मक्का की ' बेक्का ' ? - भाग ०५

Submitted by Theurbannomad on 27 July, 2021 - 15:01

अदेल शेमारी मूळचे कुवेती अभ्यासक. मक्केवरच्या संशोधनात डॅन गिब्सन यांना त्यांच्याकडून बऱ्याच विषयांची सखोल माहिती मिळालेली आहे. त्यांनी डॅन गिब्सन यांचं लक्ष एका वेगळ्या दिशेला वळवलं. त्यांनी डॅन यांच्या लक्षात आणून दिली एक महत्वाची बाब - जिचा संबंध होता इस्लाममध्ये प्रार्थना करण्यासाठी वापरात असलेल्या प्रार्थनास्थळांशी.

प्रेषितांनी आपल्या समस्त अनुयायांना मक्केकडे तोंड करून नमाज पढायचा आदेश दिला आणि त्यांच्या नंतर तो आदेश आजतागायत इस्लाम मानणारे समस्त लोक पाळत आलेले आहेत. इस्लामी जगताचं प्रार्थनास्थळ म्हणजे मशीद. या मशिदीत दोन महत्वाचे भाग कटाक्षाने तयार केले जातात - मिहराब आणि मिनबार. मिहराब म्हणजे मक्केची दिशा कळावी म्हणून त्या दिशेकडच्या भिंतीत तयार केलेली अर्धवर्तुळाकार खाच आणि मिनबार म्हणजे थोडा उंचावलेला चौथरा, ज्यावर उभं राहून इमाम जमलेल्या अनुयायांना प्रवचन देऊ शकतात. याशिवाय पुढे पुढे घुमत हाही मशिदीच्या वास्तुरचनेचा भाग होतं गेला, पण मिहराबशिवाय मशीद पूर्ण होऊ शकत नाही हा सर्वमान्य नियम आहे.

शेमारी यांनी बरोब्बर याच महत्वाच्या खुणेवर बोट ठेवलं. एक तर कुराणात एखाद्या विशिष्ट ' शहराच्या ' दिशेला तोंड करून नमाज पढावा अशी स्पष्ट सूचना नाही...त्यात उल्लेख आहे फक्त ' मस्जिद - अल - हराम ' चा. शिवाय प्रेषित मोहम्मदांनी ६२४ A .D . या साली ईश्वराच्या हवाल्याने प्रार्थनेसाठी समस्त मुस्लिम जगताचं तोंड मक्केच्या दिशेला वळवायचा आधी जेरुसलेमच्या अल - अकसा मशिदीकडे तोंड करून प्रार्थना केली जायची. या अल अकसा मशिदीला मक्केपेक्षा जास्त महत्व तेव्हा होतं. मोहम्मदांनी ' सुरा २ ' मध्ये मक्केच स्थान ' किबला ' म्हणून निश्चित केलं आणि मक्केला अव्वल दर्जा प्राप्त झाला. गिब्सन आणि शेमारी या दोघांनी मोहम्मदांनी हा आदेश देण्याआधी अरबस्तानचे लोक ' किबला ' कोणत्या स्थानाला मनात याचा शोध घेणं सुरु केलं.

त्यांनी मदत घेतली ' गूगल अर्थ ' ची. या माध्यमातून त्यांनी इस्लामपूर्व काळातल्या प्रार्थनेसाठी वापरात असलेल्या अतिप्राचीन इमारतींचा शोध घ्यायला सुरुवात केली. त्यांना खुद्द मदिना शहरात एक अशी वास्तू मिळाली, जिचं नावच ' दोन किबल्यांची मशीद ' असं आहे. या मशिदीची सध्याची किबल्याची भिंत मक्केच्याच दिशेला आहे, पण १९७७ साली जुनी मशीद मोडकळीला आल्यामुळे तिचा जीर्णोद्धार करण्याच्या कामातून तिचा मूळ ढाचा प्रकाशात आला आणि त्यातून डॅन गिब्सन यांना एक नवी माहिती समजली. या मशिदीचा मूळ किबला होता उत्तरेला - जेरुसलेमच्या दिशेला.

त्यानंतर त्यांनी ६२३ AD सालची मस्जिद - अल - किबलातेन, ६२७ AD सालची चीनची गुआंगझू मशीद, ६४१ AD सालची फुसतातची इजिप्शियन मशीद, ७०० AD सालची जॉर्डनची उम्मयाद पॅलेसची मशीद, ७०१ AD सालची लेबॅनॉनची बालबेक मशीद, त्याचं सालची जॉर्डनच्या अम्मान शहरातील सीटाडेल, 705 AD सालची येमेनच्या सना शहराची ग्रँड मशीद, ७०६ AD सालची इस्रायलची खिरबात - अल - मिन्या मशीद, याच सालची इराकची वासित मशीद आणि खुद्द अल अकसा मशीद, ७२४ AD सालची आत्ताच्या वेस्ट बँक भागातली खिरबात अल मफजर मशीद आणि लेबॅनॉनची अंजार मशीद अशा सगळ्या मशीदींचा या दोघांनी अभ्यास केला. यापैकी गुआंगझू मशिदीकडे डॅन गिब्सन यांचं लक्ष गेलं. हे शहर जुन्या काळचं ' कँटोन ' - जे सिल्क रूटवरचं अरब जगताशी व्यापारमार्गाने जोडलेलं महत्वाचं शहर होतं. इथली मशीद खुद्द प्रेषित मोहम्मदांच्या काकांनी बांधलेली होती, आणि तीही इस्लामच्या स्थापनेच्या अवघ्या ६ वर्षानंतर.

आधुनिक साधनांनी या मशिदीचा ' किबला ' तपासल्यावर डॅन यांना आश्चर्याचा धक्का बसला...कारण तो जेरुसलेम किंवा मक्का या दोन्ही दिशांकडे नव्हता. त्यांनी लगेच त्यानंतरची फुसतात मशीद तपासायला घेतली...या मशिदीचं अनेक वेळा पुनर्बांधकाम झालं असलं, तरी इस्लामी दस्तऐवजांमध्ये या मशिदीच्या मूळ ढाच्याचा उल्लेख आहे. त्यात असं लिहिलेलं आहे, की या मूळच्या मशिदीचा पूर्वेकडे तोंड करून तयार केलेला किबला नंतरच्या काळात दक्षिणेकडे आत्ताच्या मक्केच्या दिशेला वळवला गेला. नंतर त्यांनी उम्मयाद महालातली किबलाची दिशा तपासली. हा महाल इस्लामच्या स्थापनेच्या ऎशी वर्षांनी तेव्हाच्या श्रीमंत अब्बास कुटुंबीयांनी बांधलेला. याही महालातल्या किबलाची दिशा जेरुसलेमच्या दिशेला नव्हती. बालबेक मशिदीचा किबलाही वेगळ्याच दिशेला होता.

अखेर अम्मानच्या सीटाडेल महालाच्या मशिदीच्या किबलाची दिशा त्यांना आत्ताच्या मक्केच्या दिशेला असलेली सापडली. येमेनच्या ग्रँड मशिदीच्या किबलाची दिशा मक्केशी तंतोतंत जुळत नसली तरी बऱ्यापैकी त्याचं दिशेला होती....पण पुन्हा एकदा खिरबात - अल - मिन्या मशिदीचा किबला जेरुसलेम किंवा मक्का या दोन्ही दिशांकडे नव्हता. पुढच्या वासित मशीदीचाही तसाच प्रकार होता. अल अकसा मशिदीच्या बाबतीतही एक विचित्र प्रकार त्यांना दिसून आला. आजच्या सोनेरी घुमटाची वास्तू म्हणजे मूळची अल अकसा मशीद नव्हे...ती आहे या घुमटाच्या वास्तूच्या बाजूला. तिथेही किबलाची भिंत आहे आणि ती सुद्धा ना मक्केकडे तोंड करून आहे ना अजून कोणत्या दिशेला. खिरबात अल मफजर आणि अंजार मशीद या मशिदीही या विरोधाभासाला अपवाद ठरल्या नाहीत.

या सगळ्यामुळे डॅन गिब्सन यांना कमीत कमी या गोष्टीचा तरी पुरावा मिळाला, की कुराणात नमूद केलेली प्रार्थना करण्याची दिशा जेरुसलेमही नाही आणि मक्काही नाही.....पूर्वीच्या अरबांचा दिशादर्शनाचा अभ्यास तगडा होता. ताऱ्यांच्या साहाय्याने भर वाळवंटात ते अचूकपणे दिशा ओळखत. अगदी पूर्वीच्या काळी उपलब्ध असलेल्या साहित्यांचा मागासपणा जमेल धरला तरी थोड्याबहुत प्रमाणात चुकीच्या का होईना, पण किमान मक्का किंवा जेरुसलेम या दिशांकडे मशिदीचा किबला असलायला हवा होता...पण या दिशांमध्ये खूप मोठा फरक दिसून येत होता. आता मात्र त्यांनी या सगळ्या मशिदीच्या किबलाच्या दिशा एकाच नकाशात रेखायचा निर्णय घेतला....आणि त्यांना त्यांचा ' युरेका ' शोध सापडला.

या सगळ्या मशीदींचा ' किबला ' लांबवत नेला, तर त्यांचा सामान छेदनबिंदू बरोब्बर जॉर्डनच्या पेट्रा शहरात सापडत होता. या सगळ्या मशिदी इस्लामच्या स्थापनेनंतर शंभर वर्षांच्या अवधीत बांधलेल्या मशिदी होत्या. पेट्राच्या दिशेला त्यांचा किबला अचूक उत्तर देत होता. डॅन गिब्सन यांच्या शोधकार्याला आता दिशा मिळालेली होती. त्यांनी आता आत्मविश्वासाने आपला हा शोध जगापुढे आणण्याचं ठरवलं....हजारो वर्षांपासून इस्लामिक जगात ज्या जागेला किबला समजत होतं, ती जागा मुळातच चुकीची आहे असा हा त्यांचा शोध अर्थात सहजासहजी स्वीकारला जाणार नव्हताच...पण त्यांच्या पुराव्यांचं खंडन करण्यासाठी त्याहूनही सबळ पुरावे जमवण्याची जबाबदारी आता विरोध करणाऱ्यांची असणार होती....

डॅन गिब्सन यांनी आता शोध घ्यायला सुरुवात केली या सगळ्या गोष्टींमागच्या कारणांचा...आणि ते पुन्हा एकदा थबकले इस्लामच्या एका अशा टप्प्यावर येऊन, जो आजही इस्लामच्या इतिहासातला काळा अध्याय म्हणून ओळखला जातो...पण त्यावर पुढच्या भागात. तोवर अलविदा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान!
किबला म्हणजे नेमके काय? प्रार्थनास्थान की प्रवेशद्वार?

@ देवकी
किबला म्हणजे प्रार्थना ज्या दिशेला तोंड करून करायचा संकेत आहे, ती दिशा.