शेअर मार्केट म्हणजे जुगार........

Submitted by अतरंगी on 5 September, 2021 - 12:33

मी एक साधासुधा मराठी मध्यमवर्गीय, ज्याच्या कानावर लहानपणापासून शेअर मार्केट म्हणजे सट्टा, जुगार, ते आपले काम नाही, हेच  आलेले. साहजिकच त्यामुळे मी कायमच त्यापासून चार हात लांबच राहीलो. पण गेल्या काही वर्षांपुर्वी मी शेवटी मार्केट मधे यायचे धाडस केलेच आणि आता माझे हेच मत झाले आहे की शेअर मार्केट म्हणजे जुगारच....

आपल्या सारख्यांसाठी, रिटेलर्ससाठी.

आपण ट्रेडिंग करतोय/मार्केट मधे गुंतवणूक करतोय तीच जुगार खेळल्यासारखी. मार्केट मधून पैसे कमावण्यासाठी जेवढे ज्ञान असायला हवे त्यातले १% तरी आपल्याकडे आहे का? आपण मार्केटमधून पैसे कमावू शकू याची शक्यता कितपत आहे?

मार्केट मधे आल्या पासून मी एक गोष्ट सातत्याने ऐकत आहे की फक्त ४ ते ५% लोकच ट्रेडिंग मधे यशस्वी होतात. आपल्या पैकी बर्‍याच लोकांनी हे ऐकले असेलच. डे ट्रेडिंग तर तसेही बदनामच आहे.  पण मी माझ्या ओळखीच्या Buy and Hold करणार्‍या गुंतवणूकदारांना पण विचारले की त्यांना  आज पर्यंत किती वर्षे गुंतवणूक करुन नक्की किती CAGR मिळाला? मला आजपर्यंत एकही सामान्य गुंतवणूकदार/ ट्रेडर भेटला नाही की जो  त्याला मिळालेले रिटर्न खात्रीने सांगू शकेल किंवा त्याचे रेकॉर्ड दाखवू शकेल.

माझ्या मते मार्केट मते  मोठ्या प्रमाणात survivorship bias आहे. सगळे जण चांगले रिटर्न दिलेल्या स्टॉक्सबद्दल, यशस्वी झालेल्या ट्रेडर्स, गुंतवणूकदारांबद्दल लिहित असतात. ज्याच्याकडे बघून आपल्यासारखे लोक मार्केट मधे पैसे गुंतवत असतात. फार कमी लोक आहेत की जे सामान्य गुंतवणूक दारांना जागृत करण्याचे काम करत असतात.  मार्केट मधे असलेल्या रिस्क समजावून सांगत असतात.

नितीन कामथ ने एका लेखात लिहिल्याप्रमाणे तीन वर्षां पेक्षा जास्त कालाव धी मधे फक्त १% टक्के अ‍ॅक्टिव्ह ट्रेडर फिक्स्ड डिपॉझिट पेक्षा जास्त रिटर्न कमावू शकतात. त्यांनीच केलेल्या एका ट्विट नुसार एखाद्या ट्रेडरचा (ब्रोकरेज आणि टॅक्सेसमुळे) ब्रेक ईव्हन पॉईंटच २०% टक्के असतो. म्हणजे  ट्रेडरला नफ्यात राहण्यासाठी वर्षाला २०% पेक्षा जास्त रिटर्न कमवणे गरजेचे आहे. आजमितीला भारतात चार साडेचार हजार स्टॉक लिस्टेड आहेत पण मागील दशकात त्यातले फक्त ३०० ते ४०० म्हणजे फक्त १०% स्टॉक्स १०% पेक्षा जास्त CAGR देऊ शकले आहेत. हे सगळे नंबर्स बघितले की जाणीव होत राहते की मार्केट मधून पैसे कमावणे किती अवघड आहे.

मी पाहिलेला एका सामान्य गुंतवणूकदार/ ट्रेडर चा प्रवास बर्‍यापैकी सारखा आहे. आपण गुगल करुन चांगल्या वेबसाईट्स शोधून त्यावर वाचन करायला सुरुवात करतो, युट्युब चॅनल बघतो, कुठेतरी छोटे मोठे क्लास  करतो. त्यातून  आपण कँडलस्टिक,  चार्ट पॅटर्न, ईंडिकेटर्स शिकतो. त्यात  टार्गेट कसे काढायचे, स्टॉप लॉस कुठे ठेवायचा, रिस्क रिवॉर्ड  रेशिओ कसा ठरवायचा हे सगळं शिकतो आणि सुरुवात करतो. नंतर अनेक जण  वेगवेगळ्या पद्धती शिकून, अ‍ॅडव्हान्स क्लासेस करुन अजून  प्रगती करतात.  माझा पण प्रवास असाच काहीसा सुरू झाला. फंडामेंटल अ‍ॅनेलेसिस करणारे थोड्या वेगळ्या प्रवासातून जातात. फंडामेंटल अ‍ॅनेलेसिस चे जास्त ज्ञान नसल्याने जास्त लिहू शकत नाही.

पण मला एक प्रश्न सारखा सतावतो.
कशावरुन हे सगळं खरं आहे?  कशावरुन कँडल्स्टीक, चार्ट पॅटर्न, ईंडिकेटर्स, व्हॅल्यू ईन्व्हेस्टिंग वापरुन नफा होतो? मी का यावर विश्वास ठेवावा? कोणी एक सो कॉल्ड यशस्वी ट्रेडर, गुंतवणूकदार सांगतो म्हणून? काय पुरावा की तो खरे बोलत आहे? त्याने सांगितलेले सगळे मी जसेच्या तसे केले तरी मला नफा होईल याची शाश्वती काय? शाश्वती तर जाऊ द्या शक्यता किती आहे ते तरी माहित आहे का? मी दोन मिनिटे खरे मानतो की त्याने ती पद्धत वापरुन पैसे  कमावले असतील. पण मार्केट हे  कायम बदलत असते, नवनविन गोष्टी घडत  असतात. जी गोष्ट मागच्या दहा पंधरा वर्षात घडली ती पुढच्या दहा पंधरा वर्षात पण घडेलच याची शक्यता किती आहे?

एखाद्या प्रकारे गुंतवणूक करुन आपल्याला किती रिटर्न मिळायची शक्यता आहे, किंवा गेला बाजार आपल्याला मागील काही वर्षात किती रिटर्न मिळालेले आहेत,  हे माहित नसताना पैसे गुंतवत राहणे हे अंधारात तीर मारण्यासारखे आहे.

सामान्य गुंतवणूकदार/ ट्रेडर ईतक्या बिनधास्तपणे पैसे घेऊन मार्केट मधे ऊतरत असतात त्याचे कारण कदाचित त्यांची मानसिकतेत असावे. एकतर आपल्यातले फार कमी जण पुर्णवेळ मार्केटला देणारे असतात.  आपले ब्रेड अँड बटर त्यावर अवलंबून नसते. शिवाय आपण गुंतवले ली रक्कम ईतकी पण मोठि नसते की ती बुडाल्याने आपल्या गळ्यापर्यंत पाणी येईल. जे उगीच भलत्या रिस्क घेउन जे लिव्हरेज वापरुन आंधळे पणाने FNO, डे ट्रेड मधे पैसे मोठी पोझिशन घेतात  त्यांची एक चूक त्यांना कर्जबाजारी करु शकते. पण जे कॅश सेगमेण्ट मधे ट्रेड करतात आणि ते पण डिलिव्हरी बेस्ड त्यांना जरा तरी रिस्क कमी आहे. पैसे गेले तरी त्यामानाने कमी जातात.  त्यामुळे कदाचित आपण या बाबतीत फार खोलात जाऊन अभ्यास करत नाही. आपण शेअर मार्केट मधील गुंतवणूकी विषयी ईतके सिरियस नसतो.

असे समजा एखाद्याला थोडीफार रक्कम टाकून लॉटरी  काढायची असेल, विमा काढायचा असेल, जुगार खेळायचा  असेल तर तो फार खोलात जात नाही. पैसे बुडालेच तरी फार काही बिघडत नाही. पण समजा जर तुम्हाला करोडो रुपये खर्चून  विमा कंपनी काढायची असेल, कॅसिनो चालू करायचा असेल तर ? तर किती अभ्यास करायला लागेल याचा विचार  करुन पहा. आपण जेव्हा गुंतवणूकीकडे, ट्रेडींग कडे या पद्धतीने पहायला लागतो तेव्हा आपला अ‍ॅप्रोच पुर्ण पणे बदलतो.  मोठ्या प्लेअर्सचा मार्केट मधला अ‍ॅप्रोच आणि आपला अ‍ॅप्रोच यामधे हा महत्वाचा फरक आहे. अ‍ॅप्रोच एवढाच फरक आपल्या आणि त्यांच्या रिसोर्सेस मधे आहे.

Institutional Investors/ मोठमोठ्या प्लेअर्स कडे आपल्यापेक्षा कैक पटीने हुशार, qualified, Financial market चे ज्ञान असलेले लोक आहेत, अत्यंत हुशार mathematician, statistician आहेत. त्यांच्याकडे कैक वर्षांचा financial instruments चा historical data आहे. त्या डेटाच्या आधारे वेगवेगळे अ‍ॅनेलेसिस करुन सेट अप तयार करु शकतील असे अनुभवी लोक आहेत. मार्केट संबंधित प्रत्येक माहिती आपल्या आधी ते अ‍ॅक्सेस करु शकतात. एखादा ट्रेड घेण्याआधी आपण केलेला अभ्यास आणि त्यांनी केलेला अभ्यास यात जमिन अस्मानाचा फरक आहे. मोठे प्लेअर्स कोणत्या पद्धतीने ट्रेडींग करतात आणि एखादी स्ट्रॅटेजी डिप्लॉय करायच्या आधीची त्यांची प्रोसेस काय आहे हे आपण पुढे पाहूच.

वर लिहिल्याप्रमाणे जर एखाद्या प्रकारे गुंतवणूक करुन आपल्याला किती रिटर्न मिळायची शक्यता आहे, किंवा गेला बाजार आपल्याला मागील काही वर्षात किती रिटर्न मिळालेले आहेत,  हे माहित नसताना पैसे गुंतवत राहणे हे अंधारात तीर मारण्यासारखे आहे. मोठमोठ्या प्लेअर्सकडे आजमिती पर्यंत जे बेनिफिट होते ते आज आपल्या सारख्या रिटेलर्स साठी उपलब्ध आहेत. टिक डेटा असो की फंडामेंटल डेटा आज आपण तो विकत घेऊ शकतो. अनेक जणांना प्रोग्रॅमिंग लँग्वेज येतात त्या वापरुन वेग्वेगळ्या स्ट्रॅटेजीज बॅकटेस्ट करणे शक्य आहे. Quantitative Analysis शिकून त्या आधारे ट्रेडिंग/ गुंतवणूक करणे हा जास्त सुरक्षित मार्ग आहे. Quantitative Analysis कसा करायचा हे सुद्धा आपण पुढील भागात पाहू.

पण या भागात जाता जाता शेवटी एक छोटेसे ऊदाहरण घेऊ.
समजा तुमच्या समोर दोन व्यक्ती आहेत.

पहिली व्यक्ती म्हणत आहे की मी मागची २५ वर्षे रेडिमेड कपड्यांचा व्यवसाय करत आहे. कपड्यांच्या व्यवसायात भरपुर नफा होतो. जीन्स आणि टि शर्ट ची दुकाने कॉलेज च्या आसपास भरपुर चालतात. मुंबईच्या होलसेल मार्केट मधून माल ऊचलायचा आणि पुणे, नाशिक, कोल्हापुर मधे विकायचा. फार छान व्यवसाय आहे.

दुसरी व्यक्ती म्हणत आहे की मी अनेक वर्षे रेडिमेड कपड्यांचा व्यवसाय करत आहे. माझ्याकडे गेल्या २० वर्षांचा रेडिमेड कपड्यांच्या विक्रीचा डेटा आहे. गेल्या २० वर्षात रेडिमेड कपडे विकून २९.५८% सरासरी नफा मिळाला आहे. दरवर्षी रेडिमेड कपड्यांची मागणी सरासरी १८% ने वाढत आहे. जी दुकाने कॉलेज पासून १ किमी परिघात आहेत त्यांची विक्री सरासरी पेक्षा ३८.६३% जास्त आहे. दरवर्षी एप्रिल, मे, नोव्हेंबर या तीन महिन्यात विक्रित ४३% घट निदर्शनास आलेली आहे. रेडिमेड कपड्यांची फॅशन त्यातले पॅटर्न साधारण ५ ते ६ वर्षांनी बदलत आहेत.
दुकानाचे भाडे, कामगारांचे पगार, टॅक्स, पॅटर्न बदलल्यावर लावावा लागणार्‍या सेल मधले नुकसान हे सर्व वजा केल्यावर १९.१८% सरासरी नफा राहतो. जर एप्रिल, मे मधे सुती कपडे आणि ऑक्टोंबर, नोव्हेंबर मधे सणासुदीला, लग्नांना वापरायचे कपडे विकायला ठेवल्यास ८ ते ९% नफा वाढू शकतो.

या दोन व्यक्तीमधील कोणत्या व्यक्तीने पद्धतशीर अभ्यास केला आहे? तुम्ही कोणाच्या सोबत व्यवसाय केल्यास तुम्हाला नफा व्हायची शक्यता जास्त आहे? तुम्हाला जर रेडीमेड कपड्यांचा व्यवसाय करायचाच असेल तर तुम्ही कोणाचे मार्गदर्शन घ्याल?

युट्युब वरचे शेअर मार्केट वरचे बहुतांश व्हिडिओ, गल्लोगल्ली चालणारे शेअर मार्केटचे क्लासेस त्यात शिकवणारे गुरु हे पहिल्या प्रकारच्या व्यक्तींसारखे आहेत. मी असे म्हणत नाही की त्यांना ज्ञान नाही, ते यशस्वी नाहित किंवा त्यांनी नफा कमावलेलाच नाही. पण ते जे काही शिकवत आहेत त्याचे बॅकटेस्टेड रिझल्ट, त्याचे प्रॉपर अ‍ॅनेलेसिस त्यांना तरी ठाऊक आहे की नाही याविषयी मी साशंक आहे.

आपण जेव्हा जेव्हा मार्केट मधे पैसे गुंतवतो तेव्हा समोर एक आपल्या पेक्षा ज्ञान, माहिती, ईन्फ्रास्ट्रक्चर, कंप्युटींग पॉवर या सर्व बाबतीत आपल्यापेक्षा अतिशय वरचढ, आपल्यापेक्षा मुरलेला असा प्रतिस्पर्धी आहे. आपण जर त्याच्या ईतका अभ्यास करुन मार्केट मधे ऊतरणार नसू तर आपल्यासाठी शेअर मार्केट हा एक जुगारच आहे, सट्टाच आहे.

   
   
 

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चांगला लेख, पण वाचून टेन्शन आलं. Happy आता लेव्हरेज कमी झालं त्याने तर दर तीन महिन्यांनी मार्केट संपूर्ण बदलत गेलं. रिटेलरला ऑप्शन बाईंगशिवाय दुसरा पर्याय नाही.

इथे कोणाला Portfolio Management Services च्या माध्यमातून गुंतवणुकीचा काही अनुभव असेल तर वाचायला आवडेल.

छान लेख.

पण
एका ट्विट नुसार एखाद्या ट्रेडरचा (ब्रोकरेज आणि टॅक्सेसमुळे) ब्रेक ईव्हन पॉईंटच २०% टक्के असतो. >> हे मात्र नाही कळले.
ब्रोकरेज, टॅक्सेस (ट्रेंडिंग डिमॅट अकाऊंटची वार्षिक फी धरून) एवढे जास्त नसतात. (IT/LTCG/STCG वगळून तुलना करत आहोत अशी अपेक्षा कारण इतरत्र गुंतवणूकितही तो असेलच.)

छान लेख.

आपण जेव्हा जेव्हा मार्केट मधे पैसे गुंतवतो तेव्हा समोर एक आपल्या पेक्षा ज्ञान, माहिती, ईन्फ्रास्ट्रक्चर, कंप्युटींग पॉवर या सर्व बाबतीत आपल्यापेक्षा अतिशय वरचढ, आपल्यापेक्षा मुरलेला असा प्रतिस्पर्धी आहे.
>>>>>>
आपण या प्रतिस्पर्धी (Big investor) च्या पाऊलखुणा ओळखून त्याप्रमाणे पुढे गेलो तर?

पुभाप्र.

लेखातील सर्व विधानांना मम !

survivorship bias बरोबरच self reporting bias हाही महत्त्वाचा आहे. ज्या हौशी इन्वेस्टर चे लाखाचे बारा हजार झाले आहेत तो गपगुमान बसतो, आपली टिमकी वाजत नाही. पण ज्याच्या बारा हजाराचे लाख झाले तो मात्र जिकडे तिकडे सांगत फिरतो. मटक्यात जो कफल्लक झाला तो अनमिकच रहातो, पण संकेश्वर च्या एकाला पंधरा हजाराची डबल कशी लागली व एजंट ने पेमेंट गावी जाऊन कसे दिले व बरोबर एक सोन्याची सखळी कशी भेट दिली याच्या खमंग चर्चा अड्ड्यावर वर्षानुवर्षे रंगतात.

Efficiant Market Hypothesis वरचे लेख वा Fooled by Randomness, Random walk down the wall street वगैरे पुस्तके वाचावीत.

मिरजेत रहात असताना तिथल्या मटका बाजाराचे सूक्ष्म निरिखण केले आहे व गेली कित्येक वर्षे न्यूयॉर्क च्या नामांकित हेज फंडस मध्ये काम करतानाही निरिक्षण केले आहे. माणसे इथून तिथून सारखीच. असो यावर फार लिहित नाही .

कॅलिफोर्निया च्या गोल्ड रश मधे सोन्याच्या आशेने धावणारे सारेच श्रीमंत झाले नाहीत पण त्यांना जीन्स , हातोडे, दारू वगैरे विकणारे झाले.

> Quantitative Analysis शिकून त्या आधारे ट्रेडिंग/ गुंतवणूक करणे हा जास्त सुरक्षित मार्ग आहे.

हेही क्षेत्र फार पुढे गेले आहे. सामान्य गुंतवणुकदारांना आवाक्या बाहेर असलेली पॉवर फुल मशीन्स, फास्ट डेटा ई ई वापरले जातात. एक सामान्य गुंतवणुकदार हे सारे करू शकेल ?

कमीत कमी एक्स्पएन्स रेशो असलेली ब्रोड मार्केट इन्देक्स फंद्स घेणे व धरून ठेवणे.

हे मात्र नाही कळले.
ब्रोकरेज, टॅक्सेस (ट्रेंडिंग डिमॅट अकाऊंटची वार्षिक फी धरून) एवढे जास्त नसतात. >>>

मानवदा, ब्रोकरेज हे सेपरेटली न बघता, ब्रोकरेजचा तुमच्या कॅपिटलवर होणारा परिणाम लक्षात घ्या. तुम्हाला नफा होवो की तोटा ब्रोकरेज हे द्यायचेच आहे. तुम्हाला एकदा तोटा झाला की तुमचे कॅपिटल तुम्हाला झालेला तोटा आणि ब्रोकरेज एवढे कमी होते. मग तुम्ही जेव्हा पुढचा ट्रेड घेता तेव्हा तुमचा नफा तोटा हा तुमच्याकडे असलेल्या कॅपिटल वर होतो. हे compounding सारखे वाढत जाते आणि मग ब्रोकरेज चा परिणाम लक्षात येतो. ट्रेडिंग फ्रिक्वेन्सी जितकी जास्त तितका हा ईफेक्ट जास्त.

मी गेले काही महिने अनेक बॅकटेस्ट केल्या आहेत, त्यात मला तरी सगळीकडे नितिन कामथ च्या स्टेटमेंटला सपोर्ट करणारीच निरिक्षणे मिळाली आहेत. अतिशय आकर्षक वाटणारे स्ट्रॅ टेजी रिटर्न्स हे ब्रोकरेज अ‍ॅड केल्यावर निम्म्याने कमी झालेले दिसतात.

टेक्निकल ऍनॅलिसीस हे मला तरी पत्रिका बघुन भविष्य सांगणाऱ्या प्रकारासारखे वाटले. त्याला "टेक्निकल" हे नाव का दिले कुणास ठाऊक.

पण दोन्हीत एक फरक आहे. हे सगळ्यांना शिकवत असल्याने आता अमुक अमुक पॅटर्न आला म्हणजे (उदा. डबल बॉटम) स्टॉक वर जाणार म्हणुन सगळे तो स्टॉक घ्यायला सुरुवात करतात. मग स्टॉक वर जाऊ लागलेला दिसतो, जे केवळ डबल बॉटम नको - रिव्हर्सल इंडिकेटर्स ट्रीगर झाले की घेऊ अशी दक्षता घेतात त्यांचे इंडिकेटर्स ही ट्रीगर होतात आणि ते पण एन्ट्री घेतात आणि स्टॉक अजून वर जातो. पण FII/DII/इतर मोठे फ़ंड हाऊस यांनी त्यामध्ये रिएंट्री केल्याशिवाय तो काही वधारत नाही, मग इन्ट्राडे / स्विंग ट्रेडर्स मिळेल ते पदरात पाडून घेऊन बाहेर पडतात, स्टॉक खाली येतो.
पण आता त्या स्टॉकच्या इतिहासात एक पॅटर्न तयार झालेला असतो. पुढचे जे लोक जुना चार्ट बघतात त्याना दिसतं डबल बॉटमला स्टॉक इथेही वर जातच होता (सांगितलेलं भविष्य बरोबरच होतं), पण सस्टेन नाही झाला (त्याला अमुक तमुक कारण), म्हणजे टेक्निकल ऍनॅलिसिस वर्क्स असा निष्कर्ष काढल्या जातो.

अर्थात कुठलाही पॅटर्न असला तरी त्यानंतर स्टॉक वर तरी जाईल किंवा खाली तरी (काही काळ तिथेच राहू शकतो, ती शक्यता बाजुला ठेवू) म्हणजे ५०% प्रॉबॅबिलिटी असते. त्यात पॅटर्न फॉर्म झाला म्हणुन एन्ट्री घेणारे लोक असल्याने अपेक्षित दिशेने जाण्याची प्रोबॅबिलिटी जरा वाढते (जी तात्पुरती असू शकते) एवढेच.

Submitted by अतरंगी on 6 September, 2021 - 10:47 >>> ओके, आले लक्षात, पटले.
धन्यवाद.

आपण या प्रतिस्पर्धी (Big investor) च्या पाऊलखुणा ओळखून त्याप्रमाणे पुढे गेलो तर?>>>

प्रयत्न करुन पहा. मार्ग सापडू शकतो. अवघड आहे पण अशक्य नाही. एखाद्यला प्रोग्रॅमिंग येत असेल, मशिन लर्निंग, AI चे ज्ञान असेल तर जमू शकेल.

Efficient Market Hypothesis वरचे लेख वा Fooled by Randomness, Random walk down the wall street वगैरे पुस्तके वाचावीत.>>>
Efficient Market Hypothesis, Random walk down the wall street बद्दल वाचले आहे. Fooled by Randomness हे शोधून वाचतो.

सामान्य गुंतवणुकदारांना आवाक्या बाहेर असलेली पॉवर फुल मशीन्स, फास्ट डेटा ई ई वापरले जातात. एक सामान्य गुंतवणुकदार हे सारे करू शकेल ?>>>

सद्यस्थितीत भारतात शक्य आहे. भरपुर ब्रोकर्स API देत आहेत. अल्गो ट्रेडींगची फॅसिलीटी देत आहेत.
फक्त HFTs ज्या प्रकारे कोलोकेशन सर्व्हर घेऊन टिक डेटा वर, ऑर्डर बूक वर ट्रेड घेतात तसे अवघड आहे. कारण ते फारच महागडे प्रकरण आहे.

कमीत कमी एक्स्पएन्स रेशो असलेली ब्रोड मार्केट इन्देक्स फंद्स घेणे व धरून ठेवणे.>>>

मी पण आता याच मताचा होत चाललो आहे. फक्त ब्रॉड मार्केट ईंडेक्स पेक्षा माझा कल स्मार्ट बिटा ईंडेक्स कडे आहे.

रिटेल ईन्व्हेस्टर्स वापरत असलेल्या अनेक स्ट्रॅटेजी मी बॅक टेस्ट करत आहे, पण अजून तरी २५ ते ३०% CAGR पेक्षा जास्त परतावा देणारी स्ट्रॅटेजी मला मिळाली नाही. जर ईंट्राडे करुन पण २०-२५% CAGR च मिळणार असेल तर मग Nifty 200 Momentum 30, Nifty Alpha Low Volatility 30 मधे पैसे टाकून निवांत राहणे कधीही ऊत्तम.

सामान्य गुंतवणूकदार/ ट्रेडर ईतक्या बिनधास्तपणे पैसे घेऊन मार्केट मधे ऊतरत असतात त्याचे कारण कदाचित त्यांची मानसिकतेत असावे. एकतर आपल्यातले फार कमी जण पुर्णवेळ मार्केटला देणारे असतात. आपले ब्रेड अँड बटर त्यावर अवलंबून नसते. शिवाय आपण गुंतवले ली रक्कम ईतकी पण मोठि नसते की ती बुडाल्याने आपल्या गळ्यापर्यंत पाणी येईल. >>>>> हे खुप पटलं
खुपच छान लेख. Happy

तसा माझा मार्केटचा अनुभव प्रचंड वगैरे नाही पण काही गोष्टी नमूद कारेन
१. इथे गुंतवणूकदार आणि ट्रेडर ना "गुंतवणूकदार/ट्रेडर" असे दर्शविले आहे पण दोघांचा दृष्टिकोन मात्र खूप वेगळा असतो असे मला वाटते.
गुंतवणूकदार एखाद्या उद्योगामध्ये काहीतरी कारणास्तव पैसे 'गुंतवत' आहे कदाचित त्याला त्या उद्योगसमूहावर किंवा क्षेत्रावर भरवसा असेल आणि तो बराच काळ त्या व्यवसायाचा छोटा हिस्सेदार राहण्यास उत्सुक असेल, त्यात चढ-उतार आलेच पण ट्रेडर मात्र तिथे केवळ 'खरेदी/विक्री' करून 'नफा' कमावण्यासाठी आहे.(माझे निरीक्षण, चुकीचे देखील असू शकते)

२. गुतवणूकदार जर मध्यमवर्गीय असेल तर शक्यतो त्याचा स्वतःचा काही उद्योग किंवा नोकरी असणारच आणि त्या सोबतीला तो/ती भविष्यात 'अधिक' परतावा मिळावा म्हणून रक्कम गुंतवत आहे. आता हे 'अधिक' म्हणजे नक्की किती याबाबत प्रत्येकाच्या अपेक्षा असू शकतात पण किमान फिक्स्ड डेपोसिट पेक्षा किंवा महागाई दरापेक्षा जास्त परतावा मिळण्याची अपेक्षा हि असतेच!
त्यामुळे त्याला मार्केटचा पूर्णवेळ अभ्यास घराण्याची गरज वाटत नाही. ते चार्ट analysis वगैरे तर दूरच्या गोष्टी.

३. आता जर गुंतवणूकदारांच्या बद्दल बोललो तर त्यांच्यात मुळात "धीर धरणे" हा अंगभूत गुण आवश्यक आहे असे मला तरी वाटते. म्हणजे गुंतवणूक करताना तुम्ही जर विचार करून एखाद्या चांगल्या कंपनीचे भागधारक झाला असाल तर पुढच्या मार्गात चढ-उतार हे येणारच आपल्या निर्णयावर ठाम तरी राहणे यावेळी आवश्यक ठरते . निदान बऱ्यापैकी लार्ज कॅप कंपन्यांसाठी हे लागू होते आणि ४-५ वर्षानंतर १०-१२% CAGR तर मिळू शकतात जे कि इतर कुठल्याही गुंतवणूक साधनांपेक्षा जास्तच आहेत.

४. जर आपण वॉरेन आजोबांच्या "next generation will lead a much better life than their parents." या निरीक्षणाशी सहमत असू तर १० ते १५ वर्षांसाठी मार्केट मध्ये 'गुंतवणूक' करणे मला तरी जुगार वाटत नाही. कॅल्क्युलेटेड रिस्क म्हणता येईल कारण आपण एखादा संपूर्ण उद्योग उभा करून वाढवण्याऐवजी, जो उद्योग आतापर्यंत चांगल्या रीतीने हाताळला गेला आहे तो भविष्यात वाढण्याची 'शक्यता' नक्कीच जास्त आहे.

आता मी देखील मार्केट मध्ये जवळपास ४ च वर्षांपासून आहे पण सुरुवात SIP ने केली आणि ४ वर्षात कधीही थांबविली नाही, covid मध्ये "-५०%" परतावा दिसत असून सुरु ठेवली आता जवळपास ७०% mutual फंड चे रिटर्न आहेत. पुढे मार्केट पडल्यावर पुन्हा कमी होतील पण तुमचं 'लक्ष्य' काय आहे त्यावर 'रिस्क' कमी जास्त करता येऊ शकते.
जी गोष्ट म्युच्युअल फंड ची तीच स्टॉक च्या बाबतीत झाली आहे.

त्यामुळे मला तरी वाटते कि जर तुम्हाला लांबच्या भविष्यात चांगला परतावा हवा असेल आणि धीर धरण्याची क्षमता असेल तर मार्केट तो देऊ शकते अर्थात जर 'हाव' अधिक झाली आणि केवळ "MultiBagger" स्टॉक शोधायची खटपट सुरु झाली कि पुढच्या गोष्टी अनिश्चित होतात असे मला तरी वाटते.

जर गरज लांबची असेल तर इंडेक्स फंड तर सगळ्यात निर्धोक वाटतात.

गुंतवणूकदार आणि ट्रेडर यांच्या दृष्टिकोन वेगळा असतो हे मान्यच.

जितकी छोटी टाईमफ्रेम तितकी रिस्क जास्त.

निदान बऱ्यापैकी लार्ज कॅप कंपन्यांसाठी हे लागू होते आणि ४-५ वर्षानंतर १०-१२% CAGR तर मिळू शकतात>>>
भविष्यात वाढण्याची 'शक्यता' नक्कीच जास्त आहे.>>>>
ही जी वाक्ये आहेत ती मी लेखात लिहिलेल्या रेडिमेड कपड्याचा व्यवसाय करणार्‍या पहिल्या व्यक्तीसारखी आहेत.

लार्ज कॅप घ्यायचा हे ठिक आहे पण निफ्टी५० हे लार्ज कॅप ५० स्टॉक आहेत. त्यातला कोणता लार्ज कॅप घ्यायचा? कधी घ्यायचा, कधी विकायचा?
त्याचे नियम लिहायला हवेत.
नंतर ब्रोकरेज, टॅक्सेस जाऊन किती नफा शिल्लक राहिला? IT/LTCG/STCG हे पण पहायला हवे. ते सगळे वजा करुन किती नफा मिळतो हे बघायला हवे.
२० वर्षात एखाद्याने सातत्याने वरचे सर्व नियम पाळून लार्ज कॅप मधे गुंतवणूक केली असती तर त्याला आजमितीला किती रिटर्न मिळाले असते हे कॅल्क्युलेट करुन मग असे स्टेटमेंट करता येईल.

हे सगळे माहित नसताना आपण जी स्टेटमेंट करु, त्यावर विश्वास कशाच्या जिवावर करायचा?

गुंतवणूकदार असो की ट्रेडर, तो जे काही करत आहे ते पुढचे २०-३० वर्षे केल्याने त्याला नफा होणार आहे का? त्याची शक्यता किती आहे? निदान फिक्स्ड डिपॉझीट पेक्षा जास्त रिटर्न मिळतील का? का मिळतील ? कशावरुन मिळतील? त्याची विदा कुठे आहे.

I have been investing thru SIP since 2009. My current XIRR is close to 20%. One should not try to time the market.

नुसते शेअर मार्केटच कशाला, अख्खे आयुष्य म्हणजे जुगार.

लेखकाला नक्की काय म्हणायचे आहे, मूळ मुद्दा काय आहे, तेच कळले नाही.

रिटेल ईन्व्हेस्टर्स वापरत असलेल्या अनेक स्ट्रॅटेजी मी बॅक टेस्ट करत आहे, पण अजून तरी २५ ते ३०% CAGR पेक्षा जास्त परतावा देणारी स्ट्रॅटेजी मला मिळाली नाही. जर ईंट्राडे करुन पण २०-२५% CAGR च मिळणार असेल तर मग Nifty 200 Momentum 30, Nifty Alpha Low Volatility 30 मधे पैसे टाकून निवांत राहणे कधीही ऊत्तम. >> म्हणजे काय?. २५ ते ३०% नक्की रिटर्न देणारी अशी काही स्ट्रॅटेजी असेल तर त्याबद्दल डिटेल लिहा, वाचायला आवडेल.
मलाही आधी टेक्निकल अ‍ॅनॅलिसिस मूर्खपणा वाटायचे. आता नाही. अगदी थोड्या मायक्रो (जास्तीत जास्त २-३ दिवस) कालावधीसाठी वापरल्यास आणि ठरवलेले नियम पाळल्यास फायदा होतो अस मला वाटत. (पण हे नियम पाळण अवघड असत. Happy )
स्वतः किती शहाणे समजतो व तितके आहोत का हेही बघायला मिळते. Happy

शेयर मार्केट मधे वावरल्याचा ( म्हणजे अगदी किरकोळ) मला एक मात्र फायदा झालाय. मी घासाघीस करायच सोडलय. नेहमी अस वाटत, अरे २० रूपयांसाठी काय घासाघीस करायची. तेवढे तर आपण एखा सेकंदात घालवतो किंवा मिळवतो. Happy

<< रिटेल ईन्व्हेस्टर्स वापरत असलेल्या अनेक स्ट्रॅटेजी मी बॅक टेस्ट करत आहे, >>
Analysis paralysis

<< २५ ते ३०% नक्की रिटर्न देणारी अशी काही स्ट्रॅटेजी असेल तर त्याबद्दल डिटेल लिहा, >> Rofl
हे कनसिस्टंटली, वर्षानुवर्षे करणे खूप कठीण आहे, जवळपास अशक्य. अपवाद आहेत, उदा. Jim Simons आणि समजा हे कुणाला जमत असेल तर तो इतरांना कशाला सांगायला जाईल?

<< मलाही आधी टेक्निकल अ‍ॅनॅलिसिस मूर्खपणा वाटायचे. आता नाही. >> मला आधीही ते मूर्खपणा वाटायचे आणि आताही वाटते. पण कुणाला तो जुगार खेळून फायदा होणार असेल, तर हरकत नाही. इतरांना पण त्यातून काही शिकता येईल. मला तरी ती शक्यता वाटत नाही.

<< २५ ते ३०% नक्की रिटर्न देणारी अशी काही स्ट्रॅटेजी असेल तर त्याबद्दल डिटेल लिहा, >> Rofl
हे कनसिस्टंटली, वर्षानुवर्षे करणे खूप कठीण आहे, जवळपास अशक्य. अपवाद आहेत, उदा. Jim Simons आणि समजा हे कुणाला जमत असेल तर तो इतरांना कशाला सांगायला जाईल?>>>>> यात हसण्यासारखं काय आहे? आमचा ग्रुप आहे त्यावर त्यांनी हि स्ट्रॅटेजी डिस्कस केले.

शेअर मार्केट ही जत्रा आहे
नवख्या लोकांनी साधे सोपे प्रयोग करावेत

1. आयपीओ भरणे

नवीन कम्पनी लॉन्च होताना किंवा जुन्याचे भाग भांडवल वाढवताना आयपीओ निघतात
रिटेल मनुष्य 2 लाख रु गुंतवू शकतो , हे लिमिट काळानुसार बदलत असते, चेक करावे
शेअर अलोट झाले की लिस्टिंग ला विकून टाकावेत , 2000 तरी मिळतात,
मग पुढचा आयपीओ , वर्षातून 4,5 गावले तरी 8,10 हजार नफा,
कुणाला न विकता ठेवावेत वाटले तर त्याची मर्जी

2. सेकंडरी मार्केट
पूर्वी मा वसंत पटवर्धन म्हणून तज्ञ पेपरात लिहीत असत, त्यांचे शेअर 3,6 महिन्यात चांगले वाढायचे, मग विका पुन्हा दुसरे घ्या, मनी कंट्रोल , व्हॅल्यू नोट्स.कॉम , एकोनोमोक टाइम्स मधूनही अशा बातम्या मिळतात, काही ब्रोकरदेखील sms पाठवतात, पण ज्याची त्याची रिलायबलिटी चेक करून बघावी.

3. चांगले शेअर कायम स्वरूपी घेऊन ठेवणे व न विकणे

4. फ्युचर ट्रेडिंग , भयानक रिसकी , काय समजत नाही

5. ऑप्शन ट्रेडिंग , थोडेफार ठोकताळे अभ्यासाने जमतात, यावर इथे स्वतंत्र ठिकाणी चर्चा सुरू आहेत.

6. इन्ट्रा डे - हेही भयानक रिस्की आहे, मला तरी समजत नाही

याखेरीज शेअर मार्केटात अजून 4 प्रकारचे लोक पैसे मिळवतात

1. ब्रोकर
2. शेअर मार्केटमध्ये रोज टिपा देणारे लोक
3. शेअर मार्केटवर पुस्तके लिहिणारे लोक
4. शेअर मार्केट या विषयावर क्लास चालवणारे लोक
Proud

इति शेअर मार्केट नफामार्गपुराणम समाप्तम
----

ब्या नि गेल्या आठवड्यात atm call put विकले आहेत, मार्जिन दीड लाख , एक आठवड्यात 4000 रु नफ्यात आले.
Screenshot_2021-09-07-13-47-41-034_com.axis_.login_.png

हे ऑप्शन एक तारखेला दोन्ही मिळून 1500 प्लस प्रीमियममध्ये असतात , एक आठवड्यात 100,200 तरी झिजतातच

blackcat,
1. ब्रोकर
2. शेअर मार्केटमध्ये रोज टिपा देणारे लोक
3. शेअर मार्केटवर पुस्तके लिहिणारे लोक
यात अजून एक राहिले
४ शेअर ट्रेडिंग कस कराव याचे क्लास घेणारे लोक

हो

वरच्या प्रतिसादात 2 बदल केले आहेत

1. रिटेल आयपीओ लिमिट 2 लाख केले आहे
2. पैसे मिळणारी चौथी कॅटेगरी , शेअर मार्केटवर क्लास घेणारे लोक, हे एड केले आहे

धन्यवाद

5. एक्सचेंज
6. डिपॉझिटरी अथोरिटी
7. सरकार (यातच सेबी आले).

२५ ते ३०% नक्की रिटर्न देणारी अशी काही स्ट्रॅटेजी असेल तर त्याबद्दल डिटेल लिहा, वाचायला आवडेल.>>>>

विक्रमसिंहजी

मी बॅकटेस्ट केलेल्या स्ट्रॅटेजीज लिहायचा माझा विचार नाही.

पण स्ट्रॅटेजी बॅकटेस्ट कशी करावी यावर लिहिणार आहे. जेणे करुन ज्याला ईच्छा आहे तो स्वतःची स्ट्रॅटेजी बॅकटेस्ट करु शकेल.

Give a man a fish and you feed him for a day; teach a man to fish and you feed him for a lifetime Happy

लेखकाला नक्की काय म्हणायचे आहे, मूळ मुद्दा काय आहे>>>>

आपण जेव्हा जेव्हा मार्केट मधे पैसे गुंतवतो तेव्हा समोर एक आपल्या पेक्षा ज्ञान, माहिती, ईन्फ्रास्ट्रक्चर, कंप्युटींग पॉवर या सर्व बाबतीत आपल्यापेक्षा अतिशय वरचढ, आपल्यापेक्षा मुरलेला असा प्रतिस्पर्धी आहे. आपण जर त्याच्या ईतका अभ्यास करुन मार्केट मधे ऊतरणार नसू तर आपल्यासाठी शेअर मार्केट हा एक जुगारच आहे, सट्टाच आहे.

पण तुमच्या मते "नुसते शेअर मार्केटच कशाला, अख्खे आयुष्य म्हणजे जुगार." त्यामुळे तुमच्या दुसर्‍या प्रतिसादावर काही कमेंट करत नाही. Happy

मोठे प्लेअर्स कोणत्या पद्धतीने ट्रेडींग करतात आणि एखादी स्ट्रॅटेजी डिप्लॉय करायच्या आधीची त्यांची प्रोसेस काय आहे हे आपण पुढे पाहूच =असण

वाचायला आवडेल !!

माझे दोन मित्र एक आकडी लॉटरी खेळायचे. इतके कि दुसरे काही सुचत नसे. मी त्यांना म्हणायचो कि लॉटरी खेळून श्रीमंत झालेले तुम्ही मला दाखवा लॉटरी विकून श्रीमंत झालेले मी तुम्हाला दाखवतो. त्याकाळी त्यांना सतत पैसे मिळायचे. एकाने त्यावर हिरो होंडा घेतली. मला सांगायचे बघ आज हे घेतल. आज ते घेतल. मी म्हणायचो मला अजून पाच वर्षांनी हिशोब द्या. काही वर्षातच ते गाळात गेले. एक सुधारला एक वरती गेला. या ज्योतिषाचे काय करायचे मधील मटका ज्योतिष यावरच आधारले आहे.

मटका ज्योतिष
मटका किंवा एक आकडी लॉटरी मध्ये चाळीस पन्नास आठवडयाच्या निकालातून काही सूत्र मिळते का? हे पहाणे याला लाईन म्हणतात. त्यातून काही आडाखे काढून नंगा, अपोझिट व सपोर्टिंग असे नंबर काढले जातात. नंगा म्हणजे एकच ’फिट्ट’ वाटणारा आकडा काढणे. अपोझिट म्हणजे एखादे सुलट चित्र काढल्यानंतर उलट चित्रही काढणे; न जाणो काळाला सुसंगत वाटणारी प्रतिमा ही आपल्या दृष्टीने उलट असेल तर? सपोर्टिंग म्हणजे उलट सुलट प्रतिमा झालेवर त्या प्रतिमेला पूरक वाटेल असे चित्र काढणे. आता येणारे हे चित्र ० ते ९ या आकडयांमध्येच असणार हे उघड आहे. समजा तुम्ही ठरविलेल्या चित्रांपैकी एक चित्र न येता वेगळेच चित्र आले तर इथे लाईन तोडली असे म्हणतात. एखद्याचे नंगा चित्र बरोबर आले तर त्याची लाईन फिट बसली असे म्हणता येते. नंगा आकडा खेळण्याची रिस्क नको म्हणून नंग्याच्या सोबत अपोझिटही खेळला जातो. ही रिस्क अजून कमी करण्यासाठी या दोन्ही सोबत सपोर्टिंगही खेळला जातो. कुठलाही आकडा येण्याची शक्यता दहात एक म्हणजे दहा टक्के असते. अपोझिट व सपोर्टिंग खेळल्यामुळे ती अजून वीस टक्के वाढते. तरीसुद्धा जर आकडा आला नाही तर इथे लाईन तुटली. एखाद्याची लाईन तुटली असेल तर दुसऱ्या कुणाची तरी लाईन फिट बसली असे घडू शकते. कारण त्याचे सूत्र हे वेगळे असते. म्हणजे कुणाचे तरी चित्र बरोबर आलेच ना! ज्योतिषांचीही भाकितचित्रे ही साधारण अशाच प्रकारची असतात. तुमच्या मनातील भूत वर्तमान वा भविष्याबाबत एखादा चित्ररुपी आकडा एखाद्या ज्योतिषाचा नंगा येतो, एखाद्याचा अपाझिट येतो तर एखाद्याचा सपोर्टिंग येतो. एखाद्या ज्योतिषाची लाईन तुटली तरी दुसऱ्या ज्योतिषाची लाईन फिट्ट बसते. सातत्याने मटका वा लॉटरी खेळून श्रीमंत झालेला माणूस अभावानेच मिळेल पण मटका खेळवून वा लॉटरी विकून श्रीमंत झालेले अनेक दिसतील. मटका किंवा लॉटरी ची लाईन काढून द्यायचा उद्योग करणारे काही लोक असतात. लाईन फिट बसली तर स्वत:हून लाभार्थी आपल्यातला काही वाटा या आकडेशास्त्री लोकांना देतो. नाही लागला आकडा तर त्याचे नशीब! ज्योतिषी लोकांचेही तसेच आहे. चुकले भाकित तर जातकाचे नशीब! बरोबर आले तर ज्योतिषाचा लाभ! जातकाचे भविष्य बरोबर येण्यासाठी जातक आणि ज्योतिषी यांचे परस्पर ग्रह जुळावे लागतात तरच ते भाकित बरोबर येते ते जर जुळले नाही तर महान ज्योतिषाने केलेले भाकित सुद्धा चुकते आता बोला?

असो! तर जोपर्यंत अनिश्चितता आहे तोपर्यंत फलज्योतिषाला मरण नाही हेच आमचे भाकित!

छान

हे मटक्यातले हेजिंग म्हणायचे

Pages