नातं निसर्गाशी: वृक्षवल्ली अम्हा सोयरे वनचरे - भाग २

Submitted by जिज्ञासा on 2 August, 2021 - 00:04

गेल्या भागात आपण जंगलाची इंग्रजीतल्या फॉरेस्ट शब्दाची फोड करून सांगितलेली व्याख्या पाहिली. मूळ जंगलं कशी तयार झाली आणि सेकंडरी फॉरेस्ट्स म्हणजे काय, जंगलाची क्लायमॅक्स किंवा मॅच्युअर स्टेज कशी असते हे पाहिलं. त्यानंतर आपल्याकडच्या जंगलातली विविधता आणि IUCN च्या रेड लिस्ट याद्यांविषयी बोललो. आता या भागात आपण जंगल परिसंस्थेविषयी गप्पा अशाच पुढे चालू ठेवू!

जिज्ञासा: गेल्या भागात आपण माणसाच्या हस्तक्षेपामुळे जातींच्या नष्ट होण्याचा वेग कसा वाढला आहे याबद्दल बोललो. पण माणसाच्या हस्तक्षेपामुळे काही चांगलं घडल्याचं उदाहरण आहे का?
केतकी: होय, आहे आणि अगदी आपल्या महाराष्ट्रातच अनेक ठिकाणी ते पहायला मिळतं देवरायांच्या स्वरूपात! जरी एकूण जंगलांच्या वयाच्या मानाने देवराया या फार जुन्या नसल्या तरी त्या किमान काहीशे वर्षं राखल्या गेल्या आहेत. त्यांचे अनेक फायदे आहेत. त्यामुळे हे एक उत्कृष्ट उदाहरण आहे निसर्गरक्षणाचं. मुळात कोणत्यातरी स्थानिक देवाच्या नावाने या देवराया राखणं सुरु झालं आणि लोकांची पापभिरू वृत्ती आणि बराचसा अंधविश्वास याच्या जोरावर त्या राखल्या गेल्या. देवाच्या कोपाच्या भीतीने या जंगलांमध्ये माणसांचा हस्तक्षेप नव्हता आणि म्हणून तिथली नैसर्गिक विविधता टिकली. त्यामुळे आजही अशा देवराया जिथे माणसांचा वावर कमी आहे त्या ठिकाणी आपल्याला उत्तम जंगल पहायला मिळतं.
तुला एक चांगली आठवण सांगते. आम्ही पानशेतच्या खोऱ्यात एका ठिकाणी असाच देवरायांचा अभ्यास करण्यासाठी गेलो होतो आणि आम्हाला तिथे एक प्रचंड मोठा गारंबीचा वेल दिसला - म्हणजे त्या दोन चार एकर जंगलामध्ये तो वेल पसरला होता इतका मोठा! एखाद्याला भीती वाटावी इतका प्रचन्ड आणि जाड पीळ असणारा तो महावेल आम्हाला पाहायला मिळाला. आता या अशा विशाल महावेलांचा एक फायदा असा असतो की यांच्यामुळे जंगलातलं micro climate राखायला मदत होते. कारण हे वेल बऱ्याच प्रमाणात सूर्यप्रकाश अडवतात आणि त्यामुळे बाष्पीभवन कमी होतं. अर्थात मोठ्या वृक्षांची सावली असतेच पण हे महावेल त्यात भर घालतात. या ठिकाणी मग जिथे जमिनीपर्यंत सूर्यप्रकाश पोहोचू शकत नाही अशी परिस्थिती तयार होते ज्यात मग आपण आधी म्हणालो तशा specialist जाती वाढू शकतात. यात आपल्याकडे हर्दळ नावाचं एक झुडूप (shrub) आहे, याला काही IUCN चं लिस्टिंग नाहीये पण हे झुडूप अत्यंत दुर्मिळ आहे. आता आपल्याकडे याची मोजून काही हजार फारतर झुडुपं राहिली असतील. या हर्दळीसारख्या अशा काही वनस्पती असतात ज्यांना हा स्पेशल अधिवास लागतो तो या महावेली असल्याने तयार होतो आणि टिकून राहतो. तर त्या पानशेतच्या देवराईमधल्या गारंबीच्या वेलाबद्दल एका स्थानिक माणसाने आम्हाला सांगितलं की, “ताई, हा वेल आता फार नाही राहिलेला आता. पूर्वी हा वेल या जंगलातून निघायचा आणि एक किलोमीटर दूर असलेल्या दुसऱ्या गावात दिसायचा. इतका त्याचा विस्तार होता!” म्हणजे आम्ही ज्या देवराईत उभे होतो तिथे त्याची मूळं होती आणि तो वर चढून वरच्यावर इतक्या लांब पसरला होता. हे ऐकल्यावर आम्हाला वाटलं की आता तर हे वेल वाढतील अशी जंगलंच राहिली नाहीत. आम्ही म्हणजे खरंतर अशा जंगलाचा शिल्लक असलेला फक्त एक तुकडाच बघत होतो. पण अर्थात जो दोन तीन एकरावर पसरलेला सुंदर असा गारंबीचा वेल आम्ही पाहिला तोही अतिशय उत्तम अशा देवराईत होता.
आता जर अशी राखलेली एखादी देवराई असेल तर तिचं अजून एक महत्त्व हे की ती आजूबाजूच्या परिसरासाठी एक reference ecosystem असते. आणि तिचा उपयोग हा त्या परिसरात जेव्हा आपण ecological restoration management चा विचार करतो तेव्हा आपल्याला करता येतो. तुम्हाला एखाद्या भागात कोणत्या प्रकारचं जंगल करायचं हे ठरवायचं असेल तर त्यासाठी या देवराया खूप उपयोगी पडतात. तुमच्या जमिनीच्या जवळ जी देवराई असेल तिथल्या झाडांचं composition पाहून, त्याचा अभ्यास करून तुम्हाला तिथल्या जैवविविधतेचा अंदाज येऊ शकतो. पण आपल्याकडे अशा देवराया कमी आहेत आणि ज्या आहेत त्या बहुतेक सगळ्या पश्चिम महाराष्ट्रातच आहेत. पण महाराष्ट्रात आणि भारतात इतरत्र निदान सरकारी वनखात्याच्या ज्या जमिनी आहेत त्या बाकीच्या परिसरापेक्षा काही अंशी जास्त संरक्षित आहेत. कारण या भागांत माणसांचा वावर कमी आहे. किंवा जे अति दुर्गम भाग आहेत - जिथे माणूस सहज पोहोचू शकत नाहीये अशा ठिकाणची जी जंगलं असतात ती आपल्याला reference ecosystem म्हणून वापरता येतात.
आणि जेव्हा देवरायांचा विषय निघतो तेव्हा मी हे जरूर सुचवते की जर रस असेल आणि शक्य असेल तर एखाद्या देवराईला दत्तक घ्या. जर तुम्हाला आयुष्यभर एखाद्या ठिकाणी जात राहायचं असेल तर त्या देवराईत जात रहा. तिथल्या स्थानिक लोकांचा त्या देवराईचे संरक्षण करण्यासाठी आत्मविश्वास वाढवायला मदत करा. कारण गेल्या काही पिढ्या देवराया जपल्या गेल्या त्या अंधविश्वासाच्या जोरावर. देवाचा कोप होईल म्हणून. परंतु पुढच्या पिढ्या या अशा गोष्टींवर विश्वास ठेवणाऱ्या नाहीत. आणि दुर्दैवाने तिथल्या वृक्षांचं किंवा जमिनीचं महत्त्व हे देवाची जागा म्हणून न राहता पैशांत मोजलं जातं आहे. आता मात्र अंधश्रद्धेऐवजी इकॉलॉजीच्या वैज्ञानिक आणि शास्त्रीय दृष्टिकोनातून याविषयी जनजागृती व्हायला हवी आहे. तिथल्या स्थानिक लोकांना या संवर्धनाचे महत्त्व पटवून देणे - त्यांचा आणि त्यांच्या पुढच्या पिढ्यांचा त्यात असलेला फायदा लक्षात आणून देणे असे जर कोणी करू शकले तर या देवराया वाचायला मदत होईल. यात अनेकदा असं होतं की जरी अवेअरनेस असला तरी आर्थिक किंवा सामाजिक कारणांमुळे देवराई राखता येत नाही. अशावेळी जर देवराई राखण्यासाठी जी लागेल ती मदत आपण एकट्याने किंवा गटाने करू शकू का? यात आर्थिक, सामाजिक, कायदेविषयक, सरकारी किंवा अगदी भावनिक आधार सुद्धा आला. बरेचदा गावकऱ्यांना “तुम्ही ही देवराई सांभाळा. तुम्हाला काही अडीअडचण आली तर आम्ही तुमच्या पाठीशी उभे राहू” असा आधार देण्याची गरज असते. शहरातील माणसे अशी काही मदत करू शकतात. कारण बऱ्याचदा देवराईची जमीन ही गावकीची असते. काही वेळा देवराई खाजगी मालकीची पण असते.
यात एक विशेष गोष्ट मला सांगावीशी वाटते जी शहरी माणसे गावाकडच्या माणसांकडून शिकू शकतील. उदाहरणार्थ ही पुण्याजवळ जी कोंडेथरची देवराई आहे ती सगळी गावातल्या साने कुटुंबाची आहे पण तिथल्या गावकऱ्यांची वागणूक अशी असते की ही देवराई जणू गावाचीच आहे आणि तिचे रक्षण करणे ही साऱ्या गावाची जबाबदारी आहे. ते सहसा असं म्हणत नाहीत की नाही ही देवराईची जमीन आमची जमीन नाहीये तर आम्ही काही ही राखणार नाही! आपण ३००० स्क्वेअरफूट जमीन जरी विकत घेतली तरी लगेच त्याला कुंपण घालतो. पण या देवराया जरी खाजगी असल्या तरी त्यांना कुंपण घातलेले नसते आणि गावकरी देखील त्यांचे रक्षण आपणहून करत असतात. यातून आपल्याला आपल्याकडे परंपरागत चालत आलेली value system काय होती याची कल्पना येते. या देवराया राखल्या गेल्या कारण लोकं या value system मुळे त्यांच्या स्वार्थापलीकडे जाऊन गावकीचं भलं बघू शकत होती. आज अशाच सामाजिक दृष्टिकोनातून या देवरायांच्या रक्षणाचं आणि संवर्धनाचं काम हाती घेण्याची गरज आहे. या देवराया राखण्याचे अनेक फायदे आहेत. यांच्यामुळे जंगलाच्या सर्व पर्यावरणीय सेवा तर मिळतीलच शिवाय त्या परिसरासाठी एक उत्तम reference ecosystem राखली जाईल. या देवराया आपल्याला निसर्गशिक्षण, मर्यादित पर्यटन यासाठी देखील वापरता येतील. हे असे उपक्रम शहरातल्या आणि गावांतल्या लोकांना एकमेकांशी जोडणारे उत्तम पूल बनू शकतात.
महाराष्ट्रात हजारो देवराया अशाही आहेत जिथे माणसांचा वावर प्रचंड आहे आणि त्याचा थेट परिणाम आपल्याला तिथल्या प्राणी आणि वनस्पतींच्या आढळणाऱ्या जातींवर दिसून येतो. तुला एक गमतीशीर किस्सा सांगते. आम्ही जव्हार भागातल्या १६ देवरायांचा अभ्यास करत होतो - त्यातल्या प्रत्येकासाठी conservation plan बनवण्याचं काम होतं. तर तेव्हा आम्ही अशाच एका देवराईत गेलो - देवराई कसली? सगळं मिळून तिथे फक्त एक झाड शिल्लक होतं! आणि त्याच्यावर एक मोठी महावेल वाढत होती. मी आणि मानसी असं एकमेकींना सांगत होतो की ही अशी वृक्ष आणि महावेलीची associations दिसतात म्हणून देवराया गरजेच्या आहेत, या महावेलीला या वृक्षाचा आधार कसा मिळाला आहे वगैरे वगैरे. आणि मग आम्ही दोघी ती महावेल कोणती हे ओळखायचा प्रयत्न करायला लागलो. अगदी ओळखीची वेल दिसतेय पण लक्षात येत नाहीये आणि अशा पद्धतीची वेल याआधी आपण पाहिली नाहीये देवराईत, तरी ओळखीची वाटते आहे. असा उलटसुलट विचार करत आम्ही तिथे उभ्या होतो. आत्तापर्यंत बघितलेल्या महावेलींची नावं आठवून तपासून पाहत होतो. असा आमचा काही वेळ गेला पण त्या वेलीची ओळख काही पटेना! तेवढ्यात तिकडचा एक स्थानिक माणूस तिथून चालला होता तर आम्ही त्याला विचारलं. तर तो म्हणे नाही मला नाव नाही माहिती पण हे तर नवीन आलेलं झाड आहे. आम्ही विचारलं की नवीन आलेलं झाड म्हणजे? तर तो म्हणाला, “ते नाही का ज्याला अशी कागदी फुलं येतात वेगवेगळ्या रंगांची? ते झाड आहे हे.” त्याने हे सांगितल्यावर आमच्या डोक्यात लगेच ट्यूब पेटली! अरे ही तर बोगनवेल!! म्हणून झाड ओळखीचं वाटत होतं पण आधी पाहिलेल्या महावेलींमध्ये सापडत नव्हतं!

जिज्ञासा: काय सांगतेस! म्हणजे ती सो कॉल्ड “महावेल” actually बोगनवेल होती? आणि देवराईच्या विचारात असल्याने तुम्हाला ती ओळखू आली नाही!
केतकी: हो ना! आणि आमच्या मनात देवराई म्हणजे फक्त देशी स्थानिक झाडं असं समीकरण असल्याने ही बोगनवेल असेल असा विचारच आला नाही! म्हणजे लक्षात घ्यायची गोष्ट ही की माणसाचं एकदा अतिक्रमण व्हायला लागलं की मूळ देवराई मधलं जंगलाचं composition पार बदलून जातं.

जिज्ञासा: मी आजवर एकच देवराई पाहीली आहे. पण तिथे त्या देवराईच्या उरलेल्या छोट्याश्या तुकड्यावरच्या किमान पाचशे वर्षं जुन्या सातवीणीच्या वृक्षाखाली उभं राहिल्यावर जो एक मन आणि शरीर शांतवणारा गारवा आणि हवेतला सुकून अनुभवला तो मनात कोरला गेला आहे. हे जपलं गेलं पाहिजे ही जाणीव खूप प्रकर्षाने झाली त्याक्षणी हे नक्कीच. त्यामुळे अत्यंत उत्तम स्वरूपात राखलेल्या देवराया पाहिल्यानंतर तुला या जागांना संरक्षण मिळावं असं वाटणं हे अगदी स्वाभाविक वाटतं मला. आणि या देवराया राखण्यासाठी जर शहरातले आणि गावातले समविचारी लोकं एकत्र येऊ शकले तर खरंच उत्तम होईल. तुझी ही कल्पना मला फार पटली!
आता पुढचा प्रश्न विचारते. इकॉलॉजीच्या दृष्टीने पाहिलं तर महाराष्ट्रात सगळीकडे कोणत्या ना कोणत्या प्रकारची जंगलं हेच मूळ स्वरूप आहे. तर मग महाराष्ट्राचा लँडस्केप कसा असावा असं तुला वाटतं?
केतकी: हा एक चांगला प्रश्न आहे. आणि बरं झालं की तू हा प्रश्न विचारते आहेस. मला वाटतं की आपण याच्याकडे थोडं रॅशनली बघायला पाहिजे. “जंगलं हवी” या आग्रहाकडे म्हणत्येय मी! आत्ता माणूस ज्या स्थितीला आहे ना त्या स्थितीत सगळीकडे जंगलं निर्माण करणं हे जवळजवळ अशक्य आहे. कारण ज्या पद्धतीने आपण वस्ती करतोय, आपलं अन्न पिकवतोय ते पाहता हे घडणं कठीण आहे. या माझ्या स्टेटमेंट मागे आपला माणसाचा इतिहास आहे. तो बघितला तर आपण कधीच मागे गेलेलो नाहीयोत. आपण पुढेच जात राहिलो आहोत आणि ही आपल्या सगळ्या मनुष्यजातीला अभिमानाचीच गोष्ट वाटते. हा विकास घडवताना आपण निसर्गाला कसे डावलले याचा विचार फारच कमी लोकांच्या मनात दिसतो. बहुतांश लोक हे करणं म्हणजेच विकास असंच मानतात. आणि तो आपण म्हणजे मी, तू सगळेच मानतो. जरी आपण निसर्गप्रेमी आहोत असं म्हणत असलो तरीसुद्धा आपण या एका मोठ्या सिस्टीमचाच भाग आहोत हे आपण नाकारू शकत नाही. त्यामुळे आता सगळीकडे जंगलं तयार होणं हे अशक्यप्राय आहे. मग अशावेळी जे शक्य होईल असे उद्दिष्ट ठेवावे. हा मी माझ्या २० वर्षांच्या कामानंतर घेतलेला धडा आहे. जेव्हा काम सुरु केलं तेव्हा मी याच विचाराने प्रेरित होते की सगळीकडे मूळची जंगलं परत आली पाहिजेत. पण मग जशी कामांना सुरुवात झाली, सिस्टिम समजू लागली, वेगवेगळ्या प्रकारचे गव्हर्नन्स बघितले, अनुभवले तेव्हा जाणवलं की आपलं ध्येय ही एक fantasy आहे. आणि जर आपण या फँटसीला चिकटून राहिलो तर अशाने पर्यावरणाचा विकास मागे पडतो. त्याऐवजी जर का आपण feasible, rational goals ठेवली - जंगलांसाठी किंवा इतर कोणत्याही इकोसिस्टिमसाठी तर मग पर्यावरणाचा विकास, restoration, conservation हे अधिक चांगल्या प्रकारे पुढे नेता येतं.
तर मग शक्य काय आहे? तुझा जो प्रश्न आहे की महाराष्ट्रात काय होऊ शकतं? आपली सगळी इकॉलॉजी आणि सध्याची परिस्थिती दोन्ही लक्षात घेऊन आपला landscape कसा विकसित करता येईल किंवा काय असायला पाहिजे? या तुझ्या प्रश्नाचं उत्तर देते. आता जी मूळ जंगलं आहेत ती परत येणार नाहीत हे मान्य केलं तर मग किमान असा प्रयत्न हवा की mosaic of habitats तयार व्हावेत. म्हणजे काय तर काही जंगलांचे तुकडे आहेत, काही शेतीचे तुकडे, काही मानवी वस्तीचे तुकडे आणि हे सगळे तुकडे सांधणारे परत नैसर्गिक पट्टे (corridors) आहेत हे असं चित्र हवं. हे corridors म्हणजे जे जोडणारे पट्टे आहेत ते जंगल नाही पण जंगलाशी साधर्म्य सांगणारे असावेत. म्हणजे आत्ता कसं चित्र आहे की दोन शहरं जोडणारा रस्ता हा एक अत्यंत कृत्रिम अनैसर्गिक एलिमेंट आहे. खरंतर सरकार त्याला कॉरिडॉरच म्हणतं! पण मला हसूच येतं हा शब्द वाचून की हा कॉरिडॉर कसला! कारण बरेचदा असलेले ecological corridors तोडून हे रस्ते बनत असतात. So, from an ecological point of view it is actually the antithesis of a corridor! पण मग रस्ता हाच आपण कॉरिडॉर म्हणणार असू तर मग किमान त्याची इकॉलॉजिकल व्हॅल्यू कशी वाढवायची याचा विचार केला पाहिजे. तो शक्य तितका नैसर्गिक पट्टा हवा. मग जर या रस्त्यांच्या दोन्ही बाजूंनी दाट जंगलाचे मोठे रुंद पट्टे केले आणि शिवाय अलीकडे आणि पलीकडे देखील समांतर अंतरावर या रस्त्यांच्या कॉरिडॉरला काटकोनात पट्टे केले तर मग हा रस्ता नैसर्गिक कॉरिडॉर पण बनेल.
जो नैसर्गिक कॉरिडॉर असतो तो प्राण्यांना, पक्षांना एका जंगलातून दुसऱ्या जंगलात येजा करण्यासाठी आवश्यक असतो. आपण पेपरमध्ये बातमी वाचतो की वाघांना किंवा हत्तीच्या कळपाला असे स्थलांतर करण्यासाठी आवश्यक असे पट्टे उरलेले नाहीत आणि त्यामुळे हे प्राणी मानवी वस्तीत किंवा शेतात शिरतात. या अशा प्रकारे जर रस्ते तयार झाले तर आपण हे टाळू शकू.
आता हे कॉरिडॉर विषयी झालं. पण त्या बरोबरीने उत्तम जंगलांचे तुकडे पण विकसित व्हायला हवेत. आत्ता सध्या काय चित्र दिसतं महाराष्ट्रात? फक्त वस्तीचेच तुकडे दिसतात. आणि आजूबाजूचा प्रदेश हा जिथली मूळ इकॉलॉजी अगदी डिग्रेडेड अवस्थेत आहे असा दिसतो. मध्य महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर हे चित्र दिसतं. तिथली मूळ पानगळी/सवाना प्रकारची इकॉलॉजी जाऊन नुसतीच निकृष्ट दर्जाची गवतं उरली आहेत. त्यामुळे आजच्या महाराष्ट्राचा मुख्य रंग हिरवा न राहता तपकिरी ब्राऊन दिसतो. तर अशा जमिनींवर जर प्रयत्नपूर्वक लागवड केली तर काही तुकडे तरी छान हिरवाई असलेले होतील. अर्थात या जंगलांचा विकास करताना केवळ जैवविविधतेला डोळ्यासमोर ठेवून चालणार नाही. यातली काही जंगलं अशी पण असावीत ज्यात अन्न आणि इतर उत्पन्न मिळवून देणारी झाडे असतील. ज्यांच्या मधून आजूबाजूच्या वस्त्यांना अन्न, फळं, औषधी वनस्पती याद्वारे काही उत्पन्न देखील मिळेल. आता गावाकडच्या माणसांना देवराई राखणं अवघड का आहे कारण त्यातून आज काहीही उत्पन्न मिळू शकत नाही. एक पन्नास वर्षे जुने फणसाचे झाड तोडून जर त्याला २५ हजार रुपये मिळत असतील आणि त्याला जर त्याक्षणी पैशाची निकड असेल तर मग फणसाचे झाड राखण्यापेक्षा तोडणे हे तात्पुरत्या काळात फायदेशीर ठरते. पण जर फणसाची काही हजार झाडं गावात आसपास वाढत असतील तर एका शाश्वत पद्धतीने तिथल्या इकॉलॉजीचं नुकसान न करता ती झाडं तोडणं हे शक्य होईल. तुम्ही फणस लावा, निगा राखा, आणि कापून पैसे मिळावा. पण जेव्हा एक झाड कापलं जाईल तेव्हा त्या बदल्यात दुसरं झाड वाढवलं जाईल. जंगल काही प्रमाणात कापायला ही हरकत नाही जर ते पुन्हा आपण लावणार असू. Then it can become a fantastic renewable resource for many things. जेव्हा लँडस्केपचा विचार करताना आपण जंगलांना renewable resource म्हणून स्थान देतो तेव्हा आपल्याला मग त्या विकासाच्या आराखड्यात निसर्ग संवर्धनाला एक स्थान मिळवून देता येते. असेच काही तुकडे agroforestry साठी राखून ठेवता येतील. आणि अर्थात काही जंगलं ही केवळ जैवविविधतेचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी अशी राखली पाहिजेत.
हेच धोरण गवताळ प्रदेशांच्या बाबतीत पण राबवता येईल - काही कुरणं ही पाळीव जनावरांसाठी राखीव आणि काही प्रदेश हे इतर तृणभक्षी प्राण्यांसाठी जसे हरीण यांच्यासाठी राखीव ठेवता येतील. असा निसर्ग आणि माणूस दोघांच्या गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करणारा आराखडा असेल तर तो किमान feasible वाटतो. अर्थात कोणताच प्लॅन १००% यशस्वी होत नाही पण किमान तो यशस्वी होण्याची शक्यता जास्त असते. आत्ता कसं असतं की दोन्ही बाजू टोकाच्या भूमिका घेतात - पर्यावरणवादी purist भूमिकेत असतात तर शासनाला किंवा खाजगी उद्योगांना केवळ मानवी विकास हवा असतो. या दोन्हींचा मध्य साधत विकास घडायला हवा आहे.

जिज्ञासा: तुझा हा दृष्टिकोन मला खूपच पटला आहे. यात थोडं अवांतर होईल पण आपण जे नैसर्गिक कॉरिडॉर विषयी बोललो त्यांचं महत्त्व अजून सांगता येईल का? मी काही वर्षांपूर्वी मधमाशांवर संशोधन करणाऱ्या एका शास्त्रज्ञांचा सेमिनार ऐकला होता. त्यात त्यांनी सांगितलं की मधमाशी एका वेळी काही विशिष्ट अंतर उडू शकते. त्यानंतर तिला कुठेतरी फुलावर किंवा पानावर बसायला लागतं. या तिच्या flight च्या अंतरात जर फक्त सिमेंट काँक्रीट असेल तर मग तिची पंचाईत होते! अमेरिकेतल्या सहा/आठ पदरी महामार्गांमुळे त्यांच्या दोन्ही बाजूंना मधमाशांच्या वेगवेगळ्या जाती दिसू लागल्याचे त्यांना संशोधनात आढळले होते. The freeways act as genetic barriers for the bees and other insects. तो सेमिनार ऐकेपर्यंत रस्त्यांचा असा परिणाम असू शकतो याची मला जाणीवच झाली नव्हती!
केतकी: नक्कीच! कॉरिडॉरची गरज खूपच असते पण आता तू genetic divide विषयी बोललीस म्हणून आधी थोडं त्याबद्दल इकॉलॉजीच्या दृष्टीने बोलते. या विषयी दोन अर्ग्युमेंट्स होतात. एक जे तू आत्ता मांडलंस ते. पण दर वेळेस barriers किंवा अडथळे हे वाईटच असतात असंही नाही. या अशा अडथळ्यांमुळे अनेकदा speciation म्हणजे नवीन जाती तयार व्हायला मदत होते. आपण कसं बघतो यावर सगळं अवलंबून असतं. आता धबधबा हा एक नैसर्गिक अडथळा आहे. धबधब्याच्या वरती जे सगळे उभयचर प्राणी असतात ते काही धबधब्याबरोबर खाली येऊ शकत नाहीत. त्यामुळे आपल्याला बरेचदा धबधब्याच्या वरच्या बाजूला आणि तळाशी वेगवेगळ्या बेडकाच्या जाती दिसतात. We agree to this genetic divide because it is natural. In fact, आपण या गोष्टीचं कौतुक करतो आणि धबधब्यामुळे जैवविविधता कशी वाढली असं म्हणतो. पण रस्त्यांच्या बाबतीत आपण ही अशी भूमिका घेत नाही. अर्थात आपण कोणत्या जातींविषयी बोलतो आहोत याचाही विचार महत्त्वाचा आहे. पण या विषयाला अनेक कंगोरे आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे.
आता कॉरिडॉर्सची गरज का असते कारण बरेचसे मोठे प्राणी एका मोठ्या क्षेत्रफळावर वावरतात. उदाहरणार्थ वाघ हा भरपूर फिरणारा प्राणी आहे. किंवा काही हत्तींसारखे प्राणी migrate करतात त्यासाठी त्यांना कॉरिडॉर्सची गरज असते. इतकंच नाही अगदी स्थानिक पातळीवर पाहिलं तरी कॉरिडॉरची गरज असते. आता समजा डोंगरमाथ्यावर (ridge line) जंगल आहे आणि पाण्याच्या स्रोत हा दरीत कुठेतरी आहे (valley line). तर प्राण्यांना पाण्यासाठी रोज खाली उतरून यायला लागणार. त्यासाठी सुरक्षित कॉरिडॉर हवा. जो बऱ्याचदा ओढ्याच्या काठाने असतो पण काही वेळा तो तुटलेला असतो. यात जर मध्ये मानवी वस्ती/शेती/रस्ता असे काही अडथळे आले तर त्याचा परिणाम या प्राण्याच्या रोजच्या आयुष्यावर होतो. त्यामुळे या कॉरिडॉर्सचा विचार आवश्यक आहे. यात मग काय करता येतं? की यातले जे मानव निर्मित घटक आहेत ना त्यांची इकॉलॉजिकल व्हॅल्यू वाढवायची. We can’t stop building roads. प्रत्येक सरकारच्या प्रायोरिटीवर रस्ते आहेतच. आणि काही प्रमाणात ते आवश्यकही आहेत. मग त्यांच्या बाजूंनी जंगल सदृश्य पट्टे केले तर आपण या रस्त्यांमुळे होणारे नुकसान कमी करू शकू.
वस्त्यांमध्ये किंवा शेतीमध्ये झाडं कमी दिसतात. मग जर शेतात बांधांवर झुडुपांची कुंपणं (hedges) केली किंवा काही झाडं लावली जी खरी पूर्वी आपल्याकडे बांधावर आवर्जून लावली जायची. त्यामुळे झुडुपांवर मधमाशा, फुलपाखरे येतात जी पिकाच्या परागीभवनात मदत करू शकतात. किंवा पक्षी शेताच्या जवळ येऊन बसू शकतात आणि पिकावरचे किडे टिपून खाऊ शकतात. यासाठी जुने वृक्ष (old growth trees) महत्त्वाचे असतात. जर आपण या साऱ्याचा विचार करून नियोजन केले तर एखाद्या लँडस्केपमधला मानवी ठसा हा संपूर्णपणे कृत्रिम न राहता थोडा नैसर्गिकतेकडे झुकवता येतो. यातून मग आपल्याला त्या परिसराची इकोसिस्टिम राखता येते.

जिज्ञासा: आजच्या आपल्या भागात आपण इथेच थांबूया. जंगल हा बायोम आपल्या सगळ्यांच्याच जरा जास्त ओळखीचा! त्यामुळे काही प्रश्न अजून बाकी आहेत. तेव्हा पुढच्या भागात आपल्या जंगलांविषयीच्या गप्पा अशाच सुरु ठेवूया.
या मालिकेचा पुढचा भाग पुढील सोमवारी प्रसिद्ध होईल.

आधीचे भाग

भाग १: नातं निसर्गाशी - पृथिवी नः प्रथतां राध्यतां नः - भाग १

भाग २: नातं निसर्गाशी - पृथिवी नः प्रथतां राध्यतां नः - भाग २

भाग ३: नातं निसर्गाशी - सुजलाम् सुफलाम् मलयज शीतलाम्

भाग ४: नातं निसर्गाशी: अंजन कांचन करवंदीच्या काटेरी देशा

भाग ५: नातं निसर्गाशी: गंगेच यमुनेचैव गोदावरी सरस्वती - भाग १

भाग ६: नातं निसर्गाशी: गंगेच यमुनेचैव गोदावरी सरस्वती - भाग २

भाग ७: नातं निसर्गाशी - तळे राखी तो पाणी चाखी

भाग ८: नातं निसर्गाशी: वृक्षवल्ली अम्हा सोयरे वनचरे - भाग १

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कॉरिडॉर्सची गरज का असते कारण बरेचसे मोठे प्राणी एका मोठ्या क्षेत्रफळावर वावरतात............ .... ... .....

बरोबर. यासाठी माहितगारांचे आराखडे घेऊन सरकारने ( कारण जमिन त्यांची आहे) भूभाग जोडावेत.

उदाहरणार्थ - कर्नाळा डोंगर, तळाचे वन, खाडी. आणि पनवेल - उरण मार्गे अरबी समुद्र हा एक एक भूभाग धरून जोडावेत. यातून जाणाऱ्या रस्ते आणि रेल्वे मार्गांवर ठिकठिकाणी शंभर दोनशे मिटर्स रुंदीचे पुल बांधून त्यावर मातीचे आच्छादन करून झाडे लावून जोडावेत. वाहनं जाणार बोगद्यांतून आणि काही प्राणी आणि कीटक याचा उपयोग करतील वरून अल्याड पल्याड जाऊ शकतील.