चातुर्मासाच्या कथा - चतुर मा'सी'सह (कहाणी संपत शनिवारची)

Submitted by Barcelona on 19 August, 2021 - 12:15

आटपाट नगर होतं. तिथं एक आपला गरीब ब्राह्मण राहात होता. त्याला तीन सुना होत्या. पावसाळ्या दिवशीं तो लवकर उठे. सकाळींच जेवी,
(खादाडबोदला!! इतकं खायचं की गोष्टीपुरतं ही “न्याहारी” म्हणायची चोरी, जेवणच क्रियापद हवं . सगळ्या कहाण्यांच्या सुरूवातीस “क्ष” सुना आवश्यक असतात.)

लेकी सुनांसुद्धां शेतावर जाई. धाकट्या सुनेला मात्र घरीं ठेवीं. याप्रमाणं आपला नित्याप्रमाणं शेतावर गेला. जातांना घरी सुनेला सांगितलं. “मुली मुली, आज शनिवार आहे. माडीवर जा. घागरीमडक्यांत कांहीं दाणे पहा. थोडेसे काढ. दळून त्याच्या भाकर्‍या कर. केनीकुर्डूची भाजी कर. तेरड्याचं बीं वाटून ठेव.”
(मायक्रोमॅनेजर!! सून करेल की तिचं तिचं डोकं वापरून. केनीकुर्डू च्या भाजीची रेसिपी सापडली नाही पण नुसत्या कुर्डूची रेसिपी सापडली. तेरड्याचं बीं कशासाठी वाटायच?)
सुनेनं बरं म्हटलं. माडीवर दाणे पाहूं लागली. अर्ध्या भाकरीपुरते दाणे निघाले तेवढेच तिनं दळले. त्याच्या लहान लहान भाकर्‍या केल्या. केनीकुर्डूची भाजी केली. तेरड्या टाकळ्याचं बीं वाटलं नि सासूसासर्‍यांची वाट पहात बसली.
(दळण झालं. काय झटपट काम आहे! नायतर इतर सूना … ‘बरं’ म्हणतात नि पिझ्झे मागवतात.)

इतक्यांत तिथं शनिदेव कुष्ठ्याच्या रूपानं आले आणि म्हणाले, बाई बाई, माझं सर्व अंग ठणकत आहे, माझ्या अंगाला तेल लाव, ऊन पाण्यांनं आंघोळ घाल. घरांत गेली, चार तेलाचे थेंब घेतले, त्यांच्या अंगाला तेल लावलं. वांटलेले बीं लावून ऊन पाण्याने आंघोळ घातली. भाकरी खाऊ घातली. त्याचा आत्मा थंड केला.
(आज कुष्ठरोग समाजात फार आढळत नाही याचे कारण औषधोपचार. मात्र सुनेसारखी अशी सेवावृत्ती म्हणजे _/\_ अर्थात त्याकाळची सामाजिक सुरक्षितता ही कारणीभूत. हल्ली शनिदेवाने कुष्ठ्याच्या रूपात यायचं म्हणलं तरी खाली वॉचमन अडवेल.)

तसा कुष्ठ्यानं तिला आशीर्वाद दिला, तो काय दिला?” तुला कांहीं कमी पडणार नाहीं” म्हणून म्हणाला. आपलं उष्टं वळचणीला खोंचलं, शनिदेव अदृश्य झाले. काहीं वेळानं घरीं सासूसासरे, दीरजावा आल्या. त्यांनीं सर्व तयाई उत्तम पाहिली, संतोषी झालीं. आपल्या घरांत तर कांहीं नव्हतं. हें असं कशानं आलं, म्हणून आश्चर्य करूं लागली.
(आश्चर्य वर थांबलं हे बरंच आहे. ललिता पवार बाई असत्या तर ‘अरी कलमुही, कौन देकर गया ये सब. अपने ही घर में मुंह मार गयी. डायन भी सात घर छोडती है… इ इ झापलं असतं)

दुसर्‍या शनिवारीं ब्राह्मणानं दुसर्‍या सुनेला घरी ठेवलं. सगळीं माणसं घेऊन शेतावर गेला. इकडे काय मौज झाली? शानिदेवांनी मागच्यासारखंच कुष्ठ्याचं रूप घेतलं, ब्राह्मणाच्या घरीं आले. मागच्या सारखंच मला न्हाऊं घाल, मांखू घाल, म्हणून म्हणूं लागले. ब्राह्मणाची सून घरीं होती ती त्याच्याशीं बोलूं लागली, “बाबा, आम्हीं काय करावं! आमच्याजवळ कांहीं नाहीं.” देव म्हणाले, “ जे असेल त्यांतलंच थोडंसं मला दे.” ब्राह्मणाची सून मजजवळ कांहीं असलं तरी नाहीसं होईल.” असा त्यांनीं शाप दिला नि आपण अंतर्धान पावले. ब्राह्मणाची सून माडीवर गेली. हांडीमडकीं पाहूं लागली. तिला कांहीं सापडलं नाहीं. संध्याकाळ झाली, सासूसासरा घरीं आलीं. सर्व तयारी पाहू लागलीं. तो त्यांना कांहींच दिसेना. मग सुनेला रागं भरलीं. सुनेनं झालेली हकीकत सांगितलेली.
(लोकं उपाशी झोपले ह्यात मौज काय होती?? सासू सासरे एकदम सोकावले की…. काही नाही असं होत नाही. आश्वासनं नेहमी असतात. ती तरी द्यावी.)

पुढं तिसरा शनिवार आला. ब्राह्मणानं तिसर्‍या सुनेला घरीं ठेवलं. जेवणाची तयारी चांगली कर म्हणून सांगितलं. आपण उठून शेतावर गेला. इकडे मागच्यासारखे शनिदेव आले. ब्राह्मणाच्या सुनेला, अंगाला तेल लाव म्हणून म्हणूं लागले. तिनं दुसर्‍या जावेसारखा जबाब दिला. देवांनीं तिला पूर्वीसारखा शाप दिला आणि आपण अंतर्धान पावले. पुढं काय झालं? कांहीं वेळानं सासुसासरा घरीं आलीं, जेवणाची तयाई पाहूं लागलीं, तों तिथं कांहीं दिसेना. मग त्यांनीं सुनेला विचारलं, मागच्यासारखीच हकीकत ऐकली. सगळ्यांना उपवास पडला, मनांत फार खिन्न झालीं.
(चांगलं एक्सपेरिमेंटल डिझाईन आहे. सून ह्या इंडिपेन्डन्ट व्हेरिएबल मध्ये बदल करून धान्य हे डिपेन्डन्ट व्हेरिएबल तपासायचे. स्टॅटिस्टिक्सचा उगम इथे इथेच रे महाराजा!!)

पुढं चौथ्या शनिवार आला. ब्राह्मणानं धाकट्या सुनेला घरीं ठेवलं. पहिल्यासारखीच आज्ञा केली आणि आपण निघून शेतावर गेला. इकडे शनिदेवानं काय केलं? गलितकुष्ठ्याचं रूप धरलं. ब्राह्मणाचे घरीं आला. सुनेला म्हणूं लागला. “बाई बाई, माझं अंग ठणकत आहे, त्याला थोडं तेल लाव.” तिनं बरं म्हटलं. अंगाला तेल लावलं, ऊन पाण्यानं आंघोळ घातली. भाजीभाकर खायला दिली. त्याचा आत्मा थंड झाला.
(सॉंग सिच्यूएशन - तुम आए तो आया मुझे याद, गली में आज चांद निकला…. आता हे कोण कुणाला म्हणाले ते नका विचारू. लैच लडिवाळ गाणं नि लैच लडिवाळ सुनेचं वागणं.)

तेव्हां देवानं तिला आशीर्वाद दिला. तो काय दिला? असाच तुझाच आत्मा देव थंड करील म्हणून म्हणाला.
(ठंडा ठंडा आत्मा!! क्या आपको चाहिए ठंडा ठंडा आत्मा!! आर्थिक सुबत्तेने एकदाचा आत्मा थंड होतो हे बायांना स्पष्ट सांगितलं त्याबद्दल ह्या चातुर्मास कहाणीला “सही कहाणी” हा किताब व नसलेल्या स्पर्धेत पहिला क्रमांक देण्यात येत आहे. नाहीतर पुढे आत्मा थंडनार्थ वळचणीला दोन-चार मुले नि नवरा सापडायला हवे होते. )

आपलं उष्टं वळचणीला खोचलं आणि आपण अंतर्धान पावला. पुढं ब्राह्मणाची सून माडीवर गेली. हांडींमडकीं पाहूं लागली. डाळदाणा दृष्टीस पडला. तो काढला, तिनं चांगला स्वयंपाक केला, आणि सासूसासर्‍यांची वाट पहात बसली. इतक्यांत सासूसासरा तिथं आलीं. सुनेला विचारूं लागली. “मुली मुली, आज तूं काय केलं आहेस?” सुनेनं सांगितलं, “सगळी तयारी आहे. न्हायला तेल आहे. टाकळ्याची चोखणी आहे. आंघोळीला ऊन पाणी आहे. जेवायला बाजरीची भाकरी आहे. तोंडीं लावायला केनीकुर्डूची भाजी आहे.” सासूसासर्‍यांस आनंद झाला. “आपल्या घरांत तर कांहीं नव्हतं आणि इतकं सामान कुठुन आणलसं?” म्हणून तिला विचारलं. तिनं कुष्ठ्याची हकीकत सांगितली. दिलेला आशिर्वाद सांगितला. सासर्‍याला आनंद झाला.
(व्हॉट इज टाकळ्याची चोखणी?? बाळांचे पॅसिफायर असते त्याला चोखणं म्हणताना ऐकलं आहे. दर शनिवारी केनीकुर्डूची भाजी. ह्यापेक्षा तर आमची मेसवाली मावशी बरी. फार गरीब होती पण तरी मुलांना शनिवारी खीर इ काही “फिस्ट” द्यायची.)

इतक्यांत काय चमत्कार झाला? सासर्‍यांची दृष्टी वळचणीकडे गेली. तिथं कांहीं खोचलेलं दृष्टीस पडलं. त्यांनी तें सोडून पाहिलं तॊ, पत्रावळींवर हिरेमोत्यें दृष्टीस पडलीं सुनेला दाखविलीं, ह्याच पत्रावळींवर तो कुष्टी जेवला म्हणून तिनं सांगितलं सासरा म्हणाला, “देवानं मुलीला दर्शन दिलं.” पुढं दुसर्‍या सुनांस हकीकत विचारली, त्यांनीं दोन वेळां आला होता म्हणून सांगितलं, “आम्ही त्याला कांहीं दिलं नाहीं, त्याचा त्याला राग आला. नंतर त्यानं तुमच्याजवळ कांहीच नसेल म्हणून सांगितलं आणि त्याच दिवशी हांड्यामडक्यांत दाणे नाहींसे झाले. म्हणून दोन शनिवार आपणाला उपवास पडला.” पुढं सासुसासर्‍यांनी शनिदेवाची प्रार्थना केली. मुलीला आशीर्वाद दिला व नेहमी शनिदेवाची पूजा करूं लागली.
(सध्याच्या काळात उष्ट्याचे हिरे मोत्यें होत नाहीत, वळचणी ही नसते. शनिदेव आले तर त्यांना एखादे बिटकॉइन डिजीटल वॉलेट मध्ये देऊन जावे लागेल. फार टॅक्स पडणार नाही असं दुसरं काय बरं? बहुतेक बिटकॉइनलाही टॅक्स असावा. शनिदेवाने टॅक्सफ्री काही दिले तर बरं.)

जसा शनिदेव त्यांना प्रसन्न झाला. तसा तुम्हां आम्हां होवो. ही साठां उत्तरांची कहाणी, पांचां उत्तरीं सुफळ संपूर्ण.
(कुष्ठरोग बरा होऊ शकतो. रुग्णास जवळच्या आरोग्य केंद्रात पाठवावं. दारी आलेल्याची काया कशीही असली तरी यथाशक्ती मदत करावी. उष्ट इथे तिथे खोंचू नये ही देवांना नम्र विनंती. भक्त आहोत, प्रसाद नीट हाती द्या, प्लिज. #मॉडर्न चातुर्मास #नवराकायकुंकवापुरताहोता)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धमाल लिहिलंय.बरेचदा ख्या करून हसले.
काहीही आहे ही कथा.कुष्ठरोगात अंगाला तेलाचा मसाज चालतो का?सारखी केनीकुर्डु ची भाजी का(मला केनी लिहिलं की पुढे जी लिहावंसं वाटतं, तो मोह आवरला आहे.)
वळचणीला म्हणजे नक्की कुठे ठेवलं? ते कांदे ठेवायची परडी असते ती का?

केनीकुर्डु >>> याबद्दल मला जाम उत्सुकता आहे? कशी दिसते ही भाजी? आणि ते तेरड्याचं बी अंघोळीसाठी वाटतात का? हर्बल इफेक्ट?? Wink

भारीए कथा आणि कॉमेन्ट्री, पैसिफायर Lol
तेरड्याचं बीचं काय करतात? टकळीचा चोखणा काय असतं?केनीकुर्डी पण माहीत नाही.

पहिल्या शनिवारी वळचणीला खोचलेलं उष्ट डायरेक्ट चौथ्या शनिवारी काढलं ?????####आळशी कामचोर फॅमिली

मस्तच विश्लेषण!

केनी आणि कुर्डु ह्या पावसाळ्यात उगवणाऱ्या दोन वेगवेगळ्या भाज्या आहेत.

@मी अनु...खरंच केनी जी चा सॅक्सोफोन वाजलाच बॅकग्राऊंड ला ते केनी वाचल्यावर !!

वांटलेले बीं लावून ऊन पाण्याने आंघोळ घातली. .... तेरड्याचे बी कशाला वाटायचे म्हणत होतीस ना,घे सुनेला उपयोग माहीत होता.
आता दारावर कोणी येऊन म्हणाला की बाई मला मसाज कर तर फटकवणार नाही का एखादी बाई?
न्हायला तेल आहे.....तेलाने न्हायचे का tyaveli?

उष्ट इथे तिथे खोंचू नये ही देवांना नम्र विनंती....सहमत!

ते कांदे ठेवायची परडी असते ती का?......त्याला शिंकाळे म्हणतात.
घराचे उतरते छप्पर आणि वासे यामध्ये जी जागा असते,तिला वळचn म्हणतात.

शिंकाळ्यात मला वाटतं दह्यादुधाची मडकी पण ठेवतात.
शिंक्याचे तुटले बोक्याचे फावले म्हण त्यावरुनच आली.
कुर्डूच्या फुलांचा फोटो जमलं तर उद्या देतो. सध्या श्रावणात बहरलीयत सर्वत्र.

रविवार ते शुक्रवार काय खायची ही फॅमिली? Wink बाकी ही एक लॉजिकल आणि मोरल गोष्ट सापडली की!
कुर्डुच्या भाजीची कृती दादा सांगताहेत ती ऐका. बरोबर आयुर्वेदिक मुतखडा सल्ला मोफत आहे. त्याचाही लाभ घ्या. Lol

फॅमिली एका रात्री उपाशी झोपली तरी प्रयोग शीलता चालूच.परत तिसऱ्या सुनेला काम लावलं.
प्रोजेक्ट्स मधला 'बेस्ट सो फार' आणि चांगल्या चालणाऱ्या गोष्टीत बदल करू नये हे फंडे यांना माहीत नाहीत वाटतं.

डोंट फिक्स अनटिल ब्रोकन हे खरंच.
पण सारखं धाकट्या सुनेला काम दिलं तर मग तिला श्रावणात पुरणाचा... आपलं केनीकुर्डुचा स्वयंपाक करायची सवय लागायची.. आणि मग आपल्याला बाष्पगदगदीत लेख वाचायला लागायचे! नकोच बरं ते! Wink Light 1

हेहेहेहे, खादाडबोदला!! Biggrin मी पण ख्याक करून हसले खुपदा.
ह्या सुना एकमेकींशी बोलत नाहीत का? मी असं असं केलं म्हणून तसं तसं झालं बुवा. कि विचारलं असेल पण धा सु ने सांगितलच नसेल काय न कळे. Proud Wink

आता दारावर कोणी येऊन म्हणाला की बाई मला मसाज कर तर फटकवणार नाही का एखादी बाई? >> Rofl "ले झंडू बाम हुई डार्लिंग तेरेलिए"
साँग सिच्यूएशन मी मिस केली की.......... आता प्रक्षालनार्थ दर शनिवारी "मुन्नी बदनाम हुई" २१ वेळा ऐकेन....

मला आव्डते ही कहाणी. ते कमीत कमी रिसोर्सेस मध्ये पण स्वयंपाक होतो. घरातील लोक सुखी राहतील असे सर्व जमते हे फार मस्त वाट्ते.
हे घरातले लोक्स एका च सुनेला सोडून कुठे बरं जातात दर वीकेंडला? सगळेच का नाही जात. ह्याचे मॉडर्न इक्वीव्हॅलंट म्हणजे
शनिवारी मॉल मध्ये फिरून मजा करून आल्यावर संध्याका ळी काय करावे हे बघताना घरात मॅगीचा अर्धा चौकोन एक उघडलेले मसाला पाकीट हवा गेलेले. एक कोका नूडल्स फ्रिज मध्ये ब्रेडचे दोन तुकडे सापडावे असे वाट्ते. व त्यातच भागवा भागवी Wink

बादवे शनिमहाराज पण थोडी कंजुशीच करत होते. एक दिवस सेवेच्या बदल्यात एकाच दिवसाची/आठवड्याची शिदोरी पुरवत होते. हे तर मनरेगा सारखं वाटतय त्या काळातलं.

लेकी सुनांसुद्धां शेतावर जाई......
हे चूक नाही का वाटत व्याकरण द्रिष्ट्या?
बर्‍याच कहाण्यांमधे तसच असतं लिहीलेलं................................................!!
लेकी सुनांसकट शेतावर जाई...असं हवे ना?

इतकं मजेदार आहे हे...की भविष्यात पुन्हा येऊ येऊ वाचणार आणि नॉस्टॅल्जियात रमणार Lol

सकाळीच जेवणे हे चांगले लक्षण आहे.
न्याहारी हाणणे मग अजून थोडं मध्ये मग दुपारी जेवण, मग... मग... करत रात्री सपर हे खादाडबोदल्याचे लक्षण आहे (अनलेस ते दिवेकर बाईंच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी सांगितलेल्या पोशन मध्ये असेल.)

खादाडबोदल्या Rofl हा शब्द वाचल्यावर हसणंच थांबत नाहीये. बॉम्बे टू गोवा मधला तो मुलगा आठवला.
मानव Lol सही पकडे है