हळद आणि हडळ - १०

Submitted by देवभुबाबा on 29 July, 2021 - 04:34

हळद आणि हडळ - १०

संध्याकाळ झाली. दूरचे पाहुणे मंडळी गावात, शेजारी, घरी यायला चालू झाले. नाक्यापासून मांडवापर्यंत रंगीबिरंगी लाईट्स लावल्या होत्या. मांडवामध्ये मोठाले हॅलोजनचे दिवे लावले होते. पूर्ण घर आंगण प्रकाशाने उजळला आणि लगीन सराईच्या गाण्यांनी परिसर दुमदुमू लागला.

दिवसभरातील घटना अमृताच्या आईच्या, आजीच्या डोळ्यासमोरून जात होत्या. भुताबरोबर संपूर्ण एक रात्र नि एक दिवस कसाबसा गेला होताच, आता पुन्हा तीच वेळ. बरं दिवसा लोकांची ये-जा असते, उजेड असतो, आवाज असतो. पणं रात्री?

जसजशी वेळ सरत होती, कामात व्यस्त असूनही आई, आजी नि अवंती अस्वस्थ होत होत्या. आज सर्व जण देवघरात झोपू (अमृतादेखील) अशी त्यांनी योजना आखली. माणसांची ये-जा होत असताना अमृताचे एकाकी वेगळं वागणं, छोट्या छोट्या गोष्टींतून दिसू लागलं होत. पण आनंदाच्या भरात माणूस उत्सुर्फपणे वागू शकतो असाच सर्वांचा समज होता. पाहुणे मंडळींची जेवणे आटोपली. काही मंडळींना सोबतीला घेऊन अमृताच्या बाबांनी दुसऱ्या दिवसासाठी पिण्याचं पाणी ड्रम मध्ये भरलं. जेवणासाठी भांडी एका बाजूला धुवून ठेवली. सकाळी बाजारातून कोणकोणते सामान आणायचे, त्याची यादी एकाकडे सोपवली. दुपारच्या जेवणासाठी आणि संध्याकाळच्या जेवणासाठी वेगवेगळी यादी दुसऱ्याकडे सोपवली. भटजी, मांडवस्थापनेसाठीची तयारी, बेन्जो, आचारी, शाकाहारी आणि मांसाहारी जेवण, गोडधोड या सर्वांची चर्चा करून झाली. सर्व मंडळी झोपायला गेल्यावर अमृताचे बाबा घरात आले. आता त्यांना चर्चा करायची होती मान-पानाच्या कपड्यांवर.

किती वाजता, कुठे, कोणाकोणाला, काय द्यायचं, हि चर्चा होत असतानाच अमृता तेथे आली. "मला पणं दोन साड्या, एक शर्ट पीस एक पॅन्ट पीस हवा आहे." अमृता म्हणाली. आता अमृताला मध्येच "का?" विचारलं तर उगाचच परिस्थिती बिघडेल याची सर्वांनाच भीती होती. त्यामुळे कुणीही तोंडातून शब्दही काढला नाही. तिच्या आईने लगेचच तिच्या हातात, तिने मागितलेले मानपानाचे सामान सोपविले. अमृताने साडी आणि इतर कपडे एका हातात घेऊन त्यावर हात फिरवत प्रेमाने न्याहारू लागली. ती तशीच धावत तिच्या खोलीत गेली. सावलीशी उत्सुर्फपणे बोलू लागली.

"हे आई-बाबांसाठी, कित्येक वर्ष हे अर्धवट राहिलेलं एक एक स्वप्न अनुभवतेय" सावली तिच्यासमोरच उभी होती, अमृताच्या हाताला हात लावून. त्या दोघींचं प्रतिबिंब भिंतीवर पडलं होत. अमृताच्या डोळ्यांतून आनंदाश्रू ओघळत होते.

"फक्त तुझ्यामुळे मी हे अनुभवू शकले" सावली अमृताला बोलत होती. पण ओठ मात्र अमृताचेच हलत होते.

"उद्या आपलं घर स्वच्छ करावं लागेल, उद्या हळद आहे, तू, येशील ना?... अमृता... येशील...... तुला यावंच लागेल"

अमृता स्वतःशीच बोलत होती. हसत होती, रडत होती.

दाराच्या फटीतून अमृताचे बाबा सर्व पाहत होते. उद्या हि पुन्हा त्या बंगल्यात जाणार? काय करावं? कसं थांबवावं? पाहुण्यांसमोर असं काही केलं तर भरलेल्या मांडवात चर्चा होईल, हसू होईल आणि वेळप्रसंगी लग्नही मोडेल. "नाही, आता असं नको व्हायला" अमृताचे बाबा मनातल्या मनात विचार करत होते.

आजूबाजूची पाहुणे मंडळी झोपायला गेली. गाण्यांचा आवाज बंद झाला. गाव शांत झाले. मंडपात उजेड असला तरीही भयाण शांतता पसरलेली.घरातील पंख्यांच्या फिरणाऱ्या पातीचा आवाज आणि बाहेर किर्र्रर्र्र कर्कशता. घड्याळाचे काटेही हळूहळू आवाज देत या भयानकतेला संथ साथ देत होते. धावपळीमुळे सर्वच दमले होते. पाठ टेकावी म्हणून पहुडलेले सर्वच जण काही वेळातच डोळे मिटून गाढ झोपी गेले. घड्याळात बाराचा ठोका वाजला आणि अमृताच्या दाराची कडी खडखडली. "कर्रर्रर्र कर्रर्रर्र" करत दार वाजला आणि समोर उभी राहिली, हळदी रंगाची साडी नेसलेली एक लावण्यवती.

हातामध्ये मानपानाचे कपडे घेऊन, सजून-सवरून अमृता एकटीच निघाली. सोबत होती फक्त तिची सावली. तिचे डोळे पूर्णपणे वटारलेले, चेहऱ्यावर वेगळीच चमक. अमृता नेहमीपेक्षा अधिकच डौलदार वाटत होती. अमृताचे बाबा तीच स्वरूप पाहून भांबावले. तिला आवाज देण्याची ताकद त्यांच्यात नव्हती. आवाज देण्याची हिम्मत करूनही तोंडातून शब्द फुटत नव्हते. हात पाय थरथरत होते. जिथे उभे होते, तिथेच ते कोसळले. आजी, आई आणि अवंती अजूनही देवघरातच झोपेत होत्या. बाहेरचा दरवाज्या उघडण्याचा आवाज होताच, त्यासुद्धा गडबडीने उठून बाहेर आल्या. अमृताला बाहेर जाताना पाहून सर्वांचेच डोळे विस्फारले. "आ" वासून त्या बघू लागल्या. अमृताचे बाबा खाली पडलेले पाहून अवंती तिकडे धावली. आई आणि आजीसुद्धा अमृताच्या बाबांना सावरायला गेले. घरात पाहुणे होते. त्यांना जागे न करता हे चौघेही हळूहळू तिच्या मागोमाग चालू लागले. मंडप सोडल्यावर पुढे अंधार वाढत होता. कर्रर्रर्र कर्रर्रर्र वाजत, बंगल्याचा गेट उघडला. वाऱ्याचा वेग अचानकच वाढला. वाऱ्याच्या वेगात अमृताचे केस उडु लागले.. साडीचा पदर हवेत फडफडु लागला. सूर्रर्रर्र सूर्रर्रर्र वाऱ्याचा आवाज काळोखाला साद घालत होता. अमृताच्या घरातले गेट पर्यंत पोहोचले. अमृता, तारासाहेबांच्या बंगल्याच्या दारात होती. आपोआपच बंगल्याचा दरवाज्या उघडला. काळोखात गडप झालेला तारासाहेबांचा बंगला प्रकाशाने चमकू लागला. आणि आतून दोन हात बाहेर आले.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

बाप्रे!
चांगली रंगत चाललीए कथा.