कहाणी पाच बोटांची

Submitted by SharmilaR on 6 September, 2021 - 00:27

कहाणी पाच बोटांची

अंगठ्याचा उपयोग, अंगठा म्हणजे......हाताचा अंगठा. पायाचा नाही. पायाच्या अंगठ्याचा उपयोग पूर्वी तरुण पोरी जमीन उकरयला करायच्या. पुढे घरांना फरशा आल्यावर पायाच्या अंगठ्याचा तो एकमेव उपयोग गेला. आणि पायांना अंगठे असतात, ह्याची जाणीव शाळेत गेल्यावर शिक्षक लोकं करून द्यायचे तेव्हाच व्हायची. गृहपाठ नं करता वर्गात गेलं की हमखास पायांचे अंगठे धरून उभे राहायला लागायचं. त्या दिवशी पायांचे अंगठे सोडून सर्व अवयव बोलायला लागायचे. आताच्या मुलांना पायांच्या अंगठ्याचा हा उपयोग उरला नाही. हं, तर हाताच्या अंगठ्याचा उपयोग लोकांना ठेंगा दाखवायला करायचा असतो हे ज्ञान आम्हाला होतं. ठेंगा दाखवणं म्हणजे.... “अडलय माझं खेटर.......”, “जा उडत.”, “ नाही करत जा.” असा होता. त्यात स्पष्ट नकार होता. बाणेदारपणा होता.

पण काळ बदलला तसं संगळच बदललं. तो ठेंगा गेला.... तो बाणेदारपणा गेला. नकार देण्याकरिता तो स्पेशली शिकायला लागतो, “हाऊ टू से नो” अश्या नावांची पुस्तकं वाचून. आता अंगठा दाखवणं म्हणजे, “सही !.... एकदम बरोबर.. मान्य आहे.... काम करतो/करते .....” असा झाला. त्यातही तो अंगठा व्हॉटसऐप वर दाखवला, तर पुढची सगळीच भांडणं मिटतात. अंगठा देण्याला महत्व. वरचा मेसेज नाही वाचला तरी चालतो. त्यामुळे अंगठे बहाद्दरांची पण आपोआपच सोय होते. जेव्हा अंगठा उभा नसतो तेव्हा तो टुकटुक मेसेज टाइप करण्यात, किंवा इकडचा माल तिकडे करण्यात मग्न असतो, लोकांनी अंगठे दाखवावे म्हणून.
एकलव्यला अमर केलं ते याचं अंगठ्याच्या गुरूदक्षिणेने. अंगठा नसतानाही पुढे त्याने इतर बोटांच्या मदतीने धनुर्विद्येत प्राविण्य मिळवलं अशी आख्यायिका आहे.

स्वत: अंगठा एकटा तर काम करतोच पण इतर बोटांच्या मदतीलाही जातो. तर्जनीला बरोबर घेऊन कधी दारात सुंदर रांगोळी काढतो तर कधी भांगेत “चिमूटभर सिंदूर” भरतो. राग आला तर कुणाला चिमटा घेतो आणि शांती मिळवण्याकरिता तर्जनीच्याच मदतीने ध्यान धारणा पण करतो.
“ मूर्ती लहान, पण किर्ती महान” श्रेणीत येणारा, प्रचंड कामसू असणारा.... प्रत्येक बोटाच्या मदतीला धावून जाणारा अंगठा, बाळाच्या तोंडात जाऊ नये म्हणून स्वत:कडे कडूपणा घेतो. अंगठा हे एकमेव बोट असं असेल, की ज्याच्या करता कुणी अंगठी बनवत नाही.

अंगठ्याजवळचं बोट तर्जनी. चार बोटांमध्ये सर्वात जास्त वापरली जाणारी. दुसर्‍यांकडे बोट दाखवणारी म्हणून खरं तर ती उगाच थोडी बदनाम झाली आहे. पण ती दुसर्‍यांकडे वळते, तेव्हा तीन बोटांना स्वत:कडे वळायला भाग पाडते. माणसाला दिशा दाखवते ती हीच. तिने बंदुकीचा चाप ओढल्यावरच खलनायकाचा नायनाट होतो. गालांवर ही ठेवून बसलं की विचारात गढल्याचा आभास निर्माण करता येतो. नको असलेल्या प्रश्न टाळायला ही क्रिया फारच उपयोगी ठरते. लहान बाळांना मोठ्या माणसांकडून पहिला विश्वास मिळतो, आधार मिळतो तो याच तर्जनीचा. आई बाबांच हेच बोट धरून मूल घराबाहेर पहिलं पाऊल टाकतं आणि हेच बोट पकडून पुढे ते मूल शाळेत जातं. आवडलेला पदार्थ चाटून पुसून साफ करायला पण तर्जनीचं जि‍भेच्या आधी पदार्थांचा आस्वाद घेते.

मधलं बोट सर्वांपेक्षा मोठं म्हणून दादागिरी गाजवून तसं निवांत राहतं. पण गरज पडेल तेव्हा सगळ्यात मोठा बळकट आधार ह्याच दादा बोटाचा असतो. बघा एखादी जड वस्तु उचलून... लहान बाळाला खेळवतांना अंगठ्याला हाताशी, नाही नाही ..... बोटाशी धरून ते चुटक्या वाजवतं. आणि चार टाळकी एकत्र आली की कैरम खेळायला बसतं.
हल्ली या मधल्या बोटाला बदनाम करायला हल्लीच्याच पिढीने सुरवात केलीय म्हणे. आणि अर्थ कळला नाही तरी छोटी पिढी त्यांचं अनुकरण करतेय.

करंगळी शेजारच्या बोटाचा, अनामिकेचा तोराच निराळा. शेजारी भालदार चोपदार असल्याशिवाय ती उभीच राहणार नाही. कामही तिचं विशेष महत्वाचं, देवाला गंध लावण्याचं. विवाह बंधनात बांधून घ्यायला अंगठीही हिच्याच अंगावर.
करंगळी बोटांमध्ये सर्वात छोटी. हिचीही मूर्ती लहान, आणि अंगकाठीही अंगठ्यापेक्षा बारीक. लहान असल्यामुळे तिला कामं जरा कमीच सांगितल्या जातात. कधीतरी इतरांच्या मदतीला तिला आमंत्रण मिळत. पण करंगळी नसती तर गट्टी फू कशी केली असती? आणि गट्टी नाही तर मग बट्टीची मजा तरी कशी येणार? वर्गात कंटाळा आल्यावर तर ती जास्तच उपयोगात येते. वर केली की पाच सात मिनिटांची सुट्टी सहज मिळवता येते. आपण गरीब मर्त्य मानव...... आपल्याला लहान बोटाचा एवढाच लहान उपयोग करता येतो. भगवान श्रीकृष्ण महान. एका करंगळीवर त्यांनी अख्खा गोवर्धन पर्वत उचलला.

हातांची ही पाच बोटं, प्रत्येकाचा आकार वेगळा, स्वभाव वेगळा पण गुण्यागोविंदाने सगळे एकत्र काम करतात. तेव्हा कुणी लहान नाही की कुणी मोठं नाही. तर अशी ही पाच बोटांची कहाणी....... पाचही बोटं तुपात असतात तेव्हा माणसाला स्वर्ग दोन बोटं उरतो. हीच पाच बोटं गालावर उमटतात तेव्हा थोबाडात लगावून देतात, गालावरून फिरतात तेव्हा हळुवार प्रेम देतात. केसं धरतात तेव्हा झिंज्या उपटतात, केसांतून फिरतात तेव्हा शांती देतात. एकाच वेळी उभी राहून जगाला दाखवतात तेव्हा अवलक्षण करून घेतात आणि एकत्र होऊन बंद होतात तेव्हा सव्वा लाखांची ठरतात.
--------------------

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

हाहा, छान लिहिलेय Happy

काल माझ्या मुलीने मला लग्नाची अंगठी करंगळीशेजारील बोटातच का घालतात हे सांगितले.
आधी नमस्कार केल्यासारखे दोन्ही हातांची बोटे एकमेकांशी जोडायला सांगितली. त्यानंतर दोन्ही हातांचे मधले बोट दुमडून तसेच एकमेकाशी जोडायला लावले. आणि मग त्या स्थितीत एकेक बोट विलग करायला सांगितले. सर्व बोटांच्या जोड्या विलग झाल्या पण त्या स्थितीत अनामिका विलग होत नाही. कारण ये बंधन तो प्यार का बंधन है Happy

छान लिहिलंय.
तर्जनीचं अजून एका दिवशी महत्त्व वाढतं, ते म्हणजे मतदानाच्या. त्या दिवशी सगळेजण तर्जनी दाखवत सेल्फी काढतात.
तसं पल्स पोलिओच्या वेळी मुलांना करंगळीवर ठिपका काढतात..

छान लिहिलंय.
वावे, तर्जनी सेल्फी मला पण आठवलं.