शरसंधान--( वीक एंड लिखाण )

Submitted by निशिकांत on 28 August, 2021 - 10:14

आठ वर्षांपूर्वी एके दिवशी माझा मोबाईल खणाणला. हॅलो म्हणता दुसर्‍या बाजूने माझा एक खूप जुना वर्गमित्र बोलत होता. आम्ही दोघे दहावीत ( तेंहा मॅट्रिक म्हणत असत ) एका वर्गात होतो. एकदा त्याने खाणाखुणा सांगत ओळख पटवली आणि गप्पा सुरू झाल्या. अगदी दिलखुलास! त्याने पुढाकार घेऊन त्या वर्षी दहावीत होते त्या मुलांचे एक गेट टुगेदर करायचे ठरवले होते. त्यासाठी फोन नंबर्स आणि पत्ते काढून तो संपर्क साधत होता. आम्ही सारे अंबाजोगाईच्या शाळेत होतो. मी त्याला प्रोत्साहन देऊन पुढे जाण्यास सांगितले. लागेल ती मदत द्यायचीही तयारी दाखवली.
या नंतर जवळ जवळ एक महिन्याने त्याचा परत फोन आला. त्याने सांगितले की बत्तीस मित्रांनी यायची तयारी दर्शवली आहे. पण सर्वांना अंबाजोगाई गैरसोयीचे वाटत असल्याने आणि एवढ्या लोकांची बडदास्त ठेवणे शक्य नसल्याने, गेटटुगेदर एका मोठ्या शहरात ठरले. तारीखही ठरली होती. मी त्याला हिरवा कंदील दाखवला.
यथावकाश आम्ही सर्वजण एकत्र जमलो आणि यादोंके गलियारोंका सफर शुरू हुवा. कोण कोठे असते, काय करते, मुलं मुली काय करतात असे अनेक प्रश्न चर्चिले गेले. मधे मोकळ्या वेळात माझे खास असलेले चार मित्र भेटले. वेगळा ग्रुप करून गप्पा सुरू झाल्या. आम्ही पाच जणांनी असे ठरवले की हा कार्यक्रम झाल्यावर कुठे तरी आउटींगला जायचे एका रात्रीसाठी. आणि आम्ही निघालो. मित्रात जसे वातावरण असते तसेच होते. भरपूर गप्पा, थट्टा, मस्करी, वर्गातील मुलींच्या आठवणी वगैरे.
मला प्रथमच कळाले की त्या चौघातील दोघांना फेसबुकमुळे माहीत होते की मी कविता करतोय. आणि सगळ्यांनी माझी छेड काढायला सुरुवात केली. त्यांनी खोचक पण हसत विचारलेले प्रश्न असे:
१) निशा, तुला कविता करायची आवदसा कशी सुचली?
२) जगात आणि मराठीत एवढे कवि असताना तू धाडसच कसे केलेस त्यात भर टाकायची?
३) जगात कुठे भूकंप झाला तर लोक दु:खी होतात पण कवी मात्र संधी आहे असे समजून त्यावर कविता करत बसतात.
४) मुक्त्छंदातल्या कविता तर एखादे गद्य ओळी तोडून लिहिल्या सारखे असते. या वर मी सांगितले की माझ्या लयीत आणि वृत्तात असतात. असे सांगितल्यावर एकजण मोठ्याने म्हणाला की आपला निशिकांत अधुनिक मोरोपंत आहे बरे का!
५) आणि त्या चारोळ्या आणि हायकू? तू लिहितोस की नाही?
बरे हे सारे मित्र शाळेत असताना असे वाह्यात नव्हते. आम्ही शाळेच्या वाचनालयातून पुस्तके घेऊन वाचत असू आणि त्यावर चर्चा पण करत असू. मला वाटले ते माझी फिरकी घेत आहेत म्हणून मी दुर्लक्ष केले. आम्ही सर्वजण आपापल्या गावी परतलो. या कार्यक्रमामुळे आमच्यातील संपर्क वाढला. पण मनात सारखे येत होते की कवी आणि कवितांबद्दल इतके गैरसमज आहेत लोकात? माझे मन मित्रांचे मला चिडवणे सहजासहजी पचवायला तयार नव्हते. या विचार मंथनातून कविता तयार झाली जी थोडी खोचक, म्हंटलं तर विनोदी, थोडी आत्मचिंतन करायला लावणारी अशी झाली आहे. खरे तर हा माझ्या कवितेचा बाज नाही म्हणून पार्श्वभूमी सांगायचा हा प्रपंच. या कवितेतून तसे पाहता मी (कवी) माझ्यावरच शरसंधान केलेले आहे.
मी एका ठिकाणी वाचलय की माणसाला स्वतःकडे तिर्‍हाईत नजरेने बघता आले पाहिजे. मी छोटासा कवि असूनही ही रचना याच भावनेतून लिहिली आहे. कोणीही गैरसमज करून घेऊ नये. कविता पेश करतोय.

वादळ गेले, वळले नाही

हात जोडुनी जा जा म्हणता
पाय रोवले, गेले नाही
ऐकवतो मी कविता म्हणता
वादळ गेले, वळले नाही

माणसावरी संकट येते
पूर असो ढगफुटी असू द्या
दु:खाचा डोंगर कोसळतो
माय मरो वा बाप मरू द्या
यावरही कविता केलेल्या
कुणी वाचुनी थकले नाही
ऐकवतो मी कविता म्हणता
वादळ गेले, वळले नाही

व्यासपिठावर बरीच गर्दी
आणि अल्पसे श्रोते असती
असेल तेथे कविसंमेलन
जिथे कवींची अमाप भरती
कविता वाचन ठीक, तरन्नुम
श्रोत्यांना आवडले नाही
ऐकवतो मी कविता म्हणता
वादळ गेले, वळले नाही

कविविश्वाची विचित्र पध्दत
पहिली सर पडते ना पडते
लगेच श्रावण कवितांची झड
सर्वदूर जोमात बरसते
कवितेसाठी विषय संपले
असे कधीही घडले नाही
ऐकवतो मी कविता म्हणता
वादळ गेले, वळले नाही

सांगायाचे काय न ठावे
यमक जोडण्या धडपड नुसती
आर्या, वृत्तामधली कवणे
यांची झाली पडझड नुसती
दिवस चांगले काल कवींना
आज यूग ते उरले नाही
ऐकवतो मी कविता म्हणता
वादळ गेले, वळले नाही

श्लोक, आरत्या, स्तोत्रे सारी
काव्य प्रकारातून उपजले
म्हणताना ते उगा वाटते
देवांना ते सर्व भावले
कंटाळुन त्या कवणांना तो
पावत नसतो, कळले नाही
ऐकवतो मी कविता म्हणता
वादळ गेले, वळले नाही

निशिकांत देशपांडे, पुणे.
मो. क्र. ९८९०७ ९९०२३

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान!
<<व्यासपिठावर बरीच गर्दी
आणि अल्पसे श्रोते असती>>इथे माबोवरही कवितांना प्रतिसाद कमीच मिळतो असे माझे निरिक्षण आहे. पण एका कवीराजांच्या कवितांना ४-५ प्रतिसाद हक्काचे असतातच. हे कसे बरे? याचा तपास केला तर प्रतिसाद देणारे आयडी एकाच दिवशी प्रकट झाल्याचा शोध लागला. विशेष म्हणजे हे आयडी इतरांना एका अक्षराचा प्रतिसाद देणार नाही, पण कवीराजांची कविता आली रे आली सगळे हजर. (विषयांतराबद्दल क्षमस्व)