शृंखला..

Submitted by _आदित्य_ on 25 July, 2021 - 08:17

अंबराला वेड नव्हते व्यर्थ शृंगारायचे..
स्वस्थ बसल्याने परंतु विश्व अंधारायचे !
हीच चिंता खात होती म्हणून माळून चांदणे..
अंबराने ठरविले आता सदा चमकायचे !
त्वरित रचले चंद्र आणिक सूर्य, हेतू हाच कि,
जीवनाने भूतलावर यायचे.. बहरायचे !
संतुलित केला तयाने वेंधळा संसार हा..
जीवजंतूंना कुठे पण भाव हे समजायचे?
मग तयाने भाव पेरून यंत्र अवघे साधले,
मनुज त्याचे नाव ज्याला सर्वही उमगायचे !

खोल दडली रहस्ये अवघी तयाने जाणली,
तोच आहे रचयिता ऐसे तया वाटायचे !
अंबरालाही तयाने नाव 'अंबर' मग दिले,
जीवनातील सत्यही त्याच्या मनी प्रकटायचे !
सर्वगुणसंपन्न तो पण एक अवगुण आढळे,
ह्याच विद्वत्तेमुळे घनदुःख त्याला व्हायचे !
केवढा विध्वंस झाला मूर्ख ह्या प्राण्यामुळे,
तो निसर्गाचीच रचना त्या कुणी सांगायचे?
सृष्टीचा समतोल गेला, वाढते ही शृंखला..
अंबरा रे सांग आता हे कधी संपायचे?
अंबरा रे सांग आता हे कधी संपायचे?

.. आदित्य

Group content visibility: 
Use group defaults

छान

खूपच छान, आदित्य सर! मला तुमच्या सर्व कविता वाचायला फार आवडतात त्यात नेहमीच काही नवीन भेटते... लिहित रहा...