प्रेमगीत---( वीक एंड लिखाण. )

Submitted by निशिकांत on 4 September, 2021 - 10:10

प्रेमगीत---( वीक एंड लिखाण )

मी नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर ठरवले की व्यस्ततेमुळे जे नोकरी करताना जमले नाही आयुष्यात,  ते सर्व आता करायचे. यामुळे मी आता भरपूर गाणे, संगीत ऐकून हा छंद जोपासायचे ठरवले. सौ.ला संगीताचा छंद आणि संगिताचे शिक्षण तिचे झाल्यामुळे,  तिचा माझ्या या नविन छंदाला विरोध तर नव्हताच पण तिचे प्रोत्साहन होते. दुसरा छंद म्हणजे कविता/गझल लेखनाचा. या दोन्ही छंदामुळे अजून तरी निवृत्त होवूनही जीवन मजेत आहेत.
कांही दिवसापूर्वी असाच सकाळी रेडियो ऐकत असता,  एका मराठी गाण्याने माझे लक्ष वेधून घेतले. सुंदर चाल, तेवढीच सुरेल गायकी, आणि काव्य यांनी माझे चांगलेच लक्ष वेधून घेतले. हे सिनेगीत अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांनी गायलेले आहे. हे गीत लिहिले आहे १९८१ मधे बनलेल्या चित्रपट कैवारी साठी जगदीश खेबुडकर यांनी तर संगितकार श्री प्रभाकर जोग आहेत. शब्द सुलभता आणि आशय गहनता ध्यानात यावी म्हणून या गाण्याच्या चार ओळी खाली देतोय.

मी कशी ओळखू प्रीती, हे हृदय म्हणू की लेणे?
प्रेमाला उपमा नाही, हे देवाघरचे देणे

का नकळत डोळे मिटती? स्पर्शात शहारे उठती
मी कशी भावना बोलू? हे शब्द म्हणू की गाणे?

या जबरदस्त रचनेने मला मोहवून टाकले . प्रेम ही भावना परमेश्वराने मानवास दिलेली मौल्यवान भेट  आहे .  विचार करा हे प्रेम जर नसते तर माणसाचे आयुष्य काय बनले असते? म्हणून तर एका गीतात कवि म्हणून गेलायः
प्रेमा काय  देवू तुला?
भाग्य दिले तू मला.

प्रत्येक भाषेमधे प्रेम या विषयावर भरपूर लिखाण झालेले आहे. मग ते कवितेच्या रुपाने असो वा कादंबरीच्या रुपाने. मी बरेच कवि असे पाहिले आहेत की ज्यांनी बालपणी पहिली कविता आईवर आणि तरुणपणी पहिली कविता प्रेमावर केलेली आहे. आई हे प्रेमाचे मूर्तीमंत रूप असते. प्रेम हे सांगावे लागत नाही. त्याची अनुभूती यावी लागते.
पण हल्ली बर्‍याच वेळा प्रेमाचे भ्रष्ट रूप बघायला मिळते जी अतिशय खेदाची बाब आहे. असाच एक प्रसंग एका बातमीत वाचून मी खूप वैतागून लिहिले होते ते असे:

 फ्यूजन होता परक्या स्त्रीशी
भावतात का ओंगळ गाणी?
स्त्रीलंपट चौकट राजाला
आवडते का बदाम राणी?

असा भावनांचा स्फोट होतो कधी कधी विमनस्कतेतून! पण वरील गाण्याने मला प्रेमाची हळूवार बाजू दाखवली आणि मला एक कविता याच विषयावर लिहायची तिव्र ईच्छा झाली. बरेच दिवस विचार मंथन करून लिहिलेली कविता खाली प्रस्तूत करतोय. बघा कशी वाटतेय ती.

मी गुणगुणतो

तुझिया वरती गीत लिहाया शब्द जुळवतो
तुझेच गाणे ओठावरती मी गुणगुणतो

तुझे हासणे, तुझे बोलणे, तुझे लाजणे
मला आवडे कधी तुझे ते रुसून बसणे
तुझ्या भोवती सदा सर्वदा मी रुणझुणतो
तुझेच गाणे ओठावरती मी गुणगुणतो

वसंत फुलला जेंव्हा भेटी झाल्या अपुल्या
आठवणीच्या शुभ्र तारका मनी कोंदल्या
बेमौसम का श्रावण तू येता रिमझिमतो
तुझेच गाणे ओठावरती मी गुणगुणतो

मिसळुन गेलो केंव्हा आपण पत्ता नाही
दोस्तीमध्ये गाजवलेली सत्ता नाही
आठव येता झर्‍याप्रमणे मी झुळझुळतो
तुझेच गाणे ओठावरती मी गुणगुणतो

सुखदु:खाची एकच व्याख्या अपुली आहे
सूर, ताल, लय आयुष्याची जपली आहे
केसामध्ये फुले तुझ्या, अन् मी दरवळतो
तुझेच गाणे ओठावरती मी गुणगुणतो

तू नसताना क्षितीज असते काजळलेले
चैन हरवुनी भाव मनाचे वादळलेले
तुला शोधण्या अंधःकारी मी मिणमिणतो
तुझेच गाणे ओठावरती मी गुणगुणतो

आम्रतरूवर मोहर नसता, कोकिळ ताना
सदा ऐकल्या मिठीत आपण मोहरताना
आम्राईतुन झुळूक होवुन मी सळसळतो
तुझेच गाणे ओठावरती मी गुणगुणतो

योगायोग म्हणजे एक हुरहुन्नरी तरुण संगीतकार श्री निखिल महामुनी यांच्या ही रचना वाचनात आली आणि त्यांना फार आवडली. त्यांनी या रचनेला संगीतबध्द  केले. अर्थात चाल आणि गायकी तरूण पिढीची आहे. खूपच सुरेख गायली आहे. आपण पण मजा घ्याल ऐकतांना. ही रचना ऐकण्यासाठी क्लिक करा---https://www.youtube.com/watch?v=ab-0ExszE2k

निशिकांत देशपांडे, पुणे.
मो. क्र. ९८९०७ ९९०२३

Group content visibility: 
Public - accessible to all site users