मक्का की ' बेक्का ' ? - भाग ०३

Submitted by Theurbannomad on 27 July, 2021 - 10:51

आजच्या काळात अरबस्तानच्या रेताड वाळवंटात मोठमोठाली महानगरं वसलेली असली, तरी प्राचीन काळी या भागात वस्ती करणं अतिशय दुरापास्त होतं....पण काहीही झालं, तरी हे वाळवंट होतं भारत आणि आग्नेय दिशेकडच्या प्रगत साम्राज्यांच्या आणि युरोप-लेव्हन्ट भागातल्या संस्कृतींच्या बरोब्बर मधल्या भागात. या दोन संस्कृतींमध्ये यथावकाश व्यापाराचे मार्ग प्रस्थापित झाले आणि या मार्गावरची गावं हळू हळू पुढारत गेली. पूर्वेकडून मसाले, धान्य, मौल्यवान रत्न पश्चिमेकडच्या देशात जायला लागली. समुद्रमार्ग जोखमीचा आणि लांबचा असल्यामुळे खुश्कीच्या मार्गाचाच पुढे बऱ्यापैकी विकास झाला. ' सिल्क रूट ' म्हणून ओळखला जाणारा चीन ते दमास्कस दरम्यानचा मार्ग, ' इंसेन्स ट्रेड रूट ' हा अरेबियन महासागर आणि लाल समुद्र यांच्या किनाऱ्याने जाणारा मार्ग असे दोन महत्वाचे मार्ग तेव्हा प्रचलित होते. त्यांना ' नेबातियन व्यापारी मार्ग ' असं संबोधलं जातं.

या दोन्ही मार्गांना जोडणारा दुवा होते दोन मार्ग - आजच्या बाहरेन देशाच्या भागात असणारं ' गेरा ' शहर आजच्या सौदी अरेबियाच्या ' एल रिआ ' शहारामार्गे मदिना शहरापासून दीडशे किलोमीटर अंतरावर असलेल्या खैबर ओऍसिसला जोडणारा एक मार्ग वाळवंटाच्या भागातून जाई, जो अतिशय खडतर होता. दुसरा बाबिलोन ( आजचा इराक ) भागातून सौदीच्या ' जौफ ' प्रांतातून तयमा गावाला जोडणारा मार्ग मात्र बऱ्यापैकी सुसह्य होता. जौफ प्रांताला आजच्या जॉर्डन देशात असलेल्या ' पेट्रा ' भागातून येणारा व्यापारी मार्गही जोडला जाई.

या सगळ्यातून पूर्वीच्या काळी मदिना शहराला असलेलं महत्व अधोरेखित होतं. या शहराचा उल्लेख अनेकदा बायबल, कुराण, तोरा आणि अनेक प्राचीन हस्तलिखितांमध्येही वारंवार आलेला आहे. या कोणत्याही मार्गांवर एक शहर मात्र कधीही आलं नाही .... त्या शहराचं नावं होतं मक्का. तेव्हाच्या काळी ' empty quarter ' म्हणजेच रिकाम्या ओसाड भागात - जिथे मनुष्यवस्ती अतिशय तुरळक होती आणि आयुष्य अतिशय खडतर - मक्का शहर होतं.

डॅन गिब्सन या महत्वाच्या विसंगतीवर बोट ठेवून आपल्या संशोधनाचा रोख मनुष्यस्वभावाच्या दिशेला नेतात. जिथे जिणं अतिशय खडतर असेल तिथे तेव्हाच्या काळात धार्मिकदृष्ट्या इतकं महत्वाचं केंद्र का तयार होईल, या त्यांच्या प्रश्नाला समाधानकारक उत्तरं देणं अजूनही कोणाला जमलेलं नाही....पण त्यांच्या या प्रश्नाला प्रतिप्रश्न मात्र लगेच मिळू शकतो - जर हे मक्का शहर ' ते ' नाही, तर ' ते ' मक्का शहर नक्की कुठे असेल?

डॅन गिब्सन यांनी या प्रश्नाचं उत्तर शोधायला थेट कुराण हाती घेतलं. कुराणात ' होली सिटी ' किंवा ' वर्जित स्थान ' म्हणून ज्या जागेचा उल्लेख आहे, त्या जागेचं वर्णन त्यांनी सर्वप्रथम हाती घेतलं. इसवी सन ५७० हे वर्ष नबी मुहम्मद यांचं जन्मवर्ष म्हणून ओळखलं जातं. ते ज्या घरात जन्माला आले, ते घर नेबातियन व्यापाऱ्याचं घर होतं. स्थान होतं ' मक्का ' ..... मोहम्मदांना आसपासच्या भागात असलेली आर्थिक आणि सामाजिक विषमता त्रास देत असे. त्यांनी वयाच्या चाळिसाव्या वर्षी आपला जास्तीत जास्त वेळ आसपासच्या डोंगरातल्या गुहांमध्ये ईश्वराचं ध्यान करण्यात घालवायला सुरुवात केली. त्यांना सर्वप्रथम स्वर्गदूताने दर्शन दिलं इ.स. ६१० या वर्षी. ज्या गुहेत त्यांना हा दृष्टांत झाला, ती हिरा नावाची गुहा मक्केच्या हेजाझ भागात मूळ मक्केपासून दहा - अकरा किलोमीटर अंतरावर असलेल्या जबल - अल - नूर डोंगरात होती.

या सगळ्या वर्णनात अनेक विसंगती आढळून येतात. प्रेषितांच्या आयुष्यातल्या या घटना कुराणात अतिशय विस्ताराने आलेल्या आहेत. त्यावरून हे स्पष्ट होतं, की त्यांचा जन्म झालेला कुराईश कबिला आणि त्यांचं कुटुंब त्या काळातल्या नावाजलेल्या व्यापारी कुटुंबांपैकी होतं. हे बानू हाशिम कुटुंब जर इतकं मोठं व्यापारी कुटुंब असेल, तर ते मुख्य व्यापारी मार्गापासून लांब छोट्याशा गावात राहणं ही बाब थोडीशी खटकणारी नक्कीच वाटते. तेव्हाचे व्यापारी पैसा कमावल्यावर एखाद्या बऱ्यापैकी गावात किंवा शहरात जाणं पसंत करत असत....पण हे कुटुंब स्वतःला मक्केसारख्या गावात नक्की कोणत्या उद्देशाने ठेवेल याचं काहीही उत्तर पूर्वीच्या हस्तलिखितांमध्ये सापडत नाही.

कुराणात मक्केला ' सगळ्या शहरांची माता ' संबोधलं गेलं आहे. या शहराचं वर्णन अरबी भाषेत ' उम अल कोरा ' असं आहे - ज्याचा अर्थ तटबंदीयुक्त महानगर असाही होतो. कुराणात उल्लेख आल्याप्रमाणे मोहम्मद आपल्या अनुयायांना अनेकदा मक्केच्या ' सीमारेषांपर्यंत ' घेऊन जाताना डोंगररांगा आणि त्याच्या मधून जाणाऱ्या दऱ्या अशा भागातून पुढे होत. नबी मुहम्मद यांची पत्नी आयेशा हिने एका अशा मनुष्याचा उल्लेख केला आहे, जो मक्केला येण्यासाठी अतिशय उत्सुक होता. तिने त्याचं वर्णन करताना म्हंटल आहे, की तो मनुष्य अतिशय मनापासून मक्केला येण्यासाठी प्रयत्न करत होता. ' वेगवेगळ्या झाडांनी भरलेली गवताळ ' वादी ' असलेल्या या शहरात ' त्याला यायचं होत...आणि तिथे आल्यावर त्याला मुबलक पाणी आणि हिरवळ दिसली. एक द्राक्षे खात बसलेला साखळदंडांनी बांधून ठेवलेला कैदी त्याला या शहरात दिसला....फळांचा मोसम नसूनही त्याला हे दृश्य दिसल्यामुळे त्याला बरंच आश्चर्य वाटलं. हे सगळं वर्णन आजच्या मक्का शहराचं असणं तार्किक दृष्ट्या अयोग्य वाटतं...कारण प्राचीन काळापासून आजच्या मक्का भागात पाण्याचं दुर्भिक्ष्य होतं आणि लागवडीसाठी उपयुक्त जमीनही दूरदूरपर्यंत नव्हती. या शहराला तटबंदी कधीच नव्हती आणि या भागात नैसर्गिक रित्या फळांची पैदास होणं तेव्हाच्या काळातच काय पण आजही दुरापास्त आहे. जबल - अल - नूर डोंगरही तसे वाळवंटात उभे असलेले टेकड्यांच्या स्वरूपातले डोंगर होते, जे या सगळ्या वर्णनाला अनुसरून नव्हते.

असं असलं, तर साहजिकच इस्लामी अभ्यासकांकडून या सगळ्या दाव्यांवर प्रतिदावेही तपासणं आवश्यक होतं....सौदीच्या काही अभ्यासकांनी त्यांची बाजू मांडताना अनेक अशा गोष्टी पुढे केल्या आहेत, ज्या थेट कुराणातूनच त्यांनीही उचलल्या आहेत. त्यांच्या मते, ' उम अल कोरा ' म्हणजे तटबंदीयुक्त नगर असा सरळ सरळ अर्थ न घेता त्याचा भावार्थ उचलणं जास्त संयुक्तिक व्हायला हवं. नगराची वेस म्हणजेच मक्केची तटबंदी असा त्याचा अर्थ असायला हवा. त्याचप्रमाणे, मक्केला ' हराम ' जागा मानलं जाणं हेही त्यांच्या मते महत्वाचं आहे, कारण नेहेमीच्या व्यापारी मार्गावर सतत कुरबुरी होणं किंवा वस्तूंची देवाण - घेवाण होत असताना इतर धर्माचे - पंथांचे लोक एकत्र येणं टाळता येण्यासारखं नसतं...तेव्हा त्या सगळ्या किचाटापासून दूर असलेल्या जागी असं ' वर्जित ' स्थान वसलं जाणं तर्काला धरून आहे. शिवाय इथे झमझम विहीरही आहेच....

या प्रतिदाव्यांमध्ये ठळकपणे दिसणाऱ्या दोन विसंगती मात्र या अभ्यासकांना समाधानकारकरीत्या सोडवता आलेल्या नाहीत. एक म्हणजे या जागेचं ' सुजलाम सुफलाम ' वर्णन आणि दोन म्हणजे झमझमचं जेरुसलेमपासून असलेलं अंतर. या सगळ्यावर उत्तर म्हणून ते अब्राहम आणि त्याच्या कुटुंबियांना थेट ईश्वराने केलेली मदत या एकमेव गोष्टीचा आधार देतात, पण त्याचा वास्तविकतेशी संबंध नसल्यामुळे ते दावे कपोलकल्पितच जास्त वाटतात. कुराणातच उल्लेखलेल्या इतर अनेक गोष्टींवर डॅन गिब्सन बोट ठेवत या दाव्यांवर उत्तर देतात, तेव्हा मात्र त्यांनी किती सडेतोडपणे आपले मुद्दे अभ्यासलेले आहेत याची प्रचिती येते....पण त्यावर पुढच्या लेखात. तोवर अलविदा !

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इंटरेस्टींग आहे. गोष्टींमधल्या जागा खर्‍या आहेत का? त्या कुठे आणि कशा असतील हे अभ्यासाला नेहमी आवडते. काही झालं की गुगल मॅक काढायचा छंदच आहे आमचा त्यामुळे नक्की वाचणार ही लेखमाला Lol

>>"बेक्का" म्हणजे काय?<<
मलाहि हा प्रश्न पडलांय. इंग्रजीत "मेका" म्हणतात ते ठाउक आहे, पण बेक्का म्हणजे...