उठो द्रौपदी, वस्त्र संभालो, अब गोबिंद ना आयेंगे|

Submitted by स्वीटर टॉकर on 5 August, 2021 - 01:29

एका कथा स्पर्धेत मी भाग घेतला होता. आयोजकांनी पहिल्या काही ओळी दिलेल्या होत्या त्या तशाच्या तशा सुरवातीला वापरून पुढे कथा रंगवायची अशी स्पर्धा होती. शब्दांचीही मर्यादा होती. कथेचं शीर्षक आपणच ठरवायचं होतं. अटलजींच्या एका सुरेख कवितेचं नाव मी शीर्षक म्हणून वापरलं आहे.

सुरवातीच्या बोल्ड इटॅलिक्समधल्या ओळी आयोजकांनी दिलेल्या होत्या. दुसरं बक्षीस मिळालं त्या अर्थी कथा बरी जमली असावी. ही तुमच्यासाठी . . . .

"ही इमारत धोकादायक असून येथील रहिवाश्यांना कळविण्यात येते की त्यांनी त्वरित इमारत खाली करावी, अन्यथा होणाऱ्या अपघातास शासन जबाबदार नाही"
मंदानी नोटीस वाचली आणि कपाळाला हात लावत ती चौथ्या मजल्यावरच्या आपल्या घरी आली. तिचा नवरा दारू पिऊन कोपऱ्यात पडला होता.
एकूण साठ बिऱ्हाडांपैकी आता केवळ सात आठ कुटुंब तिथे शिल्लक राहिली होती. बाकीचे कधीच आपली जागा सोडून इतरत्र गेले होते. दोन मुलं आणि पिणारा नवरा याना घेऊन कुठे जाणार हे मंदाला माहीत नव्हतं.
घरात काम करता करता तिची बडबड सुरू झाली. "एक दिवस मुलांसकट इथेच बिल्डिंग खाली गाडले जाणार आपण! मी एकटी हातपाय चालवणार आणि तुम्ही बसणार ढोसत! "
इमारत पाडून परत बांधण्यासाठी इतर लोकांनी प्रयत्न चालवले होते. प्रत्येकी सात आठ लाख भरले तर एक मोठी खोली द्यायला बिल्डर तयार झाला होता. पण मंदा त्याचा विचारही करू शकत नव्हती.
मंदाचा नवरा बरळला, "त्या कामाला जातेस ना आहुजाकडे, त्याचा मर्डर करतो म्हणजे हवे तेवढे पैसे मिळतील!"
"स्वतःला दोन पायावर उभं राहता येत नाही आणि चालले मर्डर करायला!" मंदा चिडून म्हणाली. घरातली कामं आटपून मंदा कामाला निघाली. त्यांच्या इमारतीजवळ बंगल्यांची वसाहत होती तिथे स्वयंपाकाची कामं करून मंदा घर चालवत होती. आहुजा, शर्मा, केळकर आणि देव या चार घरची कामं करून, दोन वेळचं पोटभर जेवण आणि मुलांचं शिक्षण भागत होतं.
बंगल्याच्या दिशेनी चालत जाताना मंदाच्या डोक्यात घराचाच विचार होता. "दहा पंधरा हजार उसने मागणं वेगळं आणि एवढे लाख मागणं वेगळं! कामवाल्या बाईला एवढे पैसे कोण देईल?"
तेवढ्यात आहुजा साहेबांची गाडी जाताना तिनी पाहिली.
"मर्डर?? छे छे! काहीही बोलतायत मालक. "
विचार झटकून मंदा पुढे चालू लागली.

विचार झटकणं सोपं असतं. पण एखादा विचार असा असतो की तो लोचटासारखा मागोमाग येतच राहतो. पदराचं टोक धरून किरट्या बाळासारखा भुणभुणत राहतो!

तिला स्वतःचीच लाज वाटली. हा दारुड्या दोन पैशाचा कामाचा नाही. तो नशेत काहीबाही बरळतो आणि मी मूर्ख त्याच्या बोलण्यावर विचार करत बसलिये!

गतस्मृतीत राहणं ही तिची एकमेव चैन होती. तिचं बालपण सुखात गेलेलं होतं. घरी गरिबीच, पण समाधानी गरिबी. वडिलांची पिऊन ची नोकरी. दहावीपर्यंत तिनी वर्गात पहिला नंबर कधी सोडला नाही. वाचनाची अतोनात आवड. जे हाती मिळेल ते वाचायची सवय अजूनही कायम होती. शिष्यवृत्तीचा प्रयत्न करावा आणि पुढे शिकत राहावं याची पोच तेव्हां तिला नव्हती आणि आईवडिलांनाही.

चुलत्याच्या गावी एक वीटभट्टी होती. त्याच्या मालकाच्या मुलाशी लग्न लावून दिलं. तिच्या सासर्यांनी स्वकष्टानी धंदा उभा केला होता . पण आईविना वाढवलेल्या मुलाला कधी कष्टाच्या महत्वाची जाणीव त्यांनी करून दिलेली नव्हती. त्याचा व्हायचा तोच परिणाम झाला होता.

म्हणतात ना, "हातपाय न हलवता मिळालेल्या पैशाला लवकरच पाय फुटतात!"

नवऱ्याला वीटभट्टीपेक्षा हातभट्टीचं प्रेम जास्त!

बापाच्या धाकामुळे हे प्रेम जरा तरी आटोक्यात होतं. एकदा लग्न झाल्यावर बायकोसमोर नवऱ्याला बोलणं वाईट दिसतं म्हणून सासरेही गप्प राहायला लागले. नवऱ्याला रान मोकळं मिळालं. त्याची दारू वाढतच गेली. आत्तापर्यंत दोन मुलं देखील झाली होती. मंदा अगतिक व्हायची, मिनतवारी करायची, रागवायची, रुसायची, ओरडायची पण बाटली ही बलाच अशी आहे तिच्यासमोर भल्याभल्यांचा टिकाव लागलेला नाही.

सासर्यांची सहनशक्ती संपली. एक दिवस त्यांनी सगळ्यांना घरातून बाहेर काढलं. फार पूर्वी एक बिल्डर विटांचे पैसे देऊ शकला नव्हता त्या बदल्यात त्याच्याकडून एका पडक्या जुनाट बिल्डींग मध्ये एक खोली सासर्यांनी घेऊन ठेवली होती. मुलांसकट तिला अंग टेकायला जागा होती हे काही कमी नव्हतं.

नवऱ्याला काही बोलायची सोय नव्हती. बोललं की मारहाण करायचा. नाही बोललं तर शिव्या द्यायचा. अनवाणी चालून चालून पायाचे तळवे राठ होतात तसेच पुन्ह:पुन्हा आघात सहन करून शरिराबरोबर तिचं मनही राठ झालं होतं.

कमनशीब जरी प्रत्यक्षात बदलता आलं नाही तरी स्वप्नात तरी बदलता येतंच की!

लॉटरीचं तिकीट तिनी आयुष्यात कधी विकत घेतलं नव्हतं. पण एकदा तिला काय वाटलं कोणास ठाऊक! दहा रुपयांचं तिकीट तिनी घेतलं. तिच्या मुलांच्या वह्यांमध्ये एका वहीवर लक्ष्मीचं चित्र होतं. मुलांनी हट्ट केला की त्याच वहीत ते तिकिट ठेवायचं! अन् त्यांना पहिलं बक्षीस लागलं की! अहाहाहा! ती कधी गावी परत जाऊन संपूर्ण डोंगर विकत घ्यायची तर कधी शहरातच आलिशान बंगला विकत घ्यायची. मुलांना परदेशी शिकायला पाठवायचं हे तर ओघानी आलंच!

अशी सुखद स्वप्न जागेपणीच बघण्याचा आनंद तिनी अगणित वेळा घेतला होता आणि पुढेही घेणार होती.

काय विरोधाभास होता! वडिलांनी 'पिऊन' ची नोकरी केली पण कधीही पिऊन आले नाहीत. नवऱ्यानं नोकरीच केली नाही पण कायम पिऊन असायचा.

एके दिवशी सासरे वारल्याची बातमी आली. आता परतीचा मार्गही बंद झाला!

आता जे काय आयुष्य उभं करायचं ते आपल्या चार घरकामांवर. नवऱ्याच्या मदतीशिवाय.

शर्माबाई दिवसभर टीव्हीसमोर लोळत असायच्या. तोंड अविरत चालू! खाण्यात नाहीतर बोलण्यात! "मेरा ध्यान सब जगह होता है| तू पहले जैसे मन लगा के काम नही करती|" गेली दोन वर्ष हेच! 'पहले जैसे' म्हणजे कैसे हे काही मंदानी कधी विचारलं नाही. आपला संबंध पगाराशी. या देवमाशाच्या तोंडाशी कोण लागणार?

बिचाऱ्या केळकर बाईंना वेळच नसायचा. त्यांची नोकरी कुठे होती कुणास ठाऊक. सारख्या फोनवर असायच्या. 'येस सर' म्हणत असायच्या किंवा सटासट ऑर्डरी देत असायच्या. घरची कामं चालूच. मान वाकडी करून डाव्या खोबणीत मोबाइल पकडून इकडे मुलांचे आणि नवऱ्याचे डबे भर, दुधाला विरजण लाव, मधेच एखाद्या मुलानी टंगळमंगळ केली की टपली मारून त्याला मार्गाला लाव..... मंदाशी बोलायला त्यांना वेळच नसायचा. चिठ्ठीनी कामं बिनबोभाट चालायची.

देवबाईंच्या स्वभावाचा त्यांच्या आडनावाशी काडीचाही संबंध नव्हता. प्रत्येक वस्तूला, माणसाला, दिवसाला, बातमीला अन् काहीच नाही मिळालं तर स्वतःच्या नशिबाला नावं ठेवायच्या. चुकून देवसाहेब घरी असले तर ते तितक्याच चिवटपणे त्यांच्याशी वाद घालत बसायचे! मंदाचं डोकंच उठायचं. एकदा मंदानी पगारातली उचल मागितली तर 'भीक नको पण कुत्रा आवर.' अशी अवस्था झाली होती.

तिला सगळ्यात आवडायचं आहुजांकडे स्वयंपाकाचं काम करायला. भलामोठा बंगला, आतल्या एकएक वस्तु बघतंच राहाव्या अशा.

आहुजा यांची श्रीमंती स्वप्नवत होती त्याचं कारणही तसंच होतं. आहुजा स्वतः सकाळपासून रात्रीपर्यंत प्रचंड काम करीत असत. त्यांच्या पत्नीचा कॅन्सरने मृत्यू झाल्यापासून त्यांना घर खायला उठत असे.

घर पूर्णपणे नोकरांवर सोडून दिलेलं होतं. दिवस आणि रात्रीचे वेगवेगळे वॉचमन आणि ड्रायव्हर धरून एकंदर सात नोकर होते. स्वच्छतेबद्दल आणि चवीबाबत आहुजा अतिशय काटेकोर होते पण त्याच्या मोबदल्यात दर वर्षी वाढणारा उत्तम पगार द्यायचे!

ते एकटे असल्यामुळे नवरा मंदावर संशय घ्यायचा. तिनी कित्येक वेळा त्याचा मारदेखील यामुळे खाल्ला होता. "एवडे पैशे तो भडवा फक्त स्वेपाक कराचे देतो का रांडे? मला काय समजत नाय?"

त्यांच्या बेडरूममध्ये भलीमोठी तिजोरी होती. किल्ल्यांचा जुडगा नेहमी आहुजांच्या खिशात असायचा.
आहुजांचा खून करून पैसे लंपास करता आले असते पण लगेचच पकडलं जाण्याची खात्री होती.

मंदा एकदम भानावर आली. "काय चाललंय काय मंदा? तो यडा काहीतरी बरळला आणि तू खरोखरच.....?"

"मजा म्हणून गं. लॉटरी जिंकून मालामाल होण्याचा पिक्चर किती तरी वेळा बघितला नाही का आपण? मजा येते की नाही? तसंच हे. तेही खोटंखोटं अन् हे पण."

"नवरा शिडपिडित. आहुजा त्याला भारी पडतील. म्हणजे आहुजांना आडवं केलं पाहिजे. कसं करायचं? आजारी पाडायचं? जेवणात काहीतरी घालून? नाहीतर असं करूया. त्यांच्या सकाळच्या चहाची व्यवस्था रात्रीचा स्वयंपाक करून झाल्यावर मीच करून नेहमी ट्रे मध्ये ठेवते. टी बॅग उघडून त्यातल्या चहामध्ये झोपेच्या गोळ्या चुरून मिसळून परत बॅगला तीच पिन लावून ठेवली तर ते चहा पिऊन पुन्हा झोपून जातील. निदान झोपाळलेले तरी असतीलच."

"मर्डर केल्यावर थोड्याच वेळात नवरा पकडला जाण्याची शक्यता आहेच. मर्डर च्या आधीच आपण घरातून बाहेर पडलो होतो असं सीसीटीव्ही कॅमेरा वर दिसलं तर बरं. चहा पिऊन आहुजा झोपल्याबरोबर नवरा मर्डर करायच्या आधीच आपण स्वतःच चोरी करायची? जर नवऱ्याच्या हाती इतके पैसे लागले तर तो काय करेल काही सांगता येत नाही." टीव्ही सिरीयल्स बघून तिला माहित होतं की सगळी कामं डॉक्टरचे हातमोजे घालून केली पाहिजेत म्हणजे बोटाचे ठसे राहत नाहीत.

"आपण आहुजांचा मर्डर आणि चोरी खरोखरची करणार तर नाहीच आहोत. पण कोडं म्हणून सोडवायला किती मजा येते!" वेगवेगळ्या योजनांवर विचार करता करता कामं कशी आटपली हे तिला कळलंच नाही

परत येताना तिला सुरेखा भेटली. मंदा जेव्हा या इमारतीत राहायला आली तेव्हां तिची सुरेखाशी ओळख झाली होती. दोघी समदुःखी. त्या जिवाभावाच्या मैत्रीणी झाल्या होत्या. सुरेखानी खोली सोडायचं ठरवलं होतं. त्यांना राहायला दुसरी जागा मिळाली नव्हती. ओढ्यालगतच्या झोपडपट्टीच्या दादाला त्याची किंमत दिली की जागा मिळायची. तिथे भयानक डास, पावसाळ्यात चिखल आणि कायम असह्य दर्प यायचा. पण सिमेंट मातीच्या ढिगाऱ्याखाली मरण्यापेक्षा झोपडपट्टीत जाऊन राहणं बरं असं सुरेखाचं म्हणणं.

नवरा घोरत पसरला होता. मंदा मात्र रात्रभर तळमळच विचार करंत राहिली. आयुष्यात पुढे आशेचा किरण तर दिसतच नाहिये. आहुजा नाहीतरी एकटेच आहेत. मी त्यांचा विचार करायचा का माझ्या मुलांच्या भवितव्याचा? विवेक, सहानुभूती वगैरे माणसाच्या कल्पना आहेत. निसर्गात नाहीत. त्या जर योग्य असत्या तर देवानी त्या सगळ्या प्राण्यांनाही दिल्या नसत्या का?

सकाळपर्यंत तिचा निर्णय पक्का झाला. नवरा दुपारी बारापर्यंतच शुद्धीत असायचा. त्याच्या आधीच मर्डर झाला पाहिजे असं तिनी मनाशी पक्क केलं. प्लॅन नवऱ्याला समजावून सांगितला.

"सीसीटीव्ही कॅमेरा पुढच्या गेटवर आहे. बंगल्याच्या मागच्या बाजूला मुलांचं ग्राउंड आहे तिथे सकाळी कोणी नसतं. तिकडच्या भिंतीवरून उडी मारून मागच्या बागेत या. मोरीच्या शेजारचा दरवाजा नेहमी उघडा असतो तिथून आत या. सुरा कोणाला दिसता कामा नये. मी किचनमध्ये स्वयंपाक करत असेन. तिथे येऊन माझ्यावर जोरजोरात ओरडा. ते काय तुम्हाला अवघड नाही. तुम्हाला वाटतं ना माझं आहुजा साहेबांशी लफडं आहे म्हणून? तुम्ही मला आणि आहुजा साहेबांना दोघांनाही भोसकणार आहात अशा धमक्या द्या. मर्डर स्वयंपाकघरातच करायला पाहिजे. हॉलमधे फार आवाज झाला तर पुढच्या वॉचमनला ऐकू जाईल. तुम्ही बोंबाबोंब करत रहा. मी काय बोलतेय, ओरडतिये, रडतिये त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. ते पण तुम्हाला अवघड नाही. माझ्या झिंज्या पकडून डोकं गदागदा हलवा. सुरा माझ्यावर उगारा. आपला आरडाओरडा ऐकून आहुजा किचन मध्ये येतील. ते आले रे आले की मी तुम्हाला डोळा मारीन. पटकन् मागे वळून आहुजांचा मर्डर करा. त्यांच्या खिशात किल्ल्या असतात त्या घेऊन बेडरूममधली तिजोरी उघडून सगळे पैसे अन् दागिने घ्या. आल्या वाटेनं मागच्या भिंतीवरून उडी मारून गायब व्हा. एक शर्ट पॅण्ट लपवून ठेवा. बदलायला लागतील. अंगावर रक्त उडलेलं असेल. बरोब्बर दोन महिन्यानंतर मी मुलांना घेऊन नाशिक बस स्टॅन्ड वर येते त्याच्याआधी दारू मध्ये पैसे उडवून टाकू नका सांगते तुम्हाला. इकडे पोलिसांना मी सांभाळते. आलं का ध्यानात सगळं?"

"का येनार नाई? सगली अक्कल तुलेच हाय का? भडवी दीड शानी"

नवरा आपलं काम नीट करेल याची तिला अजिबात खात्री नव्हती. पण तिच्यासमोर दुसरा उपाय तरी कुठे होता?

"मी वाइच दोन घोट घेतले तरी ही साली बोंबाबोंब करते. माल मिलल्यावर मी येडाखुला हाये काय हिच्याबरोबर आयुश्भर राहायला? रांडला बघू दे वाट नाशिकच्या स्टॅंडवर!"

अखेर तो रविवार उजाडला. मंदानी नवऱ्याला प्लॅन पुन्हा ऐकवला. तिनी ज्या मार्गानी जायचं ठरवलं होतं तो कुठे जाणार होता कुणास ठाऊक! अशा कामाला देवाकडून आशीर्वाद तरी कुठल्या तोंडानी मागणार?

घर सोडताना दोन्ही मुलांना घट्ट कवटाळलं. मुलंही गोंधळली.

आहुजांच्या बंगल्यात शिरताना वॉचमननी नेहमीप्रमाणे विनाकारण बोलण्याचा प्रयत्न केला. दुर्लक्ष करून ती पुढे गेली.

स्वयंपाकात अजिबात लक्ष लागत नव्हतं. अचानक दरवाज्याची बेल वाजली आणि ती उडालीच!

आत्ताच कोण कडमडलं! प्लॅन बदलायचा का? नवऱ्याला थांबवावं का जे होतंय ते होऊ द्यावं? तिच्या घशाला कोरड पडली होती. हात थरथर कापत होते. पायातलं त्राणच नाहीस झालं! आता मागे यायची तिला अजिबात इच्छा नव्हती! जे होईल ते होईल!

कुरिअरवाला आला होता. तो गेला. हुश्श! ती पुटपुटली, "देवा हाच मी तुझा आशीर्वाद समजते."

कानात जीव ओतून ती मागच्या फाटकाच्या आवाजाचा कानोसा घेत होती. अखेर तो आवाज आलाच!
नवरा आरडाओरडा करतच स्वयंपाकघरात शिरला. त्याचे डोळे बघून तिला समजलं की धीर येण्यासाठी त्यांनी सकाळी सकाळीच ढोसलेली होती. "रांडे मी असताना आहुजा लागतो काय तुला? त्या भडव्याचा कोथळाच काढतो. मग तुला बघतो!"

"नका हो असं करू नका. मी तुमच्या पाया पडते!"

दोघांची झटापट सुरू झाली. त्यांनी तिचे केस धरून ओढायला सुरवात केली. तिनी एक लांब श्वास घेतला आणि हातातली आठ इंची कांदे कापायची सुरी नवऱ्याच्या शर्टाच्या चौथ्या बटणाच्या जवळ सर्व शक्ती एकवटून छातीत खालून वर घुसवली! ती मुठीपर्यंत आतच गेली!

आश्चर्यानी त्याचे डोळे एकदम विस्फारले! अचानक त्याचा श्वास सुटला अन् त्याच्याबरोबर दारूचा भसकन् दर्प आला. तशाही स्थितीत तिच्या मनात विचार आला, "ह्यापुढे हा वास मला कधीच घ्यायला लागणार नाही!" नळ उघडल्यासारखं रक्त बदाबदा यायला लागलं. त्याचे डोळे मिटले आणि तो गतप्राण होऊन खाली कोसळला!

तिनी खाली बघितलं तर तिचा हात कोपरापर्यंत रक्तात लडबडला होता. जमिनीवर रक्ताचा तांब्या उपडा व्हावा इतकं रक्त सांडलं होतं.

अन् तिची शुद्ध हरपली. . . . . . .

ती शुद्धीवर आली तेव्हा घर पोलिसांनी गजबजलेलं होतं. तिनी पुन्हा डोळे मिटले.

तिला आत्ता कुणाशीच बोलायची इच्छा नव्हती. आपण कुठे चुकलो नाही ना हे चाचपून बघायचं होतं. घरातला इंच अन् इंच सीसीटीव्हीच्या देखरेखीखाली होता हे तिला माहीत होतं. नवऱ्यानी आहुजाला आणि तिला मारण्याच्या दिलेल्या धमक्या, उगारलेली सुरी, तिच्या याचना, सगळं सगळं व्यवस्थित रेकॉर्ड झालं असणार. तितक्याच महत्वाचं म्हणजे, कमी ताकद असणाऱ्या व्यक्तीने एकाच वारात सुरी हृदयात खुपसण्यासाठी कुठून आणि कशी घुसवली पाहिजे याबद्दल तिनी लावलेला अंदाज खरा ठरला होता.

तिला खात्री होती की आहुजांकडे मदत मागायची जरूरच पडणार नाही. तिच्यासाठी उत्तम वकील, तिच्या मुलांची शिक्षणं, तिला आयुष्यभर पुरतील इतके पैसे आणि घर, हा खर्च आहुजांच्या दृष्टीनी नगण्य तर होताच, शिवाय माणुसकीच्या दृष्टीनी आवश्यक देखील.

पण मर्डर तो मर्डरच. काही वर्षं तरी तुरुंगात काढायला लागणारच. दारूडा आणि गरिबी या दोन राक्षसांपासून आयुष्यभराची सुटका मिळवायची असेल तर किंमत द्यायला हवीच की!

कोणालाही कधीही काहीही फुकट मिळत नाही. अपेक्षा तरी का करायची?

Group content visibility: 
Use group defaults

>>>>>>>>उगीचच पहिल्या क्रमांकाची कथा कशी असेल हा विचार आला.
हो ना. दुसर्‍या क्रमांकाची कथाच इतकी अव्वल आहे, तर पहील्या नंबरची तर काय असेल - असे काहीसे वाटले.

आवडली

सर्वजण,
तुम्हाला कथा आवडली हे ऐकून बरं वाटलं. धन्यवाद !

१. पहिल्या नंबरच्या कथेबद्दल थोडसंं.

एकंदर पाच बक्षिसं होती.

स्पर्धेच्या आयोजकांनी दोन वेगवेगळ्या कथांच्या सुरवातीच्या पहिल्या काही ओळी दिलेल्या होत्या. मी जी सुरवात निवडली ती तुम्ही वाचलीतच. दुसरी अशी होती की एक जुना पण राहाता वाडा चित्रपटाच्या शूटिंगसाठी दिलेला असतो. रहिवासी कशाचं शूटिंग असेल वगैरे अंदाज लावत असतानाच एक काळ्या काचांवाली आलिशान गाडी येऊन कचकन उभी राहाते आणि त्यातून एक पाय जमिनीवर ठेवला जातो . . . . . पुढे लिहा!

बाकी चारही बक्षिसपात्र कथा या दुसर्‍या दिशेनी लिहिल्या गेल्या होत्या. मला पहिली आणि तिसरी वाचायला मिळाली पण सॉफ्ट कॉपी मिळाली नाही. मी त्या मिळवू शकेन पण मायबोलीवर टाकणं योग्य होणार नाही. तुम्हाला हवी असेल तर ई मेलला पाठवू शकेन.
२. @ मी_ अनु - स्वीट टॉकरने तुमच्यासाठी एक निरोप दिला आहे. त्याचं सर्व लिखाण संपूर्णपणे अनुभवच असल्यामुळे त्याची घागर जवळपास रिकामी झाली आहे. मात्र तुम्ही एकदा सुचवल्याप्रमाणे त्याच्या आणि माझ्या सर्व लेखांचं संकलन करून एक (इंग्रजी + मराठी) ई पुस्तक प्रकाशित करावं अशा दृष्टीने आमचे लेख इंग्रजीत अनुवादित करण्याचं काम त्यानी हातात घेतलं आहे.

वाह मस्तच.
पुस्तक नक्की विकत घेऊन वाचू
किंडलवर इ कॉपी नक्की ठेवा मात्र.इ पब्लिश च्या सर्व स्टेप इंटरनेटवर आहेत.
शुभेच्छा.

@मी_अनु - धन्यवाद! आपल्या पुस्तकाची एक तरी कॉपी नक्की विकली जाणार ह्या सुखद कल्पनेनी तो उत्साहानी कामाला लागेल!

Pages