मक्का की ' बेक्का ' ? - भाग ०२

Submitted by Theurbannomad on 27 July, 2021 - 08:22

मक्का.

आजच्या इस्लामी जगताचं एकमेव केंद्र. इस्लाम धर्माला मानणाऱ्या १.८ बिलियन ( जागतिक लोकसंख्येच्या जवळ जवळ २४% ) लोकांचं हे सगळ्यात महत्वाचं तीर्थक्षेत्र. इथे ' हज ' यात्रेसाठी दर वर्षी हजारो भाविक जगाच्या कानाकोपऱ्यातून येत असतात, आणि परत जाताना स्वतःच्या नावापुढे ' हाजी ' ही पदवी अभिमानाने लावून घेत असतात. कुराणामध्ये खुद्द इस्लाम धर्माच्या शेवटच्या प्रेषितांनी - मुहम्मद पैगंबरांनी - नेमून दिल्याप्रमाणे दर वर्षी रमझानच्या महिन्यात निर्जळी उपवास करणे, दिवसातून पाच वेळा मक्केच्या दिशेला तोंड करून नमाज पढणे, जकात भरणे, व्याज आकारण्यासारखी सावकारी कामं न करणे अशा अनेक तत्वांचं पालन करणारे मुस्लिम आयुष्यात एकदा तरी मक्केला जाण्याची आस बाळगून असतात.

मक्का हे शहर सौदी अरेबिया या देशाच्या कोरड्या रखरखीत वाळवंटात वसलेलं आहे. पूर्वी सौदी अरेबिया हा देश अस्तित्वात नव्हता तेव्हाही हे शहर - खरं तर गाव - तसंच होतं. जेमतेम ( किंवा नसल्यागतच ) पाऊस, भीषण उष्मा आणि त्याहूनही भीषण थंडी असं कमालीचं विषम हवामान, प्राचीन काळापासून मुख्य वाहतुकीच्या अथवा व्यापारी मार्गाच्या वाटेपासून दूर असलेलं हे शहर एरव्ही कोणाच्या खिजगणतीतही नसतं...पण इथे स्थापन झालेल्या एका महत्वाच्या गोष्टीमुळे या शहराला अतोनात महत्व प्राप्त झालं.

काबा.
काळ्या रंगाचा, चौकोनी आकाराचा, इतिहासात नमूद केल्याप्रमाणे अनेक वेळा भंगलेला आणि पुनर्प्रस्थापित झालेला भाला मोठा पाषाण म्हणजे काबा. या काब्याची महती अशी, की खुद्द पुराणपुरुष अब्राहाम याने अल्लाहच्या आवाहनाला मान देऊन या पाषाणाची स्थापना केलेली आहे...मुस्लिमच नव्हे, तर मुस्लिम धर्म स्थापन व्हायच्या आधीच्या काळातलेही अनेक देव या काब्यावर विराजमान आहेत अशी मुस्लिमांची समजूत आहे. अब्राहमने देवाची आज्ञा शिरसावंद्य मानून 'तोवरची पेगनिझम पद्धत ' - अर्थात बहुदैवत - पूजनाची प्रथा अव्हेरून एकदेवत्वाच्या मार्गावर आपल्या अनुयायांना नेलं अशी समजूत आहे. त्याच्या वंशजांनी पुढे ज्यू, मुस्लिम आणि ख्रिस्ती असे तीन धर्म तयार केले असले, तरी त्या तिन्ही धर्माचं मूळ आहे याच एकदेवत्वाच्या पद्धतीत.

इस्लामलाही मूर्ती, तसबीर, चित्र अशा देवाच्या कोणत्याही ' रूपाचं ' वावडं आहे. देवाचं काय पण खुद्द पैगंबरांच्याही बाबतीत ते थोडे आत्यंतिक भावनेने व्यक्त होतात....पैगंबर प्रेषित असल्यामुळे त्यांचं कोणत्याही स्वरूपातलं चित्रण त्यांना मान्य नाही. मक्केच्या या काब्याच्या आजूबाजूला जी मशीद आहे, तिला ' मस्जिद - ए - हराम ' असं संबोधन आहे. हराम या शब्दाचा अर्थ ' निषिद्ध ' . या मशिदीच्या परिसरात अगदी चुकूनही हिंसा अथवा हत्या होऊ नये, भांडण होऊ नये किंवा कोणत्याही प्रकारचा वाईट विचार मनात येऊ नये असा संकेत गेली अनेक शतकं इस्लामी जगतात पाळला गेलेला आहे....या सगळ्या गोष्टी ' हराम ' म्हणून या मशिदीला हे नाव दिल गेलेलं आहे. इथे काब्याच्या आजूबाजूला अतिप्रचंड प्रदक्षिणा मार्ग तयार केलेला आहे, ज्यावरून अनेक मुस्लिम भाविक या काब्याची प्रदक्षिणा करतात. काब्यावर काळ्या रंगाचा सोनेरी झालर असलेला कपडा अधून मधून चढवला जातो, ज्याला किस्वा म्हणतात. भाविक या किस्व्याचा तुकडा हज यात्रेची आठवण म्हणून सोबत घेऊन जातात.

या काब्याच्या भिंतीवर एक छोटासा दगड वेगळ्याने बसवलेला दिसतो....या दगडाला ' अल - हजारू - अल - अस्वाद ' म्हणून ओळखलं जातं. कुराणात नमूद केल्याप्रमाणे हा दगड प्रत्यक्ष स्वर्गातून ऍडम आणि इव्ह यांच्याबरोबर पृथ्वीतलावर आलेला आहे. याशिवाय काब्याच्या वायव्य दिशेला ' मूळ ' प्राचीन काब्याचा भाग असलेली अर्धगोलाकार बुटकी शुभ्र संगमरवरी भिंतही भाविकांसाठी महत्वाची आहे. काब्याच्या चार कोपऱ्यांना त्या त्या दिशेला असलेल्या पुरातन इस्लामी जगताच्या महत्वाच्या शहरांची नावं दिलेली आहेत. काब्याच्या समोर एका काचेच्या पेटीत खुद्द मूळपुरुष अब्राहमच्या पायाचे ठसे जतन केलेले आहेत. काब्याच्या अंतर्भागात जायचा लाकडी दरवाजा ( जो कधीही उघडला जात नाही ) , काब्यावर पडणाऱ्या पावसाचं पाणी जमिनीवर पाडण्यासाठी केलेली शुद्ध सोन्याची पन्हाळ असे अनेक भाग इथे बघायला मिळतात.

इथे भाविक ज्या पवित्र विहिरीचं - झमझमचं - पाणी सोबत घेऊन जातात ती विहीरही इस्लामी जगतासाठी अतिशय महत्वाची आहे. या विहिरीची कथा अशी - अब्राहमच्या दुसऱ्या बायकोला - हेगर हिला गृहकलहाला कंटाळून अब्राहमने घालवून दिल्यावर ती तिच्या मुलासह वाळवंटात फिरत राहिली , तेव्हा तहानभुकेने व्याकूळ अवस्थेत तिने देवाची करून भाकल्यावर एका देवदूताला तिची दया आली....त्याने जमिनीवर पंख आपटून तिथे पाण्याचा एक स्रोत निर्माण केला. हा स्रोत म्हणजेच झमझम विहीर.

अशा अनेक गूढरम्य आणि सुरस कहाण्यांनी भरलेली आजच्या मक्केची कहाणी ज्या नोंदींच्या आधाराने सांगितली जाते, त्या नोंदी आहेत आजच्या ' कुराण ' नावाने ओळखल्या जाणाऱ्या मुस्लिम जगताच्या सर्वोच्च महत्व प्राप्त असलेल्या धर्मग्रंथात. त्याशिवाय जुन्या काळापासून इस्लामी जगतावर राज्य केलेल्या अनेक राजांनी आपापल्या बखरींमधून त्या त्या काळातल्या अनेक नोंदी लिहून ठेवलेल्या आहेतच....शिवाय तेव्हाच्या काळातल्या अनेक प्रवाशांनी आपल्या बाजूने मक्का आणि इतर इस्लामी जगाबद्दल बरंच काही लिहून ठेवलेलं आहे.

मक्केच्या खालोखाल इस्लामी जगतासाठी पूजनीय असेलली दोन शहरं म्हणजे मदिना आणि जेरुसलेम. मदिना फार प्राचीन काळापासून पश्चिम आणि पूर्व जगतांना जोडणाऱ्या व्यापारी मार्गावरचं महत्वाचं शहर म्हणून प्रसिद्ध होतं. मदिना शहर तसं मक्केपेक्षा सुसह्य...कारण इथे हवामान त्यातल्या त्यात बरं होतं. पाऊस, हिरवळ, समुद्रकिनाऱ्यापासून दीडशे किलोमीटर अंतरावर असल्यामुळे तुलनेने जवळचा समुद्रमार्ग अशा अनेक कारणांनी हे शहर पूर्वापार गजबजलेलं असायचं. प्रेषित मोहम्मद ज्या कुराईश कबिल्याचे होते, तो कबिला मूळचा व्यापारी कबिला असल्यामुळे याच शहरात स्थायिक झालेला होता.

जेरुसलेम या शहराबद्दल कितीही बोललं तरी थोडं ठरेल. ज्यू, इस्लाम आणि ख्रिस्ती अशा तीन महत्वाच्या धर्मांचे उगमस्थान, प्रेषित अब्राहम यांना यहोवा देवतेने खुद्द नेमून दिलेल्या ' पवित्र ' भूमीचा भाग असलेलं शहर आणि कधी काळी इस्लामी जगताच्या लोकांचा ज्या दिशेला तोंड करून नमाज पढायचा संकेत होता, त्या अल - अकसा मशिदीचं स्थान असलेलं शहर म्हणून जेरुसलेम प्रसिद्ध. प्रेषित मोहम्मदांना जिवंतपणे स्वर्गदूताच्या बरोबरीने ' इसरा - अल - मिराज ' नावाने प्रसिद्ध असलेली घटना अनुभवायला मिळाली , तिचा महत्वाचा टप्पा या मशिदीच्या परिसरात पार पडला. इथूनच प्रेषितांना स्वर्गदूताने स्वर्ग आणि नरक या दोहोंचं दर्शन घडवण्यासाठी अवकाशात नेलं असा कुराणात उल्लेख आहे.

या तिन्ही शहरांमध्ये सर्वाधिक महत्व असलेल्या मक्केकडे बघितल्यावर अनेक प्रश्न अभ्यासकांच्या मनात उत्पन्न झाले होते आणि आहेत...आणि त्यांची समाधानकारक उत्तरं मिळवण्यासाठी त्यांचं अखंड संशोधन आजही सुरु आहे.

१. मक्का या इस्लामच्या सर्वाधिक महत्वाच्या शहराचा उल्लेख संपूर्ण कुराणात फक्त एकदा, आणि तोही पुसटसा का आलेला आहे? इतक्या महत्वाच्या शहरावर वास्तविक पुरातन लिखाणांमध्ये भरभरून लिहिलं जायला हवं, पण तसं काहीही आजवरच्या ज्ञात लिखाणांमध्ये का दिसलेलं नाही?

२. अब्राहमच्या घरच्या गृहकलहामुळे हेगरला त्याने घालवून दिलं....ती आपल्या लहान मुलासह वाळवंटात भटकत राहिली...पुढे देवदूताने तिला झमझम विहिरीच्या रूपाने पाणी उपलब्ध करून दिलं या घटना जर सत्य आहेत, तर अब्राहम राहात असलेल्या जेरुसलेम भागापासून झमझमचं अंतर हजार - दीड हजार किलोमीटरचं अंतर तेव्हाच्या काळात हेगरने आपल्या लहान मुलासह कशा पद्धतीने पार केलं असेल? या भागात तेव्हाही रखरखीत वाळवंट होतं आणि कोणताही सूज्ञ मनुष्य या वाळवंटातून तेव्हा प्रवास करायचा टाळत असे.

३. इस्लामी जगताच्या इतक्या महत्वाच्या स्थानासाठी प्रेषितांनी मक्केसारख्या कोरड्या वाळवंटी गावाची निवड का केली असावी?

४. मक्केच्या भागात खाण्यापिण्याचं , पाण्याचं इतकं दुर्भिक्ष्य असूनही कुराणात या परिसराचा उल्लेख ' ऑलिव्ह आणि खजुराची मुबलक झाडं असलेला, पाण्याचे झरे असलेला आणि डोंगरांनी सुरक्षित केलेला परिसर ' असा का आलेला आहे?

५. प्रेषितांच्या मृत्यूनंतर शंभर - दीडशे वर्ष त्यांची शिकवण मौखिक स्वरूपात इस्लामी जगतात शिकवली जाई....पुढे इस्लाममध्ये झालेल्या अंतर्गत युद्धांमध्ये शिया आणि सुन्नी असे दोन पंथ जन्माला आले तेव्हा त्यापूर्वीच्या अनेक हस्तलिखितांची विल्हेवाट लावली गेली. त्यानंतरचा इतिहास ' विजेत्यांनी ' लिहिलेला इतिहास आहे, जो आज आपल्याला ज्ञात आहे. मक्केबद्दलची आज ज्ञात असलेली माहिती कशावरून खरी आहे ?

या सगळ्या प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर डॅन गिब्सन यांनी मक्केचा नव्याने अभ्यास सुरु केला. कुवेतच्या विद्यापीठांमधले अनेक अभ्यासक या कामात त्यांच्या बरोबर सहभागी झाले. पुढे जॉर्डन येथे भरलेल्या एका परिषदेत त्यांनी आपले अनेक निष्कर्ष लोकांसमोर मांडले आणि या प्रश्नांवर अधिक सखोल संशोधन व्हावं अशी आशा व्यक्त केली. साहजिकच काही एकांगी संशोधकांनी या प्रश्नांवर काहूर माजवत बराच गहजब केला, पण बऱ्याच जणांनी गिब्सन यांच्या दाव्यांवर साधकबाधक चर्चाही केली.

पुढच्या लेखांमध्ये डॅन गिब्सन यांनी केलेल्या संशोधनावर प्रकाश टाकत काही नवी तथ्य वाचकांसमोर आणायचा प्रयत्न मी करणार आहे...पण तोवर अलविदा !

aajcha kaaba.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पेट्र हे खरे पवित्र स्थान असून सुरुवातीच्या शतकातल्या सगळ्या मशिदी तिकडे तोंड करून आहेत - असं सांगणारी एक डॉक्युमेंटरी पाहिल्याचं आठवतं आहे. ख खो दे/अ जा. तुम्ही म्हणता ते संशोधन ह्यावरच आहे का?

@ हरचंद पालव
तुम्ही म्हणता आहात ती documentry ज्या संशोधनावर आधारित आहे, तेच डॅन गिब्सन मी माझ्या लेखात उल्लेख केलेले डॅन गिब्सन आहेत. documentry त्यांच्या संशोधनाचा परिपाक आहे. मी माझ्या लेखांमध्ये त्या documentry व्यतिरिक्त अधिकची माहितीसुद्धा देणार आहे.

चला.. कोरस तर जमला. आता धडाधड लेखमाला येऊ द्या. फक्त प्रत्येक लेख थोडा मोठा असावा ही विनंती अन्यथा लेख सुरु होता होता संपला असं व्हायला नको..
छान लिहिता तुम्ही.

अच्छा. डॉक्यूमेंटरी पाहिली असली तरी तुमचे लेख नक्कीच वाचनीय असतात. पुढचे लेख टाकलेले दिसले, ते वाचून काढतो.

पेट्र हे खरे पवित्र स्थान असून सुरुवातीच्या शतकातल्या सगळ्या मशिदी तिकडे तोंड करून आहेत - असं सांगणारी एक डॉक्युमेंटरी पाहिल्याचं आठवतं आहे. >>>

कुठे बघायला मिळेल हा माहितीपट ?

हे पेट्रा किती छान आहे. जॉर्डन मध्ये आहे. माझी मुलगी जेवह छोटा भीम हे कार्टून सिरीयल बघायची तेव्हा जर्नी टु पेट्रा असा एपिसोड होता. त्यात चित्रमय छान वर्णन दाखवले होते. प्रत्यक्षात बघायला पण खूप आवडेल.

I have seen this documentary. There was a designated holy space earmarked around a masjid within which no tribal fights and blood shed could take place.