावी कादंबरी आज प्रकाशित करायची होती. वी. ग. सबनीस ...? कोण आहे कुणास ठाऊक? नाव ऐकल्यासारख वाटत.! काही क्षण ते विचारात गढून गेले. पण हे नाव कुठे ऐकणार.? तसेही ते फार कधी वाचत नसत. गेल्या पंचवीस वर्षात जर त्यांनी काही वाचले असेल तर बँकिंग संदर्भातील पुस्तके. !!!! क्लार्क पासून ते जनरल मनेजर हा सदतीस वर्षाचा प्रवास कथा कादंबरी वाचून थोडाच पूर्ण झाला असता ? बँकेच्या त्या परीक्षा, ते इंटरव्ह्यू, बढतीच्या वेळी मनात असणारी धाकधूक आणि नंतरचे ते जीवघेण टेन्शन. आपण केलेल्या कष्टाचा त्यांना अभिमान वाटू लागला. समोर असलेली पत्रिका त्यांनी पुन्हा एकदा हातात घेतली. वी ग देसाई... असे स्वत:शीच पुटपुटत ते विचार करू लागले.
“आज लवकर आटोपलं वाचन ?” त्यांच्या पत्नीने अस्मिताने रुममध्ये येता येता विचारले.
“हो. आज एका कादंबरी प्रकाशन सोहळ्याच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहयचे आहे. निघतोच आहे थोड्या वेळात”
अजयनि सांगितले आणि अस्मिता मोठ्यांदा हसली. तिच्या हसण्यामागचे कारण अजयनि ओळखले होते.
“अग हसतेस काय, इतके काही मला हा समजू नकोस ह.”
“अहो तुम्ही वेगवेळ्या कार्यक्रमाला जाता, तुमची भाषणे होतात हे मी बघत आले आहे.पण ते अर्थशास्त्राविषयी. पण हा कादंबरी प्रकाशन सोहळा.. !!” हसू आवरत अस्मिता बोलत होती.
“तू म्हणते आहेस ते बरोबर आहे. पण आज माझी सत्वपरीक्षा आहे. तिथे भाषण कराव लागणार आणि साहित्याचा आणि माझा छतीसचा आकडा. माझ्यापेक्षा तुलाच बोलवायला पाहिजे होत. निदान वाचन तरी आहे तुझ या सगळ्या बाबतीत.”
“ मी काय जनरल मनेजर नाही तुमच्यासारखी. पण काय हो, कोणती कादंबरी आणि कोण लेखक आहे?”
“बर झाल तू विचारलस ते !! प्रारब्ध नावाची कादंबरी आहे आणि लेखक आहे वि .ग. सबनीस. हे नाव मला मी फारस वाचत नसताना सुद्धा ओळखीचे वाटतय. काही कळत नाही”. बोलता बोलता त्यांनी पत्रिका अस्मिताच्या हातात दिली. आणि अस्मिता पुन्हा हसू लागली.
“आज सारखे हसतेस काय ?”
“अहो , हे वि ग सबनीस तुमचे मित्र आहेत म्हणून तुम्हाला ओळखीचे वाटतात”.
“काहीही बोलू नको. असा कोणताही मला मित्र नाही”.
“ वि ग सबनीस म्हणजे. विनायक गणेश सबनीस. तुमचा विन्या. काही लक्षात येते का ?”
“काय सांगतेस तू ? अरे हो. विन्याचे पूर्ण नाव विनायक गणेश सबनीस असेच आहे. आणि त्यावेळी तो किरकोळ काहीतरी लिहायचा पण. मग तो आता मोठा लेखक बिखक झाला कि काय?”
“का नाही? जर तुम्ही क्लार्क चे जनरल मनेजर होऊ शकता तर एक किरकोळ काहीतरी लिहिणारा मोठा लेखक का होऊ शकणार नाही. ?”अस्मिता म्हणत होती त्यात तथ्य होत. विन्या त्यांचा बँकेतला मित्र. दोघ एकदम बरोबर लागले. जवळ जवळ दहा वर्षाचा त्यांचा बँकेतला प्रवास एकत्रच होता आणि नंतर विनयने नोकरी सोडली. त्यावेळी दोघे किती जवळ होतो एकमेकांच्या. पण नंतर आपण बढती घेतली. आयुष्याचे संदर्भच बदलले. तो सारा प्रवास त्यांना आठवू लागला. अजयना भूतकाळात तंद्री लागत होती.
“देसाई साहेब घड्याळ बघा.कार्यक्रम सहा वाजता आहे.पाहुण्यांनी कधीतरी वेळेत पोचले तर चालते”

“अर्चना, तुझे आटोपले का ? वेळ होतोय मला.” विनायकनि आपल्या पत्नीला आवाज दिला. आज त्यांच्या कादंबरीचा प्रकाशन सोहळा होता. वास्तविक, प्रकाशन सोहळ्याची त्यांना सवय नव्हती अशातला भाग नाही. त्यांना असले समारंभ अंगवळणी पडले होते. पंचवीस कथासंग्रह वेगवेगळ्या सामाजिक कादंबरया त्यांच्या नावावर होत्या . साहित्य क्षेत्रात त्यांचे आता नाव झाले होते. त्याचमुळे लेखक वेळेवर गेला तरी प्रमुख पाहुणे उशिरा पोचतात हे त्यांना सवयीने माहिती झाले होते. पण आज समारंभाचे पाहुणे वेळेत येणार व आपणहि वेळेत जावे असे त्यांना वाटत होते कारण प्रमुख पाहुणे होते अजय देसाई. अजयचा वक्तशीरपणा त्यांच्या चांगला स्मरणात होता. कष्ट, वक्तशीरपणा आणि ध्येयाशी एकनिष्ठ या सगळ्या गोष्टीने अजय आपल्या करिअर मध्ये किती वर गेला ना?पण येत्या पंचवीस वर्षात त्याच्याशी काहीच संपर्क नाही राहिला. त्याच्या बदल्या व आपले हे लिखाण व व्यासंग.
“अर्चना ..”
“अहो तुम्ही होता का पुढे ? मला अजुनी थोडा वेळ आहे.”
“आणि अनिकेत?”
“तो आणि मी येऊ एकत्र.” एखाद्या समारंभाला जात असताना खर तर बायकांचा उत्साह किती असतो.! अर्चनाला तो नाही असे नाही पण.. जाऊ दे त्यांनी आज विचार करायचे नाही असे ठरवले.
“सर, मी बँकेकडून आलो आहे. आपल्या साठी गाडी पाठवली आहे.”
“हो चल मी तयारच आहे.” ते ड्रायव्हरला म्हाणाले.
“तुम्ही या. तुमचे आवरले कि. मी निघतो पुढे ..” त्यांनी अर्चनाला सांगितले

विनायक गाडीत बसले आणि नेहमीप्रमाणे त्यांचे मन भूतकाळात भरकटू लागले. पंचवीस वर्षाहूनि जास्त काळाचा हा प्रवास. बँकेतली ती दहा वर्षे सोडली तर आपण सातत्याने लिहीतच आहोत. त्या दहा वर्षात आपण लिहिले नाही असे नाही पण आकड्यांच्या त्या दुनियेत शब्द तितकेसे आपल्यावर प्रसन्न होत नव्हते. शेवटी नोकरी सोडली. बँकेत तसेही मन रमत नव्हते. नोकरी सोडल्यावर अर्चना रागावली होती. बरीच आदळ आपट केली तिने. त्यावेळी ती शिक्षिका म्हणून नोकरी करत होती. अजुनी करतेच आहे. आवश्यक तेवढा पैसा मिळत होता. लेखनातून पैसा मिळाला नसता असे थोडेच होते ? पण त्यात स्थेर्य नाही म्हणू तिने वाद घातला. बँकेतला पगार जास्ती. ऐषारामाचे जीवन तिला पाहिजे होते. आणि आपले लेखन म्हणजे भिकेचे डोहाळे.
अजयला तरी आपला निर्णय कुठे पटला होता. किती वाद झाले त्याच्याशी. तो दिवस विनायकना बऱ्याचदा आठवत असे. बँकेत त्या दिवशी प्रमोशनचे सर्क्युलर आले होते. सगळ्या स्टाफ मध्ये तीच चर्चा होती. अजय तर खूपच एकसाइट झाला होता.
“विन्या, आजचे सर्कुलर बघितलेस प्रमोशनचे.? अभ्यासाला केव्हा सुरवात करू या?”
“तू कर चालू. मला त्यात काहीच रस नाही.” विनायक विचारात गर्क होता.
“काय सांगतोस? का पण ? यावेळी जागाही तशा जास्ती असणार आहेत. वेडेपणा करू नको”
“असतील. पण मी नाही त्यात इंटरेस्टेड. खर तर मला .. “
“बोल बोल. काही प्रोब्लेम आहे का? बोल मोकळेपणी सांग.” अजयचा नेहमीचा उतावळेपणा.
“नाही. प्रोब्लेम नाही. पण तुला मी काय म्हणतोय ते पटणार नाही.”
बोल रे बाबा. बोल. उगीच डोक खाऊ नकोस.”
“मला तुझा स्वभाव माहित आहे. तू करिअरच्या मागे आहेस. काहीच हरकत नाही. पण मला करिअर करायचे आहे ते लेखक म्हणून. तुला माहित आहे मी कथा वगैरे मासिकात लिहित असतो. पण हे सगळ करीत असताना मला हि नोकरी नकोशी वाटते. म्हणून मी नोकरी सोडून पूर्णवेळ लेखनाला झोकून द्यायचे ठरवले आहे.”
“तू मूर्ख आहेस. बँकेतली नोकरी मिळवण्यासाठी लोक आटापिटा करतात. ती नोकरी सोडून तू लेखक होणार .. चार कथा छापून आल्या म्हणून तुला मोठी स्वप्ने पडू लागली आहेत विन्या . किती पैसे मिळाले तुला आजपर्यत लेखनातून जरा सांगलीश मला.”
“लिखाण पैशासाठी करायचे असते का? लिखाण हे आत्मिक समाधानासाठी करायचे असते.”
“आणि पोटाला खायचे काय आत्मिक समाधान? साहेब, अनिकेत अजुनी फक्त तीन वर्षाचा आहे. काही विचार केलास ? फक्त अर्चनाच्या नोकरीत भागेल तुझ?”
“मी अर्चनाशी बोललो याबाबतीत.”
“आणि तिने तुला परवानगी दिली .. “
“नाही. ती रागावली. वाद घातले. नोकरी सोडू नको म्हणून माझ्या हातापाया पडते रोज.”
“तरीही तू हा निर्णय घेतो आहेस. विन्या बघ विचार कर. घाईने निर्णय घेऊ नकोस.”
“विचार करून झाला आहे अजय. मला लेखनासाठी माझे आयुष्य झोकून द्यायचे आहे”.
तो वाद पुढे बराच वेळ चालला होता. आणि मनाचा निग्रह करून आपण नोकरी सोडली होती. तीन वर्षाच्या मुलाला घेऊन कुठे जाणार म्हणून कदाचित अर्चनाने आपल्याशी प्रपंच केला असेल. अनिकेत व्हायच्या आधी हा निर्णय घेतला असता तर कदाचित ती आपल्यला सोडून गेली असती. तिची अधिक ओढाताण होऊ नये म्हणून घरबसल्या आपण ट्युशन्स घेतल्या. पण या गोष्टीचेही लोकात हसूच झाले. बँकेतली नोकरी सोडून शिकवण्या. आपल्याला बँकेतून काढून टाकले, मोठा फ्रोड केला विनायकने, अनेक अफवा उठल्या होत्या. अर्चना चार लोकात मिसळायची सुद्धा नाही. लोकांना सांगायचे तरी काय असा अर्चनाला प्रश्न पडत असे. अनिकेत शाळेत जाऊ लागला तेव्हा मित्र त्याला विचारायचे बाबा काय करतात ? कुणाचे वडील डॉक्टर, कुणाचे व्यापारी. कुठे कुठे नोकरी. पण वडील लेखक आहेत म्हणजे काय हे कळण्याचे त्याचे वय नव्हते. जसे जसे त्याचे वय वाढत गेले तेव्हा त्याची आई करीत असलेले कष्ट, नेहमी पैशाचा तुटवडा, आपल्या वडिलांनी बँकेतली सोडून दिलेली नोकरी या साऱ्या गोष्टी त्याच्या लक्षात आल्या. अर्चनाच्या मनात आपल्या बदल आढी होतीच आणि आता अनिकेत...

बरोबर सहा वाजता कार्यक्रम सुरु झाला. हॉल रसिकांनी तुडुंब भरला होता. वि .ग सबनीस हे नाव तसे साहित्य वर्तुळात मानाचे होते. काही समकालीन लेखक मित्रपण कार्यक्रमास उपस्थित होते. विनायक गर्दी बघून आनंदले. आपल्या पंचवीस वर्षे कारकीर्दीचा त्यांना अभिमान वाटू लागला. कार्यक्रमात बऱ्याच वक्त्यांची विनायकचे कौतुक करणारी, त्यांच्या साहित्याचे विविध पैलू दाखवणारी भाषणे झाली. प्रमुख पाहुणे अजय देसाई यांच्या हस्ते “प्रारब्ध” कादंबरीचे प्रकाशन झाले. आणि अजय भाषणासाठी उभे राहिले. प्रेक्षागृहात शांतता पसरली
“ मी बँकेत काम करणारा एक जनरल मनेजर. त्याच्या हस्ते या पुस्तकाचे प्रदर्शन हा थोडा विचित्र योगायोग आहे असे वाटते. पण हा योगायोग मी आनंदाने स्वीकारला. याला दोन कारणे होती पहिली गोष्ट प्रारबद्धात ज्या गोष्टी लिहिलेल्या असतात त्याला सामोरे जाणे गरजेचे असते. त्यापासून पळणे योग्य नाही.” प्रारब्ध या कादंबरीच्या प्रकाशनाचा कार्यक्रम आणि अजयनि केलेला प्रारब्ध या शब्दाचा भाषणात उपयोग यामुळे रासिकांच्यात खसखस पिकली. विनायक सुद्धा मिस्कीलपणे गालातल्या हसत होते.
“आणि दुसरी गोष्ट कदाचित तुमच्या पैकी कुणालाही माहित नसेल म्हणून मी अभिमानाने येथे सांगत आहे. विनायक हे माझे जवळचे मित्र होते व आहेत. पंचवीस वर्षापूर्वी विनायक आमच्याच बँकेत कालार्क म्हणून काम करत होता आणि केवळ लेखनात नाव कमवायचे म्हणून त्याने बँकेतली उत्तम नोकरी सोडून त्याने लेखन कार्यात स्वत:ला झोकून दिले होते. प्रारब्ध हे त्याचे पंचविसावे पुस्तक. म्हणजे एका दृष्टीने त्याचे वर्षाला एक पुस्तक प्रसिद्ध होते. दुर्देवाने त्याचे कोणतेही पुस्तक मी वाचले नाही. कदाचित बँकिंग वरची पुस्तके तो लिहित असता तर ती मी वाचली असती. पण मला या विषयाची खात्री आहे कि त्याचे पुस्तक हे रसिकांना विचार करायला लावणारे असणार. त्याने बँकेतील नोकरी सोडण्याचा निर्णय जेव्हा मला सांगितला होता तेव्हा त्याला पहिला प्रश्न विचारला होता “लेखन क्षेत्रात कमाई किती असणार ? आणि त्याने उत्तर दिले होते लेखन हे समाधानासाठी करायचे असते पैशासाठी नाही.” आज रसिकांनी या कार्यक्रमाला केलेली गर्दी बघता विनायकने आयुष्यात काय मिळवायचे असते हे दाखवून दिले आहे. त्याने आजपर्यत भरपूर लिहिले आहे. येथून पुढेहि तो लिहित जाईल. आणि रसिक वाचकांना असाच आनंद देत राहील. विन्या, बेस्ट ऑफ लक मित्रा”
टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. विनायकनि भाषणात त्यांचा साहित्य प्रवास सांगितला. लेखन केल ते शब्दांची पूजा म्हणून. ते एक व्रत होत. प्रसिद्धी मिळत गेली. नाव होत गेल. अनेक संकटांना सामोरे जावे लागल पण पत्नीची मुलांची साथ होती .. विनायक बोलत होते. गत आठवणी सांगत असताना त्यांना गहिवरून आले होते. पण त्यांची पत्नी प्रेक्षागृहात नव्हती. त्यांची नजर तिला शोधत होती. पण अर्चानाहि नव्हती आणि अनिकेहि.

कार्यक्रम संपल्यावर अजयनि मुद्दमच विनायकना आपल्या गाडीतून सोडायचे ठरवले. बऱ्याच वर्षानंतर ते आपल्या मित्राला भेटत होते. मनसोक्त गप्पा त्याच्याशी माराव्यात. त्याच्या साहित्य निष्ठेचे कौतुक करावे असे त्यांना मनोमन वाटत होते.
“फार काही वेळ झाला नाही. आठच वाजतायत. कुठेतरी गप्पा मारत बसू या का?” अजयनि विचारले.
“हो हो. चालेल ना.” विनायकच्या मनात तेच होते.
कॉफी हाउसचे प्रशस्त टेरेस. आजूबाजूला तुरळक गर्दी. खर तर हे कॉफी हाउस आणि तिथली कॉफी वातावरण सर्वच काही प्रसिद्ध होते. पण आज नेहमीप्रमाणे गर्दी नव्हती.
“विन्या, तुझे आज मला कौतुक वाटले ह. केवळ लेखक झालास, तुझे नाव झाले म्हणून नव्हे. तू सांगून ठरवून हे सार केलेस. खर तर तू बँकेत असताना कामातहि हुशार होतास. माझ्यासारखं करिअर करू शकला असतात पण तसे न करता तू हि वेगळी वाट धरलीस. ग्रेट. मानला तुला”
“अरे त्यात काय ? तू पण खूप वर आलास .. “
अरे ते काही विशेष नाही. अरे हो. आज अर्चना का दिसली नाही. तुझा मुलगा ..?”
विनायक काही बोलले नाहीत. पण आज बरेच दिवसांनी आपला मित्र भेटतो आहे. त्यामुळे स्वत:च्या मनातल काही बोलाव असे त्यांना वाटले.
“अजय खरे सांगू का ? गेल्या पंचवीस वर्षात मी लिखाण केल, नाव कमावल पण तरीही आत कुठेत्तरी मी दु:खी आहे”
“का रे? इतकी प्रतिष्ठा मिळून तू असे म्हणतोस?”
“प्रतिष्ठा आहे. नाव आहे पण आज कौटुंबिक सुख मला नाही. तुला आता आठवत नसेल पण अर्चानाचे आणि माझे अजुनी लेखन बिखन या विषयावरून वाद होत असतात. मी जर माझ्या खोलीत बसून जरी लिहू लागलो तरी ती धुसमुसत असते. तसे लिखाण सांभाळत बराच वेळ मी देत असतो . पण तरीही धूसफूस चालूच असते. मी जर बँकेत राहून जर हे लिखाण केल असत तर तिची काही हरकत नव्हती रे. पण नोकरी सोडल्यावर ते राहणीमान तिला मिळू शकल नाही जे तिला अपेक्षित होत. अनिकेत सुद्धा माझ्यावर नाराज आहे. त्याला इंजिनिअर व्हायचे होते. मार्क्स कमी पडले. अगदी थोडे. हुशार आहे रे तो. डोनेशन दिले असते न तर लगेच मिळाले असते. पण पैसे आणायचे कुठून? आज तो एका साध्या कंपनीत नोकरीला आहे. नोकरी तितकीशी चांगली नाही. कमी पगार आहे. लग्न जुळवताना अडचणी येतात. ते आयुष्य मी माझ्या कुटुंबाला देऊ नाही शकलो जे त्यांना हव होत. आज नाव आहे माझ, पंचवीस पुस्तके आहेत पण माझ कुटुंब आनंदी नाहि. त्याच नाराजीमुळे अर्चना कोणत्या कार्यक्रमाला येत नाही. दोघांचा बहिष्कार असतो अशा कार्यक्रमावर.”विनायक हसले. पण त्या हसण्यात विषाद होता.
अजय काही वेळ काही बोलले नाहीत. खरच माणासाच आयुष्य असेच असत का? आज आपण जनरल मनेजर आहोत आज सगळी सुख आपल्या पायशी लोळण घेत आहेत पण तरीही कोणतीतरी खंत आहेच आपल्या मनाला.त्यांनाही आपल्या मित्राशी बोलावेसे वाटले.
“तुला सांगू विनायक, तुझ्या कडे नाव आहे पण तुझे कुटुंब आनंदी नाही म्हणून तू नाराज आहेस. पण आज मी सुद्धा सगळी सुखे आहेत तरी नाराज आहे.” विनायक चकित झाले.
“तुला सांगतो मी माझ करिअर खूप passionately केल पण हे माझ passion होत का?खर तर नाही. तुला माहित आहे मला फिरण्याची टेकिंगची खूप आवड होती, मी फोटोग्राफी चांगली करायचो. वाटत होत करिअर करत सर्व करू. पण करिअर मध्ये मी इतक झोकून दिल कि माझ passion काय होत हेच विसरलो. गेल्या कित्येक वर्षात मी कुठे गेल्याच मला आठवत नाही.मोबाईल मध्ये कॅमेरा असतो पण फोटोग्राफी माझा छंद होता हे मी विसरून गेलो. वाटायचं एखादी गोष्ट सोडण्यासाठी नोकरी का सोडावी? प्रमोशन, पैसा ऐश्वर्य हेच खरे समाधान मानत होतो. आणि खऱ्या सामाधानाची व्याख्या विसरत होतो.
अस्मिताने सर्व गोष्टी सांभाळल्या आहेत. पण आत कुठेतरी ती पण नाराज असेल ना? केवळ मुला बाळाना चांगले खाऊ पिऊ घातले म्हणजे कर्तव्य होते का रे? तुला सांगतो, या बँकेच्या नादात मी माझ्या मुलांना कधी वेळ दिला नाही. मुले मला कधी बोलत नाहीत. पण त्यांच्या मनात, अर्चनाच्या मनात काही येत नसेल.? मी घरी असून नसल्यासारखा असतो . आता रिटायर झाल्यावर भरपूर वेळ मिळेल पण मुल बिझी असतील. आयुष्याच्या या टप्प्यावर आल्यावर जे मिळवलं ते इतक अनाकर्षक का वाटावं हा प्रश्न मनात बऱ्याचदा येतो.”
दोन मित्र आपापल्या क्षेत्रात टोपला होते. पण तरीही आत कुठेतरी त्यांच्या मनात शल्य होत. दोघांनाही प्रश्न होता खर समाधान नेमक कशात होत ? का सुख समाधान या गोष्टी फसव्या असतात ? आणि आयुष्यभर त्या फसव्या गोष्टींच्या मागे लागण याला जीवन म्हणायचे ?
आकाश निरभ्र होते. चांदण्या लुकलुकत होत्या. चंद्राचा शीतल प्रकाश वातावरण आल्हाददायक करत होता. पण दोघांच्या मनातल शल्याचे वादळ मात्र शांत होत नव्हते.

सतीश गजानन कुलकर्णी
satishkulkarni2807@gmail.com
9960796019

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

छान लिहिले आहे.
शेवटून तिसऱ्या पॅरेग्राफ मधे चुकून अर्चना नांव झालं आहे का पहा.

होय निरुजी
धन्यवाद. तिथे अस्मिता हव आहे. ती टायपिंग मिस्टेक आहे.

कोणताही मार्ग स्वीकारला की त्या मार्गाचे फायदे- तोटे असणारच. प्रत्येकाची आपापली व्यथा असणारच. मस्त मांडणी केलेली आहे. कथा खूप आवडली.
नाव समर्पक आहे.